कृत्तिका नक्षत्र : नक्षत्र चक्रातील कृत्तिका हे तिसरे नक्षत्र. वृषभ राशीतील कृत्तिका हा साध्या डोळ्यांनी दिसणारा आकाशातील सुंदर असा तारकापुंज आहे. कृत्तिकेचे पाश्चात्य नाव प्लीॲडेझ (Pleiades) असे आहे. त्यांनाच सेव्हन सिस्टर्स असेही म्हणतात. वृषभ राशीत आयनिकवृत्ताच्या एका बाजूला रोहिणीचा लाल तेजस्वी तारा तर दुसऱ्या  बाजूला कृत्तिकेचा तारकापुंज आहे. वृषभ राशीतील बैलाच्या वशिंडाची जागा कृत्तिकेने दाखवली जाते. कृत्तिकेच्या उत्तरेस ययाती हा तारकासमूह येतो.

कृत्तिकेत सात तारका आहेत असे म्हणतात. परंतु साध्या डोळ्यांनी सहाच ओळखू येतात. मात्र दूरदर्शीतून बघितल्या तर त्यात असंख्य तारका दिसतात. या तारकापुंजात उष्ण आणि निळ्या रंगांच्या ताऱ्यांची संख्या जास्त आहे. या ताऱ्यांचे वर्णपटीय वर्गीकरण उष्ण असणाऱ्या ‘बी’ प्रकारच्या ताऱ्यांमध्ये होते. या तारकापुंजाला ‘M45’ असेही म्हणतात. म्हणजे मेस्सिएच्या यादीतील ही ४५ वी वस्तू. याचे वर्गीकरण ‘खुला तारकागुच्छ’ असे करण्यात येते. हा तारकागुच्छ निळसर रंगाच्या मोठ्या तेजोमेघांमध्ये गुरफटलेला आहे. त्यामुळे तो निळ्या अभ्रिकेमध्ये ठेवलेल्या मोत्यांसारखा दिसतो. त्यातल्या बहुतेक प्रत्येक ताऱ्याभोवती ही निराळी अशी अभ्रिका आहे. यातल्या ताऱ्यांच्या प्रकाशामुळे त्यांच्याभोवती असणारा वायूचा मेघ प्रकाशित होत असल्याने या मेघाला ‘रिफ्लेक्शन नेब्युला’ म्हणजे परावर्तित प्रकाशामुळे दिसून येणारा तेजोमेघ असे म्हटले जाते. हा तारकागुच्छ पृथ्वीपासून अंदाजे ४४४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याची एकूण दृष्यप्रत १.६ आहे. त्यामुळे आकाशात तो सहज लक्षात येतो. कृत्तिकेतील प्रत्येक तारकेला स्वत:ची अशी गती आहे, त्यामुळे काही काळानंतर पूर्वी दिसणाऱ्या सात ताऱ्यांपैकी एक तारका बहुतेक दूर गेल्यामुळे अंधूक होऊन दिसेनाशी झाली असावी.

कृत्तिकेशी निगडीत अनेक संस्कृतींमधून विविध मिथक कथा आढळतात. आपल्या भारतीय कल्पनेप्रमाणे त्यातल्या ७ तारकांना सप्तर्षींच्या पत्नी मानतात. अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती आणि चुपुणिका अशी त्यांची नावे आहेत. या सात मातांनी वाढवलेला मुलगा म्हणजेच शिवाचा पुत्र कार्तिकेय. त्याने पुढे तारकासुराचा वध केला. वेदकाळी या सातही तारका स्पष्ट दिसत असाव्यात. पुढे चुपुणिका दिसेनाशी झाली. तेव्हापासून कृत्तिकेच्या सहाच तारकांचा उल्लेख येतो. कार्तिक स्वामींच्या कथेतील सहा कृत्तिका याच त्याच्या सहा माता. यामुळे कार्तीकस्वामिंना ‘षण्मातुर’ असेही म्हणतात. सहा मातांपासून झालेल्या या बालकाला सहा मुखे प्राप्त झाली, म्हणून त्याला ‘षडानन’ असेही नाव पडले आहे.

ग्रीक पुराणातील कथेप्रमाणे प्लीॲडेझ या ॲटलस (तारकागुच्छातील तारा क्रमांक २७) आणि प्लिओने (त्याच्या शेजारचा तारा क्रमांक २३) या दोघांच्या सात कन्या मानल्या आहेत. यांची नावे अल्सिओन (Alcyone), मेरोप (Merope), सेलॅनो (Celano), टेयजेटा  (Taygeta), स्टेरोप (Sterope), इलेक्ट्रा (Electra) आणि माइआ (Maia) अशी आहेत. कथेनुसार या सात बहिणींचा पिता ॲटलस याला देवांनी अवघ्या जगाला आधार देण्यासाठी म्हणून आकाशात पाठवला. (एक गुडघा टेकून ॲटलस याने पृथ्वीचा गोल दोन्ही हातांनी डोक्यावर तोलून धरलेला आहे, असे चित्र आजही आपण नकाशाच्या पुस्तकावर बघतो.) या ॲटलसला देवांनी आकाशात पाठवले, म्हणून सातही बहिणी पितृविरहाच्या कल्पनेने आकांत करू लागल्या. त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्या सातही बहिणींना देवांनी आकाशात कायमचे स्थान दिले.

ग्रीक पुराणातील अजून एका कथेप्रमाणे ‘ओरायन’ नावाच्या पारध्याला घाबरून या सातही बहिणी पळाल्या, त्यांची कबुतरे बनली आणि आकाशात गेली, तीच आपल्याला कृत्तिकेच्या रूपाने दिसत आहेत.

पॉलिनेशिअन दंतकथे प्रमाणे ‘ताने’ नावाच्या एका देवाने एक अतिशय तेजस्वी अशी तारका गर्विष्ठपणाने मोडून सात भागात विखरून टाकली.  त्याच या कृत्तिका आहेत.

जपानच्या दक्षिणेला असलेल्या येयामा बेटावरील ओकिनावा लोकांच्या लोककथेप्रमाणे कृत्तिका म्हणजे ‘मुरीकाबुशी’ तारकापुंज. या तारकापुंजाच्या आकाशातील स्थानावरून तिथले शेतकरी शेतीच्या कामाचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातून भरपूर पीक मिळते. आजही तिथले शेतकरी मुरीकाबुशीच्या स्तुतीपर ‘मुरीकाबुशी युन्ता’ असे लोकगीत गातात.

पॉलिनेशिआ आणि पॅसिफिक बेटं यावरील पोलोवॅट या गावातील एक लोककथा आहे. त्यांच्या समजुतीप्रमाणे कृत्तिकेचा तारकापुंज हा दिशादर्शक आहे. कृत्तिकेला ते ‘म्वारीकर’ (Mwarikar) म्हणतात. म्वारीकर आणि तिच्या पाच कन्या म्हणजे कृत्तिकेतल्या सहा तारका. म्वारीकर हे नाव त्यांच्या जुलै महिन्याचे सुद्धा आहे. जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तिथले लोक असे म्हणतात की, म्वारीकरचे कुटुंब विखुरले गेले, म्हणून ती दु:खाने रडते आहे, तोच हा पाऊस.

समीक्षक : आनंद घैसास