जगातील एक सर्वाधिक जागृत ज्वालामुखी. पॅसिफिक महासागरात हवाई द्वीपसमूह असून या द्वीपसमूहातील हवाई बेटावरील कीलाउआ (म्हणजे पुष्कळ विस्तारणारा) ज्वालामुखी हे हवाई व्होल्कॅनोज नॅशनल पार्केचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मध्यवर्ती कटाह किंवा ज्वालामुखी महाकुंड, तसेच पूर्व व आग्नेय भागातील भेगांना (खाचांना) अनुसरून असलेला कटाह यांच्यामधून झालेल्या उद्रेकामधील लाव्ह्यापासून याचा लांबट घुमट बनला. ज्वालामुखीचे १,२५० मी. उंचीचे शिखर कोसळून हा कटाह बनला. तो ५ किमी. लांब, ३.२ किमी. रुंद असून त्याचे क्षेत्रफळ १० चौ. किमी. पेक्षा जास्त आहे. याचे पश्चिम व उत्तर दिशांतील उतार लगत असलेल्या माउना लोआ या ज्वालामुखीच्या उतारांमध्ये मिसळून गेलेले आहेत.
एकोणिसाव्या शतकात कीलाउआ कटाहाच्या तळभागावर लाव्हा भरला जाण्याचे व तो खचण्याचे अनेक प्रसंग घडले. इ. स. १९१९ मध्ये त्याची खोली १५० मी. झाली. अलीकडील लाव्हा प्रवाहांमुळे त्याच्या तळभागाची फरसबंदी तयार झाली. तिच्यात हालेमाऊमाऊ (म्हणजे फर्न हाऊस वा नेचागृह) हे आतले कुंड ०.८ किमी. रुंदीचे असून हे या ज्वालामुखीचे सर्वाधिक क्रियाशील निर्गमद्वार आहे. इ. स. १८२३ ते इ. स. १९२४ दरम्यान त्यामध्ये बुडबुडेयुक्त लाव्ह्याचे सरोवर होते. हवाईयन अग्निदेवता पेले हिचे हालेमाऊमाऊ हे दंतकथेमधील गृह आहे. हालेमाऊमाऊजवळ, ज्वालामुखीच्या पश्चिम कडेवरील युवेकाहुना येथे हवाईयन व्होल्कॅनो ऑब्झर्व्हेटरी आहे.
किलाउआ ज्वालामुखीचे वारंवार होणारे उद्रेक बहुधा स्फोटक नसतात. क्रियाशील लाव्ह्याचे सरोवर असलेल्या हालेमाऊमाऊमध्येच ते होतात. कधीकधी लाव्हा वर येऊन ते भरून जमिनीवरून व खुद्द कटाहाच्या बाजूंवरून वाहतो; परंतु इ. स. १७९० मध्ये वाफेच्या जोरदार स्फोटांमुळे कटाहाजवळून संचलन करीत जाणाऱ्या सैनिकांपैकी काहींचा मृत्यू झाला. इ. स. १९२४ मधील कमी शक्तिशाली उद्रेकाने हालेमाऊमाऊ कटाह ४०० मी. खोलीपर्यंत विस्तारला. पूर्वेच्या भेगांतील १९५५ च्या उद्रेकाबरोबरची जबरदस्त भूकंपांची मालिका ही या बेटांच्या इतिहासातील एक सर्वाधिक विध्वंसक घटना होती. तेव्हा लाव्हा ८८ दिवस भेगांतून बाहेर पडत होता. त्यामुळे एक खेडे व १६ चौ. किमी. पेक्षा अधिक क्षेत्रातील मौल्यवान फळझाडे व वेताचे क्षेत्र (केनलँड) नष्ट झाले. याच प्रकारच्या, परंतु अल्पकालीन अशा १९७५ मधील घटनेनंतर विनाशकारी व अतिशय उंच लाटा निर्माण झाल्या. १९८३ मध्ये उद्रेकांची मालिका सुरू झाली. या ज्वालामुखीतून लाव्ह्याची नदी निर्माण झाली आणि ती त्याच्या दक्षिणेस ४८ किमी. अंतरावर समुद्रापर्यंत जाऊन पोचली. २०१८ मध्येही या ज्वालामुखीतून उद्रेकांची मालिका सुरू झाली होती. या वेळी अनेक भेगांमधून बाहेर पडलेला लाव्हा आणि सल्फर डाय-ऑक्साइड वायूचे ढग लगतच्या प्रदेशात दूरवर पसरले होते. त्यातील एक उद्रेक तर इतका स्फोटक होता की, त्यातून बाहेर पडलेल्या राखेचा फवारा हवेत ९,१४० मी. उंचीपर्यंत पोहोचला होता.
कीलाउआच्या थेट पूर्वेस असलेल्या कीलाउआ आयकी या कटाहात १९५९ मध्ये प्रेक्षणीय उद्रेक झाला. यामुळे १२० मी. खोलीचे वितळलेल्या लाव्ह्याचे सरोवर निर्माण झाले व पुउउ पुआई (बाहेर पडलेली टेकडी) व तिच्या दक्षिण कडेशी अंगार शंकू निर्माण झाला. पूर्वेकडील भेगांच्या क्षेत्रविभागात अनेक खात (खळगे) कटाह असून त्यांचा शेवट माकोओपुही (खोली ३०० मी.) येथे झाला आहे. मौना आयकी हा वाळवंटी क्षेत्रातील कमी उंचीचा ज्वालामुखी घुमट कीलाउआ ज्वालामुखीपासून ९.५ किमी. वर असून तो भेगांच्या नैर्ऋत्य क्षेत्रविभागात आहे. कीलाउआच्या पश्चिम व उत्तर बाजूंना मौना लोआ ज्वालामुखी, नैर्ऋत्येला काऊ वाळवंट, दक्षिणेला आयनाहोऊ रँच आणि उत्तर व ईशान्येला उष्णकटिबंधीय फर्न जंगल आहे. समुद्रतटीय काऊ वाळवंटात रखरखीत (उजाड) लाव्हा, ज्वालामुखी राखेचे पोपडे आणि वाऱ्याने वाहून आणलेली राख व पमीस यांच्या जागा बदलणाऱ्या वालुकागिरी आहेत. थर्स्टन लाव्हा ट्यूब हा १३५ मी. लांबीचा बोगदा कटाहाच्या पूर्वेस आहे. जेव्हा लाव्हा प्रवाहाचे बाह्य कवच कठीण होत गेले, तेव्हा वितळलेल्या लाव्ह्याचा प्रवाह सारखा वाहत राहिल्याने हा बोगदा तयार झाला. किपुका पुआउला (याला बर्ड पार्क असेही म्हणतात) हे गवताळ कुरण (शाद्वल) ज्वालामुखीच्या वायव्येला असून त्यात विविध प्रकारच्या वृक्षांचे समुदाय ठिपक्यांसारखे दिसतात. तसेच त्यात उघड्या वा मोकळ्या वनापर्यंत जाणारी नैसर्गिक अशी मळलेली वाट असून तेथे अनेक प्रकारचे स्थानिक वृक्ष आहेत.
कीलाउआ ज्वालामुखीच्या उद्रेकांचे स्वरूप स्फोटक नसून ते कमी धोक्याचे आहे. त्यामुळे या ज्वालामुखीचे निरीक्षण व अभ्यास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातून याच्या निर्गमद्वारातील लाव्ह्याचे तापमान १,१००° ते १,१५०° से. आढळले होते. तसेच त्यातील वायू गोळा करून त्यांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यांवरून येथे वाफ, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन, नायट्रोजन, आर्गॉन हे वायू असल्याचे लक्षात आले.
समीक्षक : वसंत चौधरी