(फॉरेस्ट इकोसिस्टिम). पृथ्वीवरील एक व्यापक आणि प्रभावी परिसंस्था. कोणत्याही परिसंस्थेत सजीवांचा आणि अजैविक घटकांचा म्हणजेच हवा, पाणी, मृदा यांचा समुदाय असतो आणि या समुदायात सजीव-सजीव तसेच सजीव – त्यांभोवतालचे अजैविक घटक यांच्यात सतत आंतरक्रिया होत असते. वन परिसंस्थेमध्ये वनभूमीतील वनस्पती व प्राणी आणि तेथील हवा, पाणी, मृदा इ. अजैविक प्राकृतिक घटक यांच्यात आंतरक्रिया घडत असतात. वन परिसंस्थेच्या सीमा ठळकपणे ओळखता येतात; ही परिसंस्था कोठे सुरू होते व कोठे संपते, हे सहज लक्षात येते. सजीवांचा वैशिष्ट्यपूर्ण समुदाय, वृक्षांचे लक्षणीय गट, ठळक क्षेत्र ही वन परिसंस्थेची वैशिष्ट्ये आहेत. पारिस्थितिकीय दृष्टीने वनातील सजीवांच्या आंतरक्रियेत ऊर्जा प्रवाह, रासायनिक चक्रे, सजीवांतील स्पर्धक आणि पूरक घटक यांचा समावेश होतो.

संरचना : वनाच्या विविध स्तरांवर निरनिराळे सजीव वाढतात. या सजीवांची आपल्या भोवतालच्या इतर प्रत्येक घटकाशी आंतरक्रिया घडते. प्रत्येक सजीवाचे परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका असते. काही सजीव इतर सजीवांना अन्न पुरवतात, तर काही सजीव इतर सजीवांना निवारा देतात.

सर्व सजीवांना जगण्यासाठी ऊर्जेची गरज असते. इतर परिसंस्थांतील सजीवांप्रमाणे वन परिसंस्थेतील सजीवांनाही ऊर्जा सूर्यापासून मिळते. परंतु वनातील सजीवांपैकी फक्त हिरव्या वनस्पती सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग करतात आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्ननिर्मिती करतात. वनातील इतर सर्व सजीव ऊर्जा मिळवण्यासाठी हिरव्या वनस्पतींवर अवलंबून असतात. वनातील हिरव्या वनस्पती उत्पादक असून त्या वन परिसंस्थेतील अन्नसाखळीच्या पहिल्या पोषण पातळीवर येतात.

प्राणी स्वत: अन्ननिर्मिती करू शकत नसल्याने अन्नासाठी ते इतरांवर अवलंबून असतात. उदा., गायी, म्हशी, मेंढ्या, हरणे, ससे इ. प्राणी गवत, झाडपाला, धान्ये, फळे खाऊन जगतात. हे प्राणी शाकाहारी असून त्यांना ‘प्राथमिक ग्राहक’ म्हणतात. शाकाहारी प्राण्यांना खाऊन हिंस्र प्राणी म्हणजेच मांसाहारी जगतात. त्यांना ‘द्वितीय ग्राहक’ म्हणतात. काही प्राणी मृत प्राण्यांच्या अवशेषांवर उपजीविका करतात. त्यांना ‘अपमार्जके’ म्हणतात. अपमार्जके हे तृतीय ग्राहक आहेत. जसे घार, गिधाड, कावळा, तरस, कोल्हा इ.

वनातील वनस्पतींची पाने, काटे, जुन्या फांद्या वनभूमीवर पडतात. वनस्पतींचे असे मृत भाग, प्राण्यांचे मलमूत्र, तसेच मृत प्राण्यांचे सडू लागलेले भाग यांच्या भुग्यावर भुगाभक्षी किंवा गाळभक्षी उपजीविका करतात. गांडूळ, सहस्रपाद, शेणकीडे, काष्ठउवा, गोगलगायींचे काही प्रकार इ. गाळभक्षी आहेत. याउलट जीवाणू, कवके इ. मृत अवशेषांचे विकरांद्वारे थेट अपघटन व शोषण करतात. त्यांना ‘अपघटक’ म्हणतात. गाळभक्षी आणि अपघटक या दोन्हींना मिळून ‘शवोपजीवी’ अशी संज्ञा वापरतात. शवोपजीवी हे वन परिसंस्थेतील पोषणचक्राचा भाग असतात.

वन परिसंस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील सजीवांचे परस्परावलंबन आणि त्यांच्यातील सहजीवन. उदा., सुरवंट आणि मुंग्या यांच्यातील संबंध. सुरवंटाच्या पाठीवरील ठिपक्यांतील गोड रस हे मुंग्यांचे खाद्य असते, तर याच्या बदल्यात मुंग्या सुरवंटाचे रक्षण करतात.

मानव हा वन परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मनुष्य हा ग्राहक असून त्याला आवश्यक असलेले अन्न आणि इतर पदार्थ वनांपासून उपलब्ध होतात. वनातील विविध उत्पादनांचे मानव ग्रहण करतो. त्यामुळे वन परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात बदल होतात.

वनातील वनश्रीचे स्तर : वनातील वनश्रीचे चार स्तर मानले जातात. सर्वांत खालच्या पृष्ठीय स्तरावर पालापाचोळा, प्राण्यांचे मलमूत्र, मृत वनस्पती इ. असतात. या गोष्टी कुजून मातीचा थर बनतो आणि तो वनस्पतींसाठी पोषकद्रव्यांचा स्रोत असतो. या स्तरावर नेचे, गवते, कवके आणि वनस्पतींची बीजरोपे असतात. त्यावरचा मधला निम्नस्तर झुडपे आणि वाढणारी झाडे यांपासून बनतो. वरच्या स्तरावरील दाट पर्णछत्रामुळे निम्नस्तरावर सावलीच असते. निम्नस्तरावरील वनस्पतींचे म्हणूनच अंधुक प्रकाशस्थितीसाठी अनुकूलन झालेले असते. वनाचा वरचा स्तर पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची एकमेकांत गुंतलेल्या फांद्यांचा आणि पर्णसंभारांचा बनलेला असतो. त्याला छत किंवा वनछत्र (कॅनॉपी) म्हणतात. वृक्षांच्या वरच्या भागाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे छतस्तरावर अन्ननिर्मिती सर्वाधिक होते.

उष्ण प्रदेशांतील पर्जन्यवनांमध्ये काही झाडे वरच्या स्तराच्या छताच्याही वर गेलेली असतात. अशा झाडांपासून वनछत्राच्या वरती बनलेल्या स्तराला उच्चवृक्ष आच्छादन असा उल्लेख केला जातो.

वन परिसंस्थांचे पाच प्रमुख प्रकार आहेत :

(१) उष्ण प्रदेशीय पर्जन्यवने : विषुववृत्तीय उष्ण प्रदेशात जसे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचा परिसर, आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रदेश, मध्य अमेरिकेतील पूर्व किनारा, दक्षिणपूर्व आशिया इ. सतत जवळजवळ १२ तास प्रखर सूर्यप्रकाश असतो. तसेच पावसाचे अतिप्रमाण (२५० सेंमी.पेक्षा जास्त) आणि वर्षभर २५ से. पेक्षा अधिक तापमान असते, अशा प्रदेशांत ही वने आढळतात. वनस्पतींचे अत्यंत दाट व रुंद पानांचे सदाहरित वृक्ष, तसेच ताडसदृश वृक्ष, वेली, नेचे यांचे आवरण या वनांत असते.

(२) उष्ण प्रदेशीय मोसमी वने : ही वने पर्जन्यवनांच्या बाहेरील प्रदेशांत असतात. या प्रदेशात पाऊस अनियमित आणि कमी प्रमाणात होतो. या वनांमध्ये सदाहरित वृक्षांबरोबर, पानझडी व काटेरी वृक्ष आढळतात. वनस्पतींचे आवरण पर्जन्य वनांतील आवरणाइतके दाट असते.

(३) समशीतोष्ण प्रदेशातील सदाहरित व पानझडी वने : ही वने उत्तर अमेरिका, यूरोप, आशिया येथील समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात. यात रुंद पानांचे तसेच सूचिपर्ण वृक्ष मुख्यत: असतात. सदाहरित पाइन वने याच प्रकारात येतात. या वनांच्या नैसर्गिक वाढीचा आणि पुनर्वनीकरणाच्या चक्राचा वणवे हे एक भागच असतात.

(४) उत्तरीय वने : ही वने आर्क्टिक महासागराच्या दक्षिणेकडील उत्तर कॅनडा, सायबीरिया, अलास्का अशा थंड हवामानाच्या प्रदेशांत आढळतात. यांतील वृक्ष आणि झुडपे सूचिपर्णी असतात. या वनांना ‘तैगा’ असेही म्हणतात.

(५) गवताळ प्रदेशातील वने : गवताची विस्तीर्ण कुरणे, त्यांतच झुडपांची दाट वने आणि वरून सपाट दिसणारे तुरळक वृक्ष आणि नेहमी होणारे वणवे ही वैशिष्ट्ये या वनांची असतात. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडातील मोठा प्रदेश या वनांमुळे व्यापलेला आहे.

भारतामध्ये मुख्यत: उष्णप्रदेशीय मोसमी वने आढळतात. यात आर्द्र तसेच शुष्क सदाहरित वनांचा, तसेच आर्द्र व शुष्क पानझडी वनांचा समावेश होतो. पश्चिम घाट, ईशान्य भारत तसेच अंदमान-निकोबार बेटे येथे पर्जन्य वनेही आढळून येतात. पर्वत उंच भागांत उत्तरीय वन प्रकारातील वृक्ष आणि वने आढळतात. भारतात काही खास वनांचे प्रकारही आढळतात. जसे किनाऱ्यालगत खारफुटीची वने, तर सरोवरांच्या व नद्यांच्या काठी गोड्या पाण्यातील पाणथळी वनस्पतींची वने दिसून येतात.

वन परिसंस्थांचे वर्गीकरण आणखी एका प्रकारे करता येते; काही वन परिसंस्था अतिशय पुरातन असून मानवी हस्तक्षेपापासून मुक्त राहिलेल्या असतात. त्यांच्यात वनांच्या वाढीचे नैसर्गिक आकृतिबंध आणि ती ज्या भौगोलिक क्षेत्रात असतात त्या क्षेत्रांची एतद्देशीय सजीवसंपदा दिसून येते. अशा वनांना प्राथमिक किंवा पुरातन (जुन्या वाढीची) किंवा अक्षुण्ण वने म्हणता येईल. याउलट मानवी हस्तक्षेपामुळे ज्या वनांच्या वाढीचे नैसर्गिक आकृतिबंध बदलेले आहेत, त्यांना ‘द्वितीयक’ किंवा ‘क्षुण्ण’ वने म्हणता येईल. अशा वनांतून लाकूडतोड होत असते, वनोत्पादने घेतली जातात आणि बाहेरून आणलेल्या वनस्पती, प्राणी यांची स्थापना केली जाते.

वन परिसंस्था व्यापक, सधन, वैविध्यपूर्ण आणि जटिल असतात. ऋतुमानानुसार त्यांच्यातही बदल होत असतात. २०१५ मध्ये केलेल्या एका मोजणीनुसार जगातील एकूण ३,००० अब्ज वृक्षांपैकी सु. १,४०० अब्ज वृक्ष उष्ण प्रदेशात आहेत, ६०० अब्ज वृक्ष समशीतोष्ण प्रदेशीय तर ७०० अब्ज उत्तरीय आहेत. सर्वाधिक जैवविविधता पर्जन्यवनांत आढळते. एका अंदाजानुसार जगातील निम्म्या किंवा त्याहून अधिक सजीवांच्या प्रजाती या वनांमध्ये आढळतात.

वन परिसंस्थांचे उपयोग : (१) वने ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात. एक पूर्ण वाढलेले झाड सु. १० व्यक्तींची एका दिवसाची ऑक्सिजनची गरज भागवू शकते. वनांमुळे तापमान नियमित राखले जाते. (२) वनांमुळे विविध कीटक, कृमी, पक्षी, प्राणी इ. यांना आश्रय मिळतो. जमिनीवरील सु. ८०% जैवविविधता वन परिसंस्थेत आढळते. (३) जगात सु. ३० कोटी लोक वनांत राहतात; त्यांपैकी सु. ६ कोटी वनांचे मूल निवासी आहेत. तसेच वनांच्या कडेने राहणारे अनेक कोटी लोकांची उपजीविका वनांवर अवलंबून असते. याखेरीज जगातील कोणत्याही लोकसमूहासाठी वने उपयोगी असतात. वन व्यवस्थापन व संवर्धन, वनाधारित उद्योग यांमध्ये अनेक लोकांना रोजगार मिळतो. (४) मोठी वने भोवतालच्या प्रदेशाच्या हवामानावर परिणाम करतात. वनांमुळे पर्जन्यमान वाढते. (५) वृक्षराजी पाण्याचा प्रवाह अडवून पाणी जमिनीत जिरण्यासाठी मदत करते. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी तसेच भूजलाची पातळी वाढण्यासाठी मदत होते. (६) वृक्ष वाऱ्यावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे पिकांना वाऱ्यापासून संरक्षण मिळते. तसेच मधमाशीसारख्या कीटकांना परागणाच्या कार्यातही मदत होते. (७) वने मृदा संधारणाचे कार्य करतात. ती जमिनीची धूप होऊ देत नाहीत. परिणामी भूस्खलन आणि धुळीची वादळे अशा नैसर्गिक आपत्तींची शक्यता कमी होते, जमिनीच्या ओसाडीकरणाला प्रतिबंध होतो. (८) वने वाहून जाणाऱ्या प्रदूषकांना अटकाव घालतात आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करतात, तसेच हवेतील कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड इ. प्रदूषके शोषून घेतात. वृक्ष ध्वनी ऊर्जा शोषून घेतात, त्यामुळे आवाजाची पातळी कमी होऊन ध्वनी प्रदूषण कमी होते. (९) वने आपल्याला शाकाहार आणि मांसाहार असे दोन्ही प्रकारांचे अन्न पुरवतात. वनौषधी, कागद, वनोत्पादने, जसे लाकूड, रेझीन, कापड इत्यादींचा स्रोत वने असतात. (१०) वने सृष्टिसौंदर्याचे जनक आहेत. वनातील निसर्गाने आपण मोहून जातो, त्यापासून आनंद घेतो. दुसऱ्या बाजूने आपण वनांचा, त्यांच्या अंतरंगाचा, वन प्रदेशाचा शोध घेतो आणि संशोधन करतो. त्यामुळे विज्ञान व भूगोल या विषयांच्या आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.

वन परिसंस्थांचा ऱ्हास झाल्यास किंवा त्यांची गुणवत्ता घटल्यास तेथील सजीवांचा अधिवास नष्ट होऊ शकतो, त्यामुळे सजीवांच्या अनेक जाती विलुप्त होऊ शकतात. परिणामी मनुष्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. वन परिसंस्थांचे संधारण, व्यवस्थापन आणि संवर्धन ही महत्त्वाची गरज आहे.