रझाक, अब्द-अल् : (६ नोव्हेंबर १४१३–?ऑगस्ट १४८२). मध्ययुगीन फार्सी इतिहासकार. त्याचा जन्मसमरकंद (उझबेकिस्तान) येथे एका मुस्लिम धर्मोपदेशकाच्या कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव कमालुद्दीन अब्द-अल्ल रझाक. रझाक समरकंदी या नावाने तो परिचित होता. त्याचे वडील जलालुद्दीन इशाक हे सुलतान शाहरूख (कारकिर्द १४०५– १४४७) याच्या दरबारात काझी व इमाम होते. त्याने मुस्लिम परंपरेनुसार धार्मिक शिक्षण घेतले. वडिलांसोबत व वडिलांच्या मृत्यूनंतर (१४३७) तो थोरल्या भावाबरोबर दरबारात जात असे. तेथे त्याने अझुद्दीन याह्याच्या ग्रंथावर एक चिकित्सक टीका अरबीत लिहिली आणि ती सुलतान शाहरूखला अर्पण केली. तेव्हा सुलतानाने त्याची दरबारात नेमणूक केली. दोन वर्षांनंतर त्याची हिंदुस्थानातील विजयनगरच्या (विजयानगर) साम्राज्यात राजदूत म्हणून नियुक्ती झाली. रझाकने १३ जानेवारी १४४२ रोजी आपल्या प्रवासास सुरुवात करून तो कालिकत, मंगलोर, बेलूर अशा मार्गे हंपी येथे पोहोचला. तेथे तो सुमारे सात महिने राहिला. या प्रवासातील अनुभव त्याने पुढे मत्‌ल-उस-सादैन या ग्रंथात लिहून ठेवले असून त्यात त्याने दक्षिण हिंदुस्थानातील शिल्प व वास्तुकलेविषयी प्रशंसोद्‌गार काढले आहेत; तसेच कालिकतच्या सामुरींचे राज्य आणि विजयानगर साम्राज्य यांविषयी त्यात माहिती मिळते.

कालिकतचे वर्णन करताना तो लिहितो की, ‘कालीकोट’ हे अतिशय सुरक्षित बंदर असून येथे अनेक देशांतील व्यापारी व्यापारासाठी येतात. यांत प्रामुख्याने झीरबाद, ॲबिसिनिया, झांझिबार, मक्का येथील व्यापारी असतात. येथे अनेक मुस्लीम व्यापारी राहात असून त्यांनी येथे दोन मशिदी बांधलेल्या आहेत व ते दर शुक्रवारी तेथे प्रार्थनेसाठी जमतात. येथील जकात अधिकारी विकलेल्या मालावर २.५ टक्के जकात वसूल करतो. नवीन वर्षाच्या स्वागतसमारंभ प्रसंगी त्याच्या राजाने कालिकतच्या राजाला पाठवलेल्या नजराण्याबद्दलही तो लिहितो. येथील लोकांचे वर्णन करताना तो लिहितो की, येथील लोक अंगावर फक्त लंगोट वापरतात. येथील मुस्लीम मात्र खूप किमती कपडे वापरतात. तो पुढे येथील सामुरी राजाला भेटल्याचे तसेच राजाचा मृत्यू झाल्यावर राजाच्या बहिणीच्या मुलाला गादीवर बसवल्याची माहिती देतो. कालिकत येथील लोक हे उत्तम दर्यावर्दी असून येथील समुद्रीचाचे कालिकतच्या जहाजांना त्रास देत नाहीत, तसेच येथील लोक गाय मारत व खात नसल्याचे तो नमूद करतो.

रझाक कालिकत येथून समुद्रामार्गे मंगलोर या विजयनगर साम्राज्याच्या सीमेवरील शहरात पोहोचला. विजयनगरचा उल्लेख तो ‘बिजानगर’ असा करतो. तो जेव्हा हंपीला पोहोचला (एप्रिल १४४३), तेव्हा दुसरा देवराय (कार. १४१९–४४) विजयनगरच्या गादीवर असल्याचे व राजाने त्याच्या स्वागतासाठी माणसे पाठवल्याचे, तो लिहितो. विजयनगर साम्राज्याच्या विस्ताराबद्दल तो वर्णन करतो की, हे साम्राज्य अतिशय दुर्गम असून ते श्रीलंकेपासून(सरनदीप) गुलबर्ग्यापर्यंत (कलबुर्गी) व बंगालपासून मलबारपर्यंत पसरले असून येथील लोक मूर्तिपूजक आहेत. मुख्य राजवाड्याचे वर्णन करताना तो सांगतो की, खूप देखणा असा हा राजवाडा गुळगुळीत व चकचकीत दगडांनी बनवलेला असून त्यामध्ये पाणी खेळवलेले आहे आणि याच्या उजव्या बाजूस राजाच्या मंत्र्यांची खूप मोठी कार्यालये असून त्याला चाळीस खांब आहेत. तर डाव्या बाजूस टांकसाळ असून त्यात सोने, चांदी, तांबे व मिश्र धातूंची नाणी पाडली जातात आणि त्यात ‘वराह’ हे सोन्याचे, ‘प्रताप’ हे चांदीचे नाणे असल्याचे तो लिहितो. येथील शिपायांना दर चार महिन्यांनी पगार मिळत असल्याचे त्याने नमूद केले आहे. विजयनगरच्या बाजारात पाचू, मोती, हिरे यांच्या राशी असत आणि अनेक परकीय व्यापारी खरेदी-विक्रीसाठी जमत. तेथील बाजाराबद्दल तो वर्णन करतो की, येथे विविध गोष्टींचे अनेक बाजार असून मधोमध रुंद रस्ते आहेत. येथील सोनार माणके, हिरे, मोती, पाचू अशा मौल्यवान गोष्टी येथे उघड्यावर विकतात. राजाची माणसे ६ फूट (२ यार्ड) लांबीच्या भूजपत्रावर लिहितात. तसेच राजाजवळ पांढरा हत्ती असल्याचे तो सांगतो. तेथील वास्तव्यात रझाकने राजाशी स्नेहसंबंध दृढ केले. रझाकच्या मते, विजयनगर हे त्या वेळी एक अत्यंत समृद्ध व प्रबळ साम्राज्य होते. खुद्द राजाचे सिंहासन रत्नजडित सुवर्णाचे होते. राजा व त्याची प्रजा दसरा हा प्रमुख सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत. राजाचा जनानखाना मोठा असून देवरायाला नृत्याचा शौक होता. परतीच्या प्रवासात तो मंगलोर येथे आला असताना विजयनगरचा एक राजदूत खाव्जा मसूद मरण पावल्याचे तो लिहून ठेवतो. येथून तो होनावर येथे बोटीत बसला व मस्कतमार्गे सध्याच्या संयुक्त अरब अमिरातीतील खोर फक्कन (Khor Fakkan) या बंदरात उतरला. तेथून पुढे तो होर्मुझ येथे गेला. होनावर ते होर्मुझ या प्रवासाला ७५ दिवस लागले.

समरकंदला परतल्यानंतर रझाकला राजदूत म्हणून इराणमधील गिलानला पाठविण्यात आले (१४४६). नंतर त्याची ईजिप्तमलाही नियुक्ती झाली होती, परंतु सुलतान शाहरूखच्या आकस्मिक निधनामुळे ती रद्द झाली. मिर्झा अब्द अल्-लतिफ, मिर्झा अब्द अल्लाह आणि मिर्झा अबुल कासिम बाबुर या शाहरूखच्या वारसांच्या कारकिर्दीत रझाकने सद्र, नायब, खाश्श वगैरे उच्च पदांवर काम केले. सुलतान-अबू सय्यद (जानेवारी १४६३–८२) याने त्याची शेख (राज्यपाल) म्हणून नेमणूक केली. या पदावर तो अखेरपर्यंत होता. मत्‌ल्ल-उस-सादैन मज्मा-उल्‌-बहरैन या ग्रंथात त्याने सुलतान अबू सय्यद बहादूरखानपासून मिर्झा सुलतान अबू सय्यद गुर्रगानच्या खुनापर्यंतच्या तत्कालीन घटनांचा (१३१७–१४७१) सुसंगत इतिहास लिहिला आहे. त्याने सुरुवातीच्या या कालखंडासाठी हाफिझ-इ-आबरूच्या झुबलत अल्‌ तवारीख या ग्रंथाचा उपयोग केला आहे. यांशिवाय त्याच्या लेखनातून त्याने विविध देशांतील प्रवास आणि तेथील राजकीय परिस्थिती यांचेही वर्णन केलेले दिसते. त्याच्या लेखनात त्याने लिहिलेल्या काही कवितांचाही समावेश आहे. मध्ययुगीन इतिहासाचा एक विश्वसनीय साधनग्रंथ म्हणून त्याच्या ग्रंथाचे महत्त्व आहे.

संदर्भ :

  • Muzaffar, Alam & Subrahmanyam, Sanjay, Indo-Persian Travels in the Age of Discoveries: 1400–1800, Cambridge University Press, Cambridge, 2007.
  • Elliot, Sir Henry Miers & Dowson, Sir John, ‘Matla’u-s Sa’dain, of Abdur Razzaqʼ, The History of India, as Told by Its Own Historians: The Muhammadan Period, Vol. IV, Trübner & Co., London, 1871.

                                                                                                                                                                   समीक्षक : प्रमोद जोगळेकर