(होमिओस्टॅसिस). सजीव स्वनियंत्रणाने त्यांच्या शरीराची अंतर्गत स्थिती संतुलित राखतात. या संतुलित स्थितीला समस्थिती म्हणतात. जसे उष्ण रक्ताच्या सजीवांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमान बदलले, तरी एका मर्यादेत राहते; हा समस्थितीचा भाग आहे. त्याचप्रमाणे शरीराची अंतर्गत स्थिती दाखवणारी अन्य चले जसे रक्तशर्करा पातळी, सोडियम–पोटॅशियम–कॅल्शियम इ. आयनांची संहती, पेशीबाह्यद्रवाचा सामू, शरीरातील द्रवाचे प्रमाण इ. एका विशिष्ट पातळीवर संतुलित राखली जातात, हेसुद्धा समस्थितीचे भाग आहेत. शरीरबाह्य पर्यावरण बदलत असतानाही तसेच अन्नग्रहण आणि हालचाल होत असतानाही शरीराची समस्थिती राखणे आवश्यक असते. याकरिता शरीरात वेगवेगळ्या नियमन यंत्रणा असतात.
मनुष्यामध्ये शरीराच्या तापमानाचे नियंत्रण कसे होते, हे समस्थितीचे योग्य उदाहरण म्हणून पाहता येईल. मनुष्याचे शरीराचे तापमान सामान्य स्थितीत ३७०से. (९८.६० फॅ.) एवढे असते. परंतु उघड्या–अतिशय उष्ण, अतिशय थंड किंवा प्रदूषित हवेत जाणे, संप्रेरके, चयापचयाचा दर, आजार इ. कारणांमुळे शरीराचे तापमान कमी किंवा जास्त होऊ शकते. हे तापमान एका किमान पातळीपेक्षा म्हणजे ३५०से.पेक्षा कमी आणि एका कमाल पातळीपेक्षा म्हणजे ४००से.पेक्षा जास्त होणे, धोक्याचे असते. मेंदूतील अध:श्चेतक (हायपोथॅलॅमस) या भागाद्वारे शरीराचे तापमान नियमित होते. अध:श्चेतक तसेच मेरुरज्जू, आंतरिक इंद्रिये आणि महत्त्वाच्या शिरा यांच्यात संवेदी उष्माग्राही केंद्रे असतात. ही केंद्रे म्हणजे संवेदी चेतापेशींचा एक भाग असतो. या उष्माग्राही केंद्रांकडून आलेल्या माहितीचा उपयोग करून अध:श्चेतकाद्वारे श्वसनक्रियेचा दर, रक्तशर्करेची पातळी आणि चयापचयाचा दर यांच्यात जुळवाजुळवी घडवून आणली जाते. तापमान वाढल्यास हालचाली कमी होऊन, घाम येऊन आणि त्वचेच्या पृष्ठभागाकडे मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा वाढून शरीरातील उष्णता कमी केली जाते. शरीराचे तापमान कमी झाल्यास उष्णता टाळण्यासाठी त्वचेकडील आणि हातापायांकडील रक्तपुरवठा कमी केला जातो. या अंतर्गत नियमनाशिवाय अंगावर पांघरूण घेणे, बंदिस्त निवारा शोधणे, बाहेरून उष्णता मिळवणे असे बाह्यनियमनांचे उपायही केले जातात. थोडक्यात तापमान नियमनासाठी सजीव अंतर्गत नियमनाशिवाय बाह्यनियमनही वापरतात. थंडीत ऊनी कपडे वापरणे किंवा उन्हाळ्यात सावली शोधणे, ही बाह्यनियमनाची उदाहरणे आहेत.
मनुष्याच्या शरीरातील पाणी व आयने सुद्धा समस्थितीत राखली जातात. शरीरातील पाण्यापैकी ३-४% पाणी कमी झाले तर जलऱ्हासाची लक्षणे दिसू लागतात. अतिश्रम, अधिक तापमानात काम करणे, पाण्याशिवाय सतत वाळवंटातून चालणे इ. कारणांमुळे शरीरातील पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत घटते. पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी सुधारते पण आयनांचे प्रमाण कमी होते. अशा वेळी जलसंजीवनी (प्रमाण : १ लिटर स्वच्छ पाणी, १ चमचा मीठ आणि ८ चमचे साखर याचे मिश्रण; पाहा : अतिसार) देऊन पाणी व आयने यांचे प्रमाण पूर्ववत करता येते. अतिसार, पटकी यांसारख्या आजारात जलऱ्हास होतो. अतिजलऱ्हास झाल्यास शरीरातील द्रवाचे प्रमाण अत्यंत कमी होते. शरीराची समस्थिती ही शरीराची सामान्य अवस्था असते. शरीराची समस्थिती राखली गेली नाही तर मृत्यूही ओढवतो.