भारतीय उपखंडाच्या आणि विशेषत: भारताच्या दृष्टीने हिमालय पर्वताला भौगोलिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय, सामाजिक, पर्यटन, धार्मिक, भूराजनैतिक, संरक्षण आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिम-पूर्व दिशेत पसरलेली हिमालयाची उत्तुंग पर्वतश्रेणी हे भारताला लाभलेले मोठे वरदान आहे. प्राचीन काळापासून भारतातील ऋषी-मुनींच्या तपश्चर्येचे हे प्रमुख केंद्र होते व आहे. हिमालयामुळेच मध्य आशियाई संस्कृतीच्या अतिक्रमणापासून भारतीय संस्कृतीचे वेगळेपण बराच काळपर्यंत टिकून राहिले आहे. सामाजिक दृष्ट्याही भारताचे वेगळेपण स्पष्ट दिसते. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हिमालय ही भारताला निसर्गत: लाभलेली संरक्षक भिंत किंवा सीमा आहे. उत्तर सरहद्दीवर तटासारखा भक्कम उभा असलेल्या हिमालयामुळे प्राचीन काळापासून भारतावर उत्तरेकडून परकीय आक्रमणे झालेली नाहीत; कारण आक्रमकांना सहजासहजी हा पर्वत पार करता येऊ शकत नाही. भूतकाळात हिमालयाने भारताचे संरक्षण केलेले आहे; परंतु आज युद्धपद्धतीत अमूलाग्र बदल झालेले आहेत. त्यामुळे आता हिमालयाची प्रचंड भिंत भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने पुरी पडणारी नाही. भारताची बहुतांश उत्तर सीमा चीनशी निगडित आहे. अलीकडच्या काळात विस्तारवादी चीनकडून भारत-चीन (तिबेट) दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल-एलएसी) वारंवार उल्लंघन करून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून अनेकदा संघर्षाची, तणावाची व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-चीन युद्धात (१९६२) चीनने भारताचा भूप्रदेश बळकावला. तो अक्साई चीन म्हणून ओळखला जातो. १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान यांदरम्यान लडाखमध्ये कारगील युद्ध झाले होते. भारतीय लष्कराने त्यावर यशस्वी मात करून विजय मिळविला. या युद्धातील शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ २६ जुलै हा या युद्धाचा ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. इ. स. २०१७ मध्ये भारत-चीन सरहद्दीवर डोकलाम येथे विवाद निर्माण झाला होता. भारत-चीन सरहद्दीवरच गलवान खोऱ्यात एल.ए.सी.चे चीनने उल्लंघन केल्याच्या कारणावरून १५-१६ जून २०२० रोजी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. पंगाँग सरोवर प्रदेशातही चीनच्या आडमुठेपणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेशाच्या उत्तर सरहद्दीवरही चीनच्या कुरापती चालू असतात.
हिमालयाचा भारताच्या हवामानावर फार मोठा परिणाम झाला आहे. त्यादृष्टीने हिमालयाची उंची, लांबी व दिशा लाभदायक ठरली आहे. बाष्पयुक्त नैर्ऋत्य मोसमी वारे हिमालय पर्वतरांगांना अडत असल्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात आणि हिमालयात भरपूर वर्षण होत असते. ते शेतीसाठी उपयुक्त ठरते. हिमालयामुळेच हिवाळ्यात मध्य आशियाकडून वाहत येणाऱ्या अतिशीत वायूलहरींपासून भारताचे संरक्षण झाले आहे. हिमालयाचा जो आणि जसा विस्तार आहे तो तसा नसता, तर कदाचित संपूर्ण भारतीय उपखंड वर्षणाअभावी शुष्क आणि ओसाड बनले असते. तसेच हिवाळ्यात मध्य आशियाकडून दक्षिणेकडे येणाऱ्या अतिशीत वायूलहरींपासून भारताचे संरक्षण झाले नसते. अलीकडच्या हवामानशात्रीय अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे की, हिमालयामुळेच झोतवाऱ्याच्या (जेट स्ट्रीम) दोन शाखा होतात. त्यामुळे भारतीय भूमीवरील नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचे आगमन सुलभ होते. परिस्थितीकीय दृष्टीनेही हिमालयाला खूप महत्त्व आहे. विविध परिसंस्थांचे अस्तित्व हिमालयात आढळते.
हिमालय हा उत्तर भारतातून वाहणाऱ्या असंख्य नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. तेथील बहुतेक सर्वच प्रमुख नद्या हिमालयात उगम पावतात. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे, तर उन्हाळ्यात हिमालय पर्वतश्रेणीतील हिमक्षेत्र आणि हिमनद्यांचे बर्फ वितळल्यामुळे नद्यांना वर्षभर भरपूर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हिमालयीन नद्या बारमाही बनल्या आहेत. त्यामुळे जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती आणि जलवाहतुकीसाठी या नद्या उपयुक्त ठरतात. धरणांच्या उभारणीसाठी अनेक आदर्श ठिकाणे तेथे आढळतात. याच नद्यांनी हिमालयातून खणन करून वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे जगातील सर्वाधिक सुपीक मैदानांपैकी एक असलेले उत्तर भारतीय विस्तृत व सुपीक मैदान तसेच त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. सुपीक व सखल जमीन आणि मुबलक पाणीपुरवठा यांमुळे या मैदानी प्रदेशात कृषिविकास चांगला झाला आहे.
हिमालयापासून भारताला अनेक आर्थिक लाभ होत असतात. विस्तृत अरण्ये व गवताळ प्रदेश, खनिज संसाधनांचे साठे, मशागतयोग्य सुपीक मृदा, जलविद्युतशक्ती निर्मितीची प्रचंड संभाव्यता ही हिमालयातील प्रमुख संसाधने आहेत. समृद्ध वनसंपदेतून लाकूड आणि वेगवेगळी वनोत्पादने मिळतात. विविध औषधी वनस्पती हिमालयात सापडतात. येथील अरण्यांत सिंकोना, इपिकॅक, सर्पगंध यांसारख्या असंख्य औषधी वनस्पती विपुल प्रमाणात सापडतात. त्यामुळे विशेषत: आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या दृष्टीने हिमालयाला महत्त्व आहे. चहा हे हिमालयातील मळ्याच्या शेतीतील सर्वाधिक महत्त्वाचे उत्पादन असून दार्जिलिंग आणि आसाम त्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. सफरचंद, संत्री, अलुबुखार, द्राक्ष, सप्ताळू, चेरी, विविध कवचफळे (उदा., अक्रोड, बदाम इत्यादी), विविध प्रकारची मृदु फळे इत्यादींच्या बागा या परिसरात आहेत. केशर हे काश्मीर खोऱ्यातील विशेष मत्त्वाचे उत्पादन आहे. कुरणांच्या भागात पशुपालन व्यवसाय चालतो. विविध उपयुक्त प्राणी येथे सापडतात. उदा., कस्तुरी मृग. लाकूड, राळ (रेझिन), लोकर, रेशीम, प्राण्यांची कातडी व चामडी, फळे इत्यादींच्या मुबलक उपलब्धतेमुळे अरण्ये, प्राणी आणि उद्यानशेतीवर आधारित उद्योगांच्या विकासास येथे फार मोठा वाव आहे; परंतु प्रत्यक्षात अशा उद्योगांचा हिमालयीन प्रदेशात अगदी अल्प विकास झालेला आहे. दगडी कोळसा, जलोढीय सोने, चांदी, तांबे, इंद्रनील मणी, जस्त, सिसे, लोह खनिज, निकेल, कोबाल्ट, अँटिमनी, टंगस्टन, चुनखडी, जिप्सम, बॉक्साइट, अभ्रक, ग्रॅफाइट, गंधक, टाकणखार, मॅग्नेसाइट इत्यादी खनिजांचे साठे हिमालयात आहेत. विलोभनीय सृष्टीसौंदर्य आणि आल्हाददायक हवामान यांमुळे असंख्य पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाणे आणि तीर्थक्षेत्रे हिमालयात आढळतात. त्यामुळे हिमालयीन प्रदेशात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
समीक्षक : नामदेव गाडे