ह्या अरबी शब्दाचा मूळ अर्थ अनेक शब्दयुक्त उद्गार. तसेच ‘बोलणे’, ‘शब्द’ असाही ह्याचा अर्थ होतो आणि ह्या अर्थापासून कलामला कुराणावर–ईश्वरी शब्दावर–आधारलेले धर्मशास्त्र हा अर्थ प्राप्त झालेला आहे. कलामप्रकार दोन : लौकिक किंवा ‘मानवी व्यवहारातील शब्द’ आणि ‘ईश्वरी शब्द’ म्हणजेच कुराण. आता कुराणाविषयी जे प्रश्न उपस्थित होतात ते असे : ‘ईश्वराने असे म्हटले आहे’ ह्या कुराणात आढळणाऱ्या शब्दप्रयोगाचा अर्थ काय घ्यायचा? ईश्वर अशरीरी आहे, ईश्वराला देह नाही, मग तो बोलतो कसा? उदा., ईश्वराने मोझेसला उद्देशून काही वाक्ये उच्चारली, असे कुराणात वर्णन आहे. ह्या वर्णनाचा अर्थ कसा लावायचा? इत्यादी. कुराणात एके ठिकाणी भाषण या अर्थाने आणि दुसऱ्यांदा इस्लामचा आशय या अर्थाने हा शब्द आला आहे.
कुराणाचा नेमका अर्थ लावण्याच्या आणि ‘ईश्वरी शब्द’ ह्या संकल्पनेचा अर्थ विशद करण्याच्या प्रयत्नांतून ‘कलाम’ किंवा इस्लामी ईश्वरविद्या निर्माण झाली. ह्या धर्मशास्त्रज्ञांना ‘मुतकल्लिमून’ म्हणतात. ग्रीक तत्त्वज्ञानातील ‘डायलेक्टिक’चा म्हणजे संकल्पनांचे तार्किक विश्लेषण करून त्यांतील अंतर्विरोध स्पष्ट करण्याच्या आणि त्यांचे निरसन करण्याच्या विचारपद्धतीचा प्रभाव कलामवर पडला आहे. इस्लामी धर्मशास्त्रज्ञांचे ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञांशी निकटचे वैचारिक दळणवळण होते, त्याचाही पगडा कलामवर आढळून येतो. कित्येक भारतीय आणि पर्शियन सिद्धांतांची छायाही त्याच्यावर पडली असणे शक्य आहे. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ अनेकदा अनिर्मित, आदितत्त्व असलेले ‘लोगोस’ म्हणजे शब्दतत्त्व किंवा बुद्धितत्त्व म्हणजेच ईश्वर आणि निर्मितिशील असलेले व म्हणून विश्वाची निर्मिती करणारे ‘लोगोस’ ह्यांच्यात भेद करतात आणि येशू ख्रिस्ताला आदितत्त्व असलेल्या लोगोसचा नव्हे, तर लोगोसचे निर्मितिशील असे जे स्वरूप किंवा अंग आहे त्याचा अवतार मानतात. मुतकल्लिमूनांनी कुराणाच्या म्हणजे ईश्वरी शब्दाच्या स्वरूपाविषयी स्वीकारलेली भूमिका ह्या सिद्धांताशी बरीचशी मिळतीजुळती आहे. ईश्वरी शब्द हा ईश्वराचा एक चिरंतन, अपरिवर्तनीय असा गुण आहे हे त्याचे एक स्वरूप; तसेच एक निर्मितिशील शक्ती हे त्याचे दुसरे स्वरूप. आपल्या परिचयाचे कुराण म्हणजे ह्या निर्मितिशील शक्तीचा कालात झालेला आविष्कार. विशेषतः आशराइट ह्या पंथाच्या धर्मशास्त्रात आणि ज्यू व ख्रिस्ती धार्मिक तत्त्वज्ञानांत बरेच साम्य आढळते. ‘कलाम’ आणि ‘फिक्’ (शब्दशः अर्थ आकलनशक्ती किंवा अक्कलहुशारी) ह्यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. ‘फिक्’ ह्या पारिभाषिक संज्ञेचा अर्थ ‘कायदा’ असा आहे. सुरुवातीला ‘फिक्’चा अर्थ कलामच्या अर्थापेक्षा अधिक व्यापक होता. तात्त्विक सिद्धांत त्याचप्रमाणे कुराणात प्रकट झालेली सत्ये ह्या दोहोंचे बौद्धिक आकलन ‘फिक्’मध्ये सामावते. परंतु प्रेषित मुहंमदांनंतरच्या तिसऱ्या व चौथ्या शतकांत ‘इहलोकातील व्यवहाराचे शास्त्र’ म्हणजेच ‘कायद्याचे शास्त्र’ एवढाच ‘फिक्’चा मर्यादित अर्थ रूढ झाला.
धार्मिक तत्त्वज्ञानाला अथवा धर्मशास्त्राला ‘कलाम’ अशी व्यापक अरबी संज्ञा आहे. तिचा अर्थ ‘ईश्वरी वाणी’ असा होतो. इस्लाम ही परमेश्वरी वाणी अशी जरी सर्व मुसलमानांची श्रद्धा असली, तरी काही आयतांच्या दुर्बोधतेमुळे आणि काही ठिकाणी उलटसुलट विचार असल्यामुळे कुराणाचा अर्थ कसा लावावा हा वाद निर्माण झाला. ईश्वरवाणी म्हणजे एका प्रकारे ईश्वराच्या इतर निर्मितींप्रमाणेच एक निर्मिती म्हणून कुराणाचा अर्थ प्रत्येकाने बुद्धीला आणि तर्काला धरून करावा; पंडित सांगतील तोच अर्थ खरा मानू नये, असा मुद्दा आठव्या शतकातच मुताझिला विद्वानांनी मांडला. प्रत्येक मानवी कृत्य सर्वशक्तिमान परमेश्वराच्या इच्छेमुळे होते, माणसाला आचारस्वातंत्र्य नाही हे प्रस्थापित धर्मगुरूंचे मतही मुताझिलांना अमान्य होते. एकमेकांविरुद्ध मते असलेल्या कुराणातील आयतांचा अर्थ लावताना कालक्रमाने आधी सांगितलेले मत नंतर सांगितलेल्या मताने रद्द (मनसुख) होते, या पंडितांच्या मतालाही मुताझिलांनी विरोध केला. यातून वादंग निर्माण झाले. अल्-खल्दूनसारख्या काही पंडितांनी ईश्वर सर्वज्ञ असून व्यर्थ चर्चा करण्यात स्वारस्य नाही, असे मत मांडले. उलट मुताझिला विद्वानांच्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या आणि मागाहून धर्मपंडित झालेल्या अल्-अशअरींनी (८७३–९३५) मुताझिलांना त्यांच्याच पद्धतीने, म्हणजे तर्कशुद्ध वाटणार्या युक्तिवादाने उत्तरे देण्यास सुरुवात केली. पुढे खलिफांच्या दरबारांत मुताझिलांचे वजन कमी झाले आणि त्यांचे ग्रंथ जाळून टाकले गेले तरी अल्-अशअरींची युक्तिवादाची पद्धती इतर धर्मपंडितांनी चालूच ठेवली. या पद्धतीला कलाम असे नाव पडले. नंतर अल्-गझालींच्या (१०५८–११११) वेळेपर्यंत धर्मशास्त्राची घडण चालू होती. गझालींने धर्मशास्त्र पूर्ण केले आणि प्रत्येक प्रश्नावर त्यात सांगितलेली मते, तसेच पंडितांनी लावलेला कुराणाचा अर्थ सर्वमान्य झाला. शेवटी कलाम म्हणजे धर्मशास्त्र आणि मुतकल्लिमून म्हणजे धर्मशास्त्रज्ञ असे अर्थ रूढ झाले.
मफतीह–अल्–उलूम ह्या दहाव्या शतकात रचण्यात आलेल्या विश्वकोशाच्या म्हणण्याप्रमाणे ‘कलाम’ हे शास्त्र पुढील सात विषयांचा ऊहापोह करते : तत्त्वमीमांसा; इस्लामी धर्मपंथाचे मूलभूत सिद्धांत; ख्रिस्ती ईश्वरविद्येतील तांत्रिक मुद्दे आणि पंथ; ज्यू ईश्वरविद्येतील तांत्रिक मुद्दे आणि पंथ; अन्य (कुराण, बायबल, इ. ईश्वरी शब्द म्हणून मानण्यात आलेल्या ग्रंथांचा आधार नसलेल्या, अनेक देवदेवता मानणाऱ्या) धर्मांचे सिद्धांत; पेगनधर्म आणि त्याचे सिद्धांत व तत्त्वमीमांसेतील कूटप्रश्न. कलामची रचना सु. एक हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळाच्या मानाने हे किती व्यापक आणि संग्राहक शास्त्र होते हे सहज ध्यानी येईल.
संदर्भ :
- De Lacy O’Leary, D. D. Arabic Thought and its Place in History, London, 1958.
- Lewis, B. and Others, Ed. Encyclopaedia of Islam, Vol. II, London, 1965.
- Watt, W. Montgomery, Ed. Islamic Surveys : Islamic Philosophy and Theology, Edinbudgh, 1962.
- Wolfson, Harry A. The Philosophy of the Kalam, Cambridge, 1976.