ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणारा ख्रिस्ती समाज हा सुरुवातीच्या काळात ख्रिस्ताच्या नावीन्यपूर्ण संदेशाने व भविष्यात होणाऱ्या प्रभूच्या पुनरागमनाच्या आशेने इतका भारावून गेला होता की, जगात असूनही त्याला जगात नसल्यासारखे वाटत होते. येथेच मठवासी जीवनाचा जन्म झाला. या मठवासी जीवनाचे स्फूर्तिस्थान हे ‘जुन्या करारा’तील संदेष्टे (एलीया) योहान बाप्तिस्टा, यांची जीवनशैली होती. ‘देवाचे गरीब’ या बायबलच्या विचारसरणीने जगणाऱ्या यहुदी-ख्रिस्ती समूहांच्या जीवनशैलीचा प्रभाव मठवासी जीवनावर झालेला दिसून येतो.
या मठवासी जीवनाला ख्रिस्ती धर्मात सुरुवातीपासूनच एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. ‘‘देवराज्यासाठी जो कोणी आपले घरदार, भाऊ-बहिणी, बाप, आई, मुले सोडून माझ्यामागे येतो, त्याला ‘सार्वकालिक जीवन’ हे वतन मिळेल’’ (बायबल, ‘मत्तय’ १९:२१-२९). संसाराचे पाश तोडून टाकण्यासाठी अनेक स्त्री-पुरुषांना ख्रिस्ताच्या वरील वचनापासून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले आहे. संस्कृतीभिन्नतेमुळे या मठवासी जीवनपद्धतीचे ‘पौर्वात्य’ व ‘पाश्चात्त्य’ असे दोन प्रवाह निर्माण झाले.
पौर्वात्य मठवासी जीवन : तिसऱ्या शतकामध्ये ईजिप्त देशात प्राथमिक अवस्थेत मठवासी जीवनाला प्रारंभ झाला. संत अंतोनी हा संन्यासी (Hermit) जीवनाचा प्रवर्तक; तर संत पकोमियस हा मठांचा निर्माता म्हणून ओळखला जातो. आफ्रिकेच्या उत्तरेकडील अलेक्झांड्रियाचा प्रसिद्ध गुरू ओरिजन (इ. स. १८५‒२५४) याने प्रार्थनामय जीवन, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूल्यांचा पुरस्कार केला. संत अंतोनी हा सर्वसंग परित्याग करून सलग २० वर्षे वाळवंटात एकांतवासात राहिला. त्याच्या जीवनाने प्रभावित होऊन त्याचे अनुकरण करण्यासाठी अनेक स्त्री-पुरुष त्याच्या मागे आले. तो त्याच्या अनुयायांचा गुरू झाला. संत पकोमियसने एकांतवासी संन्यासी जीवनाला एक वेगळे वळण दिले. तत्कालीन संन्यासी एखाद्या गुहेत अथवा पर्णकुटीत एक-एकटे राहात असत. त्यांचा एकमेकांशी संपर्क येत नसे. संत पकोमियस ह्याने त्यांना दिवसातून दोन वेळा एकत्र येऊन प्रार्थना करण्याची सोय केली. प्रत्येक संन्यासी शारीरिक कष्टाचे काम करी. ते सर्वजण मठाधिपतीच्या (Abbot) आज्ञेत राहात. बौद्धिक अभ्यास आणि शारीरिक श्रम यांची सांगड त्यांच्या दैनंदिनीत घातली जायची. संन्याशांना एकत्र आणून त्यांच्यासाठी पवित्र बायबलच्या अभ्यासाचे तास घेतले जात असत. ह्या नवीन मठवासी जीवनशैलीचा भावी मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडणार होता. पकोमियस जीवंत असेपर्यंत ७,००० पेक्षा जास्त उमेदवारांनी या जीवनपद्धतीचा स्वीकार केला होता.
मठवासी जीवनाचा प्रसार मध्य-पूर्वेकडील देशांत झपाट्याने होऊ लागला. वाळवंटी प्रदेशांमध्ये संन्यासी मोठ्या संख्येने वास्तव्य करीत होते. कॉन्स्टँटिनोपल (सध्याचे इस्तंबूल) या नगरीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता.
पूर्वेच्या देशांतील मठवासी जीवनातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत बेझील (३३०‒३७९). पॉन्टस येथे त्याने मठवासींची स्वतंत्र वसाहत स्थापन केली. प्रत्येक मठात मठवासींच्या संख्येला ठरावीक मर्यादा घालून दिली. त्यामुळे मठांचे व्यवस्थापन करणे सुलभ झाले. मठासोबत मुलांसाठी शाळा असावी, ही संकल्पना प्रथम बेझील याने मांडली. ह्या अभिनव संकल्पनेचा परिणाम ख्रिश्चन संस्कृतीवर झालेला दिसून येतो. या कामी वाळवंटातील गुरूंनी (Desert Fathers) दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे.
या मठवासी संस्थेने चर्चचे आणि तत्कालीन समाजाचे नेतृत्व करणारे द्रष्टे बिशप देऊन ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. तसेच विविध मठवासी संप्रदायांद्वारे आणि धर्मग्रंथांच्या नक्कला/प्रती तयार करणाऱ्या केंद्राद्वारे संस्कृतीचे जतन करण्यात मोठी मदत झाली आहे.
पाश्चात्त्य मठवासी जीवन : पौर्वात्य देशांत सुरू झालेल्या मठवासी जीवनाचा प्रसार पश्चिमेकडील देशांत होण्यास फारसा वेळ लागला नाही. संत मार्टिन (३१३‒३९७) हा मठवासी होता. त्याने स्थापन केलेल्या मठांमध्ये शेकडो अनुयायांनी प्रवेश घेतला. संत मार्टिन पश्चिम मठवासी जीवनाचा आद्य प्रवर्तक म्हणून ओळखला जातो. नंतर मार्टिनची फ्रान्समध्ये बिशप म्हणून नेमणूक करण्यात आली. फ्रान्स देशाच्या ग्रामीण भागात मिशनरीकार्य करून त्याने अनेकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली.
मध्ययुगीन ख्रिस्ती यूरोपच्या उभारणीमध्ये संत बेनेडिक्ट (इ.स. ४८०‒५४७) हा एक सर्वांत महत्त्वाचा व प्रभावी नेता समजला जातो. मठवासीयांसाठी त्याने तयार केलेली घटना व आचारपद्धती स्त्री-पुरुषांच्या अनेक धर्मसंघांनी (Religions Congregations) प्रमाण म्हणून स्वीकारली आहे. ‘प्रार्थना आणि काम’ (Ora et labora) हे बेनेडिक्टचे लॅटिन भाषेत ब्रीदवाक्य होते. त्याने नम्रता आणि आज्ञाधारकपणा यांवर भर देऊन हे दोन गुण मठवासी जीवनाचे आधारस्तंभ आहेत, याकडे लक्ष वेधले. या सूत्रानुसार मठवासी बंधू दिवसातून सातेकवेळा प्रार्थनेसाठी एकत्र येत असत. त्या वेळी ते बायबलच्या ‘स्तोत्रसंहिता’ या पुस्तकातील स्तोत्रे म्हणत वा गात असत व मनन-चिंतनात वेळ घालवीत (अजूनही ही पद्धत चालू आहे). मधल्या वेळेत ज्यांच्या त्यांच्या कार्यकौशल्यानुसार ठरलेली कामे केली जात. मध्ययुगात या कामाचे स्वरूप त्या काळानुरूप होते. प्रत्येक मठाच्या जमिनी असत. काही मठवासी शेतीवाडीची कामे करीत. काही लोकशिक्षण करीत. काही बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असत. म्हणजेच ज्ञान संपादन करणे व ज्ञानाची जोपासना करणे, वगैरे. त्या काळी छापखाने नव्हते. म्हणून ग्रंथनिर्मिती ही हाताने करावी लागे. या मठवासी बंधूंनी ग्रीक व लॅटिन भाषांतील जुन्या अभिजात (Classical) साहित्याच्या स्वहस्ते प्रती काढून ते साहित्य पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. या मठवासी संस्थेत प्रवेश करण्यासाठी त्याने ‘नवशिष्यांचे प्रशिक्षण’ (Novitiate Training) सुरू केले.
संत बेनेडिक्टने लिहिलेली घटना चर्चच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या आध्यात्मिक दस्तऐवजांपैकी एक म्हणून मानली जाते. सिस्टर्शिअन संघ (Cistercian) आणि ट्रॅपिस्ट संघ (Trapist) यांसारख्या भावी धर्मसंघांसह इतर अनेक धर्मसंघांच्या घटना संत बेनेडिक्टच्या मूळ घटनेवर आधारलेल्या आहेत.
पोप संत ग्रेगरी महान (५४०‒६०५) हे नाव मठवासी जीवनातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. उमराव घराण्याची गर्भश्रीमंतीची पार्श्वभूमी त्याला लाभलेली असूनदेखील ग्रेगरीला बेनेडिक्टच्या मठाचे आकर्षण होते. बेनेडिक्टच्या स्फूर्तीने त्याने अनेक मठांची स्थापना केली. आज्ञाधारकपणा, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या तीन व्रतांचे त्याने स्वत: पालन केले. सन ५९० मध्ये ग्रेगरी या मठवासींची पोप या सर्वोच्च पदावर निवड करण्यात आली.
मठवासी संस्थेच्या प्रवाहात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचाही सुरुवातीपासून सहभाग होता; तथापि त्या मठवासी स्त्रियांची फार थोडी चरित्रे आज उपलब्ध आहेत. देव-धर्म आणि अध्यात्म यांची ओढ स्त्रियांमध्ये अनादी कालापासून उपजतच आहे.
काळाच्या ओघात मठवासी जीवनप्रणालीत अनेक चढ-उतार झाले असले, तरी ती केव्हा थांबली नाही किंवा नष्ट झाली नाही. ह्या जीवनप्रणालीने ख्रिस्तसभेला अनेक संत-महात्मे दिले आहेत आणि देत आहे; तसेच पुष्कळ पोप, बिशप, धर्मगुरू आणि धर्मभगिनीही दिल्या आहेत. मठवासी जीवनप्रणालीने घातलेल्या पायावरच ख्रिस्तसभेमध्ये पुरुषांचे आणि स्त्रियांचे विविध धर्मसंघ उदयास आले.
संदर्भ :
- Garriz, Manuel, A Brief History of the Catholic Church, Anand, Gujarat, 2019.
- Mircea, Eliade, Ed. The Encyclopedia of Religion,Vol. 10, New York, 1987.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया