ख्रिस्ती मठाच्या वरिष्ठाला ‘ॲबट’ असे म्हटले जाते. ॲबट हा शब्द हिब्रू ‘आबा’ या शब्दापासून आला आहे. ‘आबा’ या शब्दाचा अर्थ ‘बाबा’ किंवा ‘पिता’. मठवासी आपल्या मठाच्या वरिष्ठाला ॲबट–फादर–म्हणून स्वीकारतात. ते समस्त मठवासींचा मित्र, तत्त्ववेत्ता व मार्गदर्शक असतात.

ॲबट ह्यांची निवड त्या मठातील साधक बहुमताने गुप्त रीत्या करीत असतात. ज्या मठासाठी त्यांची निवड केली जाते, त्या मठाचा कारभार त्यांना पाहायचा असतो. ॲबट या पदासाठीचा उमेदवार हा ‘दीक्षित धर्मगुरू’ असतो. तो मठवासी त्या संस्थेचा किमान दहा वर्षे तरी सभासद असावा लागतो व वयाने किमान तीस वर्षांचा असावा लागतो. काही मठांत ॲबट यांच्या कार्यकाळाला मर्यादा असते. पण सर्वसाधारणपणे त्यांचा कार्यकाळ तहहयात असतो. वृद्धावस्था व दुर्धर आजार आल्यास ते आपल्या पदाचा राजिनामा देऊ शकतात. ॲबट यांना अधिकृत रीत्या ”राइट रेव्हरंड ॲबट ‘असे संबोधले जाते. पण मठवासी त्यांना ‘फादर ॲबट’ म्हणूनच संबोधतात.

ॲबट हे प्रामुख्याने त्यांच्या मठाचे प्रमुख असतात. शिकविण्याचा व आज्ञा करायचा त्यांचा अधिकार त्यांनी पित्याच्या प्रेमाने अमलात आणायचा असतो. सगळे मठवासी त्यांना केवळ वरिष्ठ किंवा व्यवस्थापक म्हणून मानीत नाहीत, तर त्यांच्यातील कलाकौशल्य हुडकून काढणारा व ती विकसित करणारा सुज्ञ व आस्थेवाईक पालक म्हणूनच समजतात. व्यावहारिक गोष्टी पार पाडत असताना मठवसींनी आध्यात्मिक प्रगती साधावी म्हणून ॲबट दक्ष असतात.

प्रत्येक मठ हा वेगळा व स्वतंत्र असतो. पण बहुतेक मठ हे एका संघाच्या नियमाखाली एकत्र येत असतात. या सांघिक व्यवस्थाचे जे प्रमुख निवडले जातात त्यांना मठाधिपती (Abbot Primate) असे संबोधले जाते.

संदर्भ :

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया