जाधव, लक्ष्मीबाई : ( ? १९०१ – ५ मार्च १९६५) हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका. तसेच प्रख्यात बडोदा संस्थानच्या दरबार गायिका. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई व वडीलांचे नाव परशराम. दुर्देवाने आई-वडिलांची पुरती ओळख होण्यापूर्वीच ते मृत्यू पावल्याने मावशीने छोट्या लक्ष्मीचा सांभाळ करून मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. निसर्गत: त्यांना देखणेपणाबरोबरच गोड गळाही लाभला होता. लक्ष्मीबाईंच्या मावशीचे पती विलक्षण संगीतवेडे होते. त्यांनी कोल्हापूर दरबारचे विख्यात गायक अल्लादियाखाँ (१८५५–१९४६) यांना आपल्या गोड गळ्याच्या भाचीला शिकविण्याची विनंती केली. खाँसाहेबांनी आपले बंधू हैदरखाँ यांना लक्ष्मीबाईंना गाणे शिकविण्यास सांगितले. त्यांच्याकडून लक्ष्मीबाई निष्ठेने जयपूर घराण्याची गायकी शिकल्या. त्यांची कुशाग्र बुद्धी त्याबरोबरच गुरुभक्ती आणि विद्येसाठीची तळमळ यांमुळे शिक्षणाची सात वर्षे भराभर संपली.

लक्ष्मीबाईंचा पहिला जाहीर कार्यक्रम गायन समाज देवल क्लब या संस्थेने आयोजित केला. त्यांचे विधिपूर्वक गंडाबंधन अल्लादियाखाँसाहेबांच्या हस्ते झाल्यानंतर कार्यक्रमांसाठी आणि अर्थाजर्नासाठी त्या आपले गुरू हैदरखाँ यांच्या परवानगीने बाहेर पडल्या. सर्वप्रथम त्यांनी म्हैसूर दरबारात स्वत:च्या गायनाचा कार्यक्रम केला. त्यानंतर इंदूर, देवास संस्थानिकांचे आमंत्रण त्यांना मिळाले. तेथील मैफलींची कीर्ती बडोदा संस्थानातही पोहोचली होती. त्यावेळी बडोदा येथे अत्यंत मर्मज्ञ आणि गुणग्राही संस्थानिक म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत सयाजीराव गायकवाड गादीवर होते. त्यांनी लक्ष्मीबाईंना ‘दरबार गायिका’ म्हणून बडोद्याला येण्याची विनंती केली. त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे स्वरांच्या सान्निध्यात रमत असताना मानसिक स्थैर्याबरोबरच आर्थिक स्थैर्यही त्यांना लाभले. १९२४ ते १९४४ या दरम्यान बडोदा संस्थानची ‘दरबार गायिका’ म्हणून त्यांनी वीस वर्षे सेवा केली. १९४४ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा त्या कोल्हापूरमध्ये आल्या. तेथे त्यांनी श्रीमती धोंडूताई कुलकर्णी यांना गायनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. याच काळात आकाशवाणीवरही त्या नियमितपणे गात होत्या. कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता), दिल्ली, म्हैसूर, मुंबई, अलाहाबाद, लखनौ, नागपूर, बिकानेर, कानपूर, उज्जैन, इंदूर अशा प्रमुख शहरांतून लक्ष्मीबाईंच्या मैफली  सातत्याने होत असत.

एचएमव्ही (हिज मास्टर्स व्हॉइस) ग्रामोफोन कंपनीने लक्ष्मीबाईंच्या आवाजात ‘रायसा कानडा सारे छंद सोड कन्हैय्या’, ‘किती गोड गोड वदला’ या दोन भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. या ध्वनिमुद्रिका विक्रीचा उच्चांक करणाऱ्या ठरल्या. १९२६ मध्ये शंकराचार्य कुर्तकोटींनी त्यांना ‘संगीतचंद्रिका’ ही पदवी दिली. ‘संगीतज्योत’ या पदवीने हृषिकेश येथील स्वामी शिवानंद यांनी त्यांना सन्मानित केले.

लक्ष्मीबाईंच्या सांगीतिक अभ्यासामध्ये घराण्याच्या मिळालेल्या बंदिशी विचारपूर्वक सादर करण्याकडे त्यांचा कल असे. ‘जयताश्री’, ‘जयत कल्याण’, ‘परज’, ‘धवलाश्री’, ‘संपूर्ण मालकंस’, ‘ललत बहार’, ‘बिहागडा’, ‘ललितागौरी’ हे जयपूर घराण्याचे खास राग जनमानसात रुजविण्याचे कार्य या बुद्धिवादी कलावतीने केले. मांडणीसाठी निवडलेले राग, रागप्रकृती, बंदिशीचे सौंदर्य, सूक्ष्म लयकारी व निकोप, सुरेल आकारयुक्त स्वराचा लगाव यामुळे त्यांची प्रत्येक मैफल ही जतन करून ठेवण्याइतपत उंचीवर जात असे.

प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या या श्रेष्ठ कलावतीच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभाचे आयोजन त्यांच्या शिष्यांनी व चाहत्यांनी केले; मात्र समारंभापूर्वीच राहत्या घरी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.

लक्ष्मीबाईंना मूलबाळ नव्हते. त्यांनी आपल्या इच्छापत्रात स्वत:चे राहते मोठे घर गोरगरिबांसाठी दवाखाना असावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी कित्येक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांनी त्यांच्या मिळकतीचा सार्वजनिक न्यास स्थापन केला. याद्वारे शिवाजी विद्यापीठाच्या ललित कला शाखेला एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. बडोदा संस्थानात त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू आहे. संगीताची साधना करणाऱ्या या कलावतीने विद्यादान तर केलेच, पण मिळविलेल्या संपत्तीचे दानही मुक्तहस्ते केले.

संदर्भ :

  • भिडे, ग. रं., देशपांडे, पु. ल. संपा. कोल्हापूर दर्शन: श्रीमान मदनमोहन लोहिया अभिनंदन ग्रंथ, इंटरनॅशनल पब्लिशिंग सर्व्हिस, पुणे, १९७१.
  • मारुलकर, दत्ता, स्वरानुबंध, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, १९९९.

समीक्षक – मनीषा पोळ

प्रतिक्रिया व्यक्त करा