बालकाचे रूप, वर्तन, आवड, उद्दिष्टे यांतील बदलांचा अभ्यास करून बालक पहिल्या विकासात्मक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पदार्पण करतोय अथवा नाही याचा अभ्यास बाल विकास शिक्षणात प्रामुख्याने केला जातो. बाल विकासाचे अध्ययन हे जन्मपूर्व अवस्थेपासून सुरू होते. अध्ययनाचा काळ हा जन्मपूर्व अवस्था ते पौगंडावस्थेपर्यंत असतो. बालकाचा विकास समजून घेण्यासाठी बालकाची वाढ, त्याचा विकास, आणि परिपक्वता या तीन संज्ञांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
वाढ : वाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे. बालकाच्या शरीरात डोळ्यांनी दिसणारा व मोजता येणारा जो बदल होतो, त्याला वाढ असे म्हणतात. मुलाचे वजन, त्याच्या हातापायाची लांबी, त्याची उंची इत्यादी वाढलेली दिसते. आपल्याला वजन, उंची, जाडी कितीने वाढली आहे, हे मोजता येते. वाढ संख्यात्मक बदल असून हा बदल आकारात व रचनेत होतो. वाढ या शब्दात केवळ शारीरिक वाढ अभिप्रेत असते. शारीरिक वाढ बाह्य व अंतर्गत अवयवांमध्ये होते. बालकांमध्ये परिपक्वता आल्यावर वाढ थांबते. वाढ ही बऱ्याच अंशी अनुवंशाशी संबंधित असते.
विकास : विकास ही वाढीच्या तुलनेत अधिक व्यापक संकल्पना आहे. एलिझाबेथ हरलॉक यांच्या मते, ‘पक्वता व अनुभव यांच्या परिमाणाने होणारे क्रमबद्ध व प्रगतीकारक बदल म्हणजे विकास होय.’ विकास हा गुणात्मक असतो. विकासाचे सहजपणे मापन करणे अशक्य असते. उदा., भाषा विकास किती झाला, हे सेंटीमीटरमध्ये मोजता येत नाही. व्यक्तींच्या वर्तनावरून विकास ओळखला जातो. विकास मृत्यूपर्यंत सुरूच असतो. विकासात शैक्षणिक उपायांनी प्रगती होऊ शकते. विकास हा अनुवंशाबरोबरच परिस्थितीवरदेखील अवलंबून असतो.
परिपक्वता : बालकाच्या प्रत्येक विकासासाठी काही ठराविक काळ जावा लागतो. बालकाची काही शारीरिक व मानसिक तयारी पूर्ण व्हावी लागते. या तयारीस परिपक्वता म्हणतात. मानसशास्त्रीय भाषेत, ‘परिपक्वता म्हणजे विकास घडून येण्यासाठी बालकाची नैसर्गिक रीत्या चालू असलेली शारीरिक व मानसिक पूर्वतयारी.’ परिपक्वता ही वाढ व विकास यांच्याशी संबंधित आहे. परिपक्वतेमुळे बालक काही शिकण्यास सक्षम होतो.
विकासाच्या अवस्था : बालकाच्या वयाचे काही भाग त्यांच्या विकासानुरूप पडले आहेत. त्यास अवस्था असे म्हणतात.
- जन्मपूर्व अवस्था : ही अवस्था आईच्या उदरात जीवधारणा झाल्यापासून सुरू होते. यात जंतू अवस्था, भृणावस्था आणि गर्भावस्था अशा तीन अवस्था असतात. या अवस्थांचा कालखंड साधारणत: २५० ते ३०० दिवसांचा असतो.
- जन्मोत्तर अवस्था : बालकाच्या जन्मापासून १५ दिवसांचा कालावधी नवजात अवस्था, १५ दिवसांपासून २ वर्षांपर्यंत शैशवावस्था, २ ते ६ वर्षांचा कालखंड पूर्व बाल्यावस्था आणि ६ ते १२ वर्षे हा उत्तर बाल्यावस्थेचा काळ किशोरावस्था म्हणून ओळखला जातो. तसेच १३ ते १९ वर्षे हा कालखंड कुमारावस्था, १८ ते ४० तारुण्यावस्था, ४० ते ६० प्रौढावस्था आणि ६० वर्षांपासून मृत्यूपर्यंत वृद्धावस्थेचा कालखंड समजला जातो.
विकासाची अंगे : बालकाचा विकास त्याच्या जन्मापासून विविध बाजुंनी होत असतो. त्याला विकासाची अंगे म्हणतात. बाल विकासात शारीरिक, मानसिक व बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक अंगांचा समावेश केलेला असतो. विकासामध्ये सर्वच अंगांचे अध्ययन केले जाते.
शारीरिक विकास : शारीरिक विकास म्हणजे मुलाच्या जन्मानंतर त्याची उंची, वजन, स्नायू, आंतरिक अवयव या घटकात होणारी वाढ होय. शारीरिक विकास काही निश्चित नियमानुसार व एकसारख्या गतीने होत नाही. त्याच प्रमाणे विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वाढीची गती भिन्न असते. बालकाच्या शरीराचे आंतरिक व बाह्य अवयव असे विभाजन करण्यात येते. आंतरिक अवयवांमध्ये मज्जासंस्था, पचनसंस्था, अस्थी, अंतस्रावी ग्रंथी इत्यादी घटकांचे अध्ययन करण्यात येते; तर बाह्य अवयवांमध्ये वजन, उंची, शारीरिक प्रमाण, दात इत्यादी घटकांचा विचार करण्यात येतो. शारीरिक विकासामध्ये शरीराच्या आंतरबाह्य अवयवांची वाढ व त्यांच्या कार्यासंबंधीचे ज्ञान समाविष्ट असते.
कारक विकास : शरीरातील स्नायू व नसा यांच्या क्रियातील समन्वयामुळे शरीराच्या ज्या हालचाली होतात, त्यांना कारक विकास म्हणतात. मांडी, दंड, कोपरापासून ते मनगटांपर्यंतचे स्नायू, पाठ, मान यांमधील स्नायू हे आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना स्थूल स्नायू म्हणतात. या स्नायूंच्या साहाय्याने होणाऱ्या हालचालीच्या विकासाला ‘स्थूल कारक विकास’ म्हणतात. या स्थूल कारक विकासामुळे बालकाला पळणे, चालणे, नमस्कार घालणे, चेंडू फेकणे, उड्या मारणे, बसणे, उठणे इत्यादी क्रिया करता येतात. हात-पायांच्या बोटांचे स्नायू लहान असतात. या स्नायूंच्या साहाय्याने होणाऱ्या कौशल्य विकासाला ‘सूक्ष्म कारक विकास’ असे म्हणतात. सूक्ष्म कारक विकासामुळे रांगोळी काढणे, दोऱ्यात मनी ओवणे. चित्र रंगविणे, लिहिणे, भ्रमणध्वनी (मोबाईल) हाताळणे, संगणक चालविणे इत्यादी क्रिया करता येतात.
मानसिक व बौद्धिक विकास : बालकाच्या वर्तनावरून मानसिक विकास ओळखला जाऊ शकतो. बालकाच्या मानसिक विकासाला तीन रूपाने समजून घेतले जाते.
- मुलभूत मानसिक क्रिया : यात संवेदन, संकल्पना, स्मरण, विचार, तर्क इत्यादींचे अध्ययन केले जाते.
- बुद्धीचा विकास : जन्माच्या वेळी शिशुमध्ये बौद्धिक योग्यता निम्न स्तरावर असते. वयाच्या वाढीबरोबर तिचा विकास होतो. वर्तनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
- भाषिक विकास : बालकाचा भाषा विकास बुद्धीवरच अवलंबून असतो. त्यामुळे बुद्धीचा विकास होण्यासाठी मुलांची स्मृती, सर्जनशक्ती व कल्पकता वाढीस लागेल अशा खेळांचे आयोजन शाळेत व घरीसुद्धा करावेत. वस्तू व शब्द यांची सांगड घालता येईल असे प्रसंग निवडून त्यांचा उपयोग करून घ्यावा. त्यांचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी भाषिक अभिव्यक्ती कुशलता वाढविण्यासाठी वाचन, भाषण व लेखने यांचा क्रमाने वयानुसार उपयोग करावा.
सामाजिक विकास : प्रत्येक व्यक्तीला समाजाचा जबाबदार घटक व्हावेसे वाटते; पण त्याच बरोबर त्या समाजाच्या काही रुढी परंपरा असतात. त्या रुढी व परंपरा मुलांना आत्मसात करून घ्याव्या लागतात. त्यासाठी लागणाऱ्या क्षमता प्राप्त करून घ्याव्या लागतात. यालाच सामाजिक विकास म्हणतात. मुलांच्या सामाजिक विकासात अनुकरण, प्रतिस्पर्धा, भांडण-तंटा, वस्तुंची देवाण-घेवाण, एकमेकांबरोबर न भांडता खेळता येणे, एकमेकाना मदत करणे, सहानुभूती, सामाजिक मान्यता इत्यादी गोष्टी क्रमाक्रमाने येतात.
भावनिक विकास : प्रेम, भीती, राग, आनंद, मत्सर अशा विविध भावनांचे अध्ययन यात केले जाते. या भावनांचा बालकाच्या विकासावर व्यापक प्रभाव पडतो. हा पराभव अनुकूल व प्रतिकूल दोन्ही प्रकारचा असू शकतो. एखादा तीन वर्षांचा बालक शाळेत वस्तुंसाठी हट्ट करीत असेल आणि त्याची समजूत घातल्यावर तो आपले रडणे थांबवित असेल, तर त्याला भावनांचे नियंत्रण जमू लागले आहे. हाच त्याचा भावनिक विकास होय. भावनािक विकास आणि भावनिक बुद्धिमत्ता हे बालकाच्या वाढत्या वयानुसार क्रमाक्रमाने होत असतो.
सांस्कृतिक विकास : आज माणूस जंगल, पहाड, वाळवंट, सपाट प्रदेश अशा पृथ्वीवरील अनेक भूभागामध्ये वास्तव्यास आहे. तो गाव, वाडी, तांडे, पोड, शहर, नगर अशा ठिकाणी समूहाने राहतात. त्यामुळे विविध ठिकाणचे विविध वातावरण, तेथील प्राकृतिक किंवा सामाजिक स्थित्यंतर, तेथील बोली-भाषा, राहणीमान, सण-उत्सव, वडिलधाऱ्यांचा मानसन्मान इत्यादी सांस्कृतिक परीणाम तेथील बालक अनुभवत असतो. त्याच प्रमाणे ते आपल्या समाजातील संस्कृतीव्यतिरिक्त इतर समाजाच्या सहवासात येत असल्यामुळे त्या समाजातील संस्कृतीचे अनुकरणही करीत असतो. शिक्षण, एकमेकांतील व्यवहार इत्यादींमुळे बालक, व्यक्ती आणि समूह या सर्वांमध्ये अनेक विकासात्मक बदल होतात, यालाच सांस्कृतिक विकास असे म्हणतात.
थोडक्यात, बालकाचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादींचा विकास होऊन त्याच्यात मानवता हा गुण दिसणे, हे बाल विकासात अपेक्षित आहे.
समीक्षक : के. एम. भांडारकर