ढेरे, रामचंद्र चिंतामण :  (२१ जुलै १९३० – १ जुलै २०१६). महाराष्ट्रातील धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, संतसाहित्य आणि काव्यशास्त्र याविषयी संशोधन करणारे व्रतस्थ संशोधक, अभ्यासक, लेखक आणि संपादक. महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाचा सखोल, सूक्ष्म आणि सर्वांगीण अभ्यास प्रातिभ बुद्धीने करणारा संशोधक म्हणून देश-विदेशातील संशोधकांत रा. चिं. ढेरे यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या भाष्यकारांपैकी एक म्हणूनही त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या धर्मजीवनाचा, समाजधारणांचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा त्यांनी खोलवर शोध घेऊन त्याचा नवा अन्वय लावला आहे.

रा. चिं. ढेरे यांचा जन्म महाराष्ट्रातील मावळ भागातील निगडे या गावी झाला. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे वडील चिंतामण गंगाधर ढेरे यांचे उर्से धामणे या गावी आकस्मित निधन झाले. त्या वेळी वडिलांचे वय अवघे तीस वर्षाचे होते. वडिलांच्या निधनानंतर तेराव्या दिवशी अवघ्या तेवीस वर्षाच्या आईने प्रायोपवेशनपूर्वक मृत्यू स्वीकारला. ढेरे यांचे वय अवघे पाच वर्षाचे होते. अल्पवयातच ते आणि दोन वर्षाची लहान बहीण प्रमिला अनाथ, पोरके झाले. अशा विपन्न अवस्थेत त्यांच्या वृद्ध आजीकडे – आजोळी ही मुलं वाढली. पुढील सात-आठ वर्षात त्यांच्या मनावर ग्रामजीवनाचे, तेथील ग्रामसंस्कृतीचे, चालीरीती, परंपरा, धार्मिक वातावरण यांचे गाढ-गडद परिणाम झाले. चुलत आजोबा कृष्णाजीपंत पुंडले यांच्या आग्रहामुळे ते म्हणजे आजी, मामा, धाकटी बहीण यांच्यासह १ जानेवारी १९४४ रोजी पुण्यात आले. येताना गावाकडील लोकसंस्कृती आणि चौथ्या इयत्तेत थांबलेले शिक्षण, एवढीच पुंजी घेऊन ते आले होते.

पुण्यात आल्यावर मात्र एकाच वर्षात दोन-दोन इयत्ता उत्तीर्ण होत, रात्रशाळेत शिकत १९५० साली ते मॅट्रिक झाले. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांनी हिंदी परीक्षा दिल्या. ग्रंथपालन (१९५२), एस.टी.सी. (१९५४) यांसारख्या पदविका त्यांनी मिळविल्या. ५ जून १९५५ रोजी इंदूबाला यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. पत्नीच्या सहकायार्मुळेच त्यांना पूर्णवेळ संशोधनासाठी वेळ देता आला. एवढेच नव्हे, तर आर्थिक पाठबळ नसताना, एखाद्या व्रतस्थ, फकिरी वृत्तीने हे काम करता आले. जन्मापासून संकटांनी  ढेरे यांचा पाठलागच सुरू केलेला होता. आप्तजन व जिवलगांचे मृत्यू, दारिद्र आणि दीर्घ आजार या साऱ्या आपत्तींना तोंड देत त्यांनी त्या वेळी सुरु केलेला ज्ञानयज्ञ शेवटच्या श्वासापर्यंत सुरु ठेवला. कधी टी डेपोत, कधी पुठ्ठ्यांची खोकी बनवणाऱ्या कारखान्यात, कधी छापखान्यात मुद्रितशोधक म्हणून, तर कधी विद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत ते शिकत राहिले. जी छोटीशी नोकरी होती, तीही १९५९ साली सोडली आणि लेखनोपजीवी बनण्याची प्रतिज्ञाच त्यांनी केली. कोणतेही आर्थिक साहाय्य नाही. दहा-बाय दहाच्या एका छोट्या खोलीत, जेथे बारा महिने ओल असते, अशा खोलीत त्यांचा संसार होता. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष चालू असतानाच पानशेतच्या पुरात सगळे वाहून गेले. जवळजवळ पाच हजार ग्रंथांचा संग्रह, लेखनासाठी जमा केलेले संदर्भ-साधने, टिपणे वाहून गेली. या परिस्थितीतही विचलित न होता, त्यांनी पुन्हा नवे आयुष्य सुरू केले. वाचन,लेखन चालूच होते. काही लेख व पुस्तकेही प्रकाशित होत होती. हे सांभाळून ते १९६३ मध्ये बाहेरून बी.ए. झाले, विद्यापीठात एम.ए.ला असतानाच त्यांचे पुस्तक एम.ए.च्या अभ्यासासाठी होते. परंतु तत्कालीन विद्यापीठातील काहींच्या अवकृपेमुळे त्यांच्या टर्म्स नामंजूर करण्यात आल्या. तरीही १९७५ मध्ये एम.ए.शिवाय ते पीएच.डी. झाले. त्याच विद्यापीठाने पुढे त्यांच्या ग्रंथांना डी.लिट. ही पदवी दिली.

ढेरे यांच्या ग्रंथनिर्मितीचा प्रवास १९५० पासून सुरू होतो; पण तत्पूर्वी म.म.चित्रावशास्त्रींच्या समर्थ या नियतकालिकातून त्यांनी काही कविता व लेख लिहिले. ढेरे यांचा मूळ पिंड काव्याचा. केसरीसाधना मासिक याचवेळी यामधून स्फुटलेखन केले. रेडिओसाठी सांगीतिका लिहिल्या. १९५० साली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे लघुचरित्र लिहिले. पुढे महात्मा चक्रधर (१९५८), नृपनिर्माता चाणक्य (१९६०) इत्यादी सहा लघुचरित्रे मुलांसाठी लिहिली. १९५२-५३ साली त्यांनी भोर संस्थानच्या शंकराजी नारायण पारितोषिकासाठी नाथ संप्रदायावरती लघुप्रबंध लिहिला. त्याला पुरस्कारही मिळाला आणि येथूनच ढेरे यांच्या शोधकार्यास आणि संशोधनात्मक लेखनाला प्रारंभ झाला, तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहिला. रा. चिं. ढेरे यांची वाङ्मयसूची लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन या त्यांच्या गौरवग्रंथात सविस्तर आहे. त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळजवळ एकशे दहा आहे. यात स्वतंत्र, अनुवादित, आधारित व संपादनेही आहेत. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांना ढेरे यांनी प्रस्तावना वा पुरस्कार लिहिले आहेत. शरीर व्याधींनी ग्रासलेले, आर्थिक स्वास्थ्य नाही अशा स्थितीत सत्तर वर्षाच्या लेखनप्रवासात त्यांनी जमा केलेली साधने, हस्तलिखिते, पोथ्या व प्रचंड संख्येने दुर्मीळ ग्रंथ पाहिले, तर लक्षात येईल की, ढेरे हेच एक विद्यापीठ आहे.

रा.चिं.ढेरे यांची ग्रंथसंपदा – श्रीनरसिंह सरस्वती : चरित्र आणि परंपरा (१९५८), तुका झालासे कळस (१९५८), श्रीगुरु गोरक्षनाथ : चरित्र आणि परंपरा (१९५९), नामयाची जनी (१९६०), त्रिभुवनेश्वर लिंगराज (१९६०), श्रीशारदामाता : चरित्र आणि उपदेश (१९६१),खंडोबा (१९६१), मराठी लोकसंस्कृतीचे उपासक (१९६४), रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे (१९६६), मुसलमान मराठी संतकवी (१९६७), विविधा (१९६७), लोकसंस्कृतीची क्षितिजे (१९७१), गंगाजळी (१९७२), शक्तिपीठांचा शोध (१९७३), लौकिक आणि अलौकिक (१९७६), चक्रपाणि (१९७७), शोधशिल्प (१९७७), मानसयात्रा (१९७७), महाराष्ट्राचा देव्हारा (१९७८), लज्जागौरी (१९७८), संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध (१९७८), श्रीविठ्ठल : एक महासमन्वय (१९८४), कल्पद्रुमाचिये तळी (१९९०), लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा (१९९०) हे त्यांचे ९० च्या दशकापर्यंतचे महत्त्वाचे ग्रंथ होत. पुढे श्रीनरसिंह सरस्वती : चरित्र आणि परंपरा या ग्रंथाला परिष्कृत करून दत्त संप्रदायाचा इतिहास हा ग्रंथ तयार करण्यात आला. शक्तिपीठांचा शोध आणि मातंगीपट्ट (१९७६) या पुस्तिकांचा समावेश लज्जागौरी या ग्रंथात करण्यात आला. १९९६ नंतर ढेरे यांनी आपल्या पूर्वीच्या संशोधनाचे पुनर्व्यवस्थापन करून काही ग्रंथांच्या परिष्कृत आवृत्त्या प्रकाशित केल्या, तर काही नवीन ग्रंथही सिद्ध केले. नाथ संप्रदायाचा इतिहास, लोकसंस्कृतीचे उपासक, लोकदैवताचे विश्व, भारतीय रंगभूमीच्या शोधात, संत, लोक आणि अभिजन, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, श्रीआनंदनायकी, आज्ञापत्र या ग्रंथांचा त्यात समावेश आहे. त्याबरोबरच शिखर शिंगणापूरचा श्रीशंभुमहादेव, श्रीतुळजाभवानी (२००७), करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी (२००९), श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर (२०११), श्रीपर्वताच्या छायेत (२०१५), त्रिविधा (२०१५), श्रीनामदेव, जनी आणि नागरी (२०१५), श्रीनरसिंहोपासना : उदय आणि विकास (२०१६) हे त्यांचे अलीकडील ग्रंथ पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेमार्फत प्रकाशित झाले आहेत.

स्वतंत्र ग्रंथनिर्मितीबरोबरच ढेरे यांनी अनेक ग्रंथांचे संपादन करून त्यांना विवेचक सविस्तर, अभ्यासपूर्ण अशा दीर्घ प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. संस्कृतिसुगंध (१९७०), मराठी भक्तिपरंपरा आणि श्रीरामकृष्णविवेकानंद (१९६३), श्रीज्ञानेश्वरांचे विविधदर्शन (१९७५) व नवदर्शन (१९७७) ही सहयोगातून साकारलेली संपादने आहेत. समाजरचना आणि विवेकनिष्ठा (१९६७), संत आणि समाज (१९६४) यांसारखी अन्य अभ्यासकांचे असंकलित लेखन एकत्र करून त्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारी संपादने त्यांनी केली आहेत. वारसा (१९७१) या अन्वर्थक नावाने सारस्वतकार भाव्यांच्या लेखनाचे त्यांनी संपादन केले आहे. श्रीकृष्णचरित्र (१९७२), आज्ञापत्र (१९६०), महिकावतीची बखर (१९७३), शिवदिग्विजय (१९७५) अशा महत्त्वाच्या व प्रमुख कृतींचे संस्करण करून उत्तमप्रकारे संपादित केल्या आहेत. हरिवरदा, खंड ४ – ८ (१९५८-१९६२), नरेंद्रकृत रुक्मिणी स्वयंवर (१९६५), गोपालनाथ गाथ (१९७२), चिंतामणिनाथांचे ज्ञानकैवल्य (१९७२), श्यामराजनाना – गाथा (१९७३), श्रीधरांचे मल्लारिमहात्म्य (१९७५), गंगाधराचा मार्तंडविजय (१९७७), मुरारिमल्लांची बालक्रीडा (१९७७) अशी प्राचीन काव्यांची संपादनेही त्यांनी केली आहेत. ही सर्व संपादने चरित्र, बखर, कथाकाव्य, चंपू, गाथा, पदावली आणि बालक्रीडा अशा विविध ज्ञानप्रकारांतील आहेत. हे ढेरे यांचे वेगळे वैशिष्ट व विविध ज्ञानशाखांतील त्यांचा अभ्यास आणि संशोधन स्पष्ट करतात. संतांच्या आत्मकथा (१९६७), संतांच्या चरित्रकथा (१९६७) यांशिवाय आणखी वीस प्रस्तावना त्यांनी लिहिल्या आहेत. पंधरा लघुप्रस्तावना आहेत. असे वैशिष्टपूर्ण संपादन विवेचक प्रस्तावना, उपलब्धीनुसार संहिता, स्पष्टीकरणात्मक टिपा व उपयुक्त परिशिष्टासह असल्यामुळे या विविध वाङ्मयप्रकारांच्या अभ्यासात हा पहिलाच प्रयत्न ठरतो. संपादित ग्रंथांची ही संख्या एकूण सत्तावीस आहे.

लोकतत्त्व व धर्मसंप्रदायाच्या चिकित्सक अभ्यासात रमलेल्या ढेरे यांचे वाङ्मयप्रेम त्यांनी संपादित केलेल्या बोरकरांची प्रेमकविता (१९८७) या ग्रंथातून व्यक्त होते. याशिवाय त्यांचे स्फुट लेख व टिपणे तसेच अनेक ललितलेख, विविध वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून त्या-त्या काळात प्रकाशित होत गेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पंचावन्न ललित लेखांचे संकलन करून ललितबंध हा ग्रंथ प्रकाशित झाला (२०१७) आहे. सहयोगी लेखकांच्या सहकार्याने ढेरे यांचे अकरापेक्षा अधिक लेख हिंदीतून प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादमीप्राप्त श्रीविठ्ठल : एक महासमन्वय या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद ॲन फेल्डहाऊस या विदुषीने केला. तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयार्कतर्फे प्रकाशित झाला आहे. लज्जागौरी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद जयंत बापट यांनी केला असून तो मोनॅश युनिव्हर्सिटी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया या प्रकाशनसंस्थेतर्फे प्रकाशित झाला आहे. लज्जागौरी, श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, नाथ संप्रदायाचा इतिहास आणि अन्य सहा ग्रंथ कन्नडमध्ये अनुवादित झाले आहेत.

ढेरे यांच्या संशोधन कार्याचे वेगळेपण असे आहे की, त्यांनी अभिजात परंपरा आणि लोकपरंपरा यांनी निर्माण केलेल्या दैवतांच्या अभ्यासासाठी दैवतशास्त्रीय आणि मिथक विज्ञानाचा आधार घेतला. विविध ज्ञानशाखांचे परस्परसंबंध स्पष्ट करतानाच त्यांनी अभिजन-संस्कृती आणि बहुजन – संस्कृती यांच्यामधील सीमारेषा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. बहुजनांच्या संस्कृतीच्या अभ्यासातून बहुजनांच्या उन्नयन प्रक्रियेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. ढेरे यांचे संशोधन एका विषयापुरते मर्यादित राहिले नाही. विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासातून नवी मांडणी करत ते बहुविध आणि बहुपदरी वाटांनी बहरत राहिले. त्यांनी संतसाहित्याचे अनेक अंगांनी पुनर्मूल्यांकन केले, अनेक अज्ञात व अलक्षित ग्रंथकारांची नवी ओळख शोधपूर्वक व आधुनिक मीमांसेने केली आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासाला नवी संशोधनदृष्टी दिली. लोकसाहित्य – समीक्षेची पायाभरणी केली. तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, स्थळशास्त्र, मानववंशशास्त्र, आदिबंधात्मक धारणा या साऱ्या ज्ञानशाखांचे त्यांनी गरजेनुसार स्वागत करून आपल्या संशोधनात आंतरज्ञानशाखीय (Inter-Disciplinary) शोधपद्धती अवलंबली. हे करताना त्यांनी देशी संकल्पनांना मात्र केंद्रस्थानी ठेवले. यातूनच विविध पंथांचा त्यांनी अभ्यास केला. वारकरी, महानुभाव, पाशुपत, शैव, दत्त, नाथ, लिंगायत, सूफी, नागेश, गाणपत्य यांसारख्या विविध संप्रदायांची दखल घेऊन आपले संशोधनकार्य अधिक सखोल केले. या अनुषंगाने त्यांनी काही ग्रंथही सिद्ध केले.

ढेरे यांच्या संशोधनात बहुजनांच्या संस्कृतीइतकेच नारीतत्त्वाला महत्त्व आहे. भूमी आणि स्त्री यांच्या सुफलीकरण या प्रक्रियेचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. यातूनच त्यांनी आपल्या संस्कृतिविचाराला अनेक परिमाणे दिली. लज्जागौरी, श्रीआनंदनायकी  यांसारखे त्यांचे  ग्रंथ पाहिले तर, ते संस्कृतीचा मूलगामी वेध नारीतत्त्वाच्या आधारे कसा घेतात, हे स्पष्ट  होईल. त्यांचे हे सारे संशोधन संस्कृतीच्या प्रारंभबिंदूकडे घेऊन जाणारे आहे. आदितत्त्वाच्या किंवा आदिमायेच्या चिंतनात ते सतत रमत आले. त्याचे प्रकटीकरण त्यांच्या अनेक ग्रंथामधून व्यक्त झाले आहे. आयुष्यभर त्यांनी अखंड शोधमग्नतेतून अनेक जटिल सांस्कृतिक समस्यांची उकल केली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती अभ्यासावर उतरेकडील वैदिक संस्कृतीचा प्रभाव सतत राहिला.

ढेरे यांचे वैशिष्ट असे की, मराठी संस्कृतीत दाक्षिणात्य संस्कृतीचे घटक कसे कायर्रत राहिले, दाक्षिणात्य संस्कृतीशी महाराष्ट्राचे अनुबंध किती प्राचीन आणि पक्के आहेत, तेही स्पष्ट केले. त्यांच्या संशोधनातून प्रथमच आन्ध्र, तामिळनाडू, कर्नाटक यांचे महाराष्ट्राशी असलेले सांस्कृतिक नाते व त्यांचा प्रभाव विविध ग्रंथांतून अधोरेखित झाला आहे. वारकरी, महानुभाव, पाशुपत, शैव, दत्त, नाथ, लिंगायत या विविध संप्रदायांच्या अभ्यासातूनच चक्रपाणी, दत्त संप्रदायाचा इतिहास, नाथ संप्रदायाचा इतिहास अशा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. या सर्व ग्रंथांतून दक्षिणेतील संस्कृतीचे संदर्भ अधिक ठळक प्रमाणात आले आहेत.

ढेरे यांच्या संशोधनपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे त्यांचे संशोधनविश्व एकारले नाही. ते अनेक प्रमेयांची मांडणी करतात, मिथके आणि सत्य यांचा शोध घेतात, सर्व उपलब्ध साधने गोळा करण्यात आयुष्य खर्च करतात, त्यातून मिळालेल्या उपलब्ध साधनांचा ते अलिप्तपणे विचार करतात व त्यातून पुढे ते निष्कर्षाकडे जातात. ही साधने उपलब्ध करण्यासाठी त्यांनी भारतभर आणि विशेषत: दक्षिणेकडील राज्यात केलेला प्रवास थक्क करणारा आहे. तेथील मंदिरे, धर्मशाळा, जुनी जाणती माणसं,  त्या-त्या ठिकाणचे ग्रंथसंग्रह, मंदिरे यांना पुन:पुन्हा भेटी दिल्या आहेत. आपली श्रद्धेय भूमिका बाजूला ठेवून त्यांनी पूर्वग्रहविरहित अशी काटेकोर चिकित्सा केली आहे. ह्या संशोधन मंथनातून आलेले सत्य स्वीकारण्याची, सांस्कृतिक, सांप्रदायिक परंपरेला बसणारा धक्का सहन करण्याची विवेकबुद्धी समाजात असतेच असे नाही, पण अतिशय संयमित व कर्कश वादविवादाला टाळून ढेरे आपले कार्य करत राहिले. ढेरे यांची भूमिका श्रद्धाभंजनाची नसून सत्यान्वेषणाची राहिली आहे.

ढेरे यांच्या सत्तर वर्षाच्या लेखनप्रवासात अनेक सन्मानाचे क्षण आले. अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांचा गौरव केला, पुरस्कार दिले. महाराष्ट्र राज्य शासनाचे त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथांना नऊ वेळा पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०) त्यांना देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा पहिला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ; पुणे,  मुंबई विद्यापीठ, डेक्कन कॉलेज; पुणे,  पुणे महानगरपालिका, राजवाडे संशोधन मंडळ ; धुळे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,  महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र फाउंडेशन, भैरुरतन दमाणी पुरस्कार ; सोलापूर, त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा रवीन्द्रनाथ टागोर सन्मान इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली अशा मान्यवर संस्थांनी त्यांना सन्माननीय सदस्यत्व सत्कारपूर्वक दिले आहे.

ढेरे यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह मोठा आहे.त्यांच्या या ग्रंथसंग्रहाच्या आधारे संस्कृतीच्या क्षेत्रात नव्या जुन्या संशोधकांसाठी डॉ.रा.चिं.ढेरे संस्कृती- संशोधन केंद्र या न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. या न्यासाच्या स्थापनेमागे त्यांच्याच महत्वपूर्ण संशोधन कार्याची प्रेरणा आहे. त्यांच्या लेखन संशोधनाची परंपरा त्यांच्या कुटुंबियांनी पुढे नेली आहे. त्यांच्या जेष्ठ कन्या अरूणा ढेरे या राष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक,व्याख्यात्या,संशोधक आणि कवयित्री असून भारतीय संस्कृतीतील मिथकांचा त्यांनी ललित साहित्याच्या अंगाने अभ्यास केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही अरूणा ढेरे यांनी भूषविले आहे (२०१९). ढेरे यांची दुसरी कन्या वर्षा गजेंद्रगडकर ह्या लेखिका आहेत तसेच त्यांचे पुत्र मिलिंद ढेरे हे राष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार आहेत.

ढेरे यांची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही एक व्रतस्थ ज्ञानोपासक म्हणून त्यांची ओळख आहे. एक लेखनोपजीवी संशोधक म्हणून ते सत्तर वर्षे केवळ ग्रंथांच्या सहवासातच वावरले. त्यांची लोकतत्त्वीय अध्ययनबुद्धी संशोधनक्षेत्रात अपूर्व आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक प्रश्नांची उकल करतानाच त्यांनी मराठी धर्मजीवनाचे संपूर्ण दशर्नच घडविले. महत्त्वाचे म्हणजे या कायार्तून त्यांनी भारतीय संस्कृतीशी असलेला मराठीचा अनुबंधही स्पष्ट केला.

संदर्भ :

  • ढेरे, अरुणा ; गजेंद्रगडकर, वर्षा (संपा), लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (डॉ.रा.चिं.ढेरे :व्यक्ती आणि वाङ्मय), पद्मगंधा प्रकाशन , पुणे, २०१७.