साहनी, भीष्म : (८ ऑगस्ट १९१५ – ११ जुलै २००३). ख्यातनाम हिंदी साहित्यिक. रावळपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे जन्म. शालेय शिक्षण रावळपिंडीत. लाहोरच्या ‘गव्हर्नमेंट कॉलेज’मधून ते पदवीधर झाले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून इंग्रजी ह्या विषयात एम्. ए. झाले (१९३७) व चंडीगढ येथील पंजाब विद्यापीठाची पीएच्.डी. मिळवली (१९५८). तत्पूर्वी ते दिल्लीत १९५० मध्ये अध्यापन करीत होते. पुढे ते प्राध्यापक झाले आणि नंतर अध्यापन सोडून त्यांनी पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले. नई कहानीयाँ  या नियतकालिकाचे ते संपादक होते (१९६५–६७).

त्यांची मातृभाषा पंजाबी असली, तरी त्यांनी हिंदीतून लेखन केले. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच ते कथालेखन करू लागले. भाग्यरेखा (१९५३), पहला पाठ (१९५६), भटकती राख (१९६६), पटरिआं (१९७३), वांग चू (१९७८), शोभायात्रा (१९८०) आणि निशाचर (१९८३) ह्यांसारख्या त्यांच्या कथासंग्रहांतून कथेच्या रचनाकौशल्यावरील त्यांचे प्रभुत्व दिसून येते. त्यांच्या काही कथांचा– उदा., ‘चीफ की दावत’ आणि ‘अमृतसर आ गया है’–हिंदी साहित्यातील उत्कृष्ट कथांमध्ये समावेश होतो. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा गुलाल का खेल  ह्या नावाने प्रसिद्घ झालेल्या आहेत. तमस (१९७४) आणि बसंती (१९७८) ह्या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या मानल्या जातात. तमस मध्ये पंजाबमध्ये झालेल्या जातीय दंगलीचे भीषण चित्र त्यांनी सूचक व प्रभावी शैलीत उभे केले आहे. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ ह्या नीतीवर, तसेच पंजाबमधल्या सर्वच जातींमधील बूर्झ्वा उच्चभ्रू मंडळींच्या संधिसाधू वृत्तीवर त्यांनी ह्या कादंबरीतून प्रखर प्रकाश टाकला आहे. ह्या कादंबरीवर आधारित दूरदर्शनवरील मालिकाही गाजली. साहनी हे त्यांच्या बालपणापासून मुस्लिमांच्या निकट संपर्कात होते व त्यातूनच जीवनाकडे व साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन दृढमूल होत गेला. परिणामी स्वातंत्र्याच्या उदयाबरोबरच रावळपिंडीत उसळलेली जातीय दंगल व विद्वेषाचा वणवा, हिंसा व रक्तपात पाहून त्यांना जबर धक्का बसला. ह्या घटनांचे पडसाद व त्यांच्या मनावर झालेला त्याचा खोल परिणाम तमस मधून प्रकटला आहे. काइट्स विल फ्लाय ह्या नावाने ह्या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर झाले आहे. त्यांनी तीन नाटकेही लिहिली आहेत. फानूस (१९७७), कबिरा खडा बाझारमे (१९८१) आणि माधुरी (लेखन १९८२). यांपैकी फानूस हे जास्त लोकप्रिय झाले.

त्यांनी इंग्रजीतही लेखन केले आहे. त्यांचे वडीलबंधू व प्रसिद्घ अभिनेते बलराज साहनी यांचे त्यांनी लिहिलेले बलराज माय ब्रदर (१९८१) हे इंग्रजी चरित्र उल्लेखनीय आहे. काही वाङ्‌मयीन स्वरूपाचे लेखही त्यांनी इंग्रजीत लिहिले आहेत. त्यांना संस्कृत, उर्दू, पंजाबी आणि रशियन भाषाही चांगल्या अवगत होत्या. त्यांनी रशियन भाषेतून सु. पंचवीस ग्रंथ हिंदीत अनुवादिले आहेत. त्यांत टॉलस्टॉयच्या वस्क्रिसेनियेचा (इं. शी. ‘रेसरेक्शन’) समावेश आहे. १९५७ ते १९६३ ह्या काळात ते मॉस्कोत होते. तेथे ‘ फॉरिन लँग्वेजीस पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशनसंस्थेत अनुवादक म्हणून त्यांनी रशियन भाषेतून हिंदीत अनुवाद करण्याचे कार्य केले. यशपाल, अमरकांत व कमलेश्वर ह्यांसारख्या हिंदी साहित्यिकांच्या, तसेच नवतेज सिंग आणि गुरदयाल सिंग ह्यांसारख्या पंजाबी साहित्यिकांच्या कथांचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले. साहित्य अकादेमीच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य होते (१९९३–९७).

बलराज साहनींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मुंबईच्या ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ मध्ये (इप्टा) काम केले. साहित्यिक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभले. १९७५ मध्ये तमसला साहित्य अकादेमीचा तसेच उत्तर प्रदेश सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांना पंजाब शासनातर्फे ‘शिरोमणी लेखक’ पुरस्कार मिळाला (१९७५). त्यांच्या फानूस  ह्या नाटकाला मध्य प्रदेश कला साहित्य परिषदेचा पुरस्कार दिला गेला (१९७५). आफ्रो आशियाई लेखक संघाचा ‘लोटस’ पुरस्कार त्यांना १९८० मध्ये मिळाला. तसेच ‘सोव्हिएट लँड नेहरू अवॉर्ड’ देऊन (१९८३) त्यांना सन्मानित केले गेले. त्यांना ‘पद्मभूषण’ किताब १९९८ मध्ये मिळाला.

संदर्भ :

  • https://bharatdiscovery.org/india