पर्यटन हा हिमालय पर्वतीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायामुळे असंख्य स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हिमालयातील उत्तुंग हिमाच्छादित शिखरे, थंड व आल्हाददायक हवामान, थंड हवेची ठिकाणे, तीर्थक्षेत्रे, सरळ उभे कडे, खोल दऱ्या, खळखळाट करीत वाहणाऱ्या नद्या, हिमनद्या, घनदाट अरण्ये, विविध फुलाफळांनी बहरलेल्या वृक्षवल्ली, नयनरम्य सृष्टिसौंदर्य इत्यादी हिमालयाचे नैसर्गिक वैभव पाहण्यासाठी व त्यांचा निखळ आनंद घेण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांत जातात. त्याशिवाय प्राचीन काळापासून येथील प्रसिद्ध असलेली तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांनाही मोठ्या संख्येने भाविक भेटी देत असतात.

भारताच्या उर्वरित भागात जेव्हा तीव्र उन्हाळा असह्य होत असतो, तेव्हा हिमालयातील हवामान थंड व सुसह्य असते. त्यामुळे उन्हाळ्यात येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. अलीकडच्या काळात स्केटिंग, स्कीइंग यांसारख्या बर्फावरील खेळांचा आनंद लुटण्यासाठी हिवाळ्यातही हौसी लोकांची वर्दळ वाढताना दिसते. कुलू, मनाली, डलहौसी, धरमशाला, शिमला, मसूरी, नैनिताल, रानीखेत, दार्जिलिंग, धौलाधार, चक्राता, चंबा, श्रीनगर, गंगटोक, अलमोडा, मिरिक इत्यादी प्रसिद्ध गिरिस्थाने हिमालयात आहेत. काश्मीरचे खोरे, गुलमर्ग, पहलगाम, खज्जियार (फुलांचे खोरे) ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. कैलास, मानसरोवर, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, ज्वालामुखी, पशुपतिनाथ, गंगोत्री, यम्नोत्री, मणिकरण, वैष्णोदेवी, उत्तरकाशी, ज्वालाजी इत्यादी हिंदूंची पवित्र धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रे हिमालयात आहेत. हेमिस, बोधनाथ, स्वयंभूनाथ, थ्यांगबोचे, लाचेन, तवांग येथे बौद्ध मठ आहेत. अलीकडच्या काळातील वाढत्या पर्यटनाबरोबर प्रदूषण व पर्यावरणविषयक समस्या हिमालय परिक्षेत्रात निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या शाश्वत विकासाची गरज निर्माण झाली आहे.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम