ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम धर्मांतील एक श्रद्धेय संकल्पना. तिचा अर्थ मृतावस्थेतून पुन्हा जिवंत होणे, असा होतो. या नोंदीत फक्त ख्रिस्ती धर्माच्या अनुषंगाने या संकल्पनेचा ऊहापोह केला गेला आहे. ‘पुनरुत्थान’ या विश्वासाचा येशू ख्रिस्त यांनी वारंवार उल्लेख केला व स्वतःच्या बाबतीत हे भविष्य खरे होणार, असे सांगितले (बायबल – योहान ६: ४०, ४४; ११ : २५). परमेश्वर आपल्या लोकांना मृतावस्थेतून पुन्हा उठविणार आहे, अशी धर्मश्रद्धा ख्रिस्ती धर्मीयांमध्ये दिसून येते.

साधारणपणे भारतीयांना पुनरुत्थान हा शब्द पुनर्जन्म या शब्दाइतका परिचयाचा नाही; पण पुनरुत्थान व पुनर्जन्म या दोन शब्दांच्या अर्थात मूलभूत फरक असून दोघांच्या मतितार्थात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ख्रिस्ती धर्मश्रद्धेत व परंपरेत ‘पुनरुत्थान’ हा शब्द वारंवार येतो. तो त्यांच्या धर्मश्रद्धेचा उच्चांकबिंदू आहे. पुनरुत्थान हा शब्द येशू ख्रिस्त यांच्या व ख्रिस्ती जीवनाच्या सर्वांत उच्च पायरीवर आणून सोडतो.

तीन वर्षे येशू ख्रिस्त यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात अनेक अद्भूत कृत्ये केलीत; चमत्कार केलेत. त्या चमत्कारांत कधी कधी त्यांनी मानवी अवयवांना चालना दिली. त्या अवयवांना प्रज्वलित केले. कधी कधी नवे अवयवदानही दिले; पण त्या सर्वांत महत्त्वाचे दान म्हणजे जीवनदान. मृत माणसात नवे सामर्थ्य घातले. नवजन्माची ही शक्ती त्यांनी जिवंतपणे इतरांनाच दिली नाही, तर त्यांच्या मरणोत्तर त्यांनी ती स्वत:त ओतली. दुसऱ्यांच्या सामर्थ्याने नव्हे, तर स्व-सामर्थ्याने. येशू ख्रिस्त हे स्व-शक्तीने, स्व-सामर्थ्याने मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा उठले. तेदेखील अक्षरश: त्यांनी अगोदर भाकीत केले होते त्याप्रमाणे. यालाच ‘येशू ख्रिस्त यांचे पुनरुत्थान’ असे म्हणतात.

स्वत:चे पुनरुत्थान होण्याआधी येशू ख्रिस्त यांनी तीन मृत व्यक्तींना मरणातून उठविले, ते असे :

  • कफर्णहूम या गावामध्ये येशू ख्रिस्त हे लोकांना शिक्षण देत असताना याईर नावाचा एक अधिकारी त्यांच्याकडे आला व त्यांच्या पाया पडून म्हणाला, ‘‘माझी मुलगी आताच मरण पावली आहे. तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल’’. येशू ख्रिस्त हे आपल्या शिष्यांसमवेत त्या अधिकाऱ्याच्या घरी गेले व तिथे शोक करणाऱ्या लोकांना बाहेर घालवून त्यांनी त्या मुलीचा हात आपल्या हातात घेऊन तिला जिवंत केले (मत्तय ९ : १८–२५).
  • नाईन गावच्या एका विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता. त्याची अंत्ययात्रा चालली असता येशू ख्रिस्त यांनी त्या तिरडीजवळ जाऊन त्या तरुण मुलाला जिवंत केले व त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
  • जेरूसलेमजवळील बेथनी गावच्या मार्था आणि मेरी यांचा एकुलता एक भाऊ लाझरस (लॅझारस) याला मेल्याला चार दिवस झाल्यावर येशू ख्रिस्त हे त्या गावात जातात व शोक करणारे अनेक लोक त्यांच्या पुढ्यात असताना मोठ्या आवाजात म्हणतात, ‘‘लाझरस, बाहेर ये’’. लाझरस तत्काळ थडग्यातून बाहेर येतो व लोक त्याची कफणी सोडून त्याचे हातपाय मोकळे करतात (बायबल – योहान ११ : १४–४४).

येशू ख्रिस्त हे बेथनी गावात यायला विलंब करतात. त्याकरता लाझरसची बहीण जेव्हा येशू ख्रिस्त यांच्यावर ठपका ठेवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा येशू ख्रिस्त एक फार मोठे सत्य तिच्यापुढे ठेवत तिला म्हणतात, ‘‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे’’ (योहान ११ : २५). येशू ख्रिस्त यांनी स्वतःच्या संदर्भात केलेला हा पुनरुत्थानाचा उल्लेख व लाझरसचे त्यांनी केलेले पुनरुत्थान यांमुळेच येशू ख्रिस्त यांचे पुनरुत्थान झाले आहे, यावर त्यांच्या शिष्यांचा व इतर लोकांचा विश्वास बसला. पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्त यांनी कित्येक व्यक्तींना दर्शन दिले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या शिष्यांपैकी संत थॉमस (जे पुढे भारतात आले) यांनी त्यांच्या अंगावरच्या जखमांच्या खुणा तपासून खात्रीही करून घेतली, असे मानले जाते. येशू ख्रिस्त हे क्रूसा(वधस्तंभा)वरून तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाल्याचे स्मरण म्हणून (रविवारी) ईस्टर हा सण साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांनी म्हटले होते की, ‘हे मंदिर तुम्ही नष्ट करा; तीन दिवसांत मी ते पुन्हा उभारीन’. यहुदी धर्मगुरूंनी व रोमन अधिकाऱ्यांनी नष्ट केलेले येशू ख्रिस्त यांच्या देहाचे मंदिर मृत्युंजय येशू ख्रिस्त यांनी आपल्या स्वत:च्या मरणावर विजय मिळवून पुन्हा बांधून दाखविले व ख्रिस्ती धर्मातल्या सर्वांत मोठ्या धर्ममंदिराचा पाया घातला.

येशू ख्रिस्त यांच्या बारा प्रेषितांनी तर पुनरुत्थान या घटनेवर विश्वासच ठेवला नाही. ते आपापल्या दिनक्रमात मग्न होते. एकही प्रेषित त्यांच्या कबरीकडे फिरकले नाहीत. अरिमथियाचे जोसेफ यांच्या बागेत त्यांची कबर कुठे होती हे त्यांचे पट्टशिष्य जॉन यांना वगळता अन्य कुणाला माहीतच नव्हते. त्यांच्या अनुयायांपैकी पुरुषवर्गाने पुनरुत्थानाला त्या तीन दिवसांत महत्त्वाचे स्थान दिले नाही. स्त्रियांचे मात्र वेगळे होते. येशू ख्रिस्त यांच्या अनुयायांपैकी ज्या स्त्रिया होत्या, त्यात मेरी माग्दालेना (मॅग्डालीना) या जास्त अस्वस्थ होत्या. शब्बाथ संपतो कधी, रविवार सुरू होतो कधी याबाबतीत त्या मनस्वी अस्वस्थ होत्या. रविवारच्या पहाटेच येशू ख्रिस्त यांचा मृतदेह पाहण्यासाठी, त्या मृतदेहाला उटणे लावण्यासाठी, यहुदी लोकांच्या परंपरेनुसार त्या मृतदेहावर मरणोत्तर सोपस्कार करण्यासाठी त्या बागेत गेल्या होत्या. तेथे त्यांना येशू ख्रिस्त यांच्या कबरीवर रोमन शिपायांनी ठेवलेला भला मोठा दगड बाजूला सरलेला दिसला आणि त्यावर झगमगत्या दिव्य वस्त्रातील एक देवदूत बसलेला दिसला. तरीही त्यांनी येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला होता का? मुळीच नाही.

दिव्य वस्त्रातील देवदूतासंदर्भातील मेरी माग्दालेना यांचा तो आगळावेगळा वृत्तांत ऐकताच धूम ठोकून येशू ख्रिस्त यांचे दोन प्रेषित कबरीकडे येतात. प्रेषितप्रमुख संत पीटर (पेत्रस) यांपेक्षा तरुण जॉन हे शिष्य अधिक वेगाने वारा कापत येतात. येशू ख्रिस्त यांनी सांगितल्याप्रमाणे ते पुनरुत्थित झाले आहेत, यावर मात्र त्यांच्या अनुयायांनी (स्त्री-पुरुष) विश्वास ठेवला नाही. आपले प्रिय येशू ख्रिस्त यांचा मृतदेह येथून चोरीला गेला आहे, असा त्यांचा तर्क व निष्कर्ष. नंतर ते दोन शिष्य तिथून निघून गेले. मात्र मेरी माग्दालेना तिथेच राहिल्या. पुनरुत्थित येशू ख्रिस्त हे त्यांना भेटले. ते एखादे माळी असावे असा सुरुवातीला भास झाला; पण ते येशू ख्रिस्तच आहेत याची खात्री होताच मेरी माग्दालेना हिब्रू भाषेत उद्गारल्या, ‘‘राब्बोनी?’’ याचा अर्थ – गुरुवर्य?

येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानासंबंधीचा वाद त्या घटनेपासूनच सुरू आहे (बायबल – प्रेषिताची कृत्ये २३); तथापि पुनरुत्थानाच्या घटनेमुळेच येशू ख्रिस्त यांच्या शिष्यांना धैर्य प्राप्त झाले व ते अनन्वित अत्याचार सहन करू शकले. संत पॉल यांनी याच घटनेला ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू मानले आहे व याच केंद्रबिंदूभोवती ख्रिस्ती धर्माची उभारणी झाली आहे. मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त कबरीतून उठले व शिष्यांना भेटले. त्यानंतर ४०व्या दिवशी त्यांनी स्वर्गारोहण केले.

संदर्भ :

  • Bowen, Clayton R., The Resurrection of Jesus, New York, 1911.
  • Gonsalves, Francis, Sunday Seeds for Daily Deeds, Mumbai, 2008.
  • Lovasik, Rev. Lawrence G., Scriptural Homily Notes Sunday Gospels, 1970.
  • Pichappilly, Fr. John, The Table of the Word, Mumbai, 2016.
  • Sheen, Fulton J.,  Life Of Christ, Bangalore, 2008.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो