भारतीय उपखंडातील तसेच तिबेटच्या पठारावरील हवामानावर हिमालयाच्या पश्चिम-पूर्व विस्ताराचा आणि अधिक उंचीचा फार मोठा परिणाम झालेला आहे. हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या भागांतील हवामानात व पर्जन्यमानात बरीच तफावत आढळते. पश्चिमेपेक्षा पूर्व भागातील हवामान अधिक उबदार आणि आर्द्र असते. उत्तर आणि दक्षिण भागांतील हवामानातही बरीच तफावत निर्माण झाली आहे. अधिक उंचीमुळे हिवाळ्यात उत्तरेकडून मध्य आशियातून वाहत येणारे खंडीय अतिशीत वारे हिमालयाला अडतात. हिमालय ओलांडून ते दक्षिणेकडे येऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतीय उपखंडाचे या अतिशीत वाऱ्यांपासून संरक्षण झाले आहे. त्यामुळे हिमालयाच्या उत्तरेकडील हवामानापेक्षा दक्षिणेकडील हवामान अधिक उबदार असते. हिमालयामुळेच भारतीय भूमीवर मोसमी प्रकारचे हवामान स्थिरावत असते. दक्षिणेकडील हिंदी महासागरावरून वाहत येणाऱ्या बाष्पयुक्त नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गातील हिमालय पर्वताला अडलेल्या वाऱ्यांपासून उत्तर आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस तसेच हिमवृष्टी होते. याउलट, हिमालयाच्या उत्तरेकडील तिबेटचे पठार पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्यामुळे तेथे पाऊस अतिशय कमी पडतो. परिणामतः तेथे ओसाड हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात हिमालयात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्जन्यमान आणि पर्जन्याचा कालावधी कमीकमी होत जातो. पूर्व हिमालयीन भागात ते सर्वाधिक, नेपाळमध्ये मध्यम तर, तेथून पश्चिमेकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरमध्ये आणखी कमीकमी होत गेले आहे. मेघालयातील खासी टेकड्यांत असलेल्या चेरापुंजी व मॉसिनराम येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे सुमारे १,१४३ सेंमी. व १,१८७ सेंमी. असून इ. स. ऑगस्ट १८६० ते इ. स. जुलै १८६१ या एका वर्षात येथे जगातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्याची (२,६४६.७ सेंमी.) नोंद झालेली आहे. ही दोन्ही ठिकाणे जगातील सर्वाधिक पर्जन्याची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. हिमालयाच्या दक्षिण उतारावर असलेल्या दार्जिलिंग येथे ३०५ सेंमी., शिमला शहर व मसूरी शहर येथे सुमारे १५३ सेंमी. आणि हिमाद्रीच्या उत्तर भागातील काश्मीरमधील स्कार्डू, गिलगिट व लेह येथे केवळ ८–१५ सेंमी. पाऊस पडतो. मध्य आशियातील ताक्लामाकान व गोबी वाळवंटाच्या निर्मितीस हिमालय पर्वताचे स्थान कारणीभूत ठरले आहे.
हिवाळ्यातील हवामानात उंचीनुसार तफावत आढळते. पर्वताच्या पायथ्यालगतच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय हवामान, तर अधिक उंचीच्या भागात कायमस्वरूपी हिम व बर्फाच्छादन आढळते. सुमारे ६०० मी. उंचीपर्यंतच्या सखल खोऱ्यांमध्ये उष्ण व आर्द्र हवामान आढळते. त्यानंतर सुमारे २,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात क्रमाक्रमाने शीतलता वाढत जाते. सुमारे ३,००० मी. उंचीपर्यंतच्या भागात थंड हवामान, तर त्यानंतरच्या हिमरेषेनंतरच्या प्रदेशात आर्क्टिक ते ध्रुवीय प्रकारचे हवामान आढळते. दक्षिणाभिमुख उतार अधिक सूर्यप्रकाशित व अधिक पर्जन्याचे असतात. हिवाळी ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात सुमारे ३,००० –५,००० मी. उंचीच्या प्रदेशात अतिशय वेगाने वारे वाहतात. रोहतांग खिंडीत तर ती ओलांडताना माणूस किंवा मेंढीसुद्धा वाऱ्याबरोबर उडून जाऊ शकेल, इतके वेगवान वारे असल्याचे सांगितले जाते. हिवाळ्यात मध्य कटिबंधीय पश्चिमी वारे हिमालयाच्या पश्चिम भागात अधिक सक्रिय असतात. त्यांच्याबरोबरच येथे आवर्तीय न्यूनभार प्रदेश तयार होतो. हा प्रदेश पश्चिमेकडे सरकत जातो. आग्नेयीकडून येणारे उबदार वारे या प्रदेशाला मिळाल्यानंतर येथे आर्द्रतेचे प्रमाण वाढते. सीरस व सीरोक्युम्युलस प्रकारच्या ढगांची निर्मिती होते. तेथे निर्माण होणाऱ्या या वातावरणीय स्थितीला पश्चिमी विक्षोभ (न्यूनभार) असे म्हणतात. यामुळे येथील कमी उंचीच्या भागात अल्प प्रमाणात पाऊस पडतो, तर अधिक उंचीच्या प्रदेशात हिमवृष्टी होते. काही वेळा त्यांच्याबरोबर येथे ब्लिझर्ड ही हिमवादळे निर्माण होतात. त्यांमुळे हवाई वाहतुकीत अडथळे येतात व अधिक उंचीवरील खिंडी वाहतुकीस बंद होतात. न्यूनभार तीव्र असल्यास तुफान वृष्टी होते. पश्चिमी विक्षोभाची तीव्रता पूर्वेकडे कमीकमी होत जाते.
हिमालयातून वाहणाऱ्या नद्या वेगवान असल्यामुळे त्या क्वचितच गोठतात. तिबेटकडील उतारापेक्षा भारताकडील उतारावरील हिमनद्या बऱ्याच कमी उंचीपर्यंत आढळतात. उत्तरेकडील भागात सस.पासून ४,५७५ मी.पर्यंत, तर दक्षिणेकडील उतारावर त्या सामान्यपणे ३,५०५ मी.पर्यंत खाली उतरतात. भारताकडील बाजूपेक्षा तिबेटकडील बाजूवर हिमरेषा बरीच उंचावर आहे; कारण तेथे हिमवृष्टी अधिक होते. दक्षिणाभिमुख उतारावर हिमरेषा सस.पासून ४,७२५ मी.वर, तर उत्तरेकडील तिबेटच्या पठारावर ती ६,१०० मी. उंचीवर आढळते. पश्चिम भागात हिमरेषा कमी उंचीवर, तर पूर्व भागात ती जास्त उंचीवर आहे. काश्मीरमध्ये सामान्यतः सस.पासून १,६०० मी. उंचीपर्यंत हिमवृष्टी होतच असते.
समीक्षक : माधव चौंडे