पॅसिफिक महासागराचा अगदी वायव्य भागातील सीमावर्ती समुद्र. रशियाच्या अतिपूर्वेकडील भागात वास्तव्यास असलेल्या पहिल्या ओखोट्स्क जमातीच्या वस्तीच्या नावावरून या समुद्राला ओखोट्स्क समुद्र असे म्हटले जाते. ओखोट्स्क समुद्राची निर्मिती साधारणपणे २ द. ल. वर्षांपूर्वी वारंवार आलेल्या हिमाच्छादनामुळे झाली असावी. या समुद्राने एकूण १५,८३,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून त्याची सरासरी खोली ८५९ मी., तर  सर्वाधिक खोली ३,३७२ मी. आहे. सागरतळाचा उतार साधारणपणे उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. कूरील बेटाच्या पश्चिमेस असलेले ‘कूरील बेसिन’ हा सर्वाधिक खोलीचा प्रदेश आहे. या समुद्राच्या पूर्वेस कॅमचॅटका द्वीपकल्प, आग्नेयीस कूरील बेटे, दक्षिणेस जपानचे होक्काइडो बेट, नैर्ऋत्येस सॅकालीन बेटे, पश्चिमेस आणि उत्तरेस सायबीरियाचा (रशियाचा) किनारा आहे. होक्काइडो बेटाला लागून असलेला समुद्राचा भाग सोडल्यास ओखोट्स्क समुद्राचा उर्वरित सर्व भाग रशियन भूप्रदेशांनी वेढलेला आहे. समुद्राच्या उत्तर भागात शेलिकॉफ आखात आणि पेन्झिन उपसागर आहे. कूरील बेटांदरम्यान असलेल्या सामुद्रधुन्यांनी पॅसिफिक महासागर, तर सॅकालीन बेटाच्या दक्षिणेस असलेल्या ला पेरुस सामुद्रधुनीने जपानचा समुद्र (पूर्व समुद्र) ओखोट्स्क समुद्राशी जोडला गेला आहे. सॅकालीन बेटाच्या पश्चिमेस तातार सामुद्रधुनी आणि वायव्येस सॅकालीन आखात असून त्यांद्वारेही जपानचा समुद्र ओखोट्स्क समुद्राशी जोडला गेला आहे. भूप्रदेशावरून वाहत येणारे प्रवाह, वर्षण, कूरील बेटांदरम्यान असलेल्या सामुद्रधुन्यांद्वारे येणारे पॅसिफिक महासागराचे पाणी आणि ला पेरुस सामुद्रधुनीमार्गे येणारे जपानच्या समुद्राचे पाणी यांद्वारे या समुद्राला पाणीपुरवठा होतो.

ओखोट्स्क समुद्राच्या खंडित किनाऱ्याचा बराचसा भाग उंच आणि खडकाळ असून तो अमूर, तूगूर, उडा, ओखोटा, गिझिगा आणि पेन्झिना या नद्यांनी विच्छेदित केला आहे. तुलनेने होक्काइडो आणि सॅकालीन बेटांचे किनारे कमी उंचीचे आहेत. अमूर नदीने मोठ्या प्रमाणावर वाहून आणलेला गाळ, किनारी भागातील अपघर्षण आणि ज्वालामुखी क्रिया यांमुळे या समुद्रात गाळाची भर पडते. सॅकालीन बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावर आनीवा आणि टर्पेनीय हे उपसागर आहेत. ओखोट्स्क समुद्रातील होक्काइडो आणि सॅकालीन ही बेटे विस्ताराने मोठी आहेत. बरीचशी बेटे किनाऱ्यालगत किंवा कूरील द्वीपसमूहात पसरली आहेत. आयोनी हे एकमेव बेट खुल्या समुद्रात आहे. या सर्व बेटांवर मानवी वस्ती आढळून येत नाही.

पूर्व आशियातील हा सर्वांत थंड समुद्र आहे. आर्क्टिक प्रदेश आणि या समुद्रातील हवामानात बरेच साम्य आढळते. समुद्राच्या ईशान्य, उत्तर आणि पश्चिम भागांत आशियाई भूमीवरील वातावरणाच्या परिणामामुळे हिवाळे अतिशय तीव्र स्वरूपाचे असतात. दक्षिण आणि आग्नेय भागांत मात्र पॅसिफिक महासागराच्या सान्निध्यामुळे सौम्य सागरी हवामान असते. ईशान्य भागात फेब्रुवारी महिन्याचे सरासरी तापमान – २०° से., तर ऑगस्टमध्ये ते १२° से. असते. जुलै व ऑगस्ट महिन्यांत हवामान उबदार असते. ऑक्टोबरच्या अखेरीसपासून या सागरात हिमाच्छादन सुरू होऊन मार्चमध्ये त्याचा विस्तार सर्वाधिक झालेला असतो. खुल्या समुद्रात तरंगणारे बर्फ आढळते. जूनमध्ये हिमाच्छादन संपुष्टात येते. ओखोट्स्कमधील सागरी प्रवाह सामान्यपणे घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेत वाहतात. कूरील बेटांभोवतालचे प्रवाह मात्र घड्याळ काट्याच्या दिशेला अनुसरून वाहतात.

ओखोट्स्क समुद्राचा जवळजवळ संपूर्ण भाग रशियाच्या अखत्यारित आहे. या क्षेत्रात १९७७ मध्ये सुमारे ३२० किमी.चा पट्टा आर्थिक विकास विभाग म्हणून स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे मत्स्योद्योग आणि खनिजोद्योग विकासाला चालना मिळाली आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे साठे समुद्राच्या उत्तरेकडील भूखंड मंचावर शोधले गेले आहेत. ही बेटे सील मासे, सागरी पक्षी, सागरी सिंह व इतर प्राण्यांची उत्तम प्रजनन स्थाने बनली आहेत. ओखोट्स्क समुद्र हा जगातील एक समृद्ध जैविक संपत्ती असलेला समुद्र आहे. रशियाच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्यावरील मागदान, ओखोट्स्क, सॅकालीन बेटावरील कॉर्सकफ, कूरील बेटावरील सेव्हिर-कूरील्स्क आणि यूझ्नो-कूरील्स्क ही या समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. तरंगणारे बर्फ, दाट धुके, प्रभावी सागरी प्रवाह आणि सागरी खडक हे येथील सागरी वाहतुकीतील प्रमुख अडथळे आहेत.

रशियन समन्वेषक आयव्हन मॉस्कव्हितीन आणि वासिली पॉयर्कॉफ यांनी इ. स. १६४० मध्ये पहिल्यांदा या समुद्राचा शोध लावला. फ्रेंच मार्गनिर्देशक व नौदल अधिकारी झां फ्रांस्वॅ द गॅलोप, कोंत द ला पेरुस यांनी इ. स. १७८७ मध्ये ला पेरुस सामुद्रधुनीमार्गे कॅमचॅटका द्वीपकल्पापर्यंत हा समुद्र पार केला. त्यांच्या नावावरूनच येथील सामुद्रधुनीला ला पेरुस हे नाव देण्यात आले आहे. एकोणिसाव्या शतकात रशियन समन्वेषक अ‍ॅडम योहान क्रूसेनस्टर्न यांनी या कॅमचॅटका द्वीपकल्पापर्यंतचा प्रवास केला. इ. स. १९४९ मध्ये ‘व्हिट्याज’ या सोव्हिएट संशोधन जहाजाद्वारे आधुनिक सागरविज्ञान संशोधनाची सुरुवात या समुद्रापासून करण्यात आली.

समीक्षक : वसंत चौधरी