एक प्राचीन ड्रुइड

गॉल (सध्याचा फ्रान्स), ब्रिटन आणि आयर्लंड यांमधील प्राचीन केल्ट लोकांच्या धर्मगुरूंना वा पुरोहित वर्गाला अनुलक्षून ‘ड्रुइड’ ही संज्ञा लावली जाते. ‘ड्रुइ’ या प्राचीन आयरिश एकवचनाचे ‘ड्रुइड’ हे अनेकवचन आहे. ड्रुइडांबाबत फारच थोडी अधिकृत माहिती उपलब्ध होते. ग्रीक-लॅटिन साहित्यांतून तसेच प्राचीन आयरिश साहित्याच्या परंपरेतून त्यांच्याबाबतची थोडीफार माहिती मिळते. आधुनिक काळातील प्राथमिक धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासानुसार ड्रुइडांचा समावेश ‘यूरेशियन यातुनिष्ठ साधूं’च्या वर्गात केला जातो.

ड्रुइडांचा सर्वांत प्राचीन उल्लेख इ.स.पू. २००च्या सुमाराचा असून तो एका ग्रीक ग्रंथात आला आहे. त्यात ड्रुइडांना रानटी केल्टिक लोकांचे तत्त्ववेत्ते असे म्हटले आहे. ज्यूलिअस सीझर (इ.स.पू. १००–४४), डोओडोरस सिकुलस (इ.स.पू. पहिले शतक), स्ट्रेबो (इ.स.पू.सु. ६३–इ.स.सु. २४), ॲथिनिअस (इ.स. दुसरे-तिसरे शतक), प्लिनी (इ.स.सु. २३–७९) प्रभृतींच्या ग्रीक-लॅटिन लेखनातून ड्रुइडांची काही माहिती मिळते. सीझरच्या मते ड्रुइड वर्गाचा उगम ब्रिटनमध्ये होऊन नंतर ते गॉलमध्ये आले. ड्रुइडांच्या देवदेवतांमध्ये व ग्रीक-रोमन देवदवतांमध्ये बरेच साम्य आहे. केल्ट लोक अनेक निसर्गदेवता मानत. फ्रान्स, दक्षिण ब्रिटन, स्पेन आणि इतर काही प्रदेशांतून केल्टिक देवतांविषयीचे शिलालेख आढळतात. त्यांच्या अभ्यासावरून असे दिसते की, केल्ट लोक स्थानिक देवदेवतांची पूजा करीत असत. सेर्नुनास ही पशुदेवता असून एपोना या देवतेला त्यांच्यात फार महत्त्व होते. मात्रेस या सुफलतेच्या तीन देवींची गॉल व ब्रिटनमध्ये पूजा चालत असे.

सर्वसामान्य जनतेवर बसविले जाणारे कर व सक्तीची लष्करभरती इत्यादींतून ड्रुइडांना वगळले जाई. धार्मिक आणि कायदेविषयक बाबतींत ड्रुइडांचा अधिकार सर्वोच्च होता आणि यांबाबतचे त्यांचे मत प्रमाणभूत मानले जाई. देशातील तरुण पिढीला शिक्षण देण्याचे कार्यही त्यांच्याकडेच असे. न्यायदानाचे तसेच युद्धप्रसंगी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचे कामही त्यांच्याकडेच असे. तात्पर्य, केल्ट लोकांच्या जीवनात ड्रुइडांचे स्थान आणि अधिकार अनन्यसाधारण होते.

केल्टिक पशुदेवता सेर्नुनॉस : चांदीच्या पात्रावरील एक कोरीव चित्र.

ड्रुइड वर्गात समाविष्ट होणारी उमेदवार मुले ही लढवय्या उमराव वर्गातून आलेली असत आणि त्यांना अनेक वर्षे परंपरागत मौखिक पद्धतीने शिक्षण देऊन पारंगत केले जाई. आपले धर्मसिद्धांत मौखिक परंपरेने जसेच्या तसे जतन करून ठेवण्यावर त्यांचा कटाक्ष असे. हे सिद्धांत लेखनबद्ध करण्यास त्यांचा विरोध असे. इ.स.पू. पहिल्या शतकापर्यंत गॉलमध्ये केल्ट लोकांच्या जीवनात ड्रुइडांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे दिसते. न्यायनिवाडा, भविष्यकथन, जादूटोणा, बलिविधी वगैरे कामे त्यांच्याकडे असत. देशात ते सर्वत्र संचार करीत. गॉलमधील पवित्र अशा मध्यवर्ती ठिकाणी ते वर्षातून एकदा जमत.

रोमन इतिहासकार प्लिनी याने इ.स.सु. ७७ मध्ये लिहिलेल्या नॅचरल हिस्टरी या ग्रंथातही ड्रुइडांची माहिती आलेली आहे. या ग्रंथलेखनाच्या वेळी ड्रुइडांना गॉलमध्ये फक्त जादूटोणा करणारे म्हणूनच दर्जा होता, असे तो नमूद करतो. ड्रुइड वर्गाचा उगम प्रथम गॉलमध्ये झाला आणि नंतर ते ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये गेले, असे प्लिनीचे मत आहे. त्यांची विचारसरणी व सिद्धांत संपूर्णपणे अनुभवनिष्ठ होते. केवळ तात्त्विक स्वरूपाचे चिंतन त्यांनी केल्याचे आढळत नाही. भविष्यकथन, जादूटोणा, नरबलीची प्रथा आणि कर्मकांड ह्या गोष्टींच्या आचरणाने त्यांची विचारसरणी व सिद्धांत केवळ अनुभवनिष्ठ राहिले असावेत. लहानमोठ्या स्वरूपाच्या सर्वच धार्मिक आणि सांस्कृतिक बाबतींत त्यांची उपस्थिती आवश्यक असे. कर्मकांडाचे सर्व विधी, प्रार्थनांचे सर्व प्रकार, बली देण्याचे विधी वगैरे त्यांच्याच पौरोहित्याखाली पार पडत. ते वैद्यक-व्यवसायही करीत; तथापि त्यांचे वैद्यक यातुनिष्ठ असावे असे दिसते. प्लिनी म्हणतो की, त्यांच्या औषधी वनस्पती यातुधर्माने व यातुविषयक विविध विधींनीच भरलेल्या दिसतात. ओक वृक्षावर वाढणाऱ्या ‘मिसलटो’ नावाच्या वेलीस (वनस्पतीस) ते अत्यंत पवित्र मानत. दोन पांढऱ्या बैलांचा बळी देण्याचा विधी समारंभपूर्वक पार पाडून ते ही वनस्पती सोन्याच्या विळ्याने काढून आणत. विषबाधेवर आणि वंध्यत्वावर ही वनस्पती फार उपयुक्त असल्याची त्यांची समजूत होती. ते ओक वृक्षाच्या छायेत बसून सर्व धार्मिक विधी व पूजा-अर्चा करीत. त्यांमध्ये सूर्योपासना व मूर्तिपूजाही रूढ होती. त्यांच्या धर्माला ड्रुइडपंथ व धर्मोपदेशकला ड्रुइड ही नावे मिळाली. हा ड्रुइड सर्वगामी होता. तो धार्मिक विधी चालविणारा तसेच शिक्षकही असे. तो न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश असे. लोकांमध्ये अनेक अंधश्रद्धा, रूढी व भोळ्या धर्मकल्पना प्रचलित होत्या. केल्ट व ब्रिटन लोक नेहमी आपापसांत भांडत. तो परकीय शत्रूस एकमेकांविरुद्ध मदत करीत. हे वर्तन साहजिकच रोमन लोकांच्या स्वाऱ्यांस उपकारक ठरले आणि रोमनांनी ब्रिटनमध्ये प्रवेश केला. डीओडोरस सिकुलस ह्या ग्रीक इतिहासकाराने केल्ट लोकांचा कुठलाही बलिविधी ड्रुइडांवाचून पार पडत नसे, असे नमूद केले आहे.

आयर्लंडमध्ये ड्रुइडांचे स्थान राजाच्या व लढवय्या वर्गांच्या वरचे होते. भविष्यकथन, जादूटोणा, बलिविधी इ. त्यांचे विहित कार्य होते. आयर्लंडमध्ये काही ड्रुइड गृहस्थाश्रमी असल्याचेही दिसते. काही स्त्रियांही ड्रुइड वर्गाच्या अनुयायी होत्या आणि त्यांना पुरुष अनुयायांसारखेच अधिकार होते. ड्रुइडांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या असतात, अशी समजूत आयर्लंडमध्ये होती. ते बैलाचे मांस खात आणि बैलाचेच कातडे अंगाभोवती गुंडाळत. सेंट पॅट्रिक (सु. ३८९–सु. ४६१) ह्या आयर्लंडमधील ख्रिस्ती धर्मगुरूच्या टिपणांवरून ड्रुइड हे त्या वेळी प्रामुख्याने जादूटोणा करणारे लोक होते, असे दिसते.

रोमन साम्राज्याच्या विस्ताराबरोबर तसेच ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाने ड्रुइडांचा प्रभाव क्षीण होत गेला; तथापि रोमन साम्राज्याच्या पेगन काळापर्यंत त्यांचा थोडाफार प्रभाव टिकून असल्याचे गॅलो-रोमन वेदी, पवित्र स्थाने आणि कोरीव लेखांवरून दिसते. ड्रुइड हे धर्मवेडे व राष्ट्रवादी होते आणि त्यांचा राजकारणावर व लष्करावरही प्रभाव होता. त्यामुळेच रोमनांना आपल्या साम्राज्यविस्तारासाठी ड्रुइडांचा अडथळा दूर करणे क्रमप्राप्त होते. ऑगस्टस (इ.स.पू. ६३–इ.स. १४) व क्लॉडियस (इ.स.पू. १०–इ.स. ५४) ह्या रोमन सम्राटांच्या कारकिर्दीत ड्रुइडप्रणीत धर्म हा रानटी व अमानुष आहे, असे मानून चिरडला गेला.

संदर्भ :