प्रभुत्व अध्ययनाच्या प्रक्रियेत प्रत्याभरण आणि उपचारात्मक अध्यापन हे सर्वांत महत्त्वाचे असते. प्रभुत्व अध्ययनाची संकल्पना कोमोनियस यांनी सतराव्या शतकात मांडली. आजमितीला प्रभुत्व अध्ययनाविषयीच्या विविध कल्पना प्रचारात आहेत. त्यांनुसार अध्यापन संवेदनशील व पद्धतशीरपणे पार पडणे आणि प्रभुत्व संपादण्यासाठी विद्यार्थ्यास पुरेसा वेळ यांद्वारे बहुसंख्य विद्यार्थी उच्च प्रकारची क्षमता प्राप्त करू शकतात; परंतु त्यासाठी प्रभुत्व अध्ययनाचे निकष स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. प्रत्याभरणाच्या विविध साधनांचा वापर आवश्यक असतो. शिक्षणतज्ज्ञ जे. एच. ब्लॉक आणि पिटरसन यांच्या संशोधनानुसार प्रभुत्व अध्ययनासाठी वैशिष्ट्यपूर्ण अध्ययन व अध्यापन प्रक्रिया राबविल्या, तर जवळपास ८०% विद्यार्थी अध्ययनात ८०%  प्रभुत्व संपादन करू शकतात.

कॅरोल यांचे प्रतिमाने : जॉन. बी. कॅरोल यांनी अध्ययनातील प्रभुत्वाविषयी ‘मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग’ हे प्रतिमान मांडले. या प्रतिमानात प्रत्येक विद्यार्थ्याला काही पातळीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी आवश्यक तो वेळ देणे अपेक्षित असते. ज्यामुळे तो अध्ययनाची अपेक्षित पातळी गाठतो. जर विद्यार्थ्याला पुरेसा वेळ दिला गेला नसेल, तर विद्यार्थ्याने प्राप्त करायच्या अध्ययनाला मिळालेला वेळ आणि प्रत्यक्षात त्याने अध्ययनासाठी वापरलेला वेळ यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात अध्ययन घडते, असे ते म्हणतात.

विशिष्ट शालेय परिस्थितीत विद्यार्थ्याने अभ्यासासाठी वापरलेला वेळ आणि प्रत्यक्षात त्याला अध्ययन पातळी गाठण्यासाठी लागलेला वेळ यांचा सबंध अध्यापनाशी असतो. असे या प्रतिमानात स्पष्ट म्हटले आहे. या प्रतिमानात विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी विद्यार्थ्याला अध्ययनातील दिलेला वेळ, त्यांची चिकाटी, अभियोग्यता, अध्यापनाचा दर्जा आणि विद्यार्थ्याची आकलनक्षमता या घटकांवर अवलंबून असते.

अध्ययनाकरिता दिलेला वेळ : शाळेत प्रत्येक तासाचे निश्चित वेळापत्रक असते. काही विद्यार्थ्यांना तो वेळ अधिक वाटतो, तर काही विद्यार्थ्यांना कमी वाटतो. कॅरोल यांच्या मते, प्रभुत्व प्राप्तीत अध्ययनासाठी दिलेला वेळ महत्त्वाचा असतो. अभियोग्यता ही अध्ययनाची गती ठरविते. विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढा वेळ दिला, तर प्रभुत्व प्राप्त करता येते. विद्यार्थ्यांची अभियोग्यता, शाब्दिक क्षमता, वर्गामधील अनुदेशनाची गुणवत्ता आणि वर्गाबाहेरून मिळणारी मदतीची गुणवत्ता या बाबींचाही त्यावर परिणाम होतो. व्यक्तीपरत्वे प्रभुत्व अध्ययनाचा वेळ भिन्न असतो आणि अनुदेशनाची गुणवत्ता, तसेच दर्जा सुधारण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेचा योग्य उपयोग हा भेद कमी करू शकतो.

चिकाटी : ‘चिकाटी म्हणजे विद्यार्थ्याची अध्ययनात वेळ घालविण्याची तयारी होय’. एखाद्या विशिष्ट आशयावर प्रभुत्व मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला लागणारा वेळ त्याने सक्रीयपणे पूर्णतः अध्ययनासाठी न वापरल्यास त्याचे प्रभुत्त्व अध्ययन होत नाही. विद्यार्थ्याचा अध्ययनाप्रती दृष्टीकोन आणि रुची यांच्याशी चिकाटी संबंधित असते. एखाद्या विशिष्ट अध्ययनाच्या कृती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील चिकाटीत भिन्नता असली, तरी जर त्यांना भूतकाळात बक्षिसे वा प्रोत्साहन मिळालेले असेल, तर विद्यार्थी अध्ययनामध्ये जास्त वेळ घालवितो. याउलट, जर त्याचे भूतकाळातील अनुभव निराशाजनक असतील, तर तो अध्ययनासाठी कमी वेळ देतो. अध्ययनातील चिकाटी वाढविण्यासाठी सतत मिळणारे प्रोत्साहन, बक्षिसे आणि यश हे कारणीभूत ठरतात. दिलेल्या कार्यात प्रभुत्व प्राप्त करता आले, तर चिकाटी ही आपोआपच वाढत जाते. अनुदेशनाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात असली, तर चिकाटीची गरज कमी भासते.

अभियोग्यता : अभियोग्यता म्हणजे विशिष्ट ज्ञानक्षेत्रात कौशल्याने कार्य करण्याची क्षमता होय. कॅरोल यांच्या मते, ‘अभियोग्यता म्हणजे विशिष्ट आशय व कौशल्य यांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी व्यक्तीला लागणाऱ्या वेळेचे प्रमाण होय’. अभियोग्यता असेल, तर अध्ययनाला जास्त वेळ लागतो आणि जास्त असेल, तर कमी वेळेत कुशलतेने जास्त अध्ययन घडते. प्रत्येक व्यक्तींना सर्वच क्षेत्रांत उच्च कोटीची कौशल्ये व ज्ञान प्राप्तीसाठी यांच्या अभियोग्यतेनुसार कमी-जास्त वेळ लागेतो, असे या प्रतिमानात गृहीत धरले आहे. अभियोग्यता अध्ययनार्थीचे अध्ययन वातावरण, परिसर, आजुबाजुच्या वातावरणातील, शाळेतील आणि घरातील अध्ययन अनुभव यांवरून सुधारता येते.

अध्यापन दर्जा : एखाद्या अध्ययनार्थ्यासाठी सर्वांत जास्त अनुकूल अध्यापन पद्धतीचा उपयोग म्हणजे अध्यापनाचा दर्जा होय. काही विद्यार्थी स्वअध्यापनातून शिकू शकतात, तर काहींना सरचित अध्यापनाची गरज असते. काहींना मूर्त उदाहरणाची गरज असते, तर काहींना प्रबलनाची गरज असते. विद्यार्थ्यांच्या गरजानूसार आयोजित केलेले अध्यापन म्हणजे ‘दर्जेदार अध्यापन’ होय.

आकलन क्षमता : जे विशेष कार्य शिकायचे आहे, ते कार्य आणि ते शिकण्याची पद्धती या दोन्ही गोष्टींचे आकलन होण्याची क्षमता म्हणजे ‘अध्यापनाची आकलन क्षमता’ होय. ती क्षमता अध्यापन साहित्य आणि शिकविणाऱ्याची अध्यापन कौशल्ये यांवर अवलंबून असते. शिक्षकाचे शिकविणे समजत असेल किंवा अध्ययन साहित्यांचे आकलन होत असेल, तर त्याला विषयाच्या अध्ययनात जास्त अडचणी येत नाहीत. शिक्षकांची मौखिक क्षमता आणि वाचनातून होणारे आकलन यांवर आकलन क्षमता अवलंबून असते.

ब्लूमची प्रतिमाने : शिक्षणतज्ज्ञ बी. एस. ब्लूम यांनी प्रभुत्व अध्ययनाविषयी बरेच कार्य केले आहे. ब्लूम याच्या मते, अध्ययनाला लागणारा वेळ, चिकाटी, अभियोग्यता, अध्यापन दर्जा आणि विद्यार्थी आकलन क्षमता हे घटक लक्षात घेता बहुतांशी घटक विद्यार्थ्यांशी संबंधित असून तुलनेने शिक्षकांशी कमी संबंधित आहेत; परंतु या घटकांच्या परस्पर मदतीने विद्यार्थी त्या सर्वांचे नियंत्रण करू शकतो व प्रभुत्व अध्ययन प्राप्त करू शकतो हे निश्चित. ब्लूम यांच्या प्रभुत्व विषयक दृष्टीकोनात विद्यार्थ्यांना जे जे शिकविले जाईल, त्यात सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण प्राविण्य संपादन करण्यासाठी काही प्रक्रिया घडणे आवश्यक असते. ते अध्ययन आणि अध्यापन मोजता येते. ब्लूम यांच्या प्रतिमानानुसार शेकडा ७५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रभुत्व मिळविणे शक्य आहे. त्यासाठी त्यांनी नित्याच्या अध्ययनापेक्षा सफाईदारपणे अध्य्ययनासाठीचे मार्ग सुचविले आहेत. प्रभुत्व अध्ययन पद्धती ही पारंपरिक वर्गाध्यापनापेक्षा विद्यार्थ्यांची विषयात रुची आणि अभिवृत्ती विकसित करते. ब्लूम यांनी कॅराल यांच्या संकलनात्मक प्रतिमानाचे प्रभुत्व अध्ययन प्रतिमानात रूपांतरण केले. ब्लूम यांच्या युक्तीवादानुसार त्यांना समान दर्जाच्या विषयांचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर संपादन आणि अभिवृत्ती यांमधील परस्परसंबंध उच्च प्रतीचे मिळतात, ही परिस्थिती पुढीलप्रमाणे दर्शविता येते.

 

 

प्रति विद्यार्थी समान अध्यापन : प्रत्येक विद्यार्थ्याला अनुकूल दर्जाचे अध्यापन आणि पुरेसा वेळ, मिळाल्यास प्रभुत्व अध्ययन होते. यात अभिवृत्ती आणि संपादनात संबंध असत नाही. ही परिस्थिती पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते.

प्रति विद्यार्थी उपयुक्त अध्यापन : यापूर्वीच्या अध्ययन प्रभुत्वविषयक कार्यनीतीपेक्षा ब्लूम यांचा दृष्टीकोन अधिक प्रगत आहे; कारण प्रत्याभरणाची साधने त्यात खूप प्रगत आहेत. अध्ययन – अध्यापनाची अंतर्गत बाब म्हणून त्यात सातत्याने मूल्यमापनाची योजना केलेली आहे. शिक्षक व विद्यार्थ्याला अध्ययन – अध्यापन विकासासाठी सतत प्रत्याभरण पुरविले जाते. यामुळे या पद्धतीत सतत विकास होत असल्याने विद्यार्थ्याला अध्ययनात प्रभुत्व मिळविणे शक्य होते. तसेच ही पद्धती पूर्वीच्या अध्यापन पद्धतीपेक्षा वेगवेगळी उपचारात्मक अध्यापन साधने सुचविते. ही सुधारणा करणारी साधने प्रत्येक विद्यार्थ्याला सुचविली जातात. तसेच घटकाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना, कृती आणि अभ्यासाशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे सराव करण्याचीही संधी दिली जाते. यासाठी लहान लहान गटांचे अभ्याससत्र, व्यक्तीगत रीत्या अध्यापन, पर्यायी अध्यापन साहित्य (उदा., अधिक क्रमिक पुस्तके, कार्यपुस्तिका, क्रमान्वित अध्ययन, दृकश्राव्य साधने, पद्धती आणि शिक्षणविषयक खेळ इत्यादी.) आणि पुनरअध्यापन या साधनांचा वापर करता येतो.

अपेक्षित अध्ययन निष्पत्तीची विभागणी ही प्रभुत्व निष्पत्ती आणि विकासात्मक निष्पत्ती अशी केली जाते. प्रभुत्व निष्पत्ती ही अभ्यासक्रमाच्या किमान उद्दिष्टांशी निगडित असते, (उदा., मुलभूत कौशल्य) जी सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलीच पाहिजे. विकासात्मक निष्पत्ती या व्यक्तीपरत्वे भिन्न आणि गुंतागुंतीच्या असतात. (उदा., समस्या आकलन, उपयोजन इत्यादी) ज्यामध्ये विद्यार्थ्याने निरनिराळ्या श्रेणींची प्रगती दाखवावी, अशी अपेक्षा असते. वर्ग अध्यापनातील प्रभुत्व अध्ययनाचा दुसराही एक दृष्टीकोन आहे. या दृष्टीकोनानुसार सर्व अपेक्षित अध्ययन निष्पत्तींच्या मुलभूत कार्यनीतीचे उपयोजन करणे अपेक्षित आहे. हा दृष्टीकोन अनेक शिक्षणतज्ज्ञांनी स्वीकारलेला होता.

ब्लूम यांचा प्रभुत्व अध्ययन दृष्टीकोन हा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात उद्दिष्टांच्या आधारे एका निश्चित प्रभुत्वाच्या पातळीपर्यंत आणणाऱ्या अध्यापनकार्यनीतीचा आहे. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक अध्ययनातील अडचणींवर मात करण्यासाठी ही पद्धती नियमित वर्ग, अध्यापन आणि प्रत्याभरण, उपचारात्मक अध्यापन तंत्रे यांचा एकत्रित विचार करते. ज्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अधिक वेळ हवा आहे, त्यांना तो दिला जातो. अशा प्रकारे ब्लूम यांची पद्धत ही गटावर आधारित अध्यापनाचा वापर करते. त्याच बरोबर गटावर आधारित अध्यापनाद्वारे जे प्रभुत्व मिळवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेल्या सुधारित अभ्यासाची जोड दिली जाते. या कार्यनितीत अभ्यासक्रमाची विभागणी अध्ययन घटकांमध्ये करण्यात येते. या अध्ययन कृती एक किंवा दोन सप्ताहांच्या कालावधीत पूर्ण करता येतात. प्रत्येक अध्ययन घटकासाठी निश्चित अनुदेशन उद्दिष्ट्ये लिहून अध्ययनाच्या फलनिष्पत्तींवर भर दिला जातो. प्रत्येक अध्ययन घटकांच्या उद्दिष्टांसाठी प्रभुत्व मानके निश्चित ठरविली जातात. ही प्रभुत्व मानके साधारणतः ८० ते ८५ टक्के बरोबर असतात. विद्यार्थ्याने केलेले मागील कार्य लक्षात घेतले जाते. नियमित साहित्य व सांघिक अध्यापन पद्धतींचा वापर करून प्रत्येक घटकाचे अध्यापन केले जाते. प्रत्येक अध्ययन घटकाच्या शेवटी निदानात्मक प्रगती/कसोट्या दिलेल्या असतात. निरंतर मूल्यमापनामुळे अध्ययनाचे प्रबलीकरण होते. झालेल्या चुका लक्षात आल्याने त्यावर प्रभुत्व प्राप्त करता येते.  या कसोट्यांचा उपयोग श्रेणी देण्यासाठी केला जात नाही. जे विद्यार्थी अध्ययन प्रभुत्व प्राप्त करीत नाहीत, त्यांच्या अध्ययन चुका दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट पद्धती निश्चित करण्यात येते व त्यासाठी जादा वेळ दिला जातो. सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अंतिम परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा उपयोग श्रेणी देण्यासाठी केला जातो, तसेच घटक चाचणी व अंतिम कसोटी यांच्या फलनिष्पत्तीचा विचार अध्यापनात सुधारणा करण्यासाठी केला जातो. ज्या घटकांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना अध्ययन प्रभुत्व मिळविण्यात अडचणी येतात, त्यामध्ये योग्य तो बदल यामुळे करता येतो.

ब्लूम यांची अध्ययन प्रभुत्वाची कार्यनीती ही विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत गरजानुसार अनुदेशनासाठी विशिष्ट तंत्राचा वापर करणारी, पण समूहाधिष्ठित अध्यापनावर आधारलेली आहे. ही पद्धती पारंपरिक वर्ग अध्यापनापेक्षा वेगळी आहे; कारण अध्ययन घटकाच्या सर्व उद्दिष्टांच्या प्रभुत्वावर ही पद्धती भर देते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनातील विशिष्ट उणिवा, अडचणी शोधण्यापेक्षा ही पद्धती सातत्याने मुल्यांकन प्रक्रियांचा वापर करते, अध्ययन अडचणीवर मात करण्यासाठी ही पद्धती मदत करते. ही पद्धती पद्धतशीर असे प्रत्याभरण, सुधारित अध्यापन पद्धती आणि पर्यायी अध्ययन साधनसामग्री स्रोत (क्रमन्वित साहित्य) यांचा वापर करते आणि ज्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अधिक वेळ हवा असेल, त्यांना तो वेळ दिला जातो. ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन पद्धती ठरावीक वेळ आणि प्रावीण्यांचे विविध पातळीवरील संपादन यांवर भर देते. विद्यार्थ्याने कशा प्रकारे प्रभुत्व मिळवले आहे, यापेक्षा त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी त्यांच्या संपादनाची तुलना करून प्रभुत्वाची पातळी ठरवली जाते.

प्रभुत्व पातळी विद्यार्थ्याच्या संपादनाची पातळी आणि किती विद्यार्थ्यांनी ती संपादन पातळी साध्य केलेली आहे, या दोन घटकांच्या आधारे ठरवली जाते. या दोन्ही घटकांचा उल्लेख प्रभुत्व पातळीत केला जातो. ८०% विद्यार्थ्यांनी ८०% गुण प्राप्त केल्यास ८०/८० प्रभुत्व पातळी साध्य झाली, असे म्हणता येईल. परिपूर्ण प्रभुत्व पातळी ९०/९० मानली जाते. म्हणजेच ९०% विद्यार्थी ९०% गुण प्राप्त करतात. अशी परीपूर्ण प्रभुत्व पातळी प्रत्येक वेळी साध्य होईलच असे नाही. विद्यार्थ्यांची सुरवातीच्या स्थितीवर ते अवलंबून असते. जर ते खालच्या पातळीवर असतील, तर ९०/९० ऐवजी ८०/८०, ७५/७५ अशा प्रभुत्व पातळ्या निर्धारित केल्या जातात.

प्रभुत्व अध्ययनाची मानसशास्त्रीय तात्विक गृहीतके : प्रभुत्व अध्ययनाची मानसशास्त्र, उपलब्ध परिस्थिती आणि मार्गदर्शनाविषयक काही गृहीतके आहेत. प्रत्येक विद्यार्थी विशिष्ट उच्च पातळीपर्यंत अध्ययनावर प्रभुत्व प्राप्त करू शकतो; मात्र त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि सराव यांचे प्रमाण विद्यार्थीपरत्वे भिन्न भिन्न असते. तसेच व्यक्तीगत भेद लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीने व गतीने अध्ययन प्रभुत्व प्राप्तीचा प्रयत्न करीत असतो.

अध्ययनास उपलब्ध परिस्थितीविषयक गृहीतके : विद्यार्थ्याला स्वयंअध्ययनाला प्रवृत्त करील व स्वयंअध्ययनास साह्य करील अशा प्रकारची शालेय परिस्थिती आहे, असे येथे गृहीत धरले आहे. म्हणजेच वर्गखोल्या, त्यामध्ये स्वयंअध्ययनाला पूरक अशी शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध आहे असे गृहीत आहे. तसेच विद्यार्थी स्वत:च्या अध्ययनाचे नियोजन स्वत:च करतो आणि विद्यार्थी आपल्या अध्ययनात इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य घेऊ शकतो व इतरांना अध्ययनास साहाय्यही करू शकतो.

अध्यापनविषयक/शिक्षक मार्गदर्शनविषयक गृहीतके : अध्यापनाच्या आधीच्या टप्प्यात प्रभुत्व प्राप्त झाल्याशिवाय विद्यार्थ्याला पुढील टप्याच्या अध्ययनाला शिक्षक किंवा मार्गदर्शक परवानगी देत नाही. प्रत्येक टप्यावर प्रभुत्व प्राप्ती झाली किंवा काय याची चाचणी घेऊन शिक्षकाचे समाधान झाल्यावरच विद्यार्थी पुढील टप्प्याच्या अध्ययनाकडे जाऊ शकतो. तसेच या प्रकारच्या अध्ययनप्रक्रियेची व मार्गदर्शनाच्या तंत्राची व्यवस्थित माहिती असलेला प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक या कार्यावर देखरेख ठेवणार आहे, असे गृहीत धरलेले आहे.

प्रभुत्व प्राप्ती अध्ययन प्रक्रियेच्या संदर्भात अध्यापक व विद्यार्थी यांनी काही पूर्वतयारी करणे आवश्यक असते. पूर्वतयारी अध्ययनाच्या विशिष्ट आशयाच्या संदर्भात प्रभुत्वाची कल्पना निश्चित करणे म्हणजेच त्या त्या आशयात प्रभुत्व प्राप्त झाल्याची लक्षणे होय. प्रभुत्वाची उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरणे निश्चित करणे, अध्ययन करण्याचा मोठा आशय योग्य अशा छोट्या छोट्या उपघटकांमध्ये विभागणे, जेणेकरून या छोट्या आशयावर प्रभुत्व प्राप्त करीत मोठ्या आशयावर अध्ययन प्रभुत्व प्राप्त करणे शक्य होते. प्रत्येक छोट्या आशयाच्या उपघटकाचीही पुन्हा प्रभुत्व प्राप्तीची उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरण तयार करणे, अध्ययन व अध्यापनाच्या नेमक्या प्रक्रियेची निश्चिती करणे आणि अध्ययन प्रक्रियेच्या विविध टप्यांत दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या नैदानिक कसोट्यांची निर्मिती करणे, ज्यांच्या साहाय्याने विद्यार्थ्याला वा शिक्षकाला प्रभुत्व प्राप्तीचा कोणता टप्पा अध्ययनकर्त्याने गाठला आहे याची नेमकी कल्पना येऊ शकेल या बाबींचा समावेश होतो.

प्रभुत्व अध्ययनाची प्रक्रिया : (१) नियोजन : शिक्षक व विद्यार्थी अध्ययनाचे नियोजन करतात. त्या वेळी विद्यार्थ्याला त्यांच्या गतीनुसार अध्ययन करण्याची संधी देणे, विद्यार्थ्याला विशिष्ट पातळीपर्यंत अध्ययनातील प्रभुत्व संपादन करण्यास साहाय्य करणे, विद्यार्थ्याला स्वयंस्फूर्तीने आणि स्वनियंत्रित पद्धतीने अध्ययन करण्याची संधी देणे, विद्यार्थ्याच्या समस्या उकलनक्षमतेला चालना आणि विद्यार्थ्याला स्वयंमूल्यमापन व त्यातून स्वयंप्रेरणा करण्यास संधी देणे, या बाबींचा विचार केला जातो.

(२) अपेक्षित वर्तन – परिवर्तनाची नोंद : उद्दिष्टे निश्चित झाल्यावर उद्दिष्टांची स्पष्टीकरणे नोंदविली जातात; कारण अध्ययन प्रभुत्व प्राप्त केलेल्या विद्यार्थी वर्तनाची नेमकी स्पष्टीकरणे किंवा अपेक्षित वर्तनबदलांच्या तपशिलातील नोंदी लेखन येथे अपेक्षित असते.

(३) शैक्षणिक साहित्य-सामग्रीची जुळवाजुळव : या टप्प्यात प्रभुत्व प्राप्ती अध्ययनासाठी आवश्यक त्या शैक्षणीक साहित्य-सामग्रीची शिक्षक जमवाजमव करतो किंवा स्वत: निर्माण करतो. यात तक्ते, चित्रे, नकाशे, कोष्टके, उपकरणे, प्रतिकृती, संदर्भपुस्तके असे अनेक प्रकारचे साहित्य गृहीत धरलेले आहे. या साहित्यांचे एक महत्त्वाचे अपेक्षित वैशिष्ट्य म्हणजे ते स्वयंअध्ययनाला उपयुक्त असते.

(४) अध्ययन प्रक्रिया : या टप्प्यात विद्यार्थी स्वयंअध्ययन करतो. शिक्षक आवश्यक तेथे अध्यापन वा मार्गदर्शन करतात. विद्यार्थी एकमेकांना अध्ययनास साहाय्य करतात. छोट्य-मोठ्या गटांतून विद्यार्थी अध्ययन करतात. प्रामुख्याने शैक्षणिक साहित्य, संदर्भपुस्तके यांच्या साह्याने अध्ययन चालते. हा स्वयंअध्ययनाचा टप्पा असतो.

(५) मूल्यमापन : शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या कसोटीद्वारा विद्यार्थी स्वयंमूल्यमापनाला सामोरे जातात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या साहाय्याने त्यांच्या उणिवांचे निदान करून त्यांची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्याला देतात. नेमकी कोणती उद्दिष्टे, कोणत्या पातळीपर्यंत साध्य झाली आहेत, याचा शिक्षक आढावा घेऊन विद्यार्थ्याला प्रत्याभरण देतात. यातून आवश्यक ते बदल करून अथवा पुढच्या टप्प्यांची उद्दिष्टे गृहीत धरून विद्यार्थी पुन्हा अध्ययनाला सुरुवात करतो. अशा रीतीने हे चक्र सातत्याने सुरू राहून अनेकविध आशय व कौशल्य यांवर विद्यार्थी क्रमशः प्रभुत्व मिळवीत जातात.

प्रभुत्व अध्ययनाचे फायदे : प्रभुत्व प्राप्ती अध्ययनाचे अनेक फायदे आहेत. उदा., विद्यार्थ्याला स्वयंअध्ययनाला उद्युक्त केले जाते. त्यामुळे होणारे अध्ययन परिणामकारक व चिरस्थायी असते. विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार अध्ययनाला वेळ व सरावाची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांची इतर विद्यार्थ्यांबरोबर फरपट होण्याची शक्यता टळते. आपल्या हुशार सहकारी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मिळविण्याची सोय असल्याने नि:संकोचपणे विद्यार्थी आपल्या शंकांचे व उणिवांचे निरसन करू शकतो. आपल्यात व इतरांत फरक आहे, कोणी हुशार, तर कोणी मठ्ठ या कल्पनेतून आजचे चालणारे अध्ययन काही विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करू शकते, तशी शक्यता या प्रकारच्या अध्ययनात नाही आणि मानसशास्त्रातल्या व्यक्तीगत भेदांच्या तत्त्वांचे शास्त्रशुद्ध उपयोजन या पद्धतीत असल्याने हे अध्ययन महत्त्वाचे ठरते.

प्रभुत्व अध्ययनाच्या मर्यादा : सध्याच्या भारतीय परिस्थितीतील शिक्षणव्यवस्थेमध्ये प्रभुत्व अध्ययन या पद्धतीचा वापर करणे अत्यंत कठीण, किंबहुना अशक्य आहे. वर्गातील मोठी विद्यार्थीसंख्या यात मोठा अडथळा ठरतो. या पद्धतीने अध्ययन करताना विद्यार्थ्यांना लागणारा वेळ कमी-जास्त असल्याने एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांचा तोच अभ्यासक्रम कमी-जास्त वेळात संपेल. सध्याच्या आपल्या शिक्षणाच्या चौकटीत हा प्रकार बसणे कठीण आहे. प्रभुत्व अध्ययन प्राप्तीत स्वयंअध्ययनाला महत्त्व असते; परंतु त्यासाठी लागणारी शैक्षणिक साधनसामग्री भारतीय शाळांमधून उपलब्ध नाही, ही या पद्धतीची मर्यादा आहे. तसेच ही पद्धती हाताळू शकणारे शिक्षकही दुर्मीळच असतात.

तात्विक दृष्ट्या विचार करता विद्यार्थ्याच्या अनुवंश व परीस्थितीने नियंत्रित केलेल्या त्यांच्या विकासप्रक्रियेत प्रत्येक विद्यार्थी सर्वोच्च प्रभुत्व पातळी गाठण्याची शक्यता अशक्य वाटते. सैद्धांतिक दृष्ट्या ते मान्य करता येते; परंतु कोणत्याही आदर्श परिस्थितीत व्यावहारिक दृष्ट्या हे साध्य करणे कठीण आहे.

संदर्भ :

  • जगताप, ह. ना., अध्ययन–उपपत्ती व अध्यापन, पुणे, १९९२.
  • पारसनिस, न. रा., प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र, पुणे, १९९०.
  • Block, J. H., Mastery Learning : Theory and practice, New York, 1971.
  • Block, J. H., Schools, Society and Mastery Learning, New York, 1974.
  • Bloom, B. S., Stability and Change in Human Characteristics, New York, 1964.
  • Bloom, B. S.; Hastings, J. T.; Madaus, G., McGraw-Hill, New York, 1971.
  • Gredler, Margaret, E., Learning and Instruction : Theory into Practice, New York, 1986.

समीक्षक : अनंत जोशी