महाराष्ट्रातील कर्जत (जि. रायगड) जवळील प्रसिद्ध शिलालेख. भारतीय पुरातत्त्व खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोंडाणे लेण्यात एकूण तीन शिलालेख आहेत. परंतु, अनेक विद्वानांनी फक्त दर्शनी भागात असलेल्या शिलालेखाची नोंद घेतलेली आहे. बर्जेस आणि इंद्राजी यांनी त्यांच्या पुस्तकात कोंडाणे लेण्यातील शिलालेखांची नोंद केलेली नाही. एस. नागराजू यांनी त्यांच्या पुस्तकात या लेण्यात असलेल्या तिन्ही शिलालेखांची नोंद घेतलेली असलेली, तरी इतर दोन शिलालेख अप्रकाशित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आजमितीस फक्त दोनच शिलालेखांची स्थाननिश्चिती झालेली आहे.

शिल्परचना, कोंडाणे (जि. रायगड).

चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील डावीकडच्या भिंतीवर भग्नावस्थेतील यक्ष शिल्पाजवळ ब्राह्मी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. अक्षरवाटिकेवरून हा शिलालेख इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धातील असावा.

‘कन्हस अंतेवासिन बलकेन कतंʼ

(कन्हाचा शिष्य बलक याने दिलेले दान / बनवली)

हा शिलालेख यक्षाजवळ कोरलेला आहे, त्यावरून यक्षप्रतिमा बलकाने दान दिलेली असू शकते. डॉ. कर्न यांनी ‘कन्हाचा (कृष्णाचा) शिष्य बलककेन याने बनवलीʼ, असे या शिलालेखाचे वाचन केले. लुडर्स यांनी या लेखाचे ‘कन्हाचा (कृष्णाचा) शिष्य (अन्तेवासिन) बलुक (बलक) याने बनवलीʼ, असे वाचन केले.

लेण्यांमध्ये यक्ष प्रतिमा दान करण्याची परंपरा होती, हे नाशिक लेण्यातील लेणे क्र. १८च्या दर्शनी भागात असलेल्या यक्ष प्रतिमेच्या जवळील शिलालेखावरून दिसून येते.

यक्ष प्रतिमाशिल्प, कोंडाणे (जि. रायगड).

पितळखोरे येथील लेणीसंकुलात असलेल्या यक्षाच्या प्रतिमेवरही कन्ह नाव आहे कोरलेले आहे. बऱ्याचदा असे म्हटले जाते की, पितळखोरे लेण्यातील आणि कोंडाणे लेण्यातील ‘कन्ह’ एकच असावा. कोंडाणे लेण्यातील ‘कन्ह’ हा गुरू आहे. तर पितळखोरे लेण्यातील ‘कन्ह’ हा सुवर्णकार (सोनार) असून त्याचे नाव कन्हदास असे आहे.

चैत्यगृहाशेजारी असलेल्या विहाराच्या दर्शनी भागात दोन टप्प्यांत कोरीवकाम केले आहे. पहिल्या टप्प्यात पायऱ्यापायऱ्यांची नक्षी आणि वेदिकापट्टी कोरलेली आहे. याच टप्प्यावर असलेल्या खालच्या पट्टीवर दोन ओळींचा शिलालेख कोरलेला आहे :

सिधं बरकस ह(ध)मय(क)स
कुचिकापुतस पाठे

(सिद्धी असो. बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र ह(ध)मयक्ष याने पार्श्वभागातील दान दिले.)

सर्वसाधारणपणे दान दिलेल्या वस्तूवर लेख कोरायची पद्धत असते. शिलालेखाच्या पार्श्वभागात विहार असल्यामुळे त्याचे दान ह(ध) मयक्ष याने केले असावे. लेखातील अक्षरे जास्त खोल कोरलेली नसल्यामुळे आणि फार उंचीवर असल्यामुळे हा लेख पटकन दिसून येत नाही. या शिलालेखाचा शोधनिबंध डॉ. रुपाली मोकाशी आणि पंकज समेळ यांनी ॲन्शंट एशिया या नियतकालिकात प्रकाशित केला. या शिलालेखाची अक्षरवाटिका नाणेघाटातील शिलालेखातील अक्षरवाटिकेबरोबर जुळते.

विहाराच्या दर्शनी भागात असलेल्या कोरीवकामाचा दुसरा टप्पा थोडासा पुढे आलेला आहे. या टप्प्यात वेदिकापट्टी आणि त्याच्यावर सहा चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. यांपैकी उजवीकडून दुसऱ्या कमानीत लहान स्तूप कोरलेला आहे. याच टप्प्यावर एक शिलालेख असल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहितीपत्रकात नमूद केले आहे. पण त्याची स्थाननिश्चिती होऊ शकलेली नाही.

संदर्भ :

  • Fergusson, J. & Burgess, J., The Cave Temples of India, Oriental Books Reprint, Delhi, 1969.
  • Gupchup, V., ‘Kondaneʼ, Journal of the Asiatic Society of Bombay, Vol. 38, pp. 174-184, 1963.
  • Mokashi, R. & Samel, P. V., ‘Brahmi Inscriptions from Kondane Cavesʼ, Ancient Asia, 8: 3, pp. 1–7, 2017.
  • Nagaraju, S., Buddhist Architecture of Western India c. 250 BC – c. 300 AD., Agam Kala Prakashan, Delhi, 1981.
  • Qureshi, D., Rock Cut Temples of Western India, Bhartiya Kala Prakashan, Delhi, 2010.

                                                                                                                                                                                     समीक्षक : मंजिरी भालेराव