एक रोमन देव. त्याला प्रेमाची देवता मानली जाते. एरॉस या ग्रीक देवतेच्या समकक्ष त्याला समजले जाते. तो युद्धाचा देव एरिस (मार्स) व सौंदर्याची देवता ॲफ्रोडाइटी (व्हीनस) यांची अनौरस संतती होय.

हाती धनुष्य-बाण आणि पाठीवर पंख असलेले तरुण व सुडौल शरीर असे क्यूपिडचे चित्रण केले आहे. कधी कधी चिलखत घातलेलेसुद्धा त्याचे चित्रण केलेले आढळते. प्रेम आंधळे असते अशी कल्पना व्यक्त करण्यासाठी क्यूपिडच्या डोळ्यांवर पट्टी लावलेलीसुद्धा आढळते. त्याच्याकडे दोन बाण असतात. एक बाण सोन्याचा व दुसरा शिसे या धातूचा. मनुष्यांवर व इतर देवतांवर आपले सोन्याचे बाण सोडून त्यांना प्रेमात पाडणे व त्यांच्या मनात विकार उत्पन्न करणे, हे त्याचे विलक्षण कार्य. शिशाचा बाण मात्र एखाद्याविषयी विरक्ती निर्माण करण्यासाठी वापरला जाई. एखाद्याविषयी अनासक्ती वाटून दुसऱ्यावर प्रेम जडवणे, हे कामसुद्धा त्याचेच आहे. रोमन पुराणकथांमध्ये त्याला फार महत्त्व नाही. ती एक गौण देवता असून चंचल व खोडकर मुलगा अशी त्याची प्रतिमा आहे.

त्याच्या पत्नीचे नाव साइकी. क्यूपिड व साइकीची एक गमतीशीर गोष्ट अशी : साइकी ही एक अतिशय सुंदर अशी मानवी राजकन्या होती. तिच्या सौंदर्यतेमुळे सगळेच तिच्याकडे आकर्षित होत असे. हे पाहून ॲफ्रोडाइटीला साइकीचा हेवा वाटू लागला. मत्सरापोटी तिने क्यूपिडला आज्ञा केली की, त्याने आपल्या बाणांचा प्रयोग तिच्यावर करावा, जेणेकरून तिचे एका कुरूप पुरुषावर प्रेम जडेल. साइकी झोपलेली असताना त्याने तिच्यावर बाण सोडला; तथापि चुकून त्याच्या बाणाने तो स्वतःच घायाळ झाला. त्यामुळे क्यूपिड तिच्या प्रेमात पडला. साइकी जेव्हा जागी झाली, तेव्हा तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली. क्यूपिड व साइकी यांच्या प्रेमामुळे ॲफ्रोडाइटीला राग आला व तिने साइकीवर कठीण कामे सोपवली. पण साइकीने क्यूपिडच्या मदतीने प्रत्येक कार्य पूर्ण केले व दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांची डीलाइट ही मुलगी होय.

संदर्भ : 

  • Couch, Malcom, Greek and Roman Mythology, New York, 1998.
  • Stapleton, Michael, The Illustrated Dictionary of Greek and Roman Mythology, New York, 1986.

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे