अनैच्छिक गर्भधारणा टाळण्याकरिता गर्भस्थ गर्भनिरोधक साधने वापरतात. गर्भपिशवीचे अस्तर आणि स्त्रीबीजनिर्मिती, फलन आणि अस्तरामध्ये गर्भ रूजणे या सर्वांचा अतिशय नाजूक तोल नैसर्गिकरीत्या सांभाळला गेलेला असतो. हे संतुलन ढळले तर गर्भधारणा होण्याची शक्यता अतिशय कमी होते.
फार पूर्वी अरब आणि तुर्की लोक, वाळवंटातून प्रवास करताना, सांडणीच्या गर्भपिशवीमध्ये वाळूचे खडे ठेवत असत. यामुळे दूरवरच्या प्रवासात गर्भधारणेची कटकट टाळता येत असे त्यांचे निरीक्षण होते.
आधुनिक काळामध्ये गर्भस्थ गर्भनिरोधक साधन सर्वप्रथम रिचर्ड रिश्टर (Richard Richter) या जर्मन वैद्याने १९०९ मध्ये वापरल्याचा उल्लेख आहे. वाटोळ्या आकाराचे हे साधन रेशमाच्या किड्यापासून बनवले होते. पुढे अर्नेस्ट ग्राफेनबर्ग (Ernest Graefenberg) यांनी याच वेटोळ्याबरोबर चांदीची तार वापरून नवे साधन बनवले. १९२० च्या दशकात त्याला बरीच लोकमान्यता लाभली. स्वित्झर्लंडमधील झुरिक येथे १९३० मध्ये झालेल्या संमेलनात ग्राफेनबर्ग यांनी आपला शोधनिबंध मांडला. ओटा (Dr. Ota) या जपानी वैद्याने सोने किंवा सोन्याचा मुलामा दिलेली चांदी वापरून काही साधने बनवली होती (१९३४). ‘ओटा रिंग’ या नावांनी ही साधने जपानमध्ये लोकप्रिय होती. लवकरच या दोन्ही साधनांमधील तोटे लक्षात येऊ लागले. मुख्यत्वे वारंवार उद्भवणारी कटिभागातील जंतुलागण हा एक मोठाच तोटा होता. इझ्राएलच्या ओपेनहायमर (Oppenheimer) तसेच जपानच्या ईसिहामा (Isihama) यांनी प्लॅस्टिकच्या रिंग वापरून, तो प्रयोग यशस्वी झाल्याचे मांडले (१९५९). पुढे अमेरिकेतील पॉप्युलेशन कौन्सिल या संस्थेने या संशोधनामध्ये बराच रस घेतला. न्यूयॉर्कमध्ये १९६२ मध्ये या संस्थेने आयोजित केलेल्या गर्भस्थ गर्भनिरोधक साधनांबाबतच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लाझाव्ह मार्ग्युलीस (Lazav Margulies) आणि जॅक लिप्पीस (Jack Lippes) यांनी पॉलिएथिलीन प्लॅस्टिकपासून बनवलेल्या इंग्रजी एस-आकाराच्या गर्भस्थ साधनांबद्दल (लिप्पीस लूप) माहिती मांडली. ही साधने शरीर सहज स्वीकारत होते (Biologically Inert) आणि लवचिक असल्याने अगदी बारीक नळीतून ती गर्भाशयात सोडता येत होती. या आधीच्या साधनांसाठी गर्भाशयाचे तोंड मोठे करावे लागत असे.
तरीही वेदना, रक्तस्राव, साधन बाहेर येणे वगैरे तक्रारी उद्भवत असत. जॅमी झिप्पर (Jamie Zipper) प्रभृतींनी १९६९ मध्ये तांब्याची तार गुंडाळलेले टी अथवा इंग्रजी सात (7) आकाराचे साधन निर्माण केले. यामुळे वरील सर्व प्रश्न सुटले जरी नाहीत, तरी तक्रारींचे प्रमाण खूप कमी झाले.
सुरुवातीला टी कॉपर २०० (यात २०० चौ. मिमी. क्षेत्रफळाची तार गुंडाळलेली असे), मल्टीलोड टी कॉपर २५० (यात २५० चौ. मिमि. क्षेत्रफळाची तार गुंडाळलेली असे) अशी साधने उपलब्ध होती.
दुसऱ्या पिढीच्या साधनात टी कॉपर ३८० ए भारतात विशेष वापरले जाते. यात चांदीच्या तारेला तांब्याचा मुलामा दिलेला असतो (यात ३८० चौ. मिमी. क्षेत्रफळाची तार गुंडाळलेली असते). यामुळे परिणामकारकता वाढून उपद्रवी परिणाम आणखी कमी झाले आहेत.
यानंतर संप्रेरके असलेली साधने आता उपलब्ध आहेत. या साधनात तांब्याऐवजी संप्रेरके असतात. (उदा., लिव्होनॉरजेस्ट्रेल). रोज गर्भपिशवीत अत्यल्प प्रमाणात ती स्रवत राहतात. आता गर्भपिशवीत अडकून बसणारी साधने देखील निघाली आहेत.
वापर : अवांच्छित संतती टाळण्यासाठी गर्भस्थ गर्भनिरोधक साधने ही सुरक्षित असली, तरी देखील विशेषत: भारतीय स्त्रियांमध्ये या साधनांचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. गर्भस्थ गर्भनिरोधक साधने आणि त्यांच्या वापराबाबतच्या माहितीचा अभाव, गैरसमज, भीती इत्यादी कारणांमुळे गर्भस्थ साधनांना नापसंती दर्शविली जाते.
गर्भनिरोधक परिणाम कसा साधला जातो : गर्भस्थ साधने बसवली की अनेक कारणांनी गर्भधारणा टळते.
तांब्याच्या तारेतून किंचित प्रमाणात तांब्याचे आयन (Ions) बाहेर पडत असतात. या आयनांमुळे पुरुषबीजांची हानी होते. तसेच गर्भाशय आणि ग्रीवेतील अनेक स्राव बदलतात. हे बदल गर्भधारणेला अनुकूल नसतात. परकी वस्तू गर्भाशयात आल्याने गर्भाशयाला सौम्य सूज येते. आतील अस्तर तसेच स्राव बदलतात. उदा., प्रोस्टाग्लॅंडिनचे (Prostaglandins) प्रमाण वाढते तसेच बहुरूपी पेशी (Polymorph cells), बृहत् पेशी (Giant cells), महाभक्षी पेशी (Macrophage) वगैरे प्रकारच्या पेशींचे प्रमाण वाढून तिथे पोहोचणारी स्त्री व पुरुषबीजे नष्ट केली जातात. प्रोस्टाग्लॅंडिनचे प्रमाण वाढल्याने अस्तरातील आवश्यक बदल विस्कळीत होतात आणि फलन जरी झाले तरीही गर्भ रूजणे अवघड होते. यामुळे शरीरसंबंध आल्यावर पाच दिवसापर्यंत जरी असे साधन गर्भाशयात बसवले तरीही त्याचा गर्भनिरोधक म्हणून उपयोग होतो. तांब्यामुळे बीजवाहक नलिकेतून बीजाचा प्रवास झपाट्याने होतो आणि वेळेआधीच बीज गर्भाशयात पोहोचते.
लिव्होनॉरजेस्ट्रेल (Levonorgestrel) यासारख्या संप्रेरकांमुळे अस्तर सदैव पातळ आणि गर्भधारणेला प्रतिकूल राहते.
गर्भस्थ साधने केव्हा बसवता येतात : (अ) पाळी आल्यापासून पुढे दहा दिवसांपर्यंत, (आ) संबंध आल्यापासून पुढे पाच दिवसापर्यंत, (इ) नैसर्गिक गर्भपात झाल्यावर अथवा अवांच्छित गर्भ काढून टाकल्यावर, (ई) प्रसूतीपश्चात.
गर्भस्थ साधने केव्हा टाळायला हवीत : कटिशोथ अथवा कटिशूल असेल, संभाव्य गर्भधारणा असेल, गर्भपिशवीचे गुल्म (Fibroid) अथवा जन्मजात दोषांमुळे आतील पोकळी योग्य आकाराची नसेल, पाळीत अतिरक्तस्राव होत असेल, कर्करोगाची शक्यता असेल, विल्सन रोग असेल तर अशा परिस्थितीत गर्भस्थ गर्भनिरोधके टाळायला हवीत.
गर्भस्थ साधनांची परिणामकारकता, फायदे व तोटे : परिणामकारकता : सर्वसाधारणपणे शंभर स्त्रियांनी ही साधने वापरण्यास सुरुवात केली, तर वर्षअखेरीस एखाद्या स्त्रीला दिवस राहू शकतात. म्हणजेच ९९% स्त्रियांना गर्भधारणा होत नाही.
फायदे व तोटे : गर्भस्थ गर्भनिरोधक साधने बसवण्याचा खर्च अत्यल्प असून ही साधने एकदा बसवल्यानंतर ती ३—१० वर्षे (दीर्घ काळापर्यंत) काम करतात. प्रत्यक्ष शरीरसंबंधात निरोधसारखी ही साधने बाधा आणत नाहीत. या साधनांचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसतात. साधन काढून टाकताच पुन्हा लगेचच दिवस जाऊ शकतात, असे यांचे फायदे आहेत.
गर्भनिरोधनाकरिता औषधांचा देखील वापर करण्यात येतो. परंतु यामुळे डोकेदुखी, मळमळ, मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे, स्तन जड होणे इत्यादी दुष्परिणाम होतात. गर्भस्थ गर्भनिरोधक साधने वापरल्यामुळे असे कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे ही साधने फायदेशीर ठरतात.
साधने बसवण्यास लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ, सुमारे १०% महिलांमध्ये होणारा अतिरक्तस्राव, वेदना, जंतुबाधा, गर्भपिशवी बाहेर गर्भधारणा आणि साधन गळून जाण्याची शक्यता हे विशेष तोटे आहेत.
गर्भस्थ गर्भनिरोधक साधने वापरण्याची पद्धती सुरक्षित, किफायतशीर व दीर्घकाळ परिणाम देणारी असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा दिली जाते.
पहा : आपत्कालीन गर्भनिरोधन; विल्सन रोग.