इ.स.पू. ३२३ ते इ.स.पू. ३१ या काळाला ग्रीकांश काल म्हणून ओळखले जाते. अलेक्झांडरने आपले साम्राज्य स्थापन केल्यानंतर, तत्पूर्वी काही ग्रीक नगरांपुरत्याच मर्यादित असलेल्या ग्रीक कलेने आपली सीमा ओलांडली. जगाच्या फार मोठ्या भागातील कलाभिव्यक्तीवर ग्रीक कलेचा प्रभाव पडू लागला. या कालखंडातील कला ‘ग्रीकांश कला’ किंवा ‘हेलेनिस्टिक कला’ म्हणून ओळखली जाते. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ग्रीकांचा प्रभाव पूर्ण भूमध्यसागर आणि अगदी दक्षिण-पश्चिम आशियावर पडलेला दिसून येतो. या काळात इतर छोट्याछोट्या निर्माण झालेल्या राज्यांव्यतिरिक्त टॉलेमी (Ptolemy) याने इजिप्त आणि मध्यपूर्व भागांत; सेल्युकस (Seleucus) याने सिरिया आणि पर्शियावर; अँटिगोनस (Antigonus) व त्याचा पुत्र डीमीट्रिअस (Demetrius) याने मॅसिडोनिया, थ्रेस आणि आशिया मायनरच्या उत्तरी भागांत राज्य केले. अथेन्स, कॉरिंथ, थीब्झ, मायलीटस आणि सिराक्यूझसारख्या अभिजात काळातील नगरराज्यांनी ग्रीकांश काळातही वर्चस्व राखून ठेवले. ग्रीकांश कलेचा प्रभाव अलेक्झांडरने इ.स.पू. ३३१ मध्ये इजिप्तमध्ये उभारलेल्या अलेक्झांड्रिया इतका दुसऱ्या कोणत्याच नगरावर दिसत नाही. ह्या काळात अथेन्स जरी कलेचे प्रमुख केंद्र होते, तरी अलेक्झांड्रियालाही तेवढेच महत्त्व होते. ह्या काळात अंतर्मुखी नगरराज्यांचे रूपांतर खुल्या सर्वदेशीय आणि उत्साही संस्कृतीत झालेले दिसून येते. त्यानुसार तत्कालीन कला व साहित्यही रूपांतरित झाल्याचे आढळते. ह्या काळात प्रथमच अलेक्झांड्रिया आणि पर्गामम येथे वाचनालये व संग्रहालयांची निर्मिती झाली होती. पर्गामम येथे इ.स.पू. २४१ ते १३३ ह्या काळात शिल्पशाळाही स्थापण्यात आली.
ग्रीकांश कलाकारांनी आधीच्या आदर्शांपेक्षा वस्तुस्थितीवर जास्त भर दिलेला आढळतो. मानवाकृतींच्या चित्रणात सामान्य दैनंदिन जीवन, मानवाचे भावनिक विश्व, वीर व महान पुरुष तसेच देवदेवता अशी उत्साहपूर्ण व मनोरंजक कथानके चितारलेली आढळतात. बहुतकरून श्रीमंत व्यक्ती अथवा कुटुंबीयांनी त्यांची घरे तसेच बागा सुशोभित करण्यासाठी विविध शिल्पकारांना पाचारण केले. या सुशोभनासाठी प्राणी, सर्व वयोगटांतील सामान्य व्यक्ती, त्यांची व्यक्तिचित्रे असे विषय प्रामुख्याने ग्रीकांश शिल्पकारांनी स्वीकारलेले दिसतात. पुरुष आणि स्त्रियांना मूर्तिमंततेचे आदर्श म्हणून चित्रित करण्याचे शिल्पकारांना आता बंधन वाटत नव्हते. या काळातील वैशिष्ट्य म्हणजे कलाकृतींमध्ये अनेक प्रतिमा असलेल्या समूहशिल्पांची निर्मिती. चेहऱ्यांवर तीव्र आवेग आणि उधळलेली वेड्यावाकड्या स्थितीतील शरीरे अशाप्रकारे दाखवलेल्या ह्या समूहशिल्पशैलीला सामान्यतः ‘बरोक’ (baroque) असे म्हणतात. पर्गामम येथील वेदी वर्तमानापर्यंत टिकलेली मूळ ग्रीकांश कलाकृती असून इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकृती ह्या मूळ ग्रीकांश कलाकृतींच्या रोमन नकला असल्याचे मानले जाते. ह्या रोमन नकलांमध्ये द डाइंग गॉल (The Dying Gaul), लुडोविसी गॉल (Ludovisi Gaul) तसेच द लोकून ग्रूप (The Laocoön Group), पास्क्विनो ग्रूप (Pasquino Group), अरोटिनो (Arrotino) अशा अनेक शिल्पांचा समावेश होतो. द डाइंग गॉल या शिल्पामध्ये दुःखभाव आणि वेदना यांचे अतिशय समर्थ आणि सखोल प्रकटीकरण घडविले आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात रोड्झ येथे ॲजेसॅन्डर, अथीनोडोरस व पॉलिडोरस या तीन शिल्पकारांनी मिळून निर्मिलेला द लोकून ग्रूप (इ.स.पू.सु. ५o) हा प्रख्यात शिल्पसमूह ही ग्रीक कलेतील शेवटची स्वतंत्र निर्मिती. ट्रोजन धर्मगुरू आणि त्याचे पुत्र यांची राक्षसी सर्पांबरोबर चाललेली प्राणांतिक झुंज त्यात दाखविलेली आहे. हा पुतळा १५o६ मध्ये मिळाला. प्रबोधनकालीन कलावंतांवर त्याचा फार मोठा प्रभाव होता. त्यात शिल्पबद्ध केलेल्या हालचाली व अस्वस्थ भाव आजही स्तुत्य वाटतात.
ग्रीकांश शिल्पांमध्ये जीवनमानापेक्षा अति उंच असलेल्या अशा प्रतिमांचीही निर्मिती झालेली आढळून येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, साधारण इ.स.पू. २८० मध्ये, १०८ फूट उंचीचा लोखंड व कांस्य वापरून उभारण्यात आलेला ग्रीक सूर्यदेव हेलीओस याचा रोड्झ येथील पुतळा (Colossus of Rhodes). हा भव्य पुतळा पुरातनकालीन सात आश्चर्यांपैकी एक गणला जात असे. इ.स.पू. २२६ मधल्या भूकंपामध्ये ह्या पुतळ्याची बरीच नासधूस झाली तरी त्याचे कितीतरी भाग जपण्यात आले होते. ९६ इंच उंचीचे, शीर व दोन्ही हात तुटलेले विंग्ड व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस (Winged Victory of Samothrace) हे शिल्प इ.स.पू. २२० ते १८५ काळातील अजूनपर्यंत अस्तित्वात असलेल्या ग्रीकांश कलाकृतीपैकी एक आहे. हे शिल्प नाविक यशाबद्दलच्या नवसपूर्तीसाठी निर्माण केलेले असावे. पंख असलेली ही देवता गलबताच्या नाळेवर संथपणे उतरत असावी, तशी दिसते. तिची जोमदार पण सुंदर हालचाल ग्रीकांश कलेचे वैशिष्ट्य दाखविते. ह्या काळातील सर्वच शिल्पकारांनी पर्गाममच्या वास्तववादी शैलीचे अनुकरण न करता समन्वयवादाचाही स्वीकार केल्याचे आढळते. यात अभिजात शैलीच्या कलाकृतीमधील चांगल्या गोष्टी उचलून त्यात नवीन तत्वांचा समन्वय घालत ‘मेलोसच्या अफ्रोडाइट’ सारख्या अजून श्रेष्ठ कलाकृती घडविल्याचे दिसते. अँटिओकच्या अलेक्झांड्रोस याने केलेल्या या ६ फूट ८ इंच उंचीच्या अर्धनग्न शिल्पात पाचव्या शतकातील वस्त्रशिल्पांचा व चौथ्या शतकातील नग्नाकृतींचा प्रभाव दिसून येतो.
ग्रीकांश काळात ह्या आधीच्या अभिजात काळातील काही कलाकृतींची नक्कल मुद्दामच केलेली आढळून येते, उदाहरणार्थ, इयूटिकाइड्स (Eutychides) या शिल्पकाराने केलेली अँटिओक (Antioch) येथील देवता ताइची (Tyche) हिचे लुव्र संग्रहालयातील शिल्प; तर इतर कलाकारांना भावना आणि गतीमय स्थितीतील दृश्ये दाखविण्यात रस होता. हे पर्गामम येथील संगमरवरातील ‘झ्यूसची मोठी पवित्र वेदी’ (साधारण इ. स. पू. १८० ते १५०) या शिल्पपटातून दिसून येते. या समूहात्मक उत्थित शिल्पपटातून अभिव्यक्त केलेल्या वेदना आणि पुढेमागे, उलटसुलट दाखवलेल्या मानवाकृती तसेच त्यांच्या विविध अंगांचे शिल्पन यांवरून शिल्पकारांना नाट्यमय चित्रणातील नव्यानेच उमगलेली रुची दिसून येते. या शिल्पपटातील जायगान्तोमकी’ (Gigantomachy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुराणकथांमधील अथेना डिफिट अल्कोऑनियस (Athena defeats Alkyoneus, सुमारे इ. स. पू. १७५) हे उत्थित नाट्यमय चित्रण विशेष उल्लेखनीय आहे.
चौथ्या शतकाच्या शेवटी पक्वमृदेमध्ये छोट्या आकारातील शिल्पप्रतिमांची निर्मिती सुरू झाली. हे तनाग्रा (tanagra) येथे मिळालेल्या शिल्पांवरून समजते. बहुतांश शिल्पांना भाजण्यापूर्वी पांढऱ्या राळेचा थर देऊन भाजल्यानंतर जलरंगांनी रंगविल्याचे आढळते. दैनंदिन आयुष्यातील विषयांवर केलेल्या ह्या वास्तववादी लघुशिल्पाकृतींची उंची १० ते २५ सें.मी. इतकीच आहे. पक्वमृदेच्या ह्या छोट्या शिल्पांचा उपयोग मनोरंजक कारणास्तव व घरात सजावटीसाठी म्हणून केला गेला असावा.
ग्रीकांश काळात मृत्पात्रांवरील चित्रणास उतरती कळा लागून काळ्या व लाल आकृत्यांच्या शैलीतील मृत्पात्रांची निर्मिती लोप पावलेली दिसते. ह्या काळात मेगॅरिअन या उठावतंत्राने केलेल्या मृत्पात्री व पक्वमृदेतील शिल्पांव्यतिरिक्त ‘वेस्ट स्लोप मृत्पात्रां’ची निर्मिती झालेली दिसते.
या काळातील सोनार व लोहारांनी दागिने, शोभेची भांडी आणि बारकावे असलेल्या मूर्ती बनवण्यात उत्कृष्ट कामगिरी केलेली दिसते. यामध्ये पौराणिक प्राणी, आफ्रिकन व्यक्ती, देवता आणि पुष्पहार यांचा समावेश होतो. धातुकामात बहुतांशी मौल्यवान दगड आणि रत्नांचा वापर केलेला दिसतो.
ग्रीकांश काळात निर्माण केलेल्या भित्तिचित्रांपैकी फार कमी चित्रे आत्ता अस्तित्वात आहेत. त्यातील पेस्तुम येथील थडग्यांमध्ये असलेली भित्तिलेपचित्रे लुकॅनिअन कालावधीतील म्हणजे साधारण इ.स.पू. चौथ्या ते तिसऱ्या शतकातील असावीत. येथील काही उत्तम कलाकृतींमध्ये ‘रथांची शर्यत’, ‘दोन सारथी’ तसेच ‘सिंहाची शिकार’ या चित्रांचा समावेश होतो. भित्तिचित्रांशिवाय ह्या काळात तयार केलेल्या कितीतरी कुट्टिमचित्रणाची उदाहरणे आहेत. इ.स.पू. तिसऱ्या शतकात केलेल्या अलेक्झांडरच्या कुट्टिमचित्रणाची रोमन प्रतिकृती (इ. स. पू. पहिले शतक) पाँपेई येथील फाऊंच्या घरातील (house of the faun) जमिनीवर केलेली होती. आता नेपल्स येथील संग्रहालयात जतन केलेल्या ह्या कुट्टिमचित्रणात अलेक्झांडर आणि दारिअस तिसरा यांच्यातील युद्ध प्रसंग दाखवलेला दिसतो. याव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या कुट्टिमचित्रणामध्ये चौथ्या शतकाच्या शेवटी केलेल्या मेसोडोनिया येथील पेल्लामधील, ‘अलेक्झांडर काळवीटाची शिकार करताना’ व ‘अलेक्झांडर सिंहाची शिकार करताना’; दुसऱ्या शतकातील अथेनाचे देलॉस येथील कुट्टिमचित्रण ह्या चित्रांचा समावेश होतो.
संदर्भ :
- Betancourt, Philip P., Introduction to Aegean Art, 2007.
- Lane, A., Greek Pottery, London, 1956.
- Neer, Richard T., Greek Art and Archaeology : A New History, c. 2500-c. 150 B.C.E. Thames and Hudson, 2011.
- Norris Michael, Greek Art from prehistoric to classical a resource for educators, The Metropolitan Museum of Art, New York, 2000.
- Osborne, Robin, Archaic and Classical Greek Art, 1988.
- Pedley, John G., Greek Art and Archaeology, Pearson, 2011.
- Stewart, Andrew, Art, Desire, and the Body in Ancient Greece, 1997.
- Spivey, Nigel J., Greek Art, 1997.
- Whitley, James, The Archeology of Ancient Greece, United Kingdom, 2001.