केरळमधील एक प्राचीन मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. ग्रीक व रोमन व्यापारी केरळच्या मलबार किनाऱ्याला डमिरीका असे म्हणत असत. इ.स. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या ग्रंथात नेलकिंडा या मलबार किनाऱ्यावरील बंदराचा उल्लेख आढळतो.
हे बंदर नदीवरचे असून तेथे पोहोचण्यासाठी जहाजांना नदीतून १२० स्टेड (Stade) म्हणजे सु. २२ किमी. आत जावे लागत असे. प्लिनीने या शहराला नियाकिंडी (Neacyndi), तर टॉलेमीने मेलकिंडा (Melkynda) असे नाव दिलेले दिसते. हे शहर पश्चिमेकडील मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र म्हणून विख्यात होते; तथापि लिखित पुराव्यांवरून आधुनिक काळात त्याचे स्थान निश्चित करणे शक्य झाले नव्हते. त्रावणकोर जिल्ह्यामधील कल्लाडा, कोट्टायम जिल्ह्यातील नीरकुन्नम आणि नीरनम अशी अनेक ठिकाणे सुचवण्यात आली होती; परंतु कल्लाडा आणि नीरकुन्नम या ठिकाणी कोणतेही पुरातत्त्वीय अवशेष मिळालेले नाहीत.
केरळ विद्यापीठातील अजितकुमार यांनी नेलकिंडाचे स्थान निश्चित करण्यासाठी नीरनम या ठिकाणी पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. नीरनम हे गाव पठणमथिट्ट जिल्ह्यात, अचनकोविल आणि पंबा या नद्यांच्या संगमावर आहे. येथून नदीतून सु. २५ किमी. प्रवास केल्यानंतर समुद्रकाठी असलेले पोरक्काड हे गाव आहे. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या ग्रंथात त्याचा उल्लेख बकारे (Bakare) असा आहे. नीरनम, कडप्रा आणि आलमतुरूत्तू या गावांच्या सुमारे दहा चौ. किमी. परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात प्रारंभिक ऐतिहासिक काळातील खापरे मिळाली. त्यात रोमन मद्यकुंभाचे (ॲम्फोरा) तुकडे मिळणे लक्षणीय होते. नीरनम येथे मिळालेल्या खापरांमध्ये आणि पटणम व अरिकामेडू येथे मिळालेल्या प्रारंभिक ऐतिहासिक काळातील खापरांमध्ये साम्य आढळले. प्लिनीच्या लेखनात मोठी जहाजे बकारे पर्यंतच जात असल्याचे नमूद केले आहे. कारण पंबा नदीच्या पात्रात अनेक बेटे तयार झालेली होती. बहुधा त्यामुळे इ. स. पहिल्या काही शतकांमध्येच नेलकिंडाचे महत्त्व संपुष्टात आले असावे. म्हणूनच मध्ययुगीन काळात या बंदराचा उल्लेख आढळत नाही. तसेच पुरातत्त्वीय सर्वेक्षणात फारसे मध्ययुगीन अवशेष मिळाले नाहीत.
संदर्भ :
- Kumar, Ajit, ‘A Probe to Locate Kerala’s Early Historic Trade Emporium of Nelcyndaʼ, Journal of Indian Ocean Archaeology, 5: 97-105, 2008.
- Nambirajan, M. ‘Ancient Ports on Kerala Coast- Recent Investigationsʼ, Recent Researches on Indus Civilization and Maritime Archaeology of India (Eds., Gaur, A. S. & Sundaresh), pp. 147-155, Agam Kala Prakashan, Delhi, 2015.
समीक्षक : शंतनू वैद्य