मोहन, नरेंद्र : (३० जुलै १९३५). भारतीय साहित्यातील सुप्रसिद्ध हिंदी कवी, नाटककार आणि समीक्षक. त्यांचा जन्म अविभाजित भारतातील लाहोर येथे झाला. प्राथमिक शिक्षण लाहोर येथेच झाले. भारताच्या विभाजनानंतर ते लाहोर येथून अमृतसरच्या शरणार्थी शिबिरात वास्तव्यास होते. वर्षभराच्या आजारामुळे त्यांचे शिक्षण खंडित झाले. नंतरच्या काळात दहावी आणि पुढील शिक्षण त्यांनी अंबाला येथून घेतले. हिंदी साहित्य हा विषय घेवून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले (१९५८). पंजाब विद्यापीठातून त्यांनी आधुनिक हिंदी कविता या विषयावर संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली (१९६६). दिल्ली येथील खालसा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी त्याच्या व्यावसायिक कार्याचा शुभारंभ केला. भारतीय लेखक संघटन या अखिल भारतीय स्तरावरील संघटनेचे महासचिव आणि अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
महाविद्यालय जीवनातच त्यांच्या कविता विविध नियतकालिकातून प्रसिद्ध होत होत्या. त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : कवितासंग्रह – इस हादसे में (१९७५), सामना होणे पर (१९७९), एक अग्निकांड जगह बदलता (१९८३), हथेली पे अंगारे की तरह (१९९०), संकट दृश्य का नही (१९९३), एक सुलगती खामोशी (१९९७), एक खिडकी खुली है अभी (२००६), निले घोडे का सवार (२००८), रंग आकाश मे शब्द (२०१२); नाटक – कहे कबीर सुनो भाई साधो (१९८८), सोंगधारी (१९८८), कलंदर (१९९१),अभंगगाथा (२०००), मिस्टर जिन्ना (२००५), हद हो गई, यारो (२०१०), मलिक अंबर (२०११); आत्मपर ललित – साए से अलग (२०१०), फ्रेम से बाहर आती तस्बिरे (२०१०), साथ साथ मेरा साया (२०१२) ; समीक्षा – आधुनिक हिंदी कविता मे अप्रस्तुत विधान (१९७२), कविता की वैचारिक भूमिका (१९७८), शास्त्रीय आलोचना से विदाई (१९९१), समकालीन कविता के बारे मे (१९९४), रचना का सच (१९९६) इत्यादी.
नरेंद्र मोहन यांची कविता हा विरोध, उपहास आणि संवेदना आणि विचार यांचा एक विनटलेला बंध आहे. त्यांची कविता फाळणी दरम्यानचा भारत ते भारतातील स्वातंत्र्यानंतर घडून आलेले विविध आंदोलने या काळाचे प्रखर आणि उद्विग्न असे चित्र उभे करते. त्यांच्या कविता ही रुपकांद्वारा अभिव्यक्त होते, ते त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जगण्याला लाभलेले आधुनिक संदर्भ लक्षात घेवून त्यांनी त्याच्या नाटकांची मांडणी केली आहे. नाट्यातला स्थायीभाव हा कसलाही असला तरी नाटकातील प्रत्येक पदाला सृजनात्मक स्वरूप त्यांनी दिले आहे. भारतभर त्यांच्या वैचारिक आणि प्रयोगशील नाटकांना प्रसिद्धी मिळाली आहे. कवितेप्रमाणे नाटकातही ते उपरोधिक आणि विचार भावानेच व्यक्त होतात. समीक्षा हा त्यांच्या लेखन कृतीतला महत्वाचा घटक. शिक्षण क्रमापासून ते संशोधन करत असल्याने मेहनती बरोबरच साहित्यातील सूक्ष्मतम घटक त्यांनी त्यांच्या समीक्षेतून वाचकासमोर मांडले आहेत.
नरेंद्र मोहन यांना त्यांच्या साहित्य कार्याबद्दल अनेक स्तरावरून गौरविण्यात आले आहे. कृती सन्मान (१९७६, पंजाब), साहित्य अकादेमी पुरस्कार (१९७८), अखिल भारतीय सन्मान (१९७८), उत्तर प्रदेश हिंदी सन्मान संस्थान (१९८०), शिरोमणी साहित्यकार पुरस्कार (१९९५, पंजाब), सर्वश्रेष्ठ नाटककार पुरस्कार (२००८) अशा पुरस्कारांचा त्यात समावेश होतो.