पृथ्वीच्या उच्च अक्षवृत्तीय ध्रुवीय प्रदेशांमध्ये उन्हाळ्यात सूर्य एका दिवसात सलगपणे २४ तास क्षितिजाच्या वर दिसू शकतो. म्हणजे तेथे तो मध्यरात्रीही दिसतो. यावरून ही संज्ञा आली असून या प्रदेशाला ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश’ म्हणतात. हा एक नैसर्गिक आविष्कार असून तो उत्तर ध्रुववृत्ताच्या (आर्क्टिक वृत्ताच्या) उत्तरेस आणि दक्षिण ध्रुववृत्ताच्या (अंटार्क्टिक वृताच्या) दक्षिणेस उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये दिसतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष आणि कक्षा यांच्यात २३ १/२°अंशाचा कोन असतो. अशाप्रकारे पृथ्वीचा अक्ष एका बाजूला कललेला असल्याने मध्यरात्रीचा सूर्य हा आविष्कार घडतो. पृथ्वीचा एक ध्रुव सहा महिने एका बाजूला (सूर्याकडे) कललेला असतो तेथे सूर्यप्रकाश मिळत असतो, तर दुसरा ध्रुव सूर्यापासून दुसऱ्या बाजूला कललेला असल्याने तेथे सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वी तिच्या अक्षाभोवतीही फिरत असते. तिच्या अक्षाभोवतीच्या म्हणजेच परिवलन गतीमुळे सूर्य ठराविक कालांतराने उगवताना व मावळताना दिसतो. यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र या घटना घडत असतात.
ध्रुवांवर सिद्धांतत: दिवस आणि रात्र प्रत्येकी सहा महिन्यांचे असतात. संधिप्रकाशाच्या कालावधीमुळे त्यात फेरबदल होतात. पृथ्वीच्या अक्षाच्या कलाच्या (तिर्यक् कोनाच्या) परिणामामुळे कमी अक्षवृतांच्या प्रदेशात उन्हाळ्यात दिवसाच्या उजेडाचा कालावधी (दिनमान) मोठा होत जातो आणि हिवाळ्यात तो लहान होत जातो. अशा रीतीने उत्तर ध्रुवावर सुमारे २१ मार्च ते २३ सप्टेंबर या सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत सूर्य कायम क्षितिजाच्या वर दिसतो. म्हणजे त्या काळात तेथे सूर्य मावळतच नाही; तर दक्षिण ध्रुवावर सुमारे २३ सप्टेंबर ते २१ मार्च या सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत सूर्य क्षितिजाच्या वरच दिसतो. ध्रुवापासून जसे अंतर वाढत जाते, तसा सूर्यप्रकाश असण्याचा कालावधी कमी होत जातो. उत्तर ध्रुववृत्त या काल्पनिक रेषेवर हा कालावधी २१ जूनच्या म्हणजे उन्हाळी अयनदिनाच्या सुमारास काही दिवस असतो; तर दक्षिण ध्रुववृत्त या दुसऱ्या काल्पनिक रेषेवर हा कालावधी १-२ दिवस असतो. उन्हाळी अयनदिनाच्या सुमारास (अंदाजे २१ जून) उत्तर गोलार्धात उत्तर ध्रुववृत्ताच्या उत्तरेस आणि हिवाळी अयनदिनाच्या सुमारास (अंदाजे २२ डिसेंबर) दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रुववृत्ताच्या दक्षिणेस २४ तासांच्या कालावधीत सूर्य क्षितिजाखाली जाताना दिसत नाही. इतर ठिकाणी म्हणजे ६६ १/२° उ. ते ६६ १/२° द. यांदरम्यानच्या प्रदेशात जेव्हा मध्यरात्र असते, तेव्हाही २४ तास किंवा अधिक काळ सूर्यप्रकाश असणाऱ्या प्रदेशांत आकाशात सूर्य असतोच. अशा प्रदेशाला ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश’ असे म्हणतात. उदा., नॉर्वेमध्ये त्रॉनहेमच्या उत्तरेस उन्हाळ्यात तीन महिने सूर्य मावळतच नाही. त्यामुळे नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणतात. याउलट हिवाळ्यात तीन महिने त्या भागात सूर्य उगवत नसल्याने रात्रच असते. अशा मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश पाहण्यासाठी पर्यटक तेथे मुद्दाम जातात. दरवर्षी मध्यरात्री सूर्य दिसणाऱ्या दिवसांची संख्या दोन्ही ध्रुवांकडे वाढत जाताना दिसते. आर्क्टिक प्रदेशात जेव्हा मध्यरात्री सूर्य दिसतो, तेव्हा सूर्य डावीकडून उजवीकडे जाताना भासतो. याउलट अंटार्क्टिका प्रदेशात तो उजवीकडून डावीकडे जात असल्याचे भासमान भ्रमण दिसते. मध्यरात्रीचा सूर्य उत्तर गोलार्धात कॅनडा, आइसलँड, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क (ग्रीनलंड), रशिया या देशांत आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील अलास्का राज्यात दिसतो. दक्षिण गोलार्धात मात्र अंटार्क्टिका वृत्ताच्या दक्षिणेस कायमस्वरूपी वस्ती नाही.
समीक्षक : वसंत चौधरी