प्राचीन भारतात प्रचलित असलेली शंखाकृतीसदृश अक्षरलिपी. अत्यंत वळणदार आणि लपेटी असलेल्या या लिपीची निर्मिती ब्राह्मी लिपीतून झाली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. अनेकदा शंख लिपीतील लेख ब्राह्मी लेखांसोबत पाहायला मिळतात. शंख लिपीतील लेख लेणी, स्तंभ, मूर्ती इत्यादी दानविषयक अवशेषांवर कोरलेले आढळून येतात. या लिपीतील लेखात चार ते जास्तीत जास्त नऊ अक्षरे असतात. काही शिलालेख एक ते तीन अक्षरे असलेले आहेत. वळणदार आणि सुलेखनयुक्त शंख लिपीचा उपयोग मुख्यत्वे विविध धार्मिक ठिकाणी स्वतःची स्वाक्षरीसदृश नावे कोरून ठेवण्यासाठी केला जात असावा.
या लिपीची पहिली नोंद जेम्स प्रिन्सेप याने केली. प्रिन्सेप यानेच या लिपीला शंख लिपी नाव दिले. तत्कालीन उत्तर प्रदेशातील उत्तरकाशी (सध्या जिल्हा बारहात, उत्तराखंड) येथील त्रिशूळाच्या दंडावर ब्राह्मी आणि शंख लिपीत कोरलेले लेख प्रिन्सेपच्या नजरेस पडले. प्रिन्सेपला या अज्ञात लिपीचे वाचन करता आले नाही. बाराबर पर्वतातील नागर्जुनी लेणीसमूहात त्यांना शंख लिपीतील आणखी दोन शिलालेख मिळाले. पण प्रिन्सेपने हा शिलालेख अवाचनीय असून अशाच पद्धतीचा लेख बारहात येथील त्रिशुळावर असल्याचे त्याच्या शोधनिबंधात नमूद केले. प्रयागराज (जुने नाव अलाहाबाद) येथे समुद्रगुप्त राजाचा प्रसिद्ध शिलालेख आहे. याच लेखाच्या ठशावर असलेल्या शंख लिपीबद्दल प्रिन्सेप म्हणतो, “पूर्वी वाचता न आलेली लिपी म्हणजे फक्त चुकीच्या पद्धतीने काढलेले शंख आहेत.”
जेम्स प्रिन्सेप, के. पी. जैस्वाल, दिनेशचंद्र सरकार इत्यादी अभ्यासकांनी शंख लिपीची उकल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश प्राप्त झाले नाही. सन १९८३ मध्ये बी. एन. मुखर्जी यांना या लिपीची उकल करण्यात यशस्वी झाले. मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड सोलोमन यांनीसुद्धा शंखलिपीवर खूप संशोधन केले आणि मोठ्या प्रमाणात शंख लिपीतील शिलालेख उजेडात आणले. तसेच आर. के. शर्मा यांचेसुद्धा शंख लिपीच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान आहे.
सन १८८० मध्ये उत्तर प्रदेशातील खैरीगड (जि. खेरी) येथे केलेल्या उत्खननात चौथऱ्यावर कोरलेला दगडी घोडा सापडला. या घोड्यावर दोन शंख लिपीतील आणि एक ब्राह्मी लिपीतील असे एकूण तीन शिलालेख कोरले आहेत. हे तिन्ही शिलालेख एकाच काळात कोरलेले आहेत, असे मत मुखर्जी यांनी मांडले. हा दगडी घोडा गुप्त घराण्याचा अंमल असलेल्या प्रदेशात उत्खननात मिळाला असल्यामुळे या घोड्याच्या मूर्तीचा आणि अश्वमेध यज्ञाचा संबंध आहे, असे मुखर्जी यांचे ठाम मत होते.
गुप्त घराण्यात पराक्रमांक समुद्रगुप्त आणि महेंद्रादित्य पहिला कुमारगुप्त या दोन राजांनी अश्वमेध यज्ञ केल्याची नोंद पुराभिलेखांमध्ये वाचायला मिळते. पहिला कुमारगुप्त याने अश्वमेध यज्ञाच्या स्मरणार्थ सोन्याची नाणीसुद्धा पाडली होती. ब्राह्मी शिलालेखात ……अश्वोरस (पहिली ओळ), …….याजिनो (दुसरी ओळ) आणि तिसऱ्या ओळीत …..स्य असे कोरले आहे.
ज्या घोड्याची आहुती अश्वमेध यज्ञात दिली, त्याची ही दगडी प्रतिकृती आहे. यावर कोरलेल्या एका शंख लिपीतील लेखाचे वाचन वि(?)चूर्णित-श्रीपुत्र आणि दुसऱ्या शंख लिपीतील लेखाची सुरुवात ‘मʼ अक्षराने होते. दगडी घोडा अश्वमेध यज्ञात दिलेल्या बळीच्या स्मरणार्थ घडवलेला होता आणि गुप्त घराण्यातील पहिला कुमारगुप्त याची बिरुदावली ‘मʼ अक्षराने सुरू होते. म्हणून त्या ओळीचे वाचन ‘श्री-महेंद्रादित्य’ असे आहे, असा निष्कर्ष मुखर्जी यांनी काढला. ‘वि(?)चूर्णित-श्रीपुत्र’ हा संदर्भ यज्ञात बळी दिलेल्या घोड्यासंदर्भात आहे. यज्ञात घोडा बळी दिला आणि नंतर त्याचे तुकडे केले, असा शिलालेखाचा आशय आहे. श्रीपुत्र हे इंद्राच्या घोड्याचे नाव होते. पहिला कुमारगुप्त याच्या घोड्याला इंद्राच्या घोड्याचे नाव देऊन कुमारगुप्ताची इंद्राशी तुलना केली आहे. या लेखातील शंख लिपीची उकल करण्यासाठी मुखर्जी यांनी मांडलेला निष्कर्ष अनेक तज्ज्ञांनी मान्य केला. ‘आजपर्यंत उकल न झालेल्या लिपीची उकल करण्यात बी. एन. मुखर्जी यांना मिळालेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहेʼ, असे मत प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञ एम. एन. कट्टी यांनी मांडले आहे; तथापि शंख लिपीची मुखर्जी यांनी केलेली ही उकल रिचर्ड सॅलोमन यांना मान्य नाही. फक्त समकालीन ब्राह्मी अक्षरांची शंख लिपीतील अक्षरांशी तुलना करून शंख लिपीची उकल करता येऊ शकत नाही, असे सॅलोमन यांचे मत आहे.
मुखर्जी यांच्या मते, शंख लिपीला अवमूर्ध लिपी किंवा व्यत्यस्ता लिपी असे म्हटले गेले पाहिजे. ललितविस्तार ग्रंथात अवमूर्ध लिपीचे नाव आहे. अवमूर्ध म्हणजे ज्या लिपीतील अक्षरांचा शीर्षभाग खालच्या दिशेला झुकलेला असतो अशी लिपी होय. शंख लिपीतील अक्षरपद्धती बघता त्या लिपीला महावस्तू अवदानमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे व्यत्यस्ता लिपी असेही म्हणता येईल. मुखर्जी यांच्या मते व्यत्यस्ता म्हणजे ‘उलटी लिपीʼ होय. ब्राह्मी लिपीतील अक्षरांमध्ये थोडेसे बदल करून ते शंख लिपीत लिहिले जातात, असे मुखर्जी यांचे मत आहे.
भारतात गुप्तपूर्व ते सु. १००० पर्यत या लिपीचा वापर होत होता. शंख लिपीत कोरलेले शिलालेख जम्मू काश्मीरमधील अकनूर ते कर्नाटकमध्ये संदूर आणि गुजरातमधील जुनागड ते पश्चिम बंगालमधील सुसुनिया या भागांत उपलब्ध आहेत. भारताबाहेर जावा येथे तीन आणि बॉर्निया येथे एक असे शंख लिपीतील एकूण चार शिलालेख मिळाले आहेत. भारतात सु. ६४० शिलालेख शंख लिपीत कोरलेले आहेत. काही शिलालेखांत शंख लिपीतील अक्षरांची उंची काही मीटरमध्ये असून ती अक्षरे काही ठिकाणी एकमेकांवर कोरलेली आहेत.
अहमदपूर, बरौनी, बेसनगर, भारहूत, भोपाळ (मनुआ-बहन-की-टेकरी, लाल घाटी, धरमपुरी), देवगड, ऐरन, गुफा-मसेर, मनसर, कालिंजर, कन्हन, सांची, तिगवा, उदयगिरी, रथचक्की (राजगीर), मुंडेश्वरी मंदिर, खांडगिरी, सुसुनिया लेणीसंकुल (पश्चिम बंगाल), बेतवा इ. शंख लिपीतील शिलालेख असलेली महत्त्वाची ठिकाणे आहेत. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्यातील लेणी क्र. ९ आणि १५ A येथे शंख लिपीतील तीन लेख आहेत.
कारीतलाई, सिलाहर, मडकूघाट, अरंग, बहोरीबंद आणि भापेल येथील शिलालेख काळाच्या ओघात नष्ट झाले. भापेल येथील लेखाचे वाचन डॉ. पांडे यांनी केले होते. सात अक्षरांच्या या लेखाचे ‘श्रीमान रविचंद्र’ असे वाचन करण्यात आले.
विष्णू श्रीधर वाकणकर यांना भीमबेटका शैलगृहांच्या परिसरात गुप्तकालीन शंख लिपीतील लेख कोरलेले सापडले. यांतील काही लेखांचे वाचन करण्यात यश आले असून काही लेखांचे वाचन झालेले नाही. वाचन झालेले लेख म्हणजे व्यक्तींची नावे आहेत. उदा. श्री रामचंद्र, श्री नरेंद्रचंद्र, देशपली, विदीलचंद्र, पवीदेवी, पिशाच इत्यादी.
शंख लिपीतील लेखात संवत्सराचा उल्लेख नसतो. अपवाद भारहूत येथील पूर्वेच्या प्रवेशद्वारावर (सध्या भारतीय संग्रहालय, कोलकाता येथे) असलेला शिलालेख. या लेखात ‘सवछरे ९० फुव फुचवो’ म्हणजे ‘संवत्सर ९० पूर्व उत्सव’ असे कोरले आहे. एका धार्मिक उत्सवाशी निगडित असलेल्या या लेखात संवत्सराचा उल्लेख असल्यामुळे हा महत्त्वाचा शिलालेख आहे.
शंख लिपीच्या अभ्यासासाठी या लिपीचे नामकरण गरजेचे आहे. देशभरातील विविध प्रांतात असलेल्या शिलालेखांचा अभ्यास आणि वाचन होणे आवश्यक आहे. कालानुक्रमानुसार विविध काळात या लिपीतील अक्षरांमध्ये झालेल्या बदलांची नोंद केली पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक ब्राह्मी आणि शंख लिपीतील अक्षरांचा तुलनात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे.
संदर्भ :
- Mukherjee, B. N., ‘The So-called Shell Script : A note on its Deciphermentʼ, Indian Museum Bulletin, Vol. XVI, pp. 128-137, 1981.
- Prinsep, J., Ed., Journal of the Asiatic Society of Bengal, Vol. 5, p. 347, 1836.
- Saloman, Richard, ‘A Recent Claim to Decipherment of the “Shell Script”ʼ, Journal of the American Oriental Society, Vol. 107, pp. 313-315, April-June, 1987.
- Sharma, R. K., Ed., Studies in The Shell Script, Agam Kala Prakashan, Delhi, 1990.
समीक्षक : अभिजित दांडेकर