पुरातत्त्वाची एक शाखा. त्यात पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन केले जाते. ही शाखा तुलनेने नवी असून विसाव्या शतकाच्या अखेरच्या चार दशकांपासून तिचा विकास होत गेला आहे. या शाखेला काही संशोधकांनी जलपुरातत्त्व (Hydro-archaeology) असे नाव दिले होते; परंतु ते फारसे प्रचलित झाले नाही.
समुद्राची अथवा तलावांची पातळी वाढणे, भूकंप व भूगर्भातील हालचालींमुळे जमीन खचणे, नदीच्या प्रवाहात बदल होणे आणि बंधारे व धरणांमुळे कृत्रिम जलाशय निर्माण होणे, अशा विविध कारणांमुळे प्राचीन सांस्कृतिक अवशेष पाण्यात बुडतात. त्याचप्रमाणे पाण्यात बुडलेल्या होड्या व जहाजे अशी जलवाहतुकीशी संबंधित साधने (Watercrafts) आणि युद्धनौका (Warships) यांचाही पुरातत्त्वीय पद्धतीने अभ्यास केला जातो. या सर्व प्रकारे पाण्याखाली गेलेल्या सांस्कृतिक अवशेषांचा अभ्यास करून ऐतिहासिक व वैज्ञानिक निष्कर्ष काढणे, हे या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही उद्दिष्टे इतर पुरातत्त्वीय संशोधनासारखीच असली तरी पाण्याखालील अवशेषांचा अभ्यास करताना विशेष तंत्रज्ञान वापरावे लागते.
सागरी पुरातत्त्व (Marine Archaeology), मेरिटाइम पुरातत्त्व (Maritime Archaeology) आणि नाविक पुरातत्त्व (Nautical Archaeology) या काही प्रमाणात परस्परांशी संबंधित अधोजल पुरातत्त्वाच्या उपशाखा आहेत. यातील प्रत्येक शाखेची कार्याची व्याप्ती, उद्दिष्टे आणि संशोधनाच्या पद्धती प्रामुख्याने साम्य असणारी असली तरी काही प्रमाणात त्यांच्यात फरकही आहेत. या उपशाखांची विभागणी व व्याख्या अद्याप पूर्णपणाने सर्वमान्य झालेल्या नाहीत. काही संशोधक सागरी पुरातत्त्व व मेरिटाइम पुरातत्त्व एकच असल्याचे मानतात. जे पुरातत्त्वीय अवशेष समुद्राच्या म्हणजेच खाऱ्या पाण्यात बुडलेले आहेत, त्यांचा अभ्यास सागरी पुरातत्त्वात केला जातो. एकेकाळी समुद्राचे जे भाग उघडे होते, तेथे मानवी वसती होती. समुद्राची पातळी वर आल्याने ते अवशेष आता समुद्राच्या पाण्यात बुडलेले आहेत. असे पाण्यात बुडालेले प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय अवशेष जगभरात फ्रान्स, इटली, ग्रीस, दक्षिण आफ्रिका व कॅलिफोर्निया अशा अनेक ठिकाणी मिळाले आहेत. तसेच नैसर्गिक कारणांनी खचून समुद्रात बुडालेली बंदरे (उदा., इझ्राएलमधील सेसारिया) व भूकंपामुळे समुद्रात बुडालेली शहरे (उदा., जमैकातील पोर्ट रॉयल) यांचा समावेश सागरी पुरातत्त्वामध्ये होतो.
मेरिटाइम पुरातत्त्वाची व्याप्ती थोडी अधिक आहे. त्यात समुद्राशी संबंधित वसाहती, मालवाहतुकीचे धक्के, दीपगृहे, बंदरे, बंदरांमधील माल साठवण्याची गोदामे आणि किनाऱ्यावरील संरक्षक रचना (किल्ले व टेहळणी चौक्या) यांचा समावेश होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सोमनाथ, पोरबंदर, भरूच, संजाण, सोपारा, चौल, केळशी, दाभोळ, विजयदुर्ग, गोपकपट्टण व विळिंजम आणि पूर्व किनाऱ्यावरील माणिकपटणा, गौरांगपटणा, खलकत्तापटणा व तामलुक (ताम्रलिप्ती) ही मेरिटाइम पुरातत्त्वाची काही उदाहरणे आहेत.
नाविक पुरातत्त्वामध्ये सर्व प्रकारची जलवाहतुकीची साधने (छोट्या होड्या, नौका, युद्धनौका, मालवाहू व प्रवासी जहाजे) आणि त्यांची बांधणी यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये नौकांचे नांगर यांच्या संशोधनाला खास स्थान आहे. नौकांचे इतर भाग जरी नष्ट झाले, तरी दगडी व लोखंडी नांगर बऱ्याच प्रमाणात टिकून राहतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाने ऐतिहासिक निष्कर्षांना मोठी मदत होते. पाण्यात बुडलेल्या नौका आणि जहाजांचा पुरातत्त्वीय अभ्यास करणारी जहाजबुडीचे पुरातत्त्व (Shipwreck Archaeology) ही नाविक पुरातत्त्वाची विशेष उपशाखा भरपूर विकसित झाली आहे. विविध कारणांमुळे आता जमिनीत गाडल्या गेलेल्या अवस्थेत मिळणाऱ्या प्राचीन नौका आणि जहाजांचा अभ्यासही नाविक पुरातत्त्वामध्ये केला जातो. केरळमधील पट्टनम उत्खननात आढळलेली सहा मीटर लांबीची नौका आणि कडक्करपल्ली येथील एकवीस मीटर लांबीची दोन शिडांची नौका ही याची भारतातील दोन उदाहरणे आहेत. जगात अनेक ठिकाणी नौका किंवा होडी यांचा दफनासाठी वापर केला असल्याची, तसेच दफनाचा भाग म्हणून नौका पुरल्याची (इजिप्तमधील ॲबिडॉस येथे इ. स. पू. १८४० मध्ये पुरलेला नौकांचा काफिला) उदाहरणे आहेत. नाविक पुरातत्त्वामध्ये अशा दफनांसाठी वापरलेल्या नौकांचा अभ्यास केला जातो.
अधोजल पुरातत्त्व ही एक भक्कम शाखा म्हणून १९५० नंतर प्रस्थापित झाली असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून वैयक्तिक पातळीवर अनेक जण पाण्यात बुड्या मारून प्राचीन अवशेष शोधत असत. अर्थात पुरातत्त्वातील इतर संशोधनाप्रमाणे येथेही मुख्य उद्देश हा बुडलेल्या जहाजांवरील खजिना अथवा मौल्यवान प्राचीन वस्तू शोधणे, असा असायचा. इटलीतील पिसा शहराजवळ आणि फ्रान्समधील मार्सेयजवळ इ. स. पू. पाचवे शतक ते इ. स. तिसरे शतक या काळातल्या समुद्रात बुडलेल्या ग्रीक व रोमन नौकांचा शोध ही अशा पाण्याखालील अवशेषांच्या सुरुवातीच्या शोधांची उदाहरणे आहेत. सन १९४० नंतर यात फरक पडत गेला. याचे मुख्य कारण म्हणजे फ्रान्सच्या नौदलातील अधिकारी याक-वेस काउस्टेउ (१९१०– १९९७) आणि फ्रेंच अभियंता एमिल गग्नान (१९००–१९८४) या दोघांनी स्कुबा उपकरण (SCUBA- Self-contained underwater breathing apparatus) विकसित केले. त्यामुळे पाणबुड्यांना पाण्याखाली शोधकार्य करणे सुकर झाले.
स्कुबा उपकरणे वापरून १९५० ते १९६० या दशकात फ्रान्स, इटली व ट्युनिशियाच्या किनारी भागात बुडलेल्या रोमन जहाजांचे उत्खनन करण्यात आले. या उत्खननांमध्ये पुरातत्त्वज्ञ स्वतः सहभागी होत नसत, तर ते व्यावसायिक पाणबुड्यांच्या निरीक्षणांवर आणि छायाचित्रांवर अवलंबून असत. कारण व्यावसायिक पाणबुड्यांना आपली मक्तेदारी टिकवायची असल्याने ते पाण्यात बुड्या मारून काम करणे अवघड असल्याची अतिशयोक्ती करत असत. परंतु पाण्यात बुड्या मारून उत्खनन करणे अवघड असल्याची कल्पना फ्लोरिडा विद्यापीठातील अमेरिकन प्राध्यापक जॉन गोगीन (१९१६–१९६३) यांनी स्वतः फ्लोरिडातील नदीच्या मुखापाशी पाण्यात काम करून झटकून टाकली. ‘व्यावसायिक पाणबुड्यांना पुरातत्त्व शिकवण्यापेक्षा पुरातत्त्वज्ञांना पाण्यात बुड्या मारणे शिकवणे फार सोपे आहेʼ असे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे.
तुर्कस्थानातील केप गेलिडोन्या (Cape Gelidonya) येथे समुद्राच्या तळापाशी असलेल्या ताम्रपाषाणयुगीन नौकेचे १९६० मधील संशोधन हे स्वतः पाणबुड्या असलेल्या एखाद्या पुरातत्त्वज्ञाने (जॉर्ज बॅस, १९३२–२०२१) केलेले पहिले उत्खनन होते. या नंतर पाण्याखालील अवशेषांच्या पुरातत्त्वीय संशोधनाला गती मिळाली आणि संशोधनासाठी लागणाऱ्या उपकरणांमध्ये व तंत्रज्ञानामध्ये सतत प्रगती होत गेली. आता पाण्याखालील अवशेषांच्या नोंदणी व उत्खननासाठी मानवसहित व दूरसंचालित मानवरहित वाहक (ROV-Remotely Operated Vehicles) म्हणजेच छोट्या पाणबुड्या, सोनार प्रणाली (Sonar System) आणि मॅग्नॅटोमीटर यंत्रणा (Magnetometer system) असे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा कामासाठी विशिष्ट प्रकारच्या संशोधन नौकांची (Research Vessels) गरज असते. जमिनीखालील अवशेषांच्या संशोधनापेक्षा पाण्याखालील अवशेषांचे सर्वेक्षण, उत्खनन आणि जतन-संवर्धन हे अधिक जटील व खर्चिक असते.
सन १९७२ मध्ये जॉर्ज बॅस यांनी अमेरिकेत ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’ या संस्थेची स्थापना केली. त्याच वर्षी ब्रिटनमधील नॉटिकल आर्किऑलॉजी सोसायटीने (स्थापना १९६४) इंटरनॅशनल जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक सुरू केले. तसेच १९७०-१९८० या दशकात जगभरात अनेक विद्यापीठांमध्ये अधोजल पुरातत्त्व या विषयाचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश झाला. सन २००१ मध्ये युनेस्कोने पॅरिस येथील परिषदेत पाण्याखाली गेलेल्या सांस्कृतिक वारसा स्थळांचे नियमन करणारा मसुदा मंजूर केला. पाण्याखालील अवशेषांचे वैज्ञानिक पद्धतीने केले जाणारे संशोधन आणि खजिन्याच्या शोधासाठी केले जाणारे अनैतिक उद्योग यांच्यात फरक करणारी रेषा आखण्यासाठी अशी आंतरराष्ट्रीय सहमती गरजेची होती.
भारतात अधोजल पुरातत्त्वीय संशोधनाची सुरवात एस. आर. राव (१९२२–२०१३) यांनी केली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातून निवृत्त झाल्यानंतर १९८१ मध्ये गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (एन. आय. ओ. – National Institute of Oceanography) येथे त्यांनी सागरी पुरातत्त्वाचा प्रारंभ केला. त्याच वर्षी तमिळनाडू सरकारने एन.आय.ओ.च्या मदतीने प्राचीन कावेरीपट्टणमचे समुद्रात बुडलेले अवशेष शोधण्याची मोहीम हाती घेतली. एन. आय. ओ. ने १९८१ ते १९९७ दरम्यान द्वारका व बेट द्वारका (गुजरात), पुम्पुहार व महाबलिपुरम (तामिळनाडू), आणि काव्हारट्टी व सुहेली पार रीफ (लक्षद्वीप) या ठिकाणी सागरी पुरातत्त्वीय संशोधन प्रकल्प पूर्ण केले. त्यानंतरही एन. आय. ओ. मधील सागरी पुरातत्त्वज्ञांनी देशाच्या इतर भागांमध्ये असे संशोधन चालू ठेवले आहे. त्यात गुजरातमधील बेट द्वारका, कोडिनार (मूळ द्वारका) व सोमनाथ आणि महाराष्ट्रातील घारापुरी (एलिफंटा), विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर यांचा समावेश आहे.
सन १९८३ मध्ये तंजावरच्या तमिळ विद्यापीठात अशा संशोधनाचे केंद्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने सुरू झाले. या केंद्राने तमिळनाडूच्या किनारी भागात विस्तृत सर्वेक्षण केले. असेच केंद्र विशाखापट्टणम येथे आंध्र विद्यापीठात १९८७ मध्ये सुरू झाले व येथील सागरी पुरातत्त्वज्ञांनी विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर केलेल्या सर्वेक्षणात अकराव्या शतकातील शिवमंदिराचा शोध घेतला. सन २००१ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने अधोजल पुरातत्त्वीय संशोधनासाठी विशेष विभाग सुरू केला. या विभागाने अरिकामेडू (पुदुच्चेरी), पुम्पुहार व महाबलिपुरम (तमिळनाडू) आणि महाराष्ट्रातील घारापुरी येथे प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच या विभागाने भारतीय नौदलाच्या मदतीने लक्षद्वीप बेटसमूहातील बंगारम या बेटाजवळ बुडलेल्या ’प्रिन्सेस रॉयल’ या ब्रिटिश जहाजाचे उत्खनन केले आहे.
संदर्भ :
- Bass, George F. ‘The Development of Maritime Archaeologyʼ, The Oxford Handbook of Maritime Archaeology (Eds., Ford, Ben; Hamilton, Donny L. & Catsambis, Alexis), 2013.
- Green, Jeremy, Maritime Archaeology : A Technical Handbook, Elsevier, London, 2004.
- Tripathi, Alok, Marine Archaeology: Recent Advances, Agam Kala Prakashan, Delhi, 2005.
समीक्षक : श्रीनंद बापट