अय्यर, मदुराई मणी : (२५ ऑक्टोबर १९१२ – ८ जून १९६८). भारतीय अभिजात कर्नाटक संगीत परंपरेतील सुप्रसिद्ध गायक. त्यांचे मूळ नाव सुब्रमण्यम होते. त्यांच्या वडिलांचे नाव एम. एस. रामस्वामी अय्यर आणि मातोश्री सुब्बुलक्ष्मी होत. त्यांचा जन्म मदुराई येथे झाला. त्यांचे वडील न्यायालयामध्ये अव्वल कारकून होते. विसाव्या शतकातील पहिल्या दोन दशकांत कर्नाटक संगीतातील क्षितिजावरती चमकलेले प्रख्यात विद्वान व शास्त्रीय संगीतकार पुष्पवनम् हे त्यांचे भाऊ.

रामस्वामी अय्यर स्वत: कर्नाटक संगीताचे एक अभ्यासक आणि प्रवक्ते होते. त्यांची ही इच्छा होती की, त्यांच्या पुष्पवानम् या भावाचा गानवारसा ते अकाली वयाच्या केवळ ३२व्या वर्षी निवर्तल्यामुळे (१९१६) थांबला होता, तो मदुराई मणी या त्यांच्या मुलाने पुढे चालवावा. मणींची संगीत शिकवण त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी सुरू झाली. त्यांचे पहिले गुरू ईत्त्यापुरम् रामचंद्र भागवतर यांचे पट्टशिष्य असलेले राजम भागवतर हे होय. त्यांनी मणींना स्वर तसेच स्वरांचे प्रयोग आणि स्थाने इत्यादी पक्के करण्यासाठी शंकराभरणम्, कल्याणी, हरिकांबोजी, पन्तुवराळी इत्यादी रागांचे शिक्षण दिले. पुढे अपूर्व राग शिकवण्यास सुरुवात केली. राजम भागवतर कर्नाटक संगीतातील एक थोर संगीतरचनाकार हरिकेसानल्लुर मुथिआ भागवतर यांनी सुरू केलेल्या त्यागराजा विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नियुक्त झाले. या विद्यालयातील सुरुवातीच्या शिष्यांपैकी एक मणी अय्यर होते. त्यामुळे त्यानंतर मणींची सांगीतिक तालीम थेट हरिकेसानल्लुर मुथिआ भागवतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिली. त्यांनी मणींना अनेक संगीतरचना, वर्णम्, थान वर्णम्, कृती, तिल्लाना इत्यादी कर्नाटक संगीतातील महत्त्वपूर्ण रचनांचे शिक्षण दिले. मणींचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. प्राथमिक शाळा शिक्षणानंतर त्यांना दोन वर्षांकरिता वैदिक अभ्यासासाठी पाठविण्यात आले होते.

१९२४ साली मणींची पहिली जाहीर मैफल अल्वाकोत्ती येथे झाली. त्यानंतर खूपच कमी कालावधीमध्ये मणी अय्यर हे त्यांच्या गानकौशल्यामुळे ‘पुष्पवनम्’ परंपरा दिमाखात पुढे नेणारे एक उदयोन्मुख कलावंत म्हणून नावारूपाला आले. जसजशी त्यांची गानप्रतिभा उजळत गेली, तसतसे ते अरियकुडीतील  कचेरीशैलीच्या (एक गानशैली) प्रभावाखाली आले आणि नंतर त्यांनी या गानपद्धतीचा वापर त्यांच्या मैफलींमध्ये बऱ्याचदा केला.

मणी अय्यर हे स्वत:च्या सांगीतिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करत असत आणि ते नवनवीन गोष्टी शिकण्यावर भर देत असत. ते कर्नाटक संगीतातील थोर संगीतरचनाकार मुथ्थुस्वामी दीक्षितर यांच्या आणि त्यांच्या संगीतरचनांचे परमभक्त होते. त्या काळी ‘दीक्षितकृती’ या मुख्यत: रागाच्या समृद्ध सादरीकरणासाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. मणी अय्यर यांनी टी. एल. वेंकटरामन अय्यर (सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि  मुथ्थुस्वामी दीक्षितर यांच्या रचनांचे प्रगल्भ अभ्यासक व तज्ज्ञ) यांच्याकडून ‘दीक्षितकृतीं’ची सखोल माहिती घेतली व अभ्यास केला.

मणी अय्यर हे संगीतरचनाकार ‘पापनासम सिवन’ चे प्रशंसक होते आणि त्यांनी थेट सिवन यांच्याकडून अनेक तमिळ रचना शिकून घेतल्या होत्या. कालमानापरत्वे त्यांनी तेवारम्, तिरुवाचगम्, मुख्यत: रामायण आणि मुकुंदमाला यांमधील श्लोक, पदम्, जावळी, गोपालकृष्ण भारती यांची गीते, सुब्रमण्यम् भारती यांची गीते, रामनाटक कृती आणि इतर अनेक रचना तमिळ, तेलुगू आणि कन्नड संगीतकारांकडून शिकून सर्वप्रकारच्या गायन कलांमध्ये ते पारंगत बनले.

मणींच्या गायनामध्ये नित्यभैरवी, तोडी, शंकराभरणम्, कल्याणी, कांभोजी आणि खरहरप्रिया यांसारख्या प्रमुख रागाचा समावेश असे. ते आपल्या सादरीकरणामध्ये अपूर्व रागाच्या आलापनेचादेखील समावेश करत असल्यामुळे तज्ञ आणि टीकाकारांवर त्यांची विशेष छाप पडत असे. सरस्वतीमनोहारी, रंजनी, सरस्वती, विजयनगिरी, जयंतसेना, जनरंजनी आणि बहादुरी यांसारख्या अपूर्व रागांच्या आलापनेचा ते त्यांच्या मैफलींमध्ये प्रामुख्याने वापर करीत असत. त्यामुळे प्रत्येक मैफिलीमध्ये त्यांचे सादरीकरण प्रशंसेस पात्र ठरत असे. मणी अय्यर यांच्या या आगळ्यावेगळ्या सादरीकरणामुळे त्यांची साथसंगत करणाऱ्या अनेकांनी सुरुवातीला त्यांना साथ करण्यास टाळाटाळ केली होती; पण त्यांच्या गानपद्धतीला मिळत गेलेल्या लोकप्रियतेमुळे ते सर्व संगतकार नंतर आपणहून त्यांना साथ करू लागले.

मणींनी अनेक तमिळ रचना प्रमुख रागांमध्ये नव्याने सादर केल्या आणि त्या अल्पावधीत श्रोत्यांच्या पसंतीस उतरल्या. त्यांपैकी काही विशेष रचना म्हणजे, “काना कन कोडी वेन्दम” (कांबोजी), “थाये येझै पाल” (भैरवी), “कपाली” (मोहनम्), “थत्वमारीया थरमा” (रेतिगौला), “आनंन्दवने उनै नंबीनेन” (षण्मुखप्रीया) आणि “पामलाईकिनै उन्डो” (हरिकंबोजी). या सर्व रचनांना मदुराई मणी अय्यर शैलीचे पेटंट घेतलेले होते आणि त्यामुळेच इतर कोणाही संगीतकाराला त्यांनी स्वरबद्ध केलेल्या संगीतरचनेमध्ये मणी अय्यर द्वारा सादर केलेल्या या सांगीतिक रचनांचा वापर करणे शक्य झाले नाही.

१९४३ साली तंजावरच्या गानश्रेष्ठींनी मदुराई मणी अय्यर यांना एका विशेष सभेमध्ये ‘गानकलाधार’ ही उपाधी देऊन सन्मानित केले. याआधी ही सर्वोच्च उपाधी कोणाही दुसऱ्या कलाकाराला दिली गेली नव्हती, हे विशेष उल्लेखनीय आहे.

१९४४ साली वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी मणी अय्यर यांना एका गंभीर आजाराने ग्रासले. कालांतराने या वाढत गेलेल्या आजारामुळे त्यांना संगीत मैफलींमध्ये भाग घेणे देखील अशक्य होत गेले. त्यामुळे पुढील बराच काळ ते सांगीतिक योगदान देऊ शकले नाहीत. या आजारामुळे त्यांच्या स्वरयंत्रावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या मूळ स्वरावर वाईट परिणाम झाला आणि ते नेहमी ज्या तार स्वरामध्ये लीलया गाऊ शकत होते, ते त्यांना हळू हळू शक्य होईना.

पुढे १९४५ मध्ये मणी अय्यर यांनी मायावरम् स्थित परिमला रंगनाथर मंदिर येथे आयोजित एका गायन सोहळ्यामध्ये दिमाखात पुनरागमन केले. खरेतर त्यावेळी त्यांनी त्यांचा मूळ स्वर जवळपास दीड श्रुतींनी खाली उतरवून त्यांच्या गानरचना सादर केल्या; परंतु त्यांच्या बदललेल्या आणि ताज्यातवान्या आवाजाने त्यांच्या रचना ऐकण्यासाठी आतुर श्रोतृवृंद आनंदित झाला. आजारपणापूर्वीच्या त्यांच्या जादुई पल्लेदार आवाजाचे गारुड श्रोतृवृंदाच्या मनावर किती होते, हेच याप्रसंगातून दिसून येते.

मणी अय्यर यांना १९५९ साली संगीत अकादमीकडून ‘संगीत कलानिधी’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. मार्च १९६० मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

१९६८ च्या सुरुवातीस मणी अय्यर यांची प्रकृती खूपच खालावली आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

मणी अय्यर यांच्या अनेक लोकप्रिय शिष्यांपैकी एस. राजम, टी. एस. वेंबू अय्यर, थिरूवेनगुडू ए. जयरामन आणि सावित्री गणेशन, सिद्धहस्त गायक टी. व्ही. शंकरनारायणन इत्यादींनी त्यांची प्रतिभाशाली गानपरंपरा दिमाखात पुढे चालू ठेवली आहे.

पहा : भागवतर; संगीत, कर्नाटक; तेवारम्

संदर्भ :

  • https://www.maduraimaniaiyer.org/

मराठी अनुवाद : शुभेंद्र मोर्डेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.