प्रस्तावना : व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याच्या आजाराचे निदान करणे व उपचार पद्धती ठरविणे यासाठी आरोग्य संस्थांमध्ये नियमित व वारंवार त्याची जीवनावश्यक चिन्हे तपासली जातात . यामध्ये शरीराचे तापमान, नाडीचा दर, श्वसनाचा वेग, रक्तदाब, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादींचा समावेश होतो. यांना आरोग्याचे जीवनावश्यक निर्देशांक असेही म्हटले जाते. हे निर्देशांक तपासल्यामुळे व्यक्तीच्या रक्ताभिसरण, श्वसन, मज्जा इ. महत्त्वाच्या शारीरिक संस्था तसेच अंत:स्रावी ग्रंथी यांचे कार्य सुरळीतपणे चालले आहे की नाही हे समजते. रुग्णाच्या शारीरिक अवस्थेचे तातडीने व प्रभावी निदान करण्यासाठी ताप, नाडी व श्वसन हे निर्देशांक तपासले जातात, त्यामुळे रुग्णाच्या शरीरामध्ये होणारे बदल लगेच कळून येतात. रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर व उपचारादरम्यान त्याचे वरील जीवनावश्यक निर्देशांक तपासण्याची व नोंद ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी परिचारिकेवर असते.
वय, लिंग, दिवसातील वेळ (उदा., सकाळ, दुपार, संध्याकाळ), व्यायाम, भावनिक संतुलन, शारीरिक स्थिती (उदा., बसणे, झोपणे, उठणे इ.), अन्नग्रहण व पचनाची स्थिती, वेदना, औषधाचे सेवन, वातावरणातील बदल, एखादा जंतुसंसर्ग किंवा आजार इत्यादी सर्व घटकांचा जीवनावश्यक निर्देशांकावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे तपासणी करत असताना परिचारिका या सर्व घटकांचा विचार करून रुग्णाची तपासणी करते व आलेल्या नोंदींचे अनुमान काढते. त्याचा उपयोग रुग्णाच्या रोगनिदानासाठी व उपचारासाठी केला जातो.
परिचारिका विविध निरीक्षणे करून खालील प्रकारे रुग्णाच्या नोंदी ठेवते :
वैशिष्ट्य | तापमान | नाडी | श्वसन | रक्तदाब |
स्वाभाविक दर | ९८.६°f किंवा ३७°c | ६०-१०० दर मिनिटाला | १६-२० दर मिनिटाला | १२०/८० mm of Hg |
तपासणीच्या जागा | काख, तोंड, गुदद्वार, जांघ, कान | मनगट, दंड, कानशिलाजवळ, दाढेजवळ, जांघ, घोट्याजवळ, मानेवर | छाती | दंड, मांडी, पाय |
गुणधर्म | दर (Rate) | दर, ताल (Rhythm), आकारमान (Volume), ताण (Tension) | दर, खोली (Depth), ताल | दर |
तपासणीचे साधन | तापमापक | वक्षश्रवणयंत्र (stethoscope), घड्याळ | घड्याळ | रक्त दाब मापक |
अस्वाभाविकता | १)स्वाभाविकपेक्षा तापमान वाढणे (Hyperthermia, Fever, Pyrexia) : स्थिरताप, सततचा ताप, मधून मधून येणारा ताप, व्यस्त ताप, अनिश्चितचा ताप
२) स्वाभाविक पेक्षा कमी तपमान होणे (Hypothermia, Low Pyrexia) |
१)जलद नाडी (Tachycardia)
२)मंद नाडी (Bradycardia) |
१)मंद श्वसन (Bradypnea)
२)जलद श्वसन (Tachypnoea) ३)श्वासावरोध (Apnoea) ४)गुदमरणे (Asphyxia) ५)प्रतत श्वास (Stridor) ६)ग्रूंटिंग (Grunting) ७)धाप लागणे (Dyspnoea) ८)ऊर्ध्वस्त श्वसन (Orthopnoea) ९) निलंगावस्था (Cyanosis) |
१)उच्च रक्तदाब (Hypertension)
२)कमी रक्तदाब (Hypotension) |
जीवनावश्यक चिन्हे तपासणीच्या वेळा :
- रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यावर प्रथम तपासणीच्यावेळी.
- रुग्णालयाच्या नियमानुसार तसेच नियमित वेळापत्रकानुसार दिवसातून सहा वेळा दर चार तासाने.
- एखादी छोटी किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी व केल्यानंतर आवश्यकतेनुसार दर अर्ध्या तासाने.
- एखादे महत्त्वाचे औषध (गोळी किंवा इंजेक्शन) देण्यापूर्वी.
- रुग्णावर एखादी ठराविक शुश्रूषा प्रक्रिया व शारीरिक व्यायाम करण्यापूर्वी व केल्यानंतर.
- रुग्णास रक्त देण्यापूर्वी व रक्त देण्याची प्रक्रिया सुरू असताना दर अर्ध्या तासाने.
- गंभीर अवस्थेतील रुग्णाचा रक्तदाब आवश्यकतेनुसार दर 15 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने मोजणे/निरीक्षणे.
परिचारिकेने लक्षात ठेवावयाचे मुद्दे : जीवनावश्यक चिन्हे तपासण्याची महत्त्वाची जबाबदारी ही परिचारिकेची असते. रुग्णालयात रुग्ण कक्षात कर्तव्यावर असणारी परिचारिका स्वतः वर सांगितलेल्या वेळेनुसार तपासणी करते. रुग्णाची तब्येत स्थिर आहे अशा रुग्णांची जीवनावश्यक चिन्हे तपासणी विद्यार्थी परिचारिकांकडून दर चार तासांनी करून घेतली जाते.
- जीवनावश्यक चिन्हे तपासणीसाठी तापमापक, रक्तदाबमापक, घड्याळ, निर्जंतुकीकरणासाठी द्रावण इत्यादी सर्व आवश्यक साहित्य व उपकरणे सुस्थितीत उपलब्ध करून घेणे व त्यांची योग्यता तपासून घेणे. तापमापक प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र असावा. तसे नसल्यास निर्जंतुक करूनच दुसऱ्या रुग्णासाठी वापरावा.
- रुग्णाची ताप, नाडी, श्वसन व रक्तदाब यांचा मूलभूत दर किती आहेत हे पहाणे जेणेकरून पुढे त्यामध्ये होणारा बदल लक्षात येईल.
- तपासणीपूर्वी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास जाणून घेणे. त्याला सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती करून घेणे.
- तपासणीपूर्वी वातावरण निर्मिती करणे. कारण वातावरणातील काही गोष्टी निर्देशांकावर परिणाम करतात. उदा. रुग्ण कक्षामध्ये गरम हवा असेल तर रुग्णाचे शारीरिक तापमान वाढलेले असते.
- तपासणीची कृती टप्प्याटप्प्याने करावी व ती करण्यापूर्वी रुग्णाला समजावून सांगावी जेणेकरून त्याचे सहकार्य मिळते.
- रुग्णाच्या शारीरिक ताप घेण्याची जागा निवडावी. ताप घेण्यापूर्वी ती जागा स्वच्छ कोरडी करावी.
- ताप, नाडी, श्वसन एकाच वेळी तपासावे.
- रुग्णाची शारीरिक तयारी करावी. रुग्णाला कोणतेही गरम किंवा थंड पदार्थ देऊ नये. त्याच्या अंगावरील गरम व जास्तीचे अंथरूण कमी करावे. रुग्णाने कोणतेही शारीरिक श्रम केलेले नसावेत.
- तपासणीच्या वेळी शांतता ठेवावी. परिचारिकेने विशेषतः नाडी व श्वसन तपासणीच्या वेळी सर्व लक्ष केंद्रित करून तपासणी करावी.
- तपासणी केल्यानंतर तक्त्यात नमूद केलेल्या गुणधर्मांनुसार रुग्णाच्या शारीरिक स्थितीच्या अनुषंगाने अनुमान काढावे.
- आवश्यकतेनुसार रुग्ण व नातेवाईकांना त्याची माहिती द्यावी.
- ताप, नाडी, श्वसन व रक्तदाब यामध्ये काही कमी जास्त असल्यास त्यानुसार उपचार सुरू करावेत. उदा., ताप वाढल्यास शितोपचार सुरू करणे, शरीर थंड पडल्यास रुग्णास उबदार ठेवणे, रक्तदाब वाढल्यास तज्ञांच्या सूचनेनुसार गोळी देणे व कमी झाल्यास सलाईन लावणे, श्वसनाचा दर वाढला असेल किंवा रुग्णाला धाप लागली असेल तर त्याला पाठीला टेकवून बसण्याची स्थिती द्यावी व गरजेनुसार प्राणवायू सुरू करावा, इत्यादी.
- वरील उपचार करत असतानाच डॉक्टरांना रुग्णाच्या तब्येतीविषयी कळवावे व त्यांच्या आदेशानुसार पुढील उपचार द्यावेत.
- तपासणी केलेल्या सर्व नोंदी केसपेपर वरील तापाच्या तक्त्यावर नोंद कराव्यात. त्यामुळे मागील नोंदींनुसार रुग्णाच्या शारीरिक स्थितीमध्ये होत असलेला बदल लक्षात येतो.
अशाप्रकारे परिचारिकेवर फक्त ताप, नाडी, श्वसन व रक्तदाब तपासणी जबाबदारी असते असे नाही तर तपासणीनंतर आढळून आलेल्या नोंदीनुसार रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारीदेखील पार पाडाची लागते. त्यासाठी आवश्यक असलेले वर सांगितल्याप्रमाणे आढळून येणाऱ्या विविध अस्वाभाविकतांविषयी सुद्धा तिला ज्ञान प्राप्त असणे गरजेचे असते. परिचारिकेने केलेल्या या महत्त्वाच्या नोंदीमुळे रुग्णाच्या आजाराचे निदान केले जाते. परिचारिका सर्व शास्त्रीय तत्त्वांचा वापर करून ताप, नाडी, श्वसन व रक्तदाब या जीवनावश्यक चिन्हांची तपासणी करते.
संदर्भ :
- Sr. Nancy, Principles & Practice of Nursing, Nursing Arts Procedures, 7th Ed.
- Potter & Perry, Fundamental of Nursing.
समीक्षक : कविता मातेरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.