मायसीनीअन संस्कृतीच्या शेवटापासून साधारण इ.स.पू. ११०० ते इ.स.पू. ७०० या प्रारंभिक प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या उदयापर्यंतच्या काळाचा, तज्ञांनी या काळातील अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या पुरावशेषांवरून, ‘अंधःकार काळ’ (Dark Ages) असा उल्लेख केल्याचे आढळते. या काळात झालेल्या स्थलांतरणामुळे प्रासाद वा नागरी संस्कृतीचा अभाव दिसून येतो. शेती, व्यवसाय व व्यापार अशा गोष्टी शंभराहून निर्माण झालेल्या छोट्या खेड्यांतून विखुरल्याने आधीच्या आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनाला उतरती कळा लागल्याचे दिसते. या काळात निर्माण झालेल्या मृत्पात्रांवरून ह्या काळाला ‘पूर्व-भौमितिक काळ’ (Proto-geometric Period) अशा नावानेही संबोधतात. साधारण इ.स.पू. ९०० पासून हस्तकौशल्य कारागिरी इ. कला व्यापाराच्या अधिक वाढलेल्या स्वरूपात पुनरुज्जीवित झाल्याचे आढळते. ह्या काळात प्रामुख्याने भौमितिक रूपचिन्हांनी चित्रण केलेल्या मृत्पात्रांची निर्मिती झालेली दिसते. त्यावरूनच शास्त्रज्ञ इ.स.पू. ९०० ते इ.स.पू. ७०० या कालावधीस प्रामुख्याने ‘भौमितिक काळ’ (Geometric Period) अशा नावाने संबोधतात. ह्या काळातच अभिजात काळाची पाळेमुळे असल्याचे म्हटले जाते. एक असा नाट्यमय स्थित्यंतराचा कालावधी ज्यामुळे आद्य ग्रीकांची प्रस्थापना झाली. आशिया मायनरच्या सागरी किनारपट्टीवर स्थापन झालेली नगरे, दक्षिण इटली आणि सिसिली येथील वसाहती आणि त्यांच्याबरोबरच व्यापारासाठी नवीन संधी निर्माण झाल्या. ग्रीक नगरराज्यांच्या विकासाबरोबर मोठी मंदिरे व संरक्षक देवतांची संकुले अस्तित्वांत येऊ लागली. ही संकुले सांकेतिक दृष्ट्या राजधर्माचा उदय दर्शवितात. इ.स.पू. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीकांनी ऑलिंपियन देवतांना समर्पित केलेली अनेक संकुले संपूर्ण ग्रीक नगरराज्यांत उभारली. मधल्या काळात लुप्त झालेल्या लेखन कौशल्यासही इ.स.पू. ७०० पासून पुन्हा सुरुवात झालेली दिसते. होमर, हा ग्रीक महाकवीही आठव्या शतकातीलच, त्याच्यामुळेच या काळाला ‘होमरीक काळ’ (Homeric period) असेही संबोधितात. होमरच्या इलियड  या महाकाव्यामध्ये ग्रीकांच्या ट्रॉययुद्धाचे आणि ओडिसी  या महाकाव्यामध्ये त्याच्या इथाका (ithaca) च्या प्रदीर्घ प्रवासाचे वर्णन केले आहे.

डीपिलोन अँफोरा, राष्ट्रीय पुरातत्त्व संग्रहालय, अथेन्स.

ग्रीसमध्ये मूलतः तांबे, कथिल, सोने यांची कमतरता असली, तरी या काळातील थडगी धातूच्या कलात्मक वस्तुूंनी सुसज्ज होती. हे सुबक धातुकाम भरभराट आणि बाहेरील देशांशी असलेल्या व्यापारी संपर्काची साक्ष देतात. मूलतः थडग्यांचे चिन्हक म्हणून वापरलेल्या स्मारक-खंदकांवर दफनविधीचे व वीर योद्ध्यांचे चित्रण केलेले दिसते. पूर्व-भौमितिक काळात अग्निसंस्कार विधी झाल्यावर भस्मावशेष अँफोरा या मृत्पात्रामध्ये ठेऊन थडग्यांमध्ये ठेवत असत. यात पुरुषांच्या थडग्यांमधे शस्त्रे व मिश्रणपात्र (क्रॅटर) तर स्त्रियांच्या थडग्यांमधे दागिने व अँफोरा ठेवण्यात येत असे. युबीया येथील लेफकंडी (lefkandi) येथे दोन भिन्न थडग्यांमधून, साधारण इ.स.पू. १०५० ते ९०० कालावधीतील, घोड्याचे शरीर व मानवाचे शीर असलेल्या ग्रीक पौराणिक देव सेंटॉर (Centaur) याची प्रतिमा मिळाली. ही उल्लेखनीय भौमितिक चित्रांकन असलेली शिल्प-प्रतिमा १४ इंच उंचीची असून टेराकोटा मध्ये केलेली आहे. हे शिल्प पोकळ असून त्याचे धड चाकावर व पाय हाताने करून जोडलेले आहेत. ह्या शिल्पावर आद्य आणि आरंभिक भौमितिक शैलीतील चित्रण केलेले आढळते. त्यात मानेवर हाराप्रमाणे पट्टा, छातीवर जाळी, पोटावर पट्ट्या, पाठीवर त्रिकोण व नागमोडी रेषांची सजावट केलेली दिसते.

घोड्याचे शरीर व मानवाचे शीर असलेल्या ग्रीक पौराणिक देव सेंटॉरची प्रतिमा, राष्ट्रीय पुरातत्त्व संग्रहालय, इरिट्रिया.

भौमितिक काळाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘भौमितिक चित्रकला’ अर्थात भौमितिक आकारांचे चित्रण असलेली मृत्पात्री. ही मृत्पात्री निर्माण करण्याचे प्रमुख केंद्र अथेन्स येथे होते. या काळात मातीच्या फुलादाण्यांची निर्मिती विविध उद्दिष्टांनी व उपयोगासाठी केलेली दिसते. मृतांच्या विधीपासून, विविध सभा-संमेलनासाठी या फुलदाण्यांचा वापर झालेला दिसतो. अधिक नावाजलेल्या कलशांमध्ये अँफोरा (Amphora) बरोबर क्रॅटर (Krater) या व्यतिरिक्त पाण्यासाठीचे कलश – हीड्रीआई (hydriai) यांचा समावेश होतो. दोन मुठी असलेला अरुंद मानेचा अँफोराचा वापर मदिरा अथवा तेल ने-आण करण्यासाठी आणि क्रॅटर ह्या खोलगट भांड्याचा उपयोग पाणी व मदिरा मिश्रणासाठी केला जात असे. ह्या भौमितिक शैलीतील विशेष उल्लेखनीय मृत्पात्रांमध्ये ‘डीपीलोन अँफोरा – दोन मुठी असलेले मद्यकुंभ’ (Dipylon Amphora) व ‘डीपीलोन क्रॅटर – मिश्रणपात्र’ (Dipylon Krater) यांचा समावेश होतो. ह्या कलशावरती ‘होरोर वाकुई’ ह्या विशिष्ट शैलीचा वापर केलेला दिसतो. ज्यामध्ये पृष्ठभागावरील कुठलीही जागा रिकामी न ठेवता ती प्रतिमा व रूपचिन्हांनी भरलेली दिसते.

इ.स.पू. आठव्या शतकातील मृत्पात्री अमूर्त आभूषित केलेली आढळतात. आर्ष काळाच्या आरंभीस साधारण १०० वर्षांपर्यंत म्हणजे प्रादेशिक कालावधीतही (इ.स.पू. ७०० ते ६००) भौमितिक कला टिकून राहिलेली दिसते. साधारण इ.स.पू. ७७० च्या सुमारास फुलदाण्यांच्या मुठींवर प्रथमच मानवी आकृत्या काळ्या रंगात चित्रित केलेल्या दिसतात. पुरुषाकृती दाखवतांना त्रिकोणी आकारचे धड, अंडाकृती डोके त्यावर थेंबासारखे नाक, लांब दंडगोलाकार मांडी व पोटरी, तर स्त्री आकृती दाखवताना लांब रेषांमध्ये केस व बगलेखाली ओळींच्या स्वरूपात स्तन दर्शविलेले दिसतात. मृत्पात्रांच्या विशेष शैलीमध्ये या काळाच्या शेवटी इ.स.पू. सातव्या शतकाच्या मध्यास ओरिएंटल काळ्या आकृत्यांची शैली (Oriental Black Figure Style/ Orientalizing style), ‘ऍटीक मृत्पात्रांची शैली’ (Attic Vase Painting) व या काळाच्या शेवटी उदयास येऊन आर्ष काळात भरभराटीस आलेल्या  ‘काळ्या-आकृत्यांची शैली’ (Black-Figure pottery) यांचा समावेश होतो.

इ.स.पू. आठव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत संकुलांशी संबंधित असलेल्या धातूच्या वस्तूंमध्ये, बहुतकरून ऐच्छिक अर्पणासाठी वापरलेली अशी लहान कांस्य शिल्पे आढळतात. कांस्य व टेराकोटाच्या स्मारक-पात्रांवरील दृश्ये साक्ष देतात ती नव्यानेच वापरलेल्या प्रतिमांचा आभास निर्माण करणारी चित्रण-शैलीची. या दृश्यांमधे दफन-विधी संस्कार, कुलीन योद्ध्यांचे युद्ध-विश्व आणि त्यांची शस्त्रात्रे चितारलेली आढळतात. भौमितिक काळात नेहमीच्या सरावात सेंटॉर, शस्त्रधारी योद्धा, रथ आणि घोडा ह्या संकेतचिन्हांचा वापर केलेला दिसतो.

भौमितिक काळातील अस्तित्वात असलेल्या कलाकृतींवरून विविध माध्यमांतील नैपुण्य दिसून येते. जसे कातण, सजावट आणि मृत्पात्रांचे भाजण्याचे तंत्र; ओतकाम, थंड झालेल्या कांस्यावरील काम, रत्नांवरील खोदकाम आणि सोन्यावरील काम. ह्या काळातील कांस्य शिल्पे आणि स्मारक-मृत्पात्रे ग्रीक कलेतील स्पष्टता आणि अनुक्रम व्यक्त करतात.

संदर्भ :

  • Neer, Richard T., Greek Art and Archaeology : A New History, c. 2500-c. 150 B.C.E. Thames and Hudson, 2011.
  • Norris Michael, Greek Art from prehistoric to classical a resource for educators, The Metropolitan Museum of Art, New York, 2000.
  • Pedley, John G., Greek Art and Archaeology, Pearson, 2011.
  • Spivey, Nigel J., Greek Art, 1997.
  • Whitley, James, The Archeology of Ancient Greece, United Kingdom, 2001.