वावडिंग (एंबेलिया राइब्ज) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे.

(फॉल्स ब्लॅक पेपर). वावडिंग ही आरोही (वर चढणारी) वनस्पती मिर्सिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव एंबेलिया राइब्ज आहे. वावडिंगाचा भारत, श्रीलंका, मलेशिया आणि चीन या देशांत प्रसार झालेला दिसून येतो. भारतात ती हिमालयात, महाराष्ट्रातील डोंगराळ भागात, कोकणच्या दक्षिण भागात, तसेच तमिळनाडू, केरळ राज्यांतील डोंगराळ प्रदेशात दिसून येते.

वावडिंगाची वेल आवृतबीजी वनस्पती असून दुसऱ्या वनस्पतीला विळखे घालून वाढते. खोड सडपातळ, खरबरीत असून त्यावर लालसर ग्रंथी असतात. फांद्या लांब, बारीक व लवचिक असून कांडे लांब असते. पाने साधी, एकाआड एक, दीर्घवर्तुळाकार, दोन्ही टोकांना टोकदार, चकचकीत आणि चामड्यासारखी असतात. फुलांचे तुरे असतात. फुले लहान, पांढरी असून त्यांचे देठ ७–८ सेंमी. लांब असतात. फळे काळी मिरीपेक्षा लहान, लालसर तांबडी ते काळ्या रंगाची असून त्यावर उभे पट्टे असतात. ती गोलाकार, गुळगुळीत, मांसल असून पिकल्यावर काळी होतात. फळांमध्ये भुरकट लाल रंगाचा मगज असतो. वावडिंग मिऱ्यासारखी किंवा कबाबचिनीसारखी दिसतात. फळात बी एकच असते.

वावडिंग रुचकर, तिखट, उष्ण व थोडेसे कडवट आणि तुरट असते. त्यात एंबेलिक आम्ल असते. आयुर्वेदानुसार वावडिंग पाचक, मूत्रल, उत्तम भूकवर्धक, वायुनाशी, कृमिनाशक, मेंदू व चेतातंतूस शक्ती देणारे आहे. आकडी, फेफरे व अर्धांगवायू, तसेच मेंदू व चेतातंतूच्या रोगात वावडिंग लसणासोबत दुधात उकळून दिले जाते. फळांपासून तयार केलेले मलम नायटा व इतर त्वचारोगांवर लावतात. लहान मुलांना जंत झाले असता फळांचे चूर्ण मधातून देतात.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.