साधारणत: इसवी सन पहिल्या शतकाच्या प्रारंभिक दशकात कुषाणांचे विविध टोळ्यांच्या माध्यमाने उत्तर पश्चिम भारतात आगमन झाले. या टोळ्यांच्या संघाचे नेतृत्व ‘एहु-झी’ (यू-एची) (Yuezhi) टोळी करीत होती. याच टोळीच्या माध्यमातून पुढे कुषाण राजवंश उदयास आला. पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात गांधार प्रदेशातील सत्तांचा पराभव करून कुषाण भारतीय उपखंडाच्या अंतर्वेदित प्रवेश करते झाले. अलीकडे गांधार प्रदेशात मिळालेल्या नवीन अभिलेखीय पुराव्यांमुळे (रबाटक/राबातक शिलालेख) कुषाण घराण्याचा निश्चित कालक्रम ठरवण्यास मदत झाली व त्याबरोबरच नवीन राजांची भर सुद्धा पडलेली आढळते.
कुषाणांचा भारतीय उपखंडाच्या राजकीय पटलावरचा उदय इतिहासाच्या विविध अंगांसाठी महत्त्वाचा मानला जातो. इ. स. पहिले शतक ते इ. स. तिसऱ्या शतकापर्यंत उत्तरेत गांधार पासून दक्षिणेत विंध्यपर्वतापर्यंत तर पश्चिमेस सिंध, राजस्थान पासून ते पूर्वेकडे पाटलीपुत्रपर्यंत कुषाणांचा राजकीय प्रभाव होता.
भारतीय कलेच्या इतिहासात कुषाण काळाचे विशेष असे महत्त्व आहे. याच काळात खऱ्या अर्थाने भारतीय कलेचे मोठ्या प्रमाणात उन्नयन, विस्तार व क्षेत्रीय कलाकेंद्रांचा उदय झालेला दिसतो. उदा., पूर्ण विकसित गांधार व मथुरा ही दोन कलेची केंद्रे याच काळाचा परिपाक आहेत. या काळातील उपलब्ध इतर कला प्रकारांच्या बरोबर मृण्मय कलेचे आपले स्वत:चे एक वेगळे स्थान आहे. या काळात असलेली राजकीय स्थिरता, त्यातून निष्पन्न झालेली आर्थिक समृद्धी, त्याला पोषक असे पर्यावरण, विविध धर्ममतांचा मोकळा वावर, सोबतच व्यापार व इतर बाबींसाठी पूर्व आणि पश्चिमेकडील भू-प्रदेशाशी आलेला जवळचा संबंध, तिथल्या स्थानिक प्रचलित धारणांचा आलेला संबंध इत्यादी माध्यमांतून तत्कालीन सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघालेले दिसते. यातूनच कलेच्या प्रांतात क्रांतिकारी बदल घडून आले. भारतीय कलेचा विशेषत: धार्मिक प्रतीके व प्रतिमांची सुस्पष्ट सुसंगती ही कुषाण काळापासून लागायला सुरुवात होते. भारताच्या सर्व प्रकारच्या कलेच्या प्रमाणीकरणाचा काळ म्हणून या कालखंडाचा निर्देश करता येईल.
वरील नमूद केलेल्या बदलांची नोंद घेण्यासाठी तत्कालीन इतर कलेच्या माध्यमांसोबतच मृण्मय कलेचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. या काळातील मृण्मय कलेचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र होते; हे उपलब्ध पुराव्यांवरून निदर्शनास येते. सोबतच दोन प्रभावी कला केंद्रांमध्ये कलेच्या क्षेत्रात झालेल्या निकोप स्पर्धेमुळे या काळातील मृण्मय कलेने वेगळीच उंची गाठलेली दिसते. या काळातील मृण्मय कलेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शुंग कालखंडात असलेली विपूल अलंकरणाची परंपरा या काळात हळूहळू मागे पडत गेली. एकल साच्याच्या तंत्रापासून द्विदल साचाने प्रतिमा तयार करण्याचे तंत्र या काळात मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले गेलेले दिसते. प्रतिमांचा आकार गरज आणि उपयोगितेनुसार लहान मोठा झालेला दिसतो. विशेषत: गांधार प्रदेशात बौद्ध स्थापत्याच्या बाह्य अलंकरणासाठी माती आणि चुन्याच्या गिलाव्याने (Stucco) तयार केलेल्या प्रतिमा व इतर अलंकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या गेल्याचे आढळते. ग्रीक कलेच्या प्रभावातून हा कलाप्रकार गांधार प्रदेशात उत्तरोत्तर विकसित होत गेला. विशेषतः कुषाण राजवटीच्या अंतर्गत या कलाप्रकाराने चांगलेच मूळ धरले व पुढे या कला प्रकारचा अंतर्वेदित सुद्धा वापर केलेला आढळतो.
या कालखंडातील टाक (Plaque) द्विदल साच्यात केलेले आढळून येतात, तसेच हाताने घडवलेल्या प्रतिमा बऱ्याच प्रमाणात आढळून आल्या. या काळातील मृण्मय प्रतिमा घडवतांना प्रतिमेच्या पृष्ठभागावर कलाकुसर न करणे, टिकाऊ बनवण्यासाठी प्रतिमा व्यवस्थित भाजणे आणि टाकांचा मागील भाग खडबडीत ठेवल जात असे. त्यासोबतच या काळातील मृण्मय प्रतिमांवर दगडांच्या शिल्पकलेचा प्रभाव होता किंबहुना दोन्ही कला एकमेकींशी संवादी व परस्परपूरक होत्या, असे दिसून येते.
याबरोबरच, तत्कालीन प्रचलित लोकधारणा व प्रस्थापित धर्मांशी निगडित देव-देवतांच्या प्रतिमा व प्रतीके, पशुपक्षी, शृंगारिक दृश्ये तसेच संगीत व वाद्ये अशा नाना प्रकारच्या मृण्मय प्रतिमा कुषाण कालखंडातील संबंधित असलेल्या अनेक उत्खनन स्थळांवरून मिळाल्या आहेत. सोबतच कुषाण साम्राज्यांतर्गत असलेल्या विस्तीर्ण प्रदेशात मृण्मय कलेच्या क्षेत्रीय कलाकेंद्रांच्या उदयास प्रारंभ झाला, ज्यामध्ये स्थानिक विषयांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट आढळते. या काळात मृण्मय कलेचा झालेला प्रतिमाशास्त्रीय विकास भारतीय दैवतांच्या दृश्य स्वरूपाच्या विकासाच्या पायाभरणीचा कालखंड म्हणून अधोरेखित केला जातो, जो भारतीय मूर्तिशास्त्राचा प्रारंभिक काळ म्हणून अभ्यासक निर्देशित करतात.
धर्म कल्पनांशी निगडित मृण्मय प्रतिमा :
कुषाणकालीन गजलक्ष्मीचे अंकन असलेले टाक अंकनाच्या दृष्टीने शुंग काळात आढळून आलेल्या टाकांप्रमाणेच आहेत; परंतु ते वस्त्र व अलंकरणाच्या बाबतीत संपूर्णपणे वेगळ्या धाटणीच्या आहेत. संपूर्ण अंगावर वस्त्र लपेटून कमळावर स्थानक प्रकारातील ‘लक्ष्मीची’ प्रतिमा असलेला टाक कौशांबी (उत्तर प्रदेश) येथे मिळाल्याची नोंद आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील संकिसा येथून प्राप्त झालेल्या टाकावर असलेल्या प्रतिमेच्या दोन्ही हातांत कमळाचे फूल असून प्रतिमेच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती पाण्याचा वर्षाव करतांना दर्शविले आहेत, जो अभिषेकलक्ष्मी या प्रतिमाप्रकाराशी जवळ जाणारा आहे. राजघाट (उत्तर प्रदेश) येथून मिळालेल्या मृण्मय प्रतिमा अभयमुद्रेत असून प्रतिमा सालंकृत आहे.
मस्तकावर असणारा प्रारंभी आडवा आणि पुढे उभा तिसरा डोळा आणि जटाजूट असणाऱ्या शिवाच्या तसेच पार्वतीच्या मृण्मय प्रतिमा कौशांबी येथून प्राप्त झालेल्या आहेत. सोबतच अहिच्छत्र येथे विष्णू प्रतिमेच्या धडाचा भाग मिळाला असून प्रस्तुत प्रतिमा वनमाला, पागोटे व बाजूबंध परिधान केलेली दिसते. तसेच मूर्तीचे पाठीमागचे हात हे कोपरापासून वेगळे होतांना दाखवलेले आहेत, जे ‘उद्बाहू’ या विष्णूच्या प्रारंभिककाळातील विशेषणाला जवळ जाणारे आहे. यातल्या बहुतांश मृण्मय प्रतिमा उत्तर कुषाणकालीन आहेत.
कुषाण काळ विविध प्रकारच्या मातृका प्रतिमांसाठी ओळखला जातो. याच काळात दुर्गा अथवा महिषासूरमर्दिनीच्या प्रतिमा अनेक ठिकाणांवरून प्राप्त झाल्याच्या नोंदी पुरातात्त्विक अहवालात आढळतात. मथुरा (उत्तर प्रदेश) येथे महिषासुरमर्दिनीची खंडित प्रतिमा असलेला टाक प्राप्त झाला असून देवी चतुर्हस्त आहे. तिने महिषाला कवेत घेतल्याप्रमाणे दर्शविले आहे. मथुरा, कौशांबी येथून कुषाण कालखंडातील मातृदेवतेच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. पशुपक्ष्यांचा चेहरा असलेल्या व स्त्री आणि लहान मुल सोबत असलेल्या मातृका यांबरोबरच स्तनदा प्रकारातल्या उन्नत वक्ष असलेल्या मातृकांच्या मृण्मय प्रतिमा मथुरा येथून प्राप्त झाल्या. तसेच इतर मातृदेवतांमध्ये चामुंडाची मृण्मय प्रतिमा कौशांबी येथे, तर कामदेवाची प्रतिमा असलेला टाक मथुरा येथे प्राप्त झाला. प्रस्तुत कामदेवाची प्रतिमा ‘त्रिभंग’ स्थितीत असून एका तरुणावर उभी असलेली दाखवलेली आहे. या प्रतिमेच्या एका हाती धनुष्य, तर दुसऱ्या हातात बाण आहेत. तसेच टाकाच्या कडा फुलांच्या नक्षीकामाने अलंकृत केलेल्या आहेत.
या काळात यक्ष आणि यक्षिणींच्या मृण्मय प्रतिमा विपुल प्रमाणात प्राप्त झाल्या. या काळात प्रतिमाशास्त्राच्या दृष्टीने विशेषतः ब्राह्मण आणि बौद्ध धर्माशी संबंधित जे आमुलाग्र बदल घडून येत होते, त्या मागची पार्श्वभूमी ही या यक्ष प्रतिमांची होती, असे तज्ज्ञ नमूद करतात. मथुरा, कौशांबी, संघोल, संकीसा, अहिच्छ्त्र, सारनाथ, उज्जैन, विदिशा, भीटा इत्यादी ठिकाणी अशा यक्ष प्रतिमा मिळालेल्या आहेत. या प्रतिमांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये नमूद करता येतात जसे, विशिष्ट प्रकारचा डगला (Coat), विविध प्रकारचे पागोटे. या प्रतिमा शिरस्त्राण, अधोवस्त्र, माला व इतर आभूषणे परिधान केलेल्या दर्शविलेल्या असून त्या स्थानक व सिंहासनावर आसनस्थ अशा दोन्ही प्रकारांत आढळतात.
बौद्ध धर्माशी निगडित मृण्मय प्रतिमा :
मैत्रेय बुद्धाच्या मृण्मय प्रतिमा उत्तर प्रदेशमधील हस्तिनापूर, कौशांबी आणि कास्य येथून प्राप्त झाल्याच्या नोंदी आहेत. हस्तिनापूर येथे सापडलेली प्रतिमा ‘समभंग’ स्थितीत उभी असून उजवा हात अभयमुद्रेत दर्शविलेला आहे. मथुरा, अहिच्छत्र आणि कौशांबी येथून वसुधरेच्या मृण्मय प्रतिमा आढळून आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील भिटा येथे नैगमेषी देवतेची प्रतिमा बौद्ध स्थापत्याच्या सान्निध्यात प्राप्त झालेली आहे. भीटा येथे तत्कालीन श्रमण परंपरेला जवळ जाणाऱ्या स्त्री व पुरुष प्रतिमा आढळलेल्या आहेत. मूर्तीची वस्त्रे, केशरचना आणि इतर बाबी यांवरून या प्रतिमा भिक्षुणी आणि संन्याशाची असावी, असा अंदाज लावला जातो. मथुरा आणि कौशांबी येथून नाग प्रतिमा आढळून आलेल्या आहेत. मथुरा येथे प्रतिमेच्या मस्तकावर पाच नाग दिसून येतात. या नाग प्रतिमांत स्त्री व पुरुष दोन्ही प्रकारच्या प्रतिमा आढळून आलेल्या आहेत.
कौशांबी येथून सापडलेल्या टाकांवर रामायणातील सीताहरण हे दृश्य अंकित केलेले आहे. त्याबरोबरच या काळातील महत्त्वाच्या मृण्मय पुरावस्तूंत संकल्प कुंडाचा उल्लेख करावा लागेल. अशा प्रकारचे प्रतीकात्मक मातीचे कुंड बऱ्याच पुरातात्त्विक स्थळांवरून प्राप्त झाले. या कुंडांच्या अंकनात थोडा फरक वगळता बरेच साम्य आढळून येते. असे कुंड मथुरा, अहिच्छत्र, राजघाट आणि कौशांबी इत्यादी ठिकाणांहून प्राप्त झालेले आहेत. हे कुंड चौरस अथवा गोलाकार असून यांत बऱ्याच गोष्टींचे प्रतीकात्मक अंकन आढळून येते. जसे, कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या, जलचर प्राणी, मातृदेवता व घराचे अंकन आढळते. अहिच्छत्र येथे आढळून आलेल्या काही संकल्प कुंडांवर दिवे लावण्यासाठी जागा आहेत. तसेच कौशांबी येथे सापडलेल्या कुंडावर वाद्य घेऊन बसलेली प्रतिमा दर्शविली आहे.
धर्म कल्पनांशी निगडित नसलेल्या मृण्मय प्रतिमा :
शुंग कालखंडाप्रमाणेच कुषाण काळातही तत्कालीन समाजजीवनाचे दर्शन घडवणाऱ्या मृण्मय प्रतिमा प्राप्त झालेल्या आहेत. मथुरा येथून सापडलेल्या टाकावर युगुलाचे (मिथुन) अंकन केलेले आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या पशुपक्ष्यांसोबत असलेल्या प्रतिमा कौशांबी, राजघाट आणि अहिच्छत्र येथे प्राप्त झालेल्या आहेत. यात एक स्त्री पोपटाला फळे भरवताना, तसेच पक्षी आणि स्त्री यांच्यातील मैत्रीचे दृश्य अंकित असलेले टाकही सापडले आहेत. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांच्या सुद्धा पोपटासोबतच्या प्रतिमा सापडल्या आहेत. या कालखंडातील प्रतिमांची काही शरीर वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. उदा., भारदस्त शरीर आणि रुंद छाती, लंबगोलाकार चेहरा, मोठे नाक, लांब कान व जाडेभरडे वस्त्र इत्यादी. अशाच गुणवैशिष्ट्यांनी युक्त असलेली कुस्तीपटूची प्रतिमा प्राप्त झालेली असून ही प्रतिमा कोठे सापडली आहे, याची नोंद आढळून येत नाही.
कुषाण काळातील मृण्मय प्रतिमांचे निरीक्षण केले असता असे निदर्शनास येते की, या काळात नृत्य आणि संगीत यांचे महत्त्व सामान्य जीवनात होते. त्याचे प्रतिबिंब या काळातील इतर कलाप्रकारांसोबतच मृण्मय कलेवर सुद्धा पडलेले आहे. नृत्य करणारे स्त्री-पुरुष, वाद्य वाजवणारे पुरुष आणि सोबतीला नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिमा प्राप्त झालेल्या आहेत. वस्त्र आणि अलंकार परिधान करून नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिमा कौशांबी आणि मथुरा येथून प्राप्त झालेल्या आहेत. कौशांबी येथे सापडलेल्या एका प्रतिमेवर ग्रीक कलेचा प्रभाव दिसून येतो, तसेच येथून सापडलेल्या एका टाकावर एक पुरुष आणि एक स्त्री नृत्य करतानाचे दृश्य अंकित केलेले आहे. कुषाण काळातील प्रतिमा निरनिराळ्या वाद्यांचे वादन करतांनाही दर्शविलेल्या आढळतात. ‘पंचनलिका’ प्रकारचे वाद्य वाजवणाऱ्या मृण्मय प्रतिमा मोठ्या प्रमाणात अहिच्छत्र येथून प्राप्त झालेल्या आहेत. ढोल वाजवणाऱ्या पुरुषांच्या प्रतिमा अहिच्छत्र आणि राजघाट येथे आढळून आल्या आहेत. झांज आणि वीणा वादन करणाऱ्या मृण्मय प्रतिमा सापडल्या असून त्यांची संख्या इतर वाद्य व वादकांच्या तुलनेत कमी आहेत.
शृंगारिक दृश्ये असलेले टाक भीटा तसेच कौशांबी येथे सापडलेले आहेत. कानपूर येथून प्राप्त झालेल्या प्रतिमेचे सर्वच अवयव स्पष्ट दिसत नसले, तरी पोटाकडील भागात दिसणाऱ्या आतड्यांवरून शस्त्रक्रिया किंवा शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठीचा बनवलेला नमुना असावा, असा अंदाज लावला जातो. कुषाण काळातील सामाजिक स्थितीची कल्पना देणाऱ्या स्त्री आणि लहान मुलाच्या प्रतिमा अहिच्छत्र, मथुरा आणि कौशांबी येथून सापडलेल्या आहेत. मथुरा येथील वस्तुसंग्रहालयात असलेल्या कुषाण कालीन टाकांवर एक स्त्री हातात फूल घेऊन उभी असलेले दृश्य दिसते. या काळात स्त्रियांना शृंगाराची व त्यातील वैविध्यपूर्ण प्रकाराची चांगलीच जाण व आवड होती, असे मथुरा, अहिच्छत्र, राजघाट आणि कौशांबी येथून सापडलेल्या टाकांवरून येतो. परंतु या शृंगाराची धाटणी त्यापूर्वीच्या काळापेक्षा अत्यंत वेगळी आणि प्रादेशिक वैशिष्ट्याच्या जवळ जाणारी दिसून पडते. मथुरा, अहिच्छत्र, राजघाट आणि कौशांबी येथून सापडलेल्या टाकांवर स्त्रीची प्रतिमा (दासी) ही आरसा घेऊन टाकावरील मुख्य पात्रासमोर उभी असलेली दिसते. आरसा पकडणारी स्त्री ही मुख्य पात्रापेक्षा आकाराने लहान अंकित केलेली आढळते. अहिच्छत्र येथे आढळून आलेल्या मृण्मय प्रतिमा या वस्त्रविरहित आणि ठेंगण्या बांध्याच्या आहेत. या प्रतिमांचे हात कमरेवर किंवा छातीवर ठेवलेले असून प्रतिमेचे इतर अवयव वेगळे दाखवण्यासाठी छिद्राचा वापर केलेला आहे. मथुरा येथे सापडलेली एक प्रतिमा ही एका महत्त्वाच्या व्यक्तीची असावी, असा अंदाज प्रतिमेचे वस्त्र, तसेच नक्षीदार अलंकार यावरून लावता येतो. कौशांबी येथे सापडलेल्या टाकांवर पुरुषाला पंख (Cupid) असलेले अंकित केलेले आहे. असे दृश्य असेलेली दगडी शिल्पे गांधार, मथुरा व इतर ठिकाणी कुषाण काळात प्रचलित होती. याबरोबरच एका प्रतिमेत योद्ध्याच्या एका हातात तलवारीसारखे शस्त्र आणि बचावासाठी दुसरा हात पंख असलेल्या सिंहाच्या छातीवर ठेवेलेले, असे दृश्य अंकित असलेला टाक कौशांबी येथून प्राप्त झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील अनेक उत्खनन स्थळांवरून पुरुष आणि स्त्रियांच्या फक्त मस्तकाचा भाग असेलल्या प्रतिमा आढळून आल्या. या प्रतिमा हाताने बनवलेल्या असून या तत्कालीन प्रचलित मृण्मय प्रतिमांच्या तुलनेत बऱ्याच ढोबळ आणि सामान्य आहेत. त्यांतील काही प्रतिमांवर मध्य आशियातील शारीर लक्षणांचा प्रभाव दिसून येतो. यात एका प्रतिमेच्या डोक्यावर त्रिकोणी उभी टोपी (तंग तुमान) म्हणजेच कुषाण काळातील वैशिष्ट्यपूर्ण पेहराव आणि मोठे डोळे दर्शविलेले आहे. ही प्रतिमा कौशांबी येथून प्राप्त झालेली आहे. भारत कला भवन येथे कुषाण काळातील एका पुरुषाच्या मस्तकाची प्रतिमा असून ती ग्रीक सैनिकाची असावी, असा अंदाज लावला जातो. मथुरा येथे सापडलेल्या एका टाकावर पुरुषाच्या डोक्यावर बांधलेले वस्त्र, धोती आणि अलंकार तसेच, उजव्या हातात काठी आणि डाव्या हातात झेंडा अंकित असलेली प्रतिमा प्राप्त झालेली आहे. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण मृण्मय प्रतिमा सुघ (हरयाणा) या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रस्तुत प्रतिमेचा धडाकडील भाग खंडित असून खालील भाग पूर्णपणे सुस्थितीत आहे. या प्रतिमेत एक लहान बालक आपल्या हातात पाटी घेऊन त्यावर ब्राह्मी अक्षरे गिरवीत असल्याचे दृश्य दर्शविलेले आहे. हे अंकन तत्कालीन ब्राह्मी लिपीच्या प्रचार प्रसाराचे महत्त्वाचे द्योतक आहे.
कुषाण काळातील मृण्मय प्रतिमांचे अवलोकन केले असता थोडक्यात असे लक्षात येते की, या काळात प्रचलनात असेलेले सर्वच धर्म दृश्य साधनांकडे गांभीर्याने बघायला लागले होते. अमूर्त प्रतीकांसोबतच मूर्त प्रकारातल्या देवी देवता, बुद्धाचे अंकन अशा प्रतिमांचे सर्वदूर प्रचलन वाढलेले आढळते. या सर्व प्रकाराला तत्कालीन शासक वर्गाचे पाठबळ होते, हे इतर पुराव्यांवरून स्पष्ट दिसते. या प्रतिमांवर तसेच इतर मातीच्या अलंकरण, खेळण्यातल्या वस्तू, अलंकृत मृद्भांडी यांवर तत्कालीन आर्थिक स्थिरतेचा प्रभाव पडलेला दिसतो.
या काळातील मृण्मय कलेचे साधारणतः दोन टप्पे आहेत. प्रारंभिक कुषाण राजे ते कनिष्क पर्यंतचा काळ हा पहिला टप्पा (इ. स. पहिले शतक ते इ. स. दुसऱ्या शतकाची प्रारंभिक दशके) आणि कनिष्कोत्तर कालखंड हा दुसरा टप्पा (इ. स. दुसरे शतक ते तिसरे शतक). या काळातील मृण्मय प्रतिमांच्या विषयवस्तूंचा अभ्यास केला असता विशेषत्वाने दिसणारी बाब म्हणजे प्रचलित लोकधारणा प्रभावी होत्या. या लोकधारणांची अभिव्यक्ती सुद्धा तेवढीच प्रभावी होती. उदा., संकल्प कुंड, मातृका, पशु पक्ष्यांच्या प्रतिमा इत्यादी. त्या बरोबरच प्रस्थापित धर्म या लोकधारणांशी प्रतिमा व प्रतीकांच्या माध्यमातून समन्वय साधण्याचा प्रयत्न करत होते, हे निदर्शनास येते. विशेषतः उत्तर कुषाण काळात ब्राह्मण धर्माशी संबंधित देवदेवतांच्या मृण्मय प्रतिमा सर्वदूर दिसण्यास प्रारंभ झालेला दिसतो. यात विष्णू (वासुदेव), शिव, नैगमेष, पार्वती, लक्ष्मी, दुर्गा, एकानंशा, षष्ठी, नैगमेषी इत्यादी. याच काळात बुद्धाच्या व बौद्ध धर्माशी संबंधित देवतांच्या मृण्मय प्रतिमांचा व प्रतीकांचा सर्वदूर प्रचार व प्रसार होत गेलेला आढळतो. यांतील काही प्रतीके अलंकार म्हणून सुद्धा उपयोगात होते. म्हणूनच, भारतीय कलेच्या इतिहासात मृण्मय कलेच्या क्षेत्रात प्रादेशिक वैशिष्ट्यांचे इतके स्पष्ट दर्शन इतर कुठल्याच काळात होत नाही, हे या काळातील मृण्मय कलेचे खास वैशिष्ट्य व महत्त्व आहे.
संकेतशब्द : मृण्मय मूर्ती, टाक, लक्ष्मी, अभय मुद्रा, नाग देवता, संकल्प कुंड, संगीत
संदर्भ :
- Chakravarti, R. Exploring Early India up to c. A.D. 1300 (Third Edition), Delhi: Primus Books, 2006
- Dhavalikar, M. K. Masterpieces of Indian Terracottas, Bombay : Taraporevala, 1977.
- Paul, Pran Gopal & Paul, Debjani, ‘Brahmanical Imagery in the Kuṣāṇa Art of Mathurā: Tradition and Innovationsʼ, East and West. Vol. 39, No. 1/4, pp. 111-143, 1989.
- Rienjang, Wannaporn & Peter, Stewart, Eds., Problems of Chronology in Gandhāran Art, Summertowen Oxford: Archaeopress Publishing Ltd, 2018.
- Srivastava, S. K. Terracotta Art in Northern India, Delhi: Parimal Publications, 1996.
- छायासौजन्य : गोपाल जोगे
समीक्षक : गोपाल जोगे