चित्त हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असल्यामुळे गुणांच्या क्रियेमुळे चित्तामध्ये प्रत्येक क्षणी परिणाम होत असतात. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध करणे, हे योगाचे प्रमुख लक्ष्य आहे. परंतु, चित्ताच्या हजारो वृत्ती (विचार) एकदम निरुद्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक वृत्तींकडून एकाग्र वृत्तीकडे आणि नंतर एकाग्र वृत्तीकडून शून्य वृत्तीपर्यंत चित्ताला घेऊन जाणे हा साधनेचा प्रवास आहे. या दृष्टीने विचार करता महर्षि पतंजलींनी चित्तामध्ये होणारे तीन प्रकारचे परिणाम स्पष्ट केले आहेत  –

(१) निरोध-परिणाम : ज्या अवस्थेत चित्तामध्ये वृत्ती (विचार) उत्पन्न होतात, त्या अवस्थेला व्युत्थान अवस्था असे म्हणतात व ज्या अवस्थेत चित्तामध्ये कोणतीही वृत्ती राहत नाही, त्या अवस्थेला निरुद्ध अवस्था असे म्हणतात. चित्त व्युत्थान अवस्थेतून निरुद्ध अवस्थेमध्ये जाते, त्याला निरोध परिणाम असे म्हणतात.

व्युत्थान अवस्थेत चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्ती नष्ट होण्यापूर्वी चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार उत्पन्न करतात. वृत्तींमुळे उत्पन्न होणाऱ्या संस्कारांना व्युत्थान-संस्कार असे म्हणतात. चित्त निरुद्ध अवस्थेमध्ये असताना जरी एकही वृत्ती नसली तरी निर्विचार अवस्थेमध्ये चित्ताच्या केवळ असण्याने सूक्ष्म संस्कार उत्पन्न होतात, त्या संस्कारांना निरोध-संस्कार असे म्हणतात. ज्यावेळी चित्तातील निरोध संस्कारांचे प्राबल्य वाढते आणि व्युत्थान संस्कार दुर्बल होतात, त्यावेळी चित्तामध्ये निरोध-परिणाम होतो (योगसूत्र ३.९). व्युत्थान अवस्थेमध्ये चित्ताने ज्या वस्तूचा आकार धारण केला आहे त्या वस्तूशी चित्ताचा संबंध असतो व त्याचबरोबर त्या त्या क्षणाशीही चित्ताचा संबंध असतो. परंतु, निरुद्ध अवस्थेमध्ये वृत्ती नसल्यामुळे चित्ताचा कोणत्याही विषयाशी संबंध राहत नाही, तर केवळ त्या क्षणाशीच चित्ताचा संबंध असतो.

(२) समाधि-परिणाम : ज्यावेळी चित्तामध्ये वृत्ती असतात, त्या व्युत्थानामध्येही चित्ताच्या सर्वार्थता आणि एकाग्रता अशा दोन अवस्था असतात. प्रत्येक क्षणी चित्त नवनवीन विषयाचा आकार धारण करीत असेल, तर चित्ताची ती अवस्था म्हणजे सर्वार्थता होय. या अवस्थेमध्ये चित्त हे चंचल असते. जर दीर्घकाळपर्यंत चित्त एकाच विषयावर केंद्रित असेल, तर चित्ताची ती अवस्था म्हणजे एकाग्रता होय. एकाग्रतेमध्ये चित्त विषयावर स्थिर राहिल्यामुळे त्याला त्या विषयाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. ज्यावेळी चित्त सर्वार्थतेकडून एकाग्रतेमध्ये जाते, त्यावेळी चित्तामध्ये होणारा परिणाम हा समाधि-परिणाम होय (योगसूत्र ३.११).

(३) एकाग्रता-परिणाम : ज्यावेळी चित्ताद्वारे पूर्वक्षणामध्ये ग्रहण केलेला विषय आणि वर्तमान क्षणामध्ये ग्रहण केलेला विषय हा एकच असेल तर चित्ताच्या त्या परिणामाला एकाग्रता-परिणाम असे म्हणतात. एकाग्रता स्थितीमध्ये जेव्हा चित्त अनेक क्षणांपर्यंत एखाद्या विषयावर एकाग्र असते, तेव्हा चित्तामध्ये जरी कोणतेच परिवर्तन होत नसले, तरीही पहिल्या क्षणातील एकाग्रता, दुसऱ्या क्षणातील एकाग्रता, तिसऱ्या क्षणातील एकाग्रता याप्रमाणे क्षणाच्या फरकानुसार एकाग्रता ही वेगवेगळी असते आणि त्या क्षणातील चित्तही वेगवेगळे असते. त्यामुळे कालभेदानुसार चित्ताच्या एकाग्रतेमध्ये होणारे परिवर्तन हा एकाग्रता-परिणाम होय.

चित्ताच्या या तीन परिणामांमध्येच धर्म, लक्षण आणि अवस्था असे तीन अन्य प्रकारचे परिणामही दिसून येतात –

(१) धर्म-परिणाम : चित्ताचा धर्म बदलणे म्हणजेच धर्म-परिणाम होय. निरोध-परिणामामध्ये चित्त ‘व्युत्थान’ हा आधीचा धर्म सोडून ‘निरोध’ हा धर्म धारण करते. समाधि-परिणामामध्येही चित्त ‘सर्वार्थता’ हा आधीचा धर्म सोडून ‘एकाग्रता’ हा धर्म धारण करते. त्यामुळे निरोध-परिणाम आणि समाधि-परिणाम यांमध्ये धर्म-परिणाम दिसून येतो. एकाग्रता-परिणामामध्ये मात्र धर्म-परिणाम दिसून येत नाही, कारण चित्ताचा पूर्वक्षणाचा धर्मही एकाग्रता असतो व वर्तमान क्षणाचा धर्मही तोच असतो.

(२) लक्षण-परिणाम : एक क्षण व्यतीत झाल्यावर दुसऱ्या क्षणाचा उदय होतो. अशा प्रकारे क्षणात परिवर्तन झाल्यामुळे चित्तात समजला जाणारा परिणाम म्हणजे लक्षण परिणाम होय. हा परिणाम निरोध, समाधी आणि एकाग्रता अशा तीनही परिणामांमध्ये प्रतिक्षण दिसून येतो.

(३) अवस्था-परिणाम : वर्तमान क्षणात असणारी चित्ताची स्थिती ही ‘व्यक्त’ रूपात असते. परंतु, अतीत आणि भविष्यकाळातील चित्ताची अवस्था वर्तमान क्षणात प्रकट होत नसल्यामुळे ती ‘अव्यक्त’ अवस्था म्हटली जाते. (भविष्यातील) अव्यक्त चित्ताचे (वर्तमानात) व्यक्त रूपात होणारे परिवर्तन आणि (वर्तमानातील) व्यक्त चित्ताचे पुन्हा (भूतकाळात) अव्यक्त रूपात होणारे परिवर्तन म्हणजे अवस्था परिणाम होय. हा परिणामही निरोध, समाधी आणि एकाग्रता अशा तीनही परिणामांमध्ये प्रतिक्षण दिसून येतो.

जीवाला विवेकख्यातीचे ज्ञान प्राप्त होईपर्यंत चित्तातील त्रिगुणांमध्ये सतत क्रिया चालू असते. विवेकख्यातीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर परवैराग्याद्वारे विवेकरूप एक वृत्ती निरुद्ध झाल्यावर पुन्हा चित्तामध्ये वृत्ती उत्पन्न होत नाही. पुरुषाला भोग आणि अपवर्ग प्रदान केल्यानंतर चित्तातील गुणांचे प्रयोजन संपते व ते प्रकृतीमध्ये लय पावतात (साम्यावस्थेमध्ये राहतात).

पहा : परिणामत्रय, विवेकख्याति.

                                                                                                समीक्षक : कला आचार्य