नेऊरगावकर, स. के.: ( २० ऑक्टो १९०५ – ३१ मे १९७८ ). वारकरी कीर्तनकार. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कल्याण जवळील टिटवाळा या गावी झाला. लहानपणी घरातील मोठी मंडळी त्यांना राजा या नावाने हाक मारीत. घराजवळ असलेल्या गणपती मंदिरात ते बालपणी कथा, कीर्तने ऐकायला जात असत. त्यांच्या मातोश्रींनी तसेच आजीने त्यांच्यावर संत साहित्याचे संस्कार घडविले.
मातोश्रींच्या निधनानंतर वडील केशव नेऊरगावकर आणि स.के.च्या म्हणजे सदाशिव केशव नेऊरगावकरांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कुल तसेच उच्च शिक्षण न्यू पूना कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे झाले. स्थापत्य शास्त्राची पदवी घेत असतानाच १९२४ मध्ये त्यांचा विवाह झाला. सन १९२९ मध्ये त्यांनी स्थापत्य शास्त्राची (बी. इ. सिव्हिल) पदवी प्राप्त केली आणि १९३१ मध्ये ते पुणे नगरपालिकेत ओव्हर सीअर म्हणून नोकरीस लागले. थोड्याच दिवसात पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. १९६० साली ते आपणहुन निवृत्त झाले आणि त्यांनी अतिशय मानाच्या आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नम्रपणे नाकारून परमार्थ साधनेसाठी पूर्ण वेळ देण्याचे ठरविले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मामासाहेब दांडेकर यांच्याशी १९३६ साली त्यांचा परिचय झाला. मामासाहेब दांडेकर यांची कीर्तन, प्रवचने यांचे नित्य श्रवण हा स. के. नेऊरगावकर यांचा दिनक्रमच झाला. सुमारे ४० वर्षे स. के. नेऊरगावकर यांनी ह. भ. प. मामासाहेब दांडेकर यांच्या कीर्तन, प्रवचनांची टिपणे काढली. मामासाहेब दांडेकर यांच्या चरित्राचे लेखनही त्यांनी केले. आषाढी वारीचे अनुभव त्यांनी लिहून काढून सकाळ दैनिकात प्रसिद्ध केले.
१९५३ साली ते वारकरी शिक्षण संस्थेचे सभासद झाले. मामासाहेब दांडेकर यांच्या निधनानंतर ते संस्थेचे अध्यक्ष झाले. वारकरी शिक्षण संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचे मोठे काम त्याची केले. नेऊरगावकर स्वतः उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार होते. वारकरी शिक्षण संस्थेतून उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार निर्माण व्हावेत हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी ते तन, मन, धन अर्पण करून सातत्याने झटत असत. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे ते अनेक वर्षे पंच आणि सरपंच देखील होते. चिंचवड देवस्थान, निवडुंगा विठोबा मंदिर, रामकृष्ण आश्रम, आनंद आश्रम, तुळशीबाग संस्थान संस्थांचे ते अनेक वर्षे विश्वस्त होते. ‘ मी अभियंता आहे ‘ या पेक्षा मी वारकरी आहे ‘ असे ते मोठ्या अभिमानाने सांगत. स. के. नेऊरगावकर यांनी सार्थ तुकारामाची गाथा प्रसिद्ध केली तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याविषयी मौलिक लेखन केले. आळंदी पंढरीच्या यात्राकर विरोधी लढ्यात त्यांचे मोठे योगदान होते. संत साहित्याच्या अभ्यासासोबत जागरूक पत्रलेखक म्हणून त्यांचा वृत्तपत्रसृष्टीत लौकिक होता.
संदर्भ :
- क्षेत्रसंशोधन