पिलांच्या पालनपोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणाऱ्या सजीवांना परभृत किंवा परजीवी म्हटले जाते. परभृत सजीव ही संकल्पना पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच काही कीटक व मासे यांमध्येही परभृतता आढळते.

गोल्डन आय (ब्युसेफॅला क्लँग्युला)

परभृत म्हणजेच परजीवी पक्षी पिलांच्या पालनासाठी स्वजातीतील किंवा इतर जातीतील पक्ष्यांची निवड करतात. त्यासाठी ते शावक साम्यता म्हणजे पिलांमधील साम्य/साधर्म्य किंवा अंडी साम्यता तंत्र वापरतात. आपल्या अंडी व पिलांचे संगोपन दुसऱ्या पक्ष्यांवर सोपविल्यामुळे घरटी बांधणे, अंडी उबवणे व पिलांचे संगोपन या जबाबदारीतून परभृत पक्ष्यांची सुटका होते. त्यामुळे त्यांना मिळणारा मोकळा वेळ ते खाण्यापिण्यासाठी व वंशवृद्धीसाठी वापरतात. परभृत अवस्थेत असणारा धोका टाळण्यासाठी हे पक्षी एकाच पक्ष्याच्या घरट्यात अंडी न घालता वेगवेगळ्या पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी घालतात. परभृत अवस्थेत ते यजमानाचे (आश्रयदाता; ज्या पक्ष्याच्या घरट्यात आपले अंडे घालायचे आहे असा पक्षी) काही नुकसानही करतात. हे टाळण्यासाठी यजमान बचाव अनुकूलन करतात, तर त्यावर मात करण्यासाठी परजीवीमध्ये प्रतिअनुकुलन उत्क्रांती प्रक्रियेदरम्यान क्षमतेप्रमाणे विकसित होत असते. काही यजमान जागरूक असल्याने परजीवी पक्षास अनुकूलनाद्वारा कार्यभाग साधावा लागतो; तर काही यजमान फारशी तमा बाळगत नसल्याने परजीवी जाती कोणतेही अनुकुलन विकसित करत नाहीत. काही पक्ष्यांच्या जातींत आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त काही नर पक्षी इतरत्र संसार थाटतात आणि अशा तऱ्हेने आधीच्या पिलांच्या संगोपनापासून दूर राहतात. या वर्तनास इंग्रजीत कॉकोल्डरी (Cuckoldry) म्हणजे अनैतिकता म्हणतात. उदा., गोल्डन आय (ब्युसेफॅला क्लँग्युला ; Bucephala clangula) मादी पक्षी आपल्याच जातीतील इतर पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी घालते.

आ. १. परभृत पक्ष्यांनी यजमान पक्ष्यांच्या घरट्यांत घातलेली अंडी

बहुसंख्य परभृत (परजीवी) पक्षी एकाच यजमान जाती कुलामधील पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी घालतात. परजीवी पक्षी सर्वसाधारणपणे एका घरट्यात एकच अंडे घालतात. परंतु, उत्तर अमेरिकेतील तपकिरी डोक्याचा काऊबर्ड मात्र विविध जातींतील २२१ वेगवेगळ्या यजमानांची घरटी वापरतो. अन्यथा इतर काऊबर्ड मादी पक्षी एकाच जातीच्या यजमानांची घरटी वापरतात.

सामान्य कोकिळेचे उदाहरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती कावळा, रेषाळ वटवट्या, डनकॉक इत्यादी विविध जातीच्या पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी घालते.  असे असले तरी प्रत्येक परजीवी मादी ही विशिष्ट यजमान जातीच निवडते. याचे कारण ती ज्या रंगाची अंडी घालते त्या रंगांचे नियंत्रण करणारे जनुक हे फक्त त्या मादीकडेच आनुवंशिकतेने आलेले असतात. ज्यामुळे ती विशिष्ट रंगाची अंडी घालू शकते. काही मादी पक्षी स्वत: ज्या यजमानांच्या घरट्यात वाढलेली असते, त्याच जातीच्या घरट्यात ती अंडी घालत असते.

परजीवी पक्षी यजमान पक्षाचे घरटे कसे निवडतात याच्या स्पष्टीकरणासाठी काही गृहितके मांडली गेली आहेत. त्यापैकी घरटे अधिवासाची निवड व घरट्याची जागा ही दोन गृहितके बऱ्यापैकी शास्त्रीय स्पष्टीकरण देतात.

आ. २. परभृत पक्ष्यांच्या पिलांचे पालनपोषण करताना यजमान मादी पक्षी

घरटे अधिवासाची निवड : बहुसंख्य यजमान पक्षी परजीवींच्या पिलांची काळजी का घेतात, याची कारणे शोधण्याचा वैज्ञानिकांनी प्रयत्न केला आहे. परजीवींची पिले लक्षणीयरित्या आकार व दिसायला यजमानांच्या पिलांपेक्षा अगदी वेगळी असतात. कधीकधी ती यजमान पिलांना मारूनही टाकतात. सदर प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अतिरेकी वर्तन (माफिया) गृहितक मांडले गेले.  परजीवींच्या वर्तनाची दखल घेऊन यजमान पक्षी तो प्रश्न हाताळतो, यावर हे गृहितक आधारीत आहे. म्हणजे यजमान परजीवी पक्ष्याचे अंडे ओळखतो व नाकारतो हे जेव्हा परजीवीच्या लक्षात येते तेव्हा तो यजमानाचे घरटे नष्ट करतो किंवा तोडून टाकतो, ज्यामुळे पिले जखमी होतात किंवा मारलीही जातात. परजीवी पक्ष्याच्या अशा आक्रमक वर्तनामुळे यजमान पक्ष्यावर अप्रत्यक्षरित्या दबाव निर्माण होतो. अंतिमत: अतिरेकी माफिया व नमते घेणारा यजमान यांच्यात सकारात्मक समेट होतो.

उत्तर अमेरिकेतील तपकिरी डोक्याचा काऊबर्ड (मोलोथ्रस एटर ; Molothrus ater) आणि दुसरे म्हणजे युरोपमधील मोठ्या ठिपक्यांची कोकिळा (क्लॅमॅटोर ग्लँडॅरिअस ; Clamator glandarius) ही अतिरेकी पक्ष्यांची दोन प्रसिद्ध उदाहरणे आहेत. मोठ्या ठिपक्यांची कोकिळा तिची अंडी बहुसंख्य वेळा युरोपियन दयाळ पक्षाच्या (पायका पायका ; Pica pica) घरट्यात घालते व नंतर नियमितपणे त्या घरट्याकडे येऊन पहाणी करून जाते. यामुळे दयाळ पक्ष्यावर अप्रत्यक्षरित्या दबाव निर्माण करता येतो.

स्पॅनिश पक्षीतज्ञ सोलेर (Manuel Soler) व इतर पक्षीतज्ञ (१९९०-१९९२) यांनी केलेल्या प्रयोगांवरून दिसून आले की, परजीवी कोकिळेचे अंडे दयाळच्या घरट्यातून मुद्दाम काढून घेतल्यावर ही घरटी मोठ्या प्रमाणावर उद्धवस्त केली गेली. असे करण्यात कोकिळेचा स्वार्थ असा की, दयाळने नवीन घरटे केले की तिला पुन्हा एकदा त्या घरट्यात अंडी घालता येतील व दयाळ पक्ष्याला त्या अंड्यांचे संगोपन नाईलाजाने करावे लागेल. अशाप्रकारे परजीवी पक्षी आपल्या पिलांच्या संगोपनाची जबाबदारी यजमान पक्ष्यांवर टाकतात आणि यजमान पक्ष्यांना स्वत:च्या नव्हे तर दुसऱ्या जातीतील पक्ष्यांच्या पिलांचे संगोपन करावे लागते.

आ. ३. अमेरिकन वारकरी (फुलिका अमेरिकाना)

घरट्याची जागा : या प्रकारात परजीवी कोकिळा यजमान पक्ष्यांचा एक गट निवडून घरट्याची जागा व त्यातील अंड्यांचे आपल्या अंड्याशी असलेले साम्य पाहते. या संभाव्य यजमानांच्या संख्येंचे सर्वेक्षण करून त्यातील एक घरटे आपले अंडे घालण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी निवडते. कोकिळा व दयाळ यांच्या बहुतांश अंड्यांतील साम्य संशोधनातून निदर्शनास आले आहे. हा पुरावा घरट्याची जागा गृहितकाच्या पुष्ट्यर्थ दिला जातो. परंतु, यास फारशी मान्यता मिळाली नाही. कारण घरटे निवडताना कोणते तंत्र वापरले जाते आणि अशी जागा वापरण्यासाठीचे कोणते संकेत आहेत याबद्दल स्पष्टीकरण नाही.

परभृतता टाळण्याचे उपाय : परभृततेचा यजमान पक्ष्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. परभृतता टाळण्यासाठी यजमान पक्षी परभृत पक्ष्यांना आपल्या घरट्याजवळ फिरकू देत नाहीत. त्यासाठी घरट्याची जागा अशी निवडली जाते की, परभृत पक्षी घरट्याजवळ पोहोचू शकणार नाहीत. अंडी उबविण्यासाठी स्वत: सकाळी लवकर अंड्यावर बसणे आणि जेव्हा अंडी घालण्यासाठी परका विजातीय पक्षी जवळ आलाच तर आक्रमकपणे त्याचा प्रतिकार करणे, त्यांना हाकलून देणे इत्यादी प्रकार यजमान पक्ष्यांकडून अवलंबिले जातात.

आ. ४. यजमान पक्ष्याच्या घरट्यातील त्याचेच अंडे घरट्याबाहेर टाकताना परभृत पक्ष्याचे पिलू.

परभृत पक्ष्याने एकदा का घरट्यात अंडे घातले की यजमान जेव्हा बाहेरून परत घरट्यात येतो तेव्हा असे अंडे ओळखून बाहेर काढणे हे काम संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पालकांच्या गुंतवणूक सिद्धांतानुसार यजमान जर परभृताचे अंडे ओळखू शकला तर स्वत:ची अंडी वाचविण्यासाठी काही रक्षणात्मक उपाय करतो. परभृताच्या अंड्यावरील रंग-रचनात्मक ठेवण यांवरून तसेच अंड्यांच्या संख्येत झालेला बदल आदीवरून यजमान पक्षी हे अंडे स्वत:च्या चोचीने घरट्याबाहेर ढकलून देतो. लहान चोचीवाले यजमान पक्षी मात्र अशा अंड्यास चोच मारून फोडतात. अर्थात परभृताच्या अंड्याचे जर यजमानाच्या अंड्यांशी अतिसाम्य असेल तर मात्र कधीकधी यजमान चुकून स्वत:चेच अंडे फोडण्याचा धोका असतो. ज्यांना परभृताचे अंडे बाहेर काढता येत नाही असे यजमान पक्षी स्वत:चे घरटे सोडून देतात आणि नवीन घरटे बांधतात. परंतु, कित्येक वेळा ही उपाययोजना फोल ठरते. कारण ह्या नवीन घरट्यात देखील परभृता आपले अंडे घालू शकते.

आ. ५. कॅटफिश (सिनोडोंटीस मल्टिपंक्ट्याटस)

काही यजमान पक्षी मात्र आपल्या घरट्यातील परभृताचे अंडे ओळखल्यानंतर घरट्याची सुधारीत रचना त्या अंड्यास वगळून करतात. काही वेळा आहे त्या घरट्यावर दुसरे घरटे बांधतात. अमेरिकन वारकरी (फुलिका अमेरिकाना ; Fulica americana) आपल्या घरट्यातून परभृताचे अंडे बाहेर लाथाडून टाकतो किंवा आणखी एक घरटे शेजारीच बांधतो आणि पहिल्या घरट्यातील परभृताच्या पिलांकडे लक्ष न दिल्याने उपासमारीने त्या पिलांचा मृत्यू होतो.

आ. ६. सिक्लिड व कॅटफिश या माशांंमधील परभृतता

पश्चिमी बोनेलीचा वटवट्या (फायलोस्कोपस बोनेल्ली ; Phylloscopus bonelli)  या छोट्या यजमानाच्या घरट्यात जर लहान बनावटीची अंडी ठेवली तर ती काढून टाकली जातात. परंतु, मोठ्या आकाराची बनावट अंडी ठेवली तर मात्र हा यजमान पक्षी स्वत:चे घरटे सोडून जातो. परभृत पक्षी अशी दुसऱ्याच्या घरट्यात अंडी घालत असले तरी त्यातील जवळपास निम्मीच अंडी सुरक्षितपणे उबवली जातात.

अनेकदा यजमान पक्ष्यांना ते दुसऱ्याच्या पिलांचे पालनपोषन करत आहेत याची अजिबात कल्पना नसते. यजमान पक्ष्याची मादी अंडी घातल्यावर थोड्या वेळासाठी बाहेर गेली की परभृता मादी आपले अंडे त्यात घालते. अतिसाम्यामुळे नवे अंडे यजमानास ओळखता येत नाही. उबवणीनंतर अंड्यातून बाहेर पडणाऱ्या तिच्या स्वत:च्या पिलांबरोबर परभृताच्या पिलांचेही संगोपन केले जाते. जेव्हा अन्न कमी मिळू लागते तेव्हा परभृताचे पिलू यजमानाच्या पिलांना मारून टाकते व एकटे अन्नग्रहण करून वाढते. परंतु, अन्न पुरेसे मिळत असेल तर ते यजमानाच्या पिलांसह ते आनंदाने एकत्र राहते. कधीकधी परभृताचे नुकतेच जन्मलेले पिलू यजमान पक्ष्याची अंडी घरट्याबाहेर टाकते (पहा – आ. ४. व दृकश्राव्य फित).

आ. ७. कोकिळ माशी

मासे व कीटक यांच्यामधील परभृतता : सिनोडोंटीस मल्टिपंक्ट्याटस (Synodontis multipunctatus – Cuckoo catfish) जातीचा मासा सिक्लिड (Cichlid) प्रजातीच्या माशांच्या तोंडात आपली अंडी घालतो. सिक्लिड मादी आपली अंडी तोंडामध्ये सुरक्षित ठेवते. सिक्लिड माशाची पिले अंड्यातून बाहेर येण्यापूर्वीच कुकू कॅटफिश माशाची पिले बाहेर पडतात व ती सिक्लिड माशाची अंडी फस्त करतात (आ. २.).

नोमाडा जातीतील कोकिळ माशी (Cuckoo Bee) आपली अंडी दुसऱ्या जातीच्या गांधील माशांच्या घरट्यांत घालते. या माशांना चोरट्या परजीवी माशा (Kleptoparasites) असेही म्हणतात. अशाचप्रकारे इतर काही गांधील माशांमध्येही परभृतता आढळते.

पहा : दृकश्राव्य फित –

https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DHNBc6LrDLA0&psig=AOvVaw2SVvcDCLqYiVLa4DFjufYb&ust=1615369644141000&source=images&cd=vfe&ved=2ahUKEwikmOr_9qLvAhXL7zgGHSz2BhEQhq8BegQIABAQ

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Brood_parasite
  • https://www.nature.com/scitable/knowledge/library/the-ecology-of-avian-brood-parasitism-14724491/

समीक्षक : किशोर कुलकर्णी