पार्श्वभूमी : १९४७, १९६५ आणि १९७१ या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. १९८६ सालापासून सियाचीन हिमनदाच्या ताब्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पाकिस्तानचा सियाचीन हिमनदाचा ताबा घेण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. जर पाकिस्तानने हा ताबा घेतला असता, तर काराकोरम खिंडीपर्यंतचा भूभाग पाकिस्तानच्या आधिपत्याखाली आला असता. सियाचीन हिमनदाचा भूभाग वेगळा पाडून गिळंकृत करण्यासाठी या भूभागाच्या दक्षिणेकडील प्रदेशावर ताबा मिळवणे आणि द्रास-लेह रस्त्यावर स्वतःचा प्रभाव पाडून भारताच्या सामरिक हालचाली खंडित करणे, हे तंत्र सामरिक दृष्ट्या पाकिस्तानच्या फायद्याचे ठरणार होते. परंतु १९९८ साली दोन्ही देशांनी त्यांच्या आण्विक चाचण्या यशस्वीपणे केल्या होत्या. त्यामुळे उघडउघड लढाई करण्याचे पाकिस्तान टाळीत होता. पण पाकिस्तान जुन्या ‘घुसखोरी तंत्रा’चा वापर करून सियाचीनचा प्रश्न हाताळण्यासाठी उत्सुक होता.

‘टायगर हिल्स’वर तिरंगा ध्वज फडकवून विजयोत्सव साजरा करताना भारतीय सैनिक

ऑक्टोबर १९९८ मध्ये दोन वरिष्ठांना डावलून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना सरसेनापतिपद बहाल केले होते. मुशर्रफ आणि आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना) या दोहोंच्या दृष्टीने काश्मीर प्रश्न प्रज्वलित राहणे आवश्यक होते. काश्मीर खोऱ्यातील आयएसआयच्या कारवायांना भारतीय सुरक्षा दलांनी लगाम घातल्याने एका नवीन भागात कुरापत काढण्यासाठी पाकिस्तानकडून कारगिलची निवड करण्यात आली होती. कारगिल भागात घुसखोरी केल्याने पाकिस्तानचे दोन उद्देश साध्य होणार होते. एक म्हणजे, काश्मीरचा प्रश्न नव्याने धुमसणार होता आणि दुसरे म्हणजे, कारगिलमधील घुसखोरीमुळे सियाचीनचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार होती.

द्रासची (उंची सु. १०,००० फूट) व कारगिल १६,००० फूट. या भागांत विशेषत: ऑक्टोबर ते मे दरम्यान कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे काही निमित्तमात्र टेहळणी चौक्या ठेवून तिथे तैनात असलेल्या भारतीय १२१ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या सर्व तुकड्या हिवाळ्यात मागे घेण्याचा रिवाज १९७१ पासून चालत आला होता. पाकिस्तानसुद्धा तसेच करीत असे. हा प्रदेश युद्धजन्य हालचालींसाठी अवघड आणि हिवाळ्यात सैनिकी कारवाईसाठी कठीण असल्यामुळे सैन्य मागे घेणे हे गैर नव्हते.

अल्-बदरची मोहीम : सियाचीनमधील भारताने आपल्यावर केलेल्या सरशीचे उट्टे काढण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही द्रास ते बटालिक या भागात भारताच्या नकळत मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून सनसनाटी निर्माण करायची आणि काश्मीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणायचा, हा मुशर्रफ यांचा मुख्य हेतू होता. ऑक्टोबरमध्ये पदग्रहण केल्यावर लागलीच मुशर्रफ यांनी ‘ऑपरेशन अल्-बदर’ या मश्को ते बटालिकमधील १४० किमी. लांबीच्या टप्प्यात घुसखोरीच्या कारवाईचे हुकूम सोडले. ऑक्टोबर १९९८ ते मार्च १९९९ या कालावधीत पाकिस्तानकडून ताबारेषेपर्यंत रस्त्यांची डागडुजी केली गेली. खेचरांसाठी पायवाटा बनविण्यात आल्या. पुरवठातळ उभे करून त्यांच्यात जड शस्त्रास्त्रे, खाण्यापिण्याचे पदार्थ, दारूगोळा, बर्फातील बूट इत्यादींचा साठा करण्यात आला. दूरध्वनीच्या तारा लागल्या. ताबारेषेच्या सान्निध्यात ८ ते १० हेलिपॅड बनविण्यात आली. बर्फातल्या बुटांचे सु. पन्नास हजार जोड परदेशातून खरेदी करण्यात आले. ऑक्टोबर १९९८ नंतर पुढे आणलेल्या जड तोफा स्कर्दूत ठेवण्यात आल्या.

पाकिस्तानकडून १९९९च्या जानेवारी आणि फेब्रुवारी यांच्या पूर्वार्धात प्रथम टेहळणी पथके (रेकी पार्टी) पाठविण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये नॉर्थ लाइट इन्फन्ट्रीच्या पलटणीच्या तुकड्यांनी आगेकूच केले. रसद, दारूगोळा आणि हत्यारे पुढे आणण्यास आरंभ झाला. मश्को ते बटालिक या टापूत ताबारेषेच्या आत कुठे चार-पाच, तर कुठे सात-आठ किमी.पर्यंत अनुरूप डोंगरमाथ्यांची आणि पठारांची निवड करून त्यांवर ठाणी उभारण्यात आली. प्रत्येक ठाण्यात ४० ते ६० पाकिस्तानी सैनिकांच्या तुकड्या तैनात झाल्या. या ठाण्यांना मशीनगन, रॉकेट लाँचर, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर, मॉर्टर, विमानविरोधी तोफा आणि विमानांवर अचूक मारा करणारी (अफगाणिस्तानातून पळविलेली) स्टिंगर ही अत्याधुनिक प्रक्षेपणास्त्रे देण्यात आली. भूसुरुंग पेरण्यात आले. १९९८-९९चा हिवाळा सौम्य असल्यामुळे हे काम सुकर झाले. काश्मीर स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने पेटलेल्या काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांची ही कामगिरी आहे, असे भासविण्यासाठी नॉर्थ लाइट इन्फन्ट्रीच्या सैनिकांना सलवार-कमीजचा पेहराव दिला गेला. वास्तविक जीनिव्हा तत्त्वप्रणालीचा आणि सैनिकमूल्यांचा हा भंग होता.

युद्धाचे एक दृश्य

पाकिस्तानचे अनुमान आणि योजना : पाकिस्तानच्या कारगिलमधील आक्रमणाचा निर्णय सात अनुमानांवर आधारलेला होता. पहिले, १९९८ मध्ये उभय देशांनी जाहीरपणे घोषित केलेल्या अण्वस्त्रसज्जतेच्या छायेत या चढाईला सशस्त्र प्रतिसाद देण्यात भारत डगमगेल. दुसरे, तरीही लढाई झाली, तर काही वेळातच आंतरराष्ट्रीय दबावामुळे ती संपुष्टात येईल. तिसरे, चीनची भूमिका पाकिस्तानधार्जिणी असेल. चौथे, भारतातील संमिश्र सरकारचा प्रतिसाद दुबळा असेल. पाचवे, भारत सरकारने युद्धाची व्याप्ती वाढविली, तर ते आंतरराष्ट्रीय समुदायाचा रोष ओढवून घेईल. सहावे, काश्मीर खोऱ्यात युद्धाने जर्जर झालेली सेना असमर्थ ठरेल. सातवे, इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कारवाईला जगभर सहानुभूती मिळून काश्मीर प्रश्नाचा जगभर बोलबाला होईल. त्यांच्या दुर्दैवाने पाकिस्तानने गृहीत धरलेले हे व इतर सारेच आडाखे फार चुकीचे ठरले.

सुमारे सात-आठ किमी. रुंद आणि १४० किमी. लांब म्हणजे हजार ते बाराशे चौरस किमी. प्रदेश हडप करण्यात पाकिस्तान यशस्वी झाला असता, तर ती सफलता लक्षणीय ठरणार होती. पाकिस्तानच्या नियोजित कारवाईचे तीन टप्पे असावेत. पहिला, ताबारेषेच्या दक्षिणेच्या काही डोंगरसरीवर ताबा; दुसरा, श्योक नदीच्या पात्रामागे आक्रमण करून नूब्रा खोऱ्यावर नियंत्रण, त्यायोगे सियाचीन आणि लडाख यांमधील भारतीय लष्कराची कोंडी; तिसरा, लेहकडे किंवा झोजिला खिंडीपार पश्चिमेस काश्मीरच्या बाजूस या मोहिमेचा विस्तार आणि श्रीनगर‒लेह मार्गावरील भारताच्या सैन्यदलाचा संपर्क तोडणे.

भारताच्या हेरयंत्रणेचे अपयश : अल्-बदर मोहिमेची तयारी १९९८पासून चालू झाली, तरी तिची चाहूल मे १९९९च्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतीय यंत्रणांना लागू नये, ही एक अक्षम्य त्रुटी होती. परदेशात माहिती गोळा करणे हे ‘रॉ’चे, सीमेपार शत्रूच्या हालचाली मिळविणे हे इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी)चे आणि सीमेलगत जातीने टेहळणी करणे हे मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय)चे काम असते. रॉ आणि आयबीला मिळालेले अनेक वेगवेगळे धागेदोरे विणून शत्रूच्या आक्रमणाचे आगामी निदान करण्यात भारतीय हेरयंत्रणा अयशस्वी ठरली. या अवघड प्रदेशात आणि प्रतिकूल वातावरणात शत्रू मोठ्या प्रमाणात हालचाली करू शकणारच नाही, अशा दोषयुक्त मनोग्रहाखाली लष्कर गाफील राहिले.

भारतीय सैन्याच्या हालचाली : १९९८-९९च्या सौम्य हिवाळ्यामुळे एका बाजूस पाकिस्तानची घुसखोरी सुकर झाली, तर दुसऱ्या बाजूस रिवाजानुसार जूनमध्ये बर्फ वितळण्यास सुरू होण्याऐवजी मे १९९९ मध्येच वितळल्यामुळे त्याची वाट पाहात असलेल्या येथील मेंढपाळांना काकसर आणि बटालिक यांमधील डोंगरदर्‍यांत पाकिस्तानी सैनिक मोर्चे बांधत असलेले दिसले. ४ मे रोजी मेंढपाळांकडून ही बातमी भारतीय सैन्याला मिळाल्यावर चक्रे वेगाने फिरू लागली. काश्मीर खोऱ्यातच बंडखोरांविरुद्ध कार्यरत असलेल्या ८ माउंटन डिव्हिजनला तातडीने कारगिल विभागात हलण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि क्रमाक्रमाने २१ मे १९९९ पर्यंत पूर्ण डिव्हिजन तेथे पोहोचली. पाकिस्तानच्या घुसखोरीबाबत २५ मेच्या दिल्ली येथे भरलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

युद्धादरम्यान शस्त्र खांद्यावर वाहून नेणारे भारतीय सैनिक

भारतापुढील पर्याय आणि आव्हाने : पाकिस्तानी मोर्चे मोक्याच्या जागांवर उभारलेले होते आणि ते सभोवतालच्या प्रदेशावर निरीक्षण आणि प्रभुत्वाने परिपूर्ण होते. सरळसोट कडे, दुर्गम पायवाटा, सात-आठ हजार फूट शत्रूच्या नजरेखाली चढून जाताना होणारी दमछाक, अंगावर जड कपडे, पाठीवर शस्त्र, दारूगोळा आणि खाण्याच्या सामानाचे अवजड वजन हे सगळे पेलत दुर्गम पर्वतराजींच्या शिखरांवर ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानी मोर्चांवर हल्ला चढविणे व सुसज्ज घुसखोरांना ताबारेषेमागे रेटणे ही कष्टसाध्य, खडतर कामगिरी होती आणि त्यासाठी  अमाप इच्छाशक्ती आवश्यक होती.

भारतासमोर मुख्यत: दोन पर्याय होते. पहिला, ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरा, काश्मीरमध्ये वा इतरत्र आक्रमणाकरवी पाकिस्तानी प्रदेश काबीज करून कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकिस्तानला भाग पाडणे. भारताने १९७१ नंतर सिमला कराराचे काटेकोरपणे पालन केले होते. भारताने आता ताबारेषा ओलांडणे म्हणजे पाकिस्तानी खोडसाळपणाचे समर्थन करण्याजोगे होते. जर ताबारेषा न ओलांडता या घुसखोरांना मागे रेटता आले, तर भारताच्या नैतिक तत्त्वांना पुष्टी मिळाली असती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा लाभला असता; परंतु डोंगराळी प्रदेशातील कणखर मोर्चांवर समोरून हल्ले चढविणे ही हाराकिरी सैनिकी डावपेचांच्या सर्व सिद्धांतांविरुद्ध होती. यासाठी हाडामांसाची किंमत द्यावी लागली असतीच; परंतु त्याला वेळ लागला असता आणि अपयशाची दाट शक्यता होती. त्याउलट, पाकिस्तानवर इतरत्र हल्ला चढविल्यास नुकत्याच अण्वस्त्रसज्ज झालेल्या दक्षिण आशियात अण्वस्त्रयुद्धाची संभावना निर्माण झाली असती. दोन्ही बाजूंनी भारत कचाट्यात सापडला होता. निर्णय घेण्याची जबाबदारी वाजपेयी सरकारवर होती. सर्व बाजूंचा सारासार विचार करून पंतप्रधान वाजपेयींनी पहिला पर्याय निवडला. एका बाजूला ताबारेषा न ओलांडण्याच्या नैतिक निर्णयाकरवी आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवायचा आणि पाकिस्तानवर घुसखोरी मागे घेण्यासाठी दबाव आणायचा. दुसऱ्या बाजूला लष्करी सर्वस्व पणाला लावून पाकिस्तानच्या घुसखोरीचा धुव्वा उडवायचा. ही द्विस्तरीय रणनीती अवलंबण्याचे वाजपेयींनी ठरवले. यात प्राणहानीची जोखीम होती; परंतु आपल्या लष्करावर पंतप्रधानांचा दृढ विश्वास होता. या नीतीचा भारताने निग्रहाने आणि परिणामकारक रीत्या पाठपुरावा केला.

अटीतटीच्या लढाया : पाकिस्तानी मोर्चाबंदीचे प्रामुख्याने दोन विभाग होते. पहिला द्रास-मश्को विभाग आणि दुसरा बटालिक विभाग. द्रास विभागात पाकिस्तानने टोलोलिंग, पॉइंट ४७००,  पॉइंट ५१४०, पॉइंट ४५९०, टायगर हिल वगैरे वेगवेगळ्या डोंगरसरींवर आपली ठाणी उभारली होती (पॉइंट ५१४० म्हणजे ५१४० मीटर उंचीचा डोंगरमाथा). बटालिक विभागात जुब्बार आणि खालुबार डोंगरसऱ्यांवरील वेगवेगळ्या उंचवट्यांवर त्यांनी ठाणी उभारली होती.

द्रास विभागात सर्वांत प्रथम टोलोलिंगच्या मोर्चावर हल्ले चढविण्यात आले. १५०० फूट उंचीच्या या बलवत्तर आणि भक्कम ठाण्यावरून शत्रू महामार्गावर परिणामकारक गोळीबार करू शकत होता. हे ठाणे सर्वांत प्रथम काबीज करणे आवश्यक होते. हे काम १८ ग्रिनेडिअर्स या पलटणीला देण्यात आले. २२ मे रोजी चढाई सुरू झाली; परंतु टोलोलिंग माथ्याच्या वाटेतील या पॉइंट ४५९०वरून त्यांच्यावर शत्रूचा अचूक गोळीबार होऊ लागला आणि पुढे जाणे अशक्य होऊन बसले. त्यानंतर अनेक हल्ले अयशस्वी झाले. विशेषेकरून शत्रूचा एक बंकर (बरबाद बंकर) कमालीच्या मोक्याच्या स्थानावर होता. तब्बल वीस दिवस शत्रूने भारतीय तुकड्यांना पुढे येऊ दिले नाही. ११-१२ जून रोजी बोफोर्स तोफा उघड्यावर आणून त्यांतून बरबाद बंकरवर थेट मारा करण्यात आला. हे एक निर्णायक वळण होते.

नेम धरून येणारा गोळीबार खंडित झाल्यावर २ राजपुताना रायफल्स, जॅकरिफ आणि १८ गढवाल या तीन पलटणींनी तीन वेगवेगळ्या दिशांनी पॉइंट ५१४०वर एकाच वेळी हल्ला चढवून ते सर केले. त्यात कॅप्टन विक्रम बात्रा यांनी दाखविलेला पराक्रम व नेतृत्वासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर १८ गढवालने २८ जूनला खंबीर झुंज देऊन पॉइंट ४७००वर ताबा मिळविला. त्याच्या पाडावानंतर ‘टायगर हिल’ या शत्रूच्या सर्वांत मातब्बर आणि संरक्षणफळीचा गुरुत्वमध्य असलेल्या कणखर ठाण्यावर १८ ग्रिनेडिअर आणि ८ शीख या दोन पलटणींनी ३/४ जुलैला हल्ला चढविला आणि रोमांचकारी लढतीनंतर ते सर केले. या लढाईत ग्रिनेडिअरच्या योगेंद्रसिंग यादव या जवानाला परमवीर चक्राने गौरविण्यात आले. ‘टायगर हिल’ हा पाकिस्तानचा सर्वांत महत्त्वाचा बालेकिल्ला होता. तो कोसळल्यानंतर मुशर्रफांचे धाबे दणाणले. त्यानंतर पॉइंट ४८७५वर पुन्हा १३ जॅकरिफ, १७ जाट आणि २ नागा या पलटणींनी हल्ला चढविला. एका घनघोर चकमकीनंतर ते ठाणे भारतीय लष्कराच्या हातात पडले. त्या दरम्यान कॅप्टन विक्रम बात्रा धारातीर्थी पडले. १३ जॅकरिफचा रायफलमन संजयकुमार यांना त्यांच्या अचाट पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

बटालिक विभागात २९ मे रोजी १ बिहारने जुब्बार ठाण्यावर हल्ला चढविला. पण तो यशस्वी झाला नाही. शेवटी अनेक करारी प्रयत्नांनंतर तब्बल एक महिन्यानंतर ७ जुलैला ते ठाणे त्यांच्या हातात आले. याचबरोबर खालुबार डोंगरसरीवरील ठाण्यावर १/११ गोरखा रायफल्स (१/११ जी. आर.) आणि १२ जॅक लाइट इन्फन्ट्री (जॅक एल. आय.) या दोन पलटणींनी २५ मेपासून हल्ले सुरू केले. ७ जुलैपर्यंत सर्व ठाणी त्यांच्या हातात पडली. खालुबारवरील २-३ जुलैच्या रात्री १/११ गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट मनोज पांडे यांच्या उत्तुंग मर्दुमकीसाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च सैनिकी सन्मान प्रदान करण्यात आला.

युद्धाचे एक दृश्य

सफेद सागरची मोहीम : भारतीय लष्कराच्या चढाई करणाऱ्या तुकड्यांवर डोंगराच्या कडेकपारीतून अचूक गोळाफेक करणाऱ्या पाकिस्तानी मोर्चाचे प्राबल्य क्षीण करण्याचा आणि त्यांच्यावर परिणामकारक भडिमार करण्याचा एक मार्ग होता. तो म्हणजे लढाऊ विमानांचा उपयोग; परंतु एकतर त्यामुळे शत्रूच्या वायुसेनेला आमंत्रण व आव्हान दिल्यासारखे झाले असते आणि दुसरे म्हणजे आपल्याच प्रदेशात शत्रूच्या मोर्चावर मारा करण्यासाठी विमानांचा उपयोग हा नवीन पायंडा ठरला असता. त्याचबरोबर उंच डोंगरांच्या कडेकपारीतील मोर्चांवर लढाऊ विमाने चालविणे कठीण होते. तरीही या घटकांना न जुमानता वायुसेनेचा वापर करायचा लक्षणीय निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि २६ मेला प्रथमच वायुसेनेची विमाने कारगिलच्या आसमंतात अवतरली. त्यानंतर मिग‒२१ बिझ, मिग‒२३ बी एन, मिग‒२७ एम, मिग‒२९ बी आणि शेवटी मिराज–२००० या लढाऊ विमानांनी, तसेच एमआय‒१७ हेलिकॉप्टर्सनी जवळजवळ ३४०० उड्डाणे करून पाकिस्तानी घुसखोरांच्या नाकीनऊ आणले. यात भारताने दोन मिग‒२७ आणि एक एमआय‒१७  हेलिकॉप्टर गमावले. मर्यादित युद्धात वायुसेनेचा नियंत्रित स्वरूपात उपयोग हा एक अभूतपूर्व आणि अनोखा प्रयोग होता. वायुसेनेने आपल्या अलौकिक कामगिरीने विलक्षण प्रभाव पाडला.

पाकिस्तानची माघार : पराभवाची चिन्हे दिसू लागताच नवाझ शरीफ यांनी भारतीय पंतप्रधानांना बोलणी करण्यासाठी भेटण्याची विनंती केली. घुसखोरी मागे घेतल्याशिवाय बोलण्यास साफ नकार मिळाल्यावर त्यांनी ३० जूनला चीनकडे धाव घेतली; पण चीनच्या पंतप्रधानांनी ताबारेषेला मान देऊन या संघर्षाची सांगता करण्याचा सल्ला त्यांना दिला. शेवटी ४ जुलैला टायगर हिलचा बालेकिल्ला पडल्यावर शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्याकडे धाव घेतली. वॉशिंग्टनमध्ये चर्चेपश्चात आपल्या सैन्याला कोणत्याही अटीशिवाय ताबारेषेच्या मागे घेण्याचे त्यांनी कबूल केले.

११ जुलैला दोन्ही देशांच्या लष्कराच्या अती वरिष्ठ कारवाई संचालकांमध्ये (डीजीएमओ) बैठक होऊन १६ जुलै १९९९ पर्यंत सर्व घुसखोर (हे पाकिस्तानी लष्कराचे सदस्य नव्हते, असा अजूनही केविलवाणा अट्टाहास करत) परत जातील, याची शाश्वती देण्यात आली आणि या प्रत्याघाताचे सूप वाजले.

उपसंहार : कारगिल हा पाकिस्तानचा हिमालयीन प्रमाद होता. त्याचे सर्व आडाखे चूक ठरले होते. मुशर्रफ यांनी शरीफ यांना अंधारात ठेवून हे दु:साहस केले (असे नवाज़ शरीफ म्हणतात, पण ते सर्वथा बरोबर नसल्याचा पुरवा आहे). सुरुवातीला जरी त्यांना डावपेची यश मिळाले, तरी सामरिक रणनीतीत भारतापुढे ते तोकडे पडले. भारतीय सेनादलांच्या शौर्य, निग्रह आणि व्यावसायिक कौशल्याचा हा विजय होता. प्रारंभी अपयशाचे संपूर्ण यशात रूपांतर करणारा हा कारगिल संग्राम सैनिकी इतिहासात सदैव अजरामर राहील.

संदर्भ :

  • पित्रे, शशिकान्त, डोमेल ते कारगिल, पुणे, २०००.
  • मलिक, व्ही. पी. कारगिल, नवी दिल्ली, २००६.

                                                                                                                                                                     समीक्षक – प्रमोदन मराठे

प्रतिक्रिया व्यक्त करा