पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथील एक भुईकोट किल्ला. तो नीरा नदीकाठी वसलेला आहे. कालौघात या किल्ल्याची पडझड झाली असून एकमेव बुरूज शिल्लक आहे. बुरुजाजवळ दुर्गा देवीचे मंदिर व बाजूला दोन वीरगळ दिसून येतात. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली असून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे किल्ल्याचा परिसर झाकला गेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पायवाट असून माथ्यावरून नीरा नदीचे विहंगम दृश्य दिसते.
इतिहासात शिरवळ हे एक धार्मिक स्थान असावे, असे येथील केदारेश्वर, अंबिका, भैरवनाथ, मंडाईदेवी आणि रामेश्वर या मंदिरांवरून वाटते. इ. स. १३९६ ते १४०८ या कालावधीत शिरवळ परिसरात दुष्काळ पडला होता. बहमनी काळात शिरवळ येथे ठाणे वसले (१४५०). नीरा नदी जवळील चित्रबेट नावाच्या टेकडीवर या किल्ल्याचे बांधकाम १४७० मध्ये सुरू होऊन १५१५ मध्ये पूर्ण झाल्याची नोंद सापडते. येथे महमद इसलामखान (कार. १५१६–३७), वली महमदखान (१५३८–६४), शाह महमद (१५६५–७१), बहादूरखान (१५७२–८९), शामिरखान (१५९०–१६०३), हैबतखान (१६०४–२१), दाऊदखान (१६२२–३६) हे अंमलदार असल्याचे उल्लेख सापडतात. १६०४ मध्ये या किल्ल्याचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखान याच्याजवळ होता. १६२१ मध्ये किल्ल्याचा ताबा रायाराव याच्याकडे होता. १६४८ मध्ये आदिलशहाचा वजीर मुस्तफाखानाने शहाजी महाराजांना बेसावध गाठून कैद केले होते. आदिलशहाने छ. शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आपल्या फतेहखान (फत्तेखान), फाजलखान, अशफखान या सरदारांना पाठवले. या वेळी आदिलशहाने रोहीड खोऱ्यातील केदारजी खोपडे यास फतेहखानास सामील होण्याचे फर्मान पाठवले होते. त्या वेळी स्वराज्याचा आकार खूपच लहान होता. फत्तेखानाने स्वराज्यात शिरून नासधूस करू नये, यासाठी छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर हे युद्धक्षेत्र ठरवण्यात आले. फत्तेखान चालून येत होता, तेव्हा छ. शिवाजी महाराज पुरंदरवर होते. फत्तेखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली. त्याने आपला सरदार बाळाजी हैबतरावाला शिरवळचा किल्ला घेण्यासाठी पाठवले. त्या वेळी महाराजांचे सैन्यबळ कमी असल्याने त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फत्तेखानाच्या स्वाधीन केला. सुभानमंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफिकीर राहीला. दुसर्या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फोडून किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफील शत्रूवर हल्ला करून किल्ला जिंकून घेतला. १६७२ मध्ये हा किल्ला स्वराज्यात असल्याचे दिसते. १७२० मध्ये हा किल्ला बाळाजी विश्वनाथ यांच्या ताब्यात आल्यावर जुना कोट पाडून नवीन बांधल्याचा उल्लेख मिळतो.
संदर्भ :
- केळकर, न. चिं.; आपटे, द. वि. संपा., शिवकालीन पत्रसार संग्रह, खंड १ ते ३, पुणे, १९३०; १९३७.
समीक्षक : सचिन जोशी