फिरिश्ता : (१५७०–१६२३). भारतातील मध्ययुगीन मुसलमानी रियासतीचा फार्सी इतिहासकार. पूर्ण नाव मुहम्मद कासिम हिंदू शाह फिरिश्ता; तथापि फिरिश्ता (फरिश्ता) या नावानेच तो अधिक परिचित आहे. त्याने दुसरा इब्राहिम आदिलशाह (कार. १५८०–१९२७) याच्या आज्ञेवरून गुलशन-इ-इब्रहिमी हा दख्खनचा मध्ययुगीन इतिहास सांगणारा महत्त्वाचा ग्रंथ फार्सी भाषेत लिहिला (१६०६). हा ग्रंथ तारीख -इ -फिरिश्ता किंवा तारीख -इ -नवरस -नामा या नावाने देखील ओळखला जातो.
फिरिश्ताचा जन्म इराणमधील आस्ताराबाद या गावी १५७० साली झाला. त्याच्या जन्ममृत्यूच्या वर्षांबद्दल तज्ज्ञांत मतैक्य नाही. काही अभ्यासकांच्या मते, त्याचा जन्म १५५० मध्ये झाला असावा. लहानपणीच तो आपले वडील गुलाम अली हिंदू शाह याच्याबरोबर हिंदुस्थानातील अहमदनगर येथे आला. तेव्हा तो १२ वर्षांचा होता. गुलाम अलीला अहमदनगरच्या पहिल्या मुर्तजा निजामशाहने (कार. १५६५–८८) मिरान हुसैन या आपल्या मुलास फार्सी शिकविण्यासाठी शिक्षक म्हणून नेमले; पण गुलाम अली काही दिवसांतच मरण पावला. साहजिकच फिरिश्ता निराधार झाला, पण मुर्तजा निजामशाहने त्याचा सांभाळ केला. आपल्या विश्वासातील सेवक म्हणून पुढे निजामशाहने त्याच्याकडे आपल्या संरक्षण पथकाचे नेतृत्व दिले (१५८७). यावरून अभ्यासकांनी अनुमान काढले आहे की, फिरिश्ताचा जन्म १५७० मध्ये झाला असावा. पुढे मिरान हुसैनने मुर्तजा निजामशाहास पदच्युत करून गादी बळकावली (१५८८); पण वर्षभरातच पुन्हा बंडाळी होऊन मिरान हुसैनलाच पदच्युत करण्यात आले (१५८९) आणि पुढे लवकरच त्याचा खून झाला. फिरिश्ता या बंडाळीत तटस्थ राहिला व अस्थिर परिस्थिती पाहून त्याने विजापूरला प्रयाण केले (१५८९). तेथे सुलतानाच्या दिलावरखान या खास मंत्र्याने त्याचे स्वागत केले आणि दुसर्या इब्राहिम आदिलशाहाशी त्याची ओळख करून दिली; पण आदिलशाहने त्याची फारशी दखल घेतली नाही. तेव्हा दिलावरखानाने त्यास सैन्यात नोकरी दिली. यानंतर आदिलशाहीतील शिराझच्या इनायतखानाने त्याची आदिलशाहाकडे पुन्हा शिफारस केली (१५९३). लवकरच फिरिश्ताने इब्राहिम आदिलशाहाची मर्जी संपादन केली. यावेळी सुलतानाने त्यास मीर खूंदने (मीर खावंद) लिहिलेल्या रौजतुस्सफा या ग्रंथाची एक प्रत दिली आणि भारतातील मुसलमानांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची जवाबदारी त्याच्यावर सोपविली. या पूर्वी असा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न निजामुद्दीन बक्षीने केला होता. यानंतर फिरिश्ताने आपल्या ग्रंथ लेखनास प्रारंभ केला. त्याने या इतिहास लेखनासाठी अनेक संदर्भग्रंथ वापरले. या सर्व संदर्भ ग्रंथांची यादी त्याने आपल्या ग्रंथात दिली आहे. हे लेखन चालू असताना आदिलशाहने त्यास विजापूर दरबारातील जबाबदाऱ्या सोपविल्या. एक मुत्सद्दी म्हणून आदिलशाहने फिरिश्तास जहांगीरच्या दरबारी पाठवले. यावेळी फिरिश्ताने जहांगीराजवळ अकबराच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केल्याचे व जहांगीर तख्तावर बसल्याबद्दल अभिनंदन केल्याचे लिहून ठेवले आहे. ही त्याची भेट १६०६ मध्ये लाहोर येथे झाली होती. इब्राहिम आदिलशाहच्या आज्ञेवरून त्याने विविध कामानिमित्त सिंध, काश्मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, माळवा, बिहार वगैरे प्रदेशांत प्रवास केला. बिहारमधील अभेद्य असा रोह्तस किल्ल्याला भेट दिली. आपल्या लेखनात तो सुरत येथील पोर्तुगीज व इंग्रज यांच्या वखारींचे उल्लेख करतो. या प्रवासात त्या त्या प्रदेशांतील इतिहास लेखनास उपयुक्त अशा अनेक महत्त्वाच्या घटनांची त्याने नोंदही करून ठेवली.
फिरिश्ताच्या गुलशन-इ-इब्रहिमी या ग्रंथात भारतातील बहमनी, निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, कुतुबशाही तसेच फारूकी घराण्याचा इतिहास लिहिला आहे. याचबरोबर गुजरातचे सुलतान, तसेच मोगल व तत्कालीन इतर राजवटींबद्दल सुद्धा माहिती मिळते. तत्कालीन राजवटीत झालेली युद्धे व त्यांचा रक्तरंजित इतिहास त्याने नमूद केला आहे. त्याने या ग्रंथाचा पहिला मसुदा इब्राहिम आदिलशाहाला १६०६ मध्ये दिला, पण त्याच्या मृत्यूपर्यंत तो लेखन करतच राहिला.
फिरिश्ताने त्याच्या ग्रंथाची मांडणी प्रस्तावना व उपसंहार वगळता एकूण बारा प्रकरणांत त्याने केली आहे. पहिल्या दोन प्रकरणांत गझनी, लाहोर, दिल्ली येथील मोगलांसह मुस्लिम राजवटींची माहिती आहे. प्रकरण तीनमध्ये दक्षिण हिंदुस्थानातील गुलबर्गा, विजापूर, अहमदनगर, बीदर, एलिचपूर, गोवळकोंडे या राजधान्या असलेल्या मुस्लिम रियासतींचा विस्तृत इतिहास आहे. चार ते दहा प्रकरणांत गुजरात, माळवा, खानदेश, बंगाल, बिहार, मुलतान, सिंध व काश्मीर येथील मुस्लिम राजवंशांचा वृत्तांत दिला आहे. अकरावे प्रकरण मलबारसंबंधी असून बाराव्या प्रकरणात हिंदुस्थानातील तत्कालीन संतमहंतांची माहिती आहे. उपसंहारात भारताची भौगोलिक माहीती, विशेषतः हवामानविषयक माहिती आढळते. या ग्रंथासाठी त्याने सुमारे ३५ जुन्या संदर्भग्रंथांचा उपयोग केल्याचे प्रस्तावनेत लिहिले आहे. प्रत्यक्षात याहून अधिक ग्रंथ वापरले असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याच्या लेखनात भारतातील मुसलमानी सत्तांचे विस्तृत विवेचन वाचायला मिळते. अनेक प्रकारची नवीन माहिती उजेडात त्याने आणली. बहमनी सुलतानानी विजयनगर विरुद्ध पहिल्यांदाच केलेला तोफाचा वापर, तत्कालीन चलनपद्धती यांसारख्या नवीन गोष्टी त्याच्या लेखनात दिसून येतात. परंतु अनेक लढायांचे धार्मिक दृष्टीकोनातून केलेले वर्णन आणि सैन्यबळाचे दिलेले अवास्तव आकडे हा दोष त्याच्या लेखनात दिसून येतो.
फिरिश्ता विजापूर येथे मरण पावला.
गुलशन-इ-इब्रहिमी मधील सुरुवातीच्या प्रकरणांचे इंग्रजीत भाषांतर कर्नल डोव्ह याने १७६८ मध्ये केले. दक्षिणेकडील इतिहासविषयक प्रकरणांचे भाषांतर कॅप्टन जॉनथन स्कॉटने १७९४ मध्ये केले; तर पूर्ण ग्रथांचे इंग्रजी भाषांतर जनरल जे. ब्रिग्ज याने १८२९ मध्ये केले.
संदर्भ :
- Elliot, H. M.; Dowson, John, The History of India as Told by Its Own Historians, Vol. VI, Delhi, 1964.
- कुंटे, भ. ग. गुलशने इब्राहिमी , महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
लेखक : सु. र. देशपांडे; संदीप परांजपे