नाताळ (ख्रिस्मस) व ईस्टर या सणांप्रमाणेच जगभर कॅथलिक समाजात संत जॉन (योहान) दि बॅप्टिस्ट यांचा सणसोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला ‘सेंट जॉन्स ईव्ह’ असेही म्हटले जाते. रीओ दे जानेरो (ब्राझील) येथील हा उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. भारतात गोवा, वसई, कोकण वगैरे भागांत या सणाला स्थानिक भाषेत ‘संज्याव’ (संत जॉनचा सण) असे म्हटले जाते. दरवर्षी २४ जून या दिवशी चर्च (ख्रिस्तसभा) संत जॉन दि बॅप्टिस्ट यांचा जन्मदिन साजरा करते. प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र मेरी (मरिया) व जॉन दि बॅप्टिस्ट या तीनच व्यक्तींचा जन्मदिन ख्रिस्तसभा प्रतिवर्षी पाळते. यावरून संत जॉन दि बॅप्टिस्ट यांचे महत्त्व लक्षात येते.
गोव्यात पारंपरिक पद्धतीने डोक्याला वेली-फुलांचे मुकुट घालून तरुण मुले गाणी गात, नाचतगाजत घरोघर फिरतात. घरात मोठी मेजवानी केली जाते. पहिल्या जोरदार पावसाने विहिरी भरलेल्या असतात. विहिरीत उड्या घेऊन तरुण मंडळी धमाल करतात. वाजतगाजत घराघरांना भेटी देणाऱ्या अशा पथकांना लोक समारंभपूर्वक भेटी, वस्तू, फळफळावळ, देवास राखून ठेवलेली फळे देतात.
पूर्वी वसईत गावागावातील मुले प्रतिकात्मक फटाके भरलेला पुतळा तयार करीत व सणाच्या आदल्या रात्री गावाच्या वेशीवर तो पेटवून मोठा जल्लोष करीत. त्याचप्रमाणे नवविवाहित जोडपी जणूकाही जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात करीत असत. त्याचे प्रतीक म्हणून पूर्वापार हा दिवस ‘लेकी-जावयांचा सण’ म्हणूनही साजरा केला जातो. लेकी-जावयांना या दिवशी सन्मानाने बोलावले जाते. सणाच्या आदल्या रात्री जावईबापू सासरवाडीच्या अंगणात व दुसऱ्या दिवशी चर्चच्या आवारात फटाक्यांची आतशबाजी करत असत. परंतु फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, फटाक्यांच्या कारखान्यातले बालकामगारांचे होणारे शोषण, यांसारख्या गोष्टींवर सुधारणावादी धर्मगुरूंनी वारंवार केलेल्या प्रबोधनामुळे व प्रहारामुळे कालौघात ही प्रथा बंद झाली. मात्र ‘लेकी-जावयांचा सण’ कौटुंबिक पातळीवर आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
नाताळ सणाच्या बरोबर सहा महिने अगोदर येणाऱ्या ‘संज्याव’चा सण कोकणभूमीत दिवसभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
संदर्भ :
- कोरिया, फादर फ्रान्सिस, सुवार्ता, वसई, जुलै २०२१.
- दहिवाडकर, अनिल, बायबल देवाचा पवित्र शब्द, पुणे, २०१२.
- दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, सुबोध बायबल, पुणे, २०१०.
- परेरा, स्टीफन आय., संपा., कॅथॉलिक, त्रैमासिक, जून २००४.
- https://www.catholic.org/saints/saint.php?saint_id=152
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया