ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या कार्याची दिशा, ख्रिस्ती धर्मगुरूंचे आचार, विचार व वर्तन, तसेच त्यांचे परस्परांतील व बाहेरील जगाबरोबर येणारे संबंध यांचे दिग्दर्शन व नियमन करणारा धार्मिक कायदा. पाश्चात्य देशांत अनेक ठिकाणी नेहमीच्या नागरी न्यायालयापेक्षा वेगळी धार्मिक न्यायालये होती व आहेत. त्यामुळे कदाचित ख्रिस्ती धर्मसंस्थेशी निगडित असलेल्या विधिनिषेधांना कायदा म्हणून संबोधण्यात येत असावे.

कॅनन लॉ प्रामुख्याने रोमच्या चर्चचा धार्मिक कायदा असला, तरी त्याच्या अनेक शाखांमध्ये अधूनमधून प्राचीन रोमच्या नागरी कायद्यांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यासमोर आलेल्या तंट्याबखेड्यांबाबत निर्णय देताना धार्मिक न्यायालये अनेक वेळा नागरी कायद्याचा आश्रय घेत असत.

ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबल, ख्रिस्ती परंपरा, ख्रिस्ती धर्मगुरूंनी वेळोवेळी दिलेले निर्णय, त्यांनी काढलेली फर्माने व निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकाणी अधिकृतपणे भरवलेल्या परिषदांमध्ये संमत झालेले ठराव, यांमधून कॅनन लॉची निर्मिती झाली आहे. कॅनन लॉची सुरुवात ज्याला आपण ख्रिस्ती संतांची संतवचने (ॲपॉसोलिक कॅनन्स) म्हणू, यांपासून झाली असून, त्याची परिणती कॉर्पस ज्युरिस कॅनोनिसाय या पंधराव्या शतकामधील ग्रंथामध्ये होते. परंतु या तथाकथित अंतिम मानण्यात आलेल्या ग्रंथानंतरसुद्धा कॅनन लॉमध्ये अनके ठिकाणी सुधारणा व बदल घडवून आणण्यात आले आहेत किंवा त्याच्यात भर टाकण्यात आली आहे. चौथ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत अनेक लोकांनी अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे धार्मिक कायद्याच्या निरनिराळ्या नियमावल्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांवर वेगवेगळ्या देशांत अस्तित्वात असलेल्या चर्चच्या वेगवेगळ्या शाखांच्या आणि पंथांच्या स्थानिक परंपरांची छाप पडलेली आहे व धार्मिक कायद्यामध्ये नागरी कायद्याची ठिकठिकाणी भेसळही झाली आहे. या सर्व कारणांमुळे कॅनन लॉ हा काहीसा विस्कळीत, भोंगळ, अस्पष्ट व काही ठिकाणी अपूर्ण राहिलेला दिसतो.

कॅनन लॉची नियमावली प्रसिद्ध करणाऱ्या लोकांमध्ये ग्रेशिअन या बोलोन्या येथील धर्मगुरूचे स्थान फार मोठे आहे. त्याने ११५० साली डिक्रिटम नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला व त्यामध्ये तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या नियमावल्यांचा समावेश केला. हा ग्रंथ अनधिकृत रीत्या म्हणजे पोपच्या संमतीशिवाय प्रकाशित केलेला असला, तरी त्याला कॅनन लॉच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून अधिकृत ग्रंथासारखीच त्यास मान्यता मिळालेली आहे. कॉर्पस ज्युरिस कॅनोनिसाय या कॅनन लॉच्या तीन खंडांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महाकोशामध्ये डिक्रिटमचा समावेश केलेला असून त्याशिवाय नववा ग्रेगरी, आठवा बॉनिफेस, बाविसावा जॉन इ. धर्मगुरूंनी वेळोवेळी अधिकृतपणे दिलेल्या निर्णयांचा आणि काढलेल्या फर्मानांचाही त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे.

वरील वर्णन हे प्रामुख्याने रोमच्या कॅनन लॉस लागू असून त्याचे प्रतिबिंब जगातील जवळजवळ सर्व देशांच्या कॅनन लॉवर पडले आहे; परंतु सर्व देशांचा कॅनन लॉ हा सर्वथैव एकच नाही. उदा., इंग्‍लंडमध्ये रोमचा कॅनन लॉ हा स्थानिक परिस्थितीशी मिळत्याजुळत्या होणाऱ्या स्वरूपात स्वीकृत केलेला असून तो इक्लिझिआस्टिकल लॉचा भाग बनलेला आहे व इंग्‍लंडच्या सदरहू धार्मिक कायद्यामध्ये पूर्वापार चालत आलेल्या रूढी व परंपरांबरोबर पार्लमेंटने संमत केलेल्या सबमिशन ऑफ द क्लर्जी ॲक्ट (१५३३), चर्च ऑफ इंग्‍लंड असेंब्‍ली पॉवर्स ॲक्ट (१९१९) इ. अधिनियमांचाही त्यात समावेश होतो. इंग्‍लंडचे चर्च हे रोमच्या आधिपत्याखाली नसून इंग्‍लंडच्या राजाच्या आधिपत्याखाली येत असल्यामुळे रोमच्या कॅनन लॉपेक्षा इंग्‍लंडच्या धार्मिक कायद्याच्या वाढीची व सुधारणेची दिशा अर्थातच वेगळी आहे व बदल घडवून आणण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. उदा., इंग्‍लंडमध्ये राजाच्या फर्मानाशिवाय धर्मगुरूंच्या परिषदेला कॅनन लॉमध्ये दुरुस्ती करता येत नाही व अशा फर्मानान्वये भरलेल्या परिषदेमध्ये केवळ धर्मगुरूंनाच नव्हे, तर चर्चच्या सर्वसाधारण भक्तगणांनासुद्धा प्रतिनिधींद्वारा भाग घेण्याची मुभा आहे. देशोदेशींच्या कॅनन लॉचे स्वरूप अशा कारणांमुळे थोडे वेगवेगळे असले, तरी त्याची सर्वसाधारण जडणघडण सगळीकडे बहुतांशी सारखीच आहे, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.

संदर्भ :

  • Coriden, James A. An Introduction to Canon Law, New Jersey, 1991.
  • Cusheiri, Andrew J. Introductory Readings in Canon Law, Vols. 3, New York, 1988.
  • Hervada, Javier, Introduction to the Study of Canon Law, Montreal, 2007.
  • McKenna, Kevin E. A Concise Guide to Canon Law, Indiana, 2000.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.