महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस सु. ३ किमी., लातूर शहरापासून २० किमी., तर उस्मानाबादपासून ५१ किमी. अंतरावर आहे. औसा हे एक प्राचीन स्थळ असून त्याचा पहिला नामोल्लेख बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य (६९६–७३३) याच्या बोरगाव ताम्रपटात ‘उच्छिव चत्वारिंशत’ या नावाने केलेला आढळतो. राष्ट्रकूट व चालुक्य कालखंडात औसा हे दिगंबर जैनांचे दक्षिणेतील प्रमुख पीठ होते. राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष प्रथम (इ. स. नववे शतक) याचा गुरू ‘जिनसेन’ या जैन पंडिताने या नगराचा ‘औच्छ’ असा उल्लेख केलेला आहे. राष्ट्रकूट काळातील प्रशासनव्यवस्थेत या नगराचा समावेश ‘मुरुम्ब’ (मुरूम) विषयात, तर कल्याणीच्या चालुक्य काळात ‘गज्जे-७००’ नामक प्रशासन विभागात होता. औसा येथे वास्तव्यास असणारे जैन पंडित ‘कनकामर’ विरचित करकंडचरिउ (११ वे शतक) या ग्रंथात या नगराचे ‘असाई नगरी’ असे नाव नमूद केले आहे. यादव सेनापती खोलेश्वर याच्या शके ११५० (इ. स. १२२८-२९) मधील अंबाजोगाई शिलालेखात ‘औस देश’ असा याचा उल्लेख आहे.

अहशमा प्रवेशद्वार, औसा किल्ला.

औसा किल्ला ५.५२ हेक्टर क्षेत्रात उभा असून हा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असला, तरी सामरिक दृष्टीने मध्ययुगात यास फार महत्त्व होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती सु. ३८ मीटर रुंदीचा खंदक खोदलेला आहे. खंदकात प्रवेश करण्यासाठी खंदकाच्या तटभिंतीत पूर्वाभिमुख ‘लोहबंदी’ नावाचे एक प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे. याचे बांधकाम १५६५ मध्ये निजामशाही काळातील किल्लेदार तुर्कखान याच्या कारकिर्दीत झाले. या आशयाचा एक शिलालेख किल्ल्यातील तिसऱ्या प्रवेशद्वारा जवळील एका वास्तूवर आहे. खंदकात उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत.

या किल्ल्याला भक्कम दुहेरी तटबंदी आहे. सर्वप्रथम खंदकाची बाहेरील भिंत, त्यानंतर खंदक, बाह्यतट व परकोट अशी किल्ल्याची सर्वसाधारण रचना दिसते. बाह्य तटापेक्षा उपतटाची उंची जास्त आहे. किल्ल्याची बाहेरील तटबंदी साधारणतः ७० फूट उंच आहे. त्यातून खंदकात उतरण्यासाठी गुप्त मार्ग आहेत. तटबंदी व बुरुजांना बाह्य बाजूने जंग्या आहेत. तटबंदीवरील फांजीची रुंदी ८ फूट असून फांजीवर जाण्यासाठी काही ठिकाणी दगडी पायऱ्यांचा जिना आढळतो. किल्ल्याच्या तटबंदीत एकूण ४२ बुरूज आहेत. त्यांपैकी २३ बुरूज बाह्य तटबंदीत असून, १९ बुरूज आतील तटबंदीत आहेत. किल्ल्याचे बुरूज पसरट व बसक्या आकाराचे आहेत. बुरुजांचा आकार गोलाकार व कोनाकृतीही आहे. येथील बुरुजांमध्ये ‘बुलंद बुरूज’ आणि ‘टेहळणी बुरूज’ महत्त्वाचे आहेत. टेहळणी बुरुजावरून औसा परिसरावर देखरेख ठेवली जात असे. या किल्ल्यात अनेक लहान-मोठ्या तोफा आढळतात. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली आढळून येते. वाकियाते मुमालिकते बिजापूर या ग्रंथात येथील निजामशाही, कुंती, बहेतरी, भोसली, कडक बिजली, सेथू, लालखानी, लुसरी, शेरदही, लमछडी व काला पहाड या काही तोफांची नावे दिलेली आहेत. बुलंद बुरुजावर ‘महम्मद-बिन-हुसेन निजामशहा’ असा फार्सी भाषेत नामोल्लेख असलेली २.४ मी. लांब व २५ सेंमी. व्यासाची पंचधातूंची सर्वांत मोठी तोफ आहे. किल्ल्यातील सर्वांत लांब तोफ मशिदी जवळच्या बुरुजावर आहे. तिची लांबी ३ मी. ८ इंच असून व्यास ६ इंच आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर अन्य लहान-मोठ्या तोफा व दगडी व लोखंडी तोफगोळे पहावयास मिळतात. तसेच यूरोपियन बनावटीची एक तोफही आहे.

औसा किल्ला, औसा (जि. लातूर).

औसा किल्ल्याला लोहबंदी, अहशमा, नौबत, अशफखान, चिनी, सादत व घड्याळ अशी एकूण ७ प्रवेशद्वारे आहेत. ही सर्व प्रवेशद्वारे वेगवेगळ्या आकारांची असून आकर्षक आहेत. या प्रवेशद्वारांमुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडलेली असून किल्ल्याला भक्कमपणाही प्राप्त झालेला आहे. लोहबंदी दरवाजातून खंदकात उतरल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एका बुरुजात बांधलेले ‘अहशमा’ (उल्मुक) नावाचे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. हे किल्ल्याचे महाद्वार असून प्रेक्षणीय व आकर्षक आहे. या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या माथ्यावर गजथर शिल्पपट्टी अंकित केली गेली आहे.

अहशमा प्रवेशद्वारनंतर किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार लागते. या द्वारावरही गजथर शिल्पपट्टी दिसते. या प्रवेशद्वाराचे बांधकाम चौकोनाकृती व कमानयुक्त असून वरती मिनारवजा दोन स्तंभ आहेत. या द्वाराच्या डाव्या बाजूस जिन्याच्या पायऱ्या चढून द्वारमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यातील चौथे प्रवेशद्वार कमानयुक्त आयताकृती असून एका बुरुजात बांधण्यात आले आहे. येथून पुढे गेल्यास या किल्ल्याचे पाचवे प्रवेशद्वार लागते. ते इतर प्रवेशद्वारांप्रमाणे लांबट आकाराचे आहे. या प्रवेशद्वारातून पुढे डाव्या बाजूने राणी महालाकडे जाता येते. या महालाचे आज केवळ भग्नावशेष शिल्लक आहेत. या महालात हौद आणि कारंजाची रचना आढळून येते.

पाचव्या प्रवेशद्वारापुढे किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेले किल्ल्याचे सहावे प्रवेशद्वार लागते. येथून उजव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या उंच बुरुजावर असलेल्या ‘जानुमा’ (बालाहिसार) नावाच्या महालात जाण्यासाठी एक जिना आहे. इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर याने ही वास्तू बांधली. या सहाव्या प्रवेशद्वारातूनच आत गेल्यानंतर समोर एक प्रशस्त व मोठी चौरसाकृती वास्तू लागते. यास ‘राजवाडा’ असे म्हटले जाते. या इमारतीला एकूण २३ कमानी असून दर्शनी भागात मोठमोठ्या ओवऱ्या आहेत. राजवाड्यालगतच एका मशिदीची पूर्वाभिमुख वास्तू आणि समोर मोठा चौकोनी हौद दिसतो. मशिदीच्या दर्शनी भागावर तीन मोठ्या कमानी असून आत एकूण नऊ कमानी आहेत. मशिदी शेजारीच सैय्यद सादत अवलियाचा दर्गाही आहे.

किल्ल्याचे सातवे प्रवेशद्वार राजवाडा नावाच्या वास्तूतून जाते. येथून मुख्य किल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्यात असलेल्या वास्तुंमध्ये ‘जलमहाल’ नावाची वास्तू अत्यंत प्रेक्षणीय आहे. दारूकोठाराच्या जवळच ही वास्तू अगदी जमिनीत बांधलेली आहे. यास ‘तळघर’ असेही म्हटले जाते. मोठ्या आकाराच्या बारा स्तंभांवर याचे छत पेललेले आहे. किल्ल्याच्या आतील पाणी-पुरवठा ‘तवे’ विहीर, ‘चांद बावडी’ व ‘कटोरा बावडी’ या तीन विहिरींतून केला जात असे. या सर्व विहिरींचे पाणी मोटेने उपसून मोठ्या हौदात साठवले जाई. तेथून खापरी पाइपच्या साहाय्याने किल्ल्यात पुरविले जात असे. याशिवाय किल्ल्यात घोड्याच्या पागा, रक्षकांच्या खोल्या, किल्लेदाराचे भग्न निवासस्थान, गंगा-जमुना कोठारे इ. वास्तू दिसतात. किल्ल्यात काही ठिकाणी बहमनीपूर्व काळातील शिल्पे, लोहबंदी दरवाजाजवळील एक शिलालेख, गजथर शिल्पपट्ट इ. प्राचीन अवशेष दिसून येतात. बहुधा किल्ल्यात अथवा परिसरात पूर्वी एखादे मंदिर किंवा मठ असावा.

किल्ल्याच्या बाहेर, औसा शहराच्या बाजारपेठेत १६८० साली विजापूर स्थापत्यानुसार बांधलेली ‘जामा मशिद’ आहे. येथे खुत्बा वाचण्याच्या जागेतील एका कोनाड्यात फार्सी भाषेतील दोन शिलालेख आहेत. त्यात औरंगजेब व सोहराबखान यांचा नामनिर्देश केलेला आहे. याशिवाय औसा परिसरात सुफी संतांचे दर्गे, तेली गुंबद, विविध मशिदी, जैन मंदिर, लिंगायत मठ, दसनामी गोसावी पंथाचे मठ तसेच भागवत परंपरेतील लिंगायत-वीरशैव पंथीयांचे ‘वीरनाथ-मल्लनाथ’ मंदिर इ. प्रमुख वास्तू आहेत.

सय्यद अली तबातबा याने बुर्हाण–इ-मआसिर या ग्रंथात बहमनी कालखंडातील यादवी, अंतर्गत कलह व राजकीय घडामोडींचा वृत्तांत दिलेला आहे. याशिवाय गुलशने-इब्राहिमी, मासिरे आलमगिरी हे ग्रंथ व निजाम-मराठे संबंधाची फार्सी कागदपत्रे, तसेच औसा येथून प्राप्त विविध कोरीव लेखांतून या ठिकाणाचा इतिहास समजतो.

बहमनी काळात औशाचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व वाढले होते. सुलतान तिसरा मुहम्मदशाह (कार. १४६३–१४८२) याच्या काळात महमूद गावान या वजीराने औसा येथील भुईकोट किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. पुढे बहमनी सुलतान शिहाबुद्दीन महमूद (कार.१४८२–१५१८) याने बीदरचा सुभेदार सरदार कासीम बरीद यास औसाबरोबरच उदगीर आणि कंधार हे किल्ले जहागीर म्हणून दिले होते (१४९२). बहमनी राज्याच्या विघटनातून पाच शाह्या उदयास आल्यानंतर, त्यांपैकी प्रामुख्याने बरीदशाही व निजामशाही यांनी औसावर राज्य केले. आदिलशाहीचा ताबा औशावर अल्पकाळच होता. कासिम बरीदने महमूदशाहास बाजूला सारण्याचा बेत केल्याचे कळताच १४९९ मध्ये युसूफ आदिलशहा, मलिक अहमद आणि इमाद-उल्-मुल्क यांनी बरीदचे मनसुबे हाणून पाडले. त्यानंतर कासिम बरीदने औसा किल्ल्यात आश्रय घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अमीर बरीद हा महमूदशहाचा वजीर बनला. पहिला अली बरीदशाह याच्या कारकिर्दीत १५४८ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाण निजामशहा प्रथम याने बरीदशहाच्या ताब्यातून औसा किल्ला जिंकून घेतला.

इ. स. १५४८ ते १६३६ पर्यंत औसा अहमदनगरच्या निजामशाहीकडे राहिले. मलिक अंबरने मोगलांपासून बचाव करण्यासाठी अल्पवयीन दुसरा मुर्तझा निजामशहास काही काळ या किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते. १६०२ मध्ये निजामशाही राजधानी औसा येथे होती. याच काळात किल्ल्याच्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. अशा आशयाचा एक शिलालेख येथे पाहावयास मिळतो. या किल्ल्यात मलिक अंबरचे बराच काळ वास्तव्य होते. त्याच्या नावावरून औसा नगराचे नामकरण ‘अंबरपूर’ करण्यात आले होते.

मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीतील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन मोगलांनी औसा किल्ल्यावर आक्रमण केले व निजामशाहीचा किल्लेदार भोजपाल यास शरण येण्यास भाग पाडले. पुढे १७२४ पर्यंत या किल्ल्यावर मोगल किल्लेदार होते. दरम्यानच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. १६७० मधील एका नोंदीनुसार छ. शिवाजी महाराजांचे सैन्य औसा किल्ल्याला वेढा देण्यासाठी आले होते, अशी तक्रार औसाचा किल्लेदार बर्खुदारखान याने औरंगजेबाकडे केली होती. मराठ्यांच्या फौजा औसा परिसरात धुमाकूळ घालत होत्या. पुढे या प्रदेशातून ‘चौथाई’ व ‘सरदेशमुखी’ वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळविता आले. यानंतर १७२४ मध्ये औसा हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात गेले. १७६० मध्ये मराठ्यांनी औसा किल्ल्याला वेढा घालून निजामास शरण आणले व तहास राजी केले होते. इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर नळदुर्गचा आयुक्त (कमिशनर) असताना (१८५३-५७) त्याचे काही काळ या किल्ल्यात वास्तव्य होते. १९४८ मध्ये औसा स्वतंत्र भारतात विलीन झाले.

संदर्भ :

  •  Maharashtra State Gazetteers, Osmanabad District, Bombay, 1972.
  • Thosar, H. S. Studies in the Historical and Cultural Geography and Ethnography of Marathwada, (Unpublished Ph.D. Thesis). Aurangabad Marathwada University, Aurangabad, 1977.
  • कुंटे, भ. ग. अहमदनगरची निजामशाही,  मुंबई, १९६२.
  • कुंटे, भ. ग. गुलशने इब्राहिमी, फरिश्ता लिखित ‘गुलशन-ई-इब्राहिमी’ या ग्रंथाचा अनुवाद, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • पुरी, सुनिल, औसा : मध्ययुगीन नगर आणि किल्ला-एक अभ्यास, डॉ. बा. आ. म. विद्यापीठ, एम. फिल्. प्रबंध (अप्रकाशित), औरंगाबाद, १९९६.
  • महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, लातूर जिल्हा भाग-२, मुंबई, २००८.
  • सरदेसाई, गो. स. मुसलमानी रियासत, भाग-१, मुंबई, १९५९.

                                                                                                                                                                                 समीक्षक : जयकुमार पाठक