बेकेट, संत थॉमस : ( २१ डिसेंबर १११८ — २९ डिसेंबर ११७० ). एक ख्रिस्ती संत, राज्याचा प्रमुख अधिकारी, कँटरबरीचा बिशप व हुतात्मा. जन्म इंग्लंडमधील चीप्साइड येथे एका मध्यमवर्गीय व्यापारी नॉर्मन कुटुंबात. त्यांचे शालेय शिक्षण प्रथम लंडनमध्ये आणि नंतर पॅरिसमध्ये झाले. लेखनिक म्हणून काही काळ अनुभव घेतल्यावर इटलीतील बोलोन्या येथे आणि फ्रान्समधील ओसॅर येथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. कँटरबरीचे आर्चबिशप हे इंग्लंडमधील ख्रिस्तमंडळाचे अत्युच्च पद मानले जात होते. थॉमस बेकेट हे कँटरबरीचे आर्चबिशप थीओबाल्ड यांचे सल्लागार झाले. ११५४ मध्ये २१ वर्षीय राजा दुसरा हेन्री याने ३६ वर्षीय थॉमस बेकेट यांना इंग्लंडचे ‘लॉर्ड हाय चान्सलर’ म्हणजे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले. दोघेही एकमेकांचे परमस्नेही होते. थॉमस बेकेट चतुर राजदूत आणि शूर सैनिक होते; तसेच औदार्याबद्दलही त्यांची ख्याती होती.

आर्चबिशप थीओबाल्ड यांच्या निधनानंतर इंग्लंडच्या चर्चवर आपला प्रभाव वाढविण्यास विश्वासू मदतनीस असावा म्हणून ११६२ मध्ये राजा दुसरा हेन्री याने कँटरबरीच्या आर्चबिशप पदासाठी थॉमस बेकेट यांची नेमणूक करावी, अशी शिफारस केली. त्याप्रमाणे ११६२ मध्ये बेकेट यांची आर्चबिशप म्हणून निवडही झाली; तथापि राजा हेन्री याची ही योजना बेकेट यांना न पटल्याने असफल ठरली आणि थॉमस बेकेट यांना आपला जीव गमवावा लागला.

मुत्सद्दी व राजकारणी स्वभाव असलेल्या थॉमस बेकेट यांचे रूपांतर पुढे आर्चबिशप म्हणून निवड होताच अत्यंत कडक व संन्यस्त वृत्तीने वागणाऱ्या बिशपमध्ये झाले. त्यांच्यात एकाएकी झालेला हा बदल समजून घेण्यासाठी हे लक्षात घेतले पाहिजे की, ते मूलत: धार्मिक वृत्तीचे होते. आर्चबिशप पदाची दीक्षा घेईपर्यंत राजकारणात कार्यरत असलेल्या शक्तीचा तिरस्करणीय वाईटपणा व कनिष्ठ वर्गीयांची दयनीय अवस्था यांची त्यांना पूर्ण कल्पना नव्हती.

वाढती शहरे आणि व्यापार, पैशाची देवाण-घेवाण व यांत्रिकीकरण यांमुळे अकराव्या शतकाच्या शेवटास पश्चिम यूरोपमधील सरंजामशाही समाजात बरेच बदल घडून आले. इंग्लंडमध्ये आधुनिक राष्ट्र-राज्य स्थापण्याच्या दृष्टिकोनातून न्यायविषयक व अर्थविषयक केंद्रीय संस्था निर्माण होणे ही पहिली महत्त्वपूर्ण पायरी होय. त्यानंतर राजा दुसरा हेन्री याच्या काळात सत्त्वपरीक्षांसारख्या (दिव्ये) परंपरांऐवजी लेखी कायदे निर्माण झाले. ‘मॅग्ना कार्टा’ (१२१५) हे या विकासामधील महत्त्वाचे पाऊल होते. चर्चचे हक्क आणि सवलती कमी कराव्यात, असे राजा दुसरा हेन्री याला वाटत होते. सॉल्झबरीजवळील क्लेरंडन पार्क येथे ११६४ मध्ये ‘क्लेरंडन संविधान’ तयार करण्यात आले. या संविधानानुसार असे घोषित करण्यात आले की, धर्मसेवकांची राज्यकायद्याशी बांधिलकी राहील, कोणत्याही दरबारी उच्चपदस्थ पुरुषास किंवा सरदारास राजाच्या माहितीशिवाय बहिष्कृत करता येणार नाही, वगैरे. थॉमस बेकेट यांनी प्रथम या संविधानाचा स्वीकार केला; परंतु नंतर त्याचा धिक्कार केला. ११६४ मध्ये त्यांना फ्रान्सला पळ काढावा लागला. त्यांच्या विनंतीवरून त्यांच्यावर असलेल्या राजाच्या दोषारोपासंबंधी मध्यस्थी करण्याचे पोपने मान्य केले; परंतु कँटरबरीच्या आर्चबिशपांचा राजीनामा स्वीकारण्याची त्यांची मागणी मात्र पोपने स्वीकारली नाही. ११७० मध्ये थॉमस बेकेट इंग्लंडला परतले आणि लोकांकडून त्यांचे उत्साहाने स्वागत झाले.

संत बेकेट यांची हत्या : इंग्रजी स्तोत्रसंग्रहातील (१२ वे-१३ वे शतक) एक चित्र.

क्लेरंडन संविधान स्वीकारलेल्या बिशपांना थॉमस बेकेट यांनी बहिष्कृत केले होते. पोपशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिल्याशिवाय थॉमस बेकेट यांनी त्यांचा बहिष्कार उठवण्याचे नाकारले. राजाने काढलेल्या तप्त उद्गारांचा, ‘आपल्याला थॉमस बेकेट यांना ठार करण्याचा अधिकार आहे’ असा काही सरदारांनी अर्थ घेतला आणि थॉमस बेकेट यांची त्यांनी सायंप्रार्थनेच्या वेळी त्यांच्या कॅथीड्रलमध्येच हत्या केली. नंतर राजाने क्लेरंडन संविधान रद्द केले आणि पश्चात्ताप व्यक्त केला. पोप तिसरे ॲलेक्झांडर यांनी ११७३ मध्ये थॉमस बेकेट यांना ‘संत’ म्हणून जाहीर केले. संत म्हणून त्यांना इंग्लंड व यूरोपमध्ये खूपच प्रसिद्धी मिळाली. १५३५ मध्ये राजकीय व धार्मिक प्रश्नांच्या संघर्षांमुळेही लॉर्ड चान्सलर थॉमस मोर यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेला राजा आठवा हेन्री याने संत थॉमस बेकेट यांचे सर्व पुतळे व चित्रे काढून टाकण्याची आज्ञा केली व त्यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या सणांवर बंदी घातली.

थॉमस बेकेट यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. ते चाणाक्ष व विनोदी बुद्धीचे होते. त्यांच्या अल्पायुष्यात ते एक विद्वान, सरदार, खेळाडू, राजनीतिज्ञ, सैनिक, बिशप व संत असे वैभवसंपन्न जीवन जगले.

थॉमस बेकेट यांच्या हत्येविषयी त्या महात्म्याचे जीवन व तत्त्वे सांगणाऱ्या बऱ्याचशा पुस्तिका आजवर प्रकाशित झाल्या आहेत. ॲल्फ्रेड टेनिसनलिखित १८८४ मध्ये प्रकाशित झालेल्या व १८९३ मध्ये हेन्री ॲर्व्हिंग यांनी रंगमंचावर आणलेल्या बेकेट या नाटकाने त्या काळात कमालीचे यश संपादन केले. बेकेट  लिहिताना टेनिसनने त्याच्या समकालीन लेखकांप्रमाणे शेक्सपिअरच्या मुक्त काव्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. या नाटकाच्या आशयासाठी राजेशाही परंतु धीरगंभीर व्यक्तिमत्त्वे व त्यांच्या एकनिष्ठपणाचे योग्य स्वभावचित्रण रेखाटण्याऐवजी तत्कालीन रसिकांच्या अभिरुचीनुसार भावविवशता, सौंदर्यवाद व पौराणिक कथेचा त्यात अंतर्भाव केला. परिणामत: काळाच्या ओघात इतर साहित्याप्रमाणे त्याचेही महत्त्व कमी होऊन अभिजात साहित्यात असणारे स्थान व दर्जा या नाटकाला मिळू शकला नाही. इतर अनेकांनी नाटक व काव्य रूपाने बेकेटबद्दल लिहिले आहे. या विषयावर टी. एस. एलिएटलिखित मर्डर इन द कॅथीड्रल (१९३५) च्या तोडीचे दुसरे नाटक नाही. ‘एक दुर्मीळ नाटक, एस्किलसच्या (इ.स.पू. ५२५−४५६) धर्तीवर लिहिलेले, प्रसंग व अभिव्यक्ती नगण्य ठरविणारे उदात्त आशयाचे नाटक’ असे त्याबद्दल टीकाकारांचे प्रशंसोद्गार आहेत. टी. एस. एलिएटच्या नाटकात थॉमस बेकेटला त्याच्या जीवनात ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले तो चांगल्या-वाईटातील संघर्ष उत्कृष्ट रीतीने रेखाटलेला आहे. सी. एफ. मायर यांनी १८८० मध्ये जर्मन भाषेत बेकेटविषयी देर हायलिगे या नावाची एक ऐतिहासिक कादंबरी लिहिली. प्रख्यात फ्रेंच नाटककार झां आनुईय यांनी १९५९ मध्ये बेकेटच्या जीवनावर एक मनोवेधक नाटक लिहिले असून त्या नाटकावर चित्रपटही निघाला. आनुईय यांच्या या नाटकाचा वि. वा. शिरवाडकरांनी मराठीत बेकेट  या नावाने अनुवाद केला आहे (१९७१). क्रिस्टोफर फ्राय यांनीही कर्टमँटल (१९६१) नावाचे नाटक बेकेटवर लिहिले आहे.

संदर्भ :

  • Brown, P. A. The Development of the Legend of Thomas Becket, Philadelphia, 1930.
  • Knowles, M. D. Thomas Becket, Stanford, 1971.
  • Robertson, J. C.; Sheppard, J. B. Materials for the History of Thomas Becket, Archbishop of Canterbury, 7 Vols., London, 1975−85.