आमोणकर, किशोरी : (१० एप्रिल १९३१ – ३ एप्रिल २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायिका. त्यांच्या जन्म मुंबई येथे झाला. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व माधवदास भाटिया यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. किशोरीताईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील बालमोहन व प्रार्थना समाज या शाळांमध्ये झाले. त्यानंतर जयहिंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.
उस्ताद अल्लादियाखाँ मोगूबाईंना गायनाची जी तालीम देत असत तिचा खोल संस्कार बालवयातच किशोरीताईंवर झाला. १९३९ साली पती माधवदास यांचे निधन झाल्यावर मोगूबाईंवर स्वत: अर्थार्जन करून तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. मात्र मोगूबाईंनी आपल्या कन्येस जयपूर घराण्याची शिस्तशीर तालीम दिली. मोगूबाईंशिवाय बाळकृष्ण पर्वतकर, आग्रा घराण्याचे अन्वर हुसेन खाँ, जयपूर घराण्याचे मोहनराव पालेकर, भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर व अल्पकाळासाठी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, शरदचंद्र आरोलकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. निवृत्तीबुवा सरनाईक यांचेकडूनही काही बंदिशी त्या शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती. उपजत कुशाग्र सांगीतिक सौंदर्यबुद्धी व अपेक्षित असणारी सांगितिक अभिव्यक्ती स्वत:च्या गळ्यातून साकारण्यासाठीचा अट्टाहास यामुळे किशोरीताईंनी अल्पवयातच रागगायनात व ख्याल, ठुमरी, भजन अशा गानप्रकारात प्राविण्य मिळवले. संत साहित्याचे – विशेषत: संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचे – त्यांनी वाचन-मनन केले.
१९५५ साली किशोरीताईंचा विवाह रविंद्र आमोणकर यांच्याशी झाला. त्यांना बिभास व निहार ही दोन मुले.
१९६० च्या दशकात आजारपणामुळे घ्याव्या लागलेल्या सक्तीच्या विश्रांतीकाळात त्यांनी सांगीतिक चिंतन करून वारशाने मिळालेल्या जयपूर गायकीला एक निराळे परिमाण दिले. मूलत: बिकट तानक्रिया व अनवट, जोड रागांवर भर देणाऱ्या गायकीस संथ आलापचारीसारख्या अन्य घटकांद्वारे त्यांनी अधिक विस्तृत, भावाविष्कारी केले. व्याकरण व घराण्याच्या शिस्तीच्या चौकटीतून स्वत:स मुक्त करून बुद्धी व भावना यांना चालना देणारा गायकीचा घाट त्यांनी समृद्ध केला. काही प्रसंगी ठराविक रागांत त्यांनी विशुद्ध जयपूर गायकीचे दर्शन घडविले; मात्र त्यांचा विशेष भर स्वनिर्मित गायकीकडेच राहिला. एच्. एम्. व्ही. ने १९६७ साली काढलेल्या त्यांच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतील जौनपुरी, पटबिहाग या रागांमध्ये त्यांना माईंकडून मिळालेल्या तालमीतील जयपूर घराण्याचे शिस्तशीर गायन दिसते. मात्र त्यानंतर १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या राग, भूप व बागेश्रीच्या लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांमध्ये त्यांची स्वतंत्र विचाराने परिवर्तित झालेली ‘भाववादी’ गायकी दिसते.
किशोरीताईंनी त्यांच्या गायकीच्या ढाच्यास त्यांना अपेक्षित असलेली अभिव्यक्ती करणाऱ्या अनेक भावपूर्ण बंदिशींची सौष्ठवयुक्त रचना केली. उदा., भूप (प्रथम सूर साधे, सहेला रे, मै तेरी रे), यमन (मो मन लगन लागी, तोसे नेहा लागा), बागेश्री (बिरहा ना जरा, आज सह्यो ना जाए बिरहा, एरी माई साजन नही आये), नंद (आजा रे बालमवा), खंबावती (रे निर्मोही सजना), हंसध्वनी (गणपत विघनहरन, आज सजनसंग मिलन, तराना), ललितबिभास (चलो री सखी सौतन घर जैये), अहिरभैरव (नैनवा बरसे) इत्यादी. तसेच आनंदमल्हार (बरसत घन आयो), सावनमल्हार (रे मेघा ना बरसो) हे रागही त्यांनी निर्माण केले आहेत.
गीत गाया पत्थरोंने (१९६४) या हिंदी चित्रपटासाठी किशोराताईंनी पार्श्वगायन केले. त्यांनी गायलेल्या ‘हे श्यामसुंदरा राजसा’ व ‘जाईन विचारित रानफुला’ (गीत-शांता शेळके व संगीत-हृदयनाथ मंगेशकर) या भावगीतांची एच्. एम्. व्ही. ने काढलेली ध्वनिमुद्रिका रसिकप्रिय झाली (१९६८). किशोरीताईंनी मराठी नाट्यसंगीतास आपल्या मैफलीत क्वचित अपवादात्मक स्थान दिले, मात्र रणजीत देसाई लिखित तुझी वाट वेगळी (१९७८) या एका मराठी नाटकासाठी त्यांनी संगीत दिले होते. गोविंद निहलानी दिग्दर्शित दृष्टी (१९९०) या हिंदी चित्रपटास त्यांनी संगीत दिले. तसेच त्यांनी स्वरबद्ध केलेली व गायलेली हिंदी भजने (म्हारो प्रणाम, घट घट में पंछी बोलता) व मराठी अभंग (रंगी रंगला श्रीरंग, पडिले दूर देशी) यांच्या ध्वनिफितीही विशेष गाजल्या. त्यांच्या आवाजात व्यंकटेशसहस्रनाम, राघवेंद्रस्वामींची कानडी भजने (१९८८) ध्वनिमुद्रित झाली आहेत.
मंगेश पाडगावकरलिखित व पु. ल. देशपांडे यांनी संगीत दिलेल्या बिल्हण या आकाशवाणी, मुंबई केंद्राने निर्मिती केलेल्या संगीतिकेतही किशोरीताईंनी गायन केले होते. कर्नाटक संगीतातील विद्वान गायक बालमुरली कृष्णन् यांच्याबरोबर गायनाची जुगलबंदी तसेच हरिप्रसाद चौरासिया यांच्यासह बासरीबरोबर केलेले सहगायन असे काही वेगळे प्रयोगही त्यांनी केले. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या संत मीराबाईंच्या भजनांचा ‘मगन हुई मीरा चली’ तसेच संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारलेल्या अभंगांचा ‘तोचि नादु सुस्वरू झाला’ हे कार्यक्रमही त्यांनी सादर केले.
रागसंगीताविषयी किशोरीताईंची स्वत:ची अशी खास मते होती व ती त्यांनी निग्रहाने जपली. स्वरार्थरमणी-रागरससिद्धान्त हा त्यांचा ग्रंथ (२००९) रागगायनाच्या संदर्भात भरताच्या नाट्यशास्त्रातील रससिद्धांताचा पाठपुरावा करणारा आहे.
अरुण द्रविड, सुहासिनी मुळगावकर, माणिक भिडे, मीना जोशी, मीरा पणशीकर, सुलभा पिशवीकर, कुमुदिनी काटदरे, आरती अंकलीकर, देवकी पंडित, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, व्हायोलिनवादक मिलिंद रायकर, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर हे त्यांचे काही प्रख्यात शिष्य; रघुनंदन पणशीकर यांनी त्यांच्या गायकीचा वारसा जपला आहे. किशोरीताईंच्या समृद्ध अशा खास गायनशैलीचा प्रभाव नंतरच्या सुमारे तीन पिढ्यांवर पडला असून विशेषत: गायिकांनी त्यांचे अनुकरण केले आहे. देशविदेशांतील महत्त्वाच्या सर्व स्वरमंचांसह आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमांतून किशोरीताईंचे गायन रसिकप्रिय झाले.
२०११ साली अमोल पालेकर व संध्या गोखले यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर आधारित भिन्नषड्ज हा अनुबोधपट काढला.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८५), पद्मभूषण (१९८७), सनातन संगीत सन्मान (१९९७), गोदावरी गौरव (१९९८), पद्मविभूषण (२००२), आय्. टी. सी. संगीत रिसर्च अकादेमी पुरस्कार (२००३), संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ती (२००९), पु. ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कार (२००९) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. तसेच ‘गानसरस्वती’ (१९८७), ‘संगीत सम्राज्ञी (१९९७), भारत गानरत्न (२००१) असे किताबही त्यांना देण्यात आले.
वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- संगीत कला विहार, किशोरी आमोणकर विशेषांक, मिरज, १९८८.
- मारुलकर, दत्ता, गानसरस्वती, श्रीपाद प्रकाशन, पुणे, २००३.
समीक्षक – मनिषा पोळ
उत्तम,मुद्देसूद लिखाण. नेटकी व नेमकी अभिव्यक्ती. कौतुकास्पद लेखन.