बाबामहाराज सातारकर : (५ फेब्रुवारी १९३६). महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले. २६ मार्च १९५४ रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले. १९७४ साली श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. १९८० ते १९९९ या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. १९९८ ते २००१ या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली. डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. १९८६ साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली आहेत.
मुंबई दूरदर्शनवरील प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात अशोक रानडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. कैवल्याचा पुतळा, ज्ञानाची दिवाळी, तुका झालासे कळस, अनाथांचा नाथ, देवाचिये द्वारी अशा अनेक प्रवचन मालिका विविध दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच मुंबई दूरदर्शनवर त्यांनी सादर केल्या आहेत. कीर्तनाच्या सुमारे ५७ ध्वनिफिती तसेच १२ सीडी बाबा महाराजांनी प्रकाशित केल्या आहेत. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत, श्री सद्गुरू दादामहाराज सांप्रदायिक भजन मालिका अशी बाबामहाराज सातारकर यांची ग्रंथसंपदा आहे.
लोणावळ्यापासून ८ कि. मी. अंतरांवर दुधिवरे येथे १६ एकर जागेत बाबामहाराजांनी आध्यत्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (१९८६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार (१९९०), पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (१९९०), सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (१९९०), महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते मानपत्र (१९९१), सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्य यांच्या हस्ते सत्कार (१९९२), जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (१९९४) अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय सातारा भूषण, फलटण भूषण आणि महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही बाबा महाराजांना सन्मानित करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय बाबामहाराज सातारकर यांनी आपल्या जीवन कर्तृत्वाने साध्य केला आहे.
संदर्भ :
- https://play.google.com/store/apps/details?id=com.ndss.babamaharajsatar&hl=en_GB