कॅनडाच्या अगदी उत्तर भागातून वाहणारी नदी. तीला ग्रेट फिश नदी या नावानेही ओळखले जाते. या नदीची लांबी ९७५ किमी. असून पाणलोट क्षेत्र १,०६,००० चौ. किमी. आहे. या नदीचा उगम ग्रेट स्लेव्ह सरोवराच्या ईशान्य भागातील, नॉर्थ स्लेव्ह प्रदेशातील अनेक लहानलहान सरोवरांतून होतो. ही नदी उत्तर कॅनडातील बॅरन ग्राउंड्स (बॅरन लँड्स) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उपध्रुवीय प्रेअरी (टंड्रा) या भौगोलिक प्रदेशाचे जलवाहन करते. हा प्रदेश नुनाव्हट टेरिटरीमधील डिस्ट्रिक्ट ऑफ मॅकेंझी व डिस्ट्रिक्ट ऑफ किवेटिन या जिल्ह्यांत येतो. उगमानंतर ती अनुक्रमे आग्नेयीस, दक्षिणेस, उत्तरेस, पूर्वेस व ईशान्येस वाहत जाऊन चँट्री इन्लेट (उपसागर) या आर्क्टिक महासागराच्या फाट्याला जाऊन मिळते. कॅप्टन जॉर्ज बॅक (अ‍ॅडमिरल सर जॉर्ज) यांनी इ. स. १८३३ ते इ. स. १८३५ या कालावधीत या नदीचे समन्वेषण केले. त्यामुळे त्यांच्या नावावरून या नदीला बॅक हे नाव देण्यात आले. प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह असल्यामुळे ती जलवाहतुकीस उपयुक्त नाही. एस्किमो लोकांची विखुरलेली अल्प वस्ती वगळता बॅक नदीच्या बऱ्याचशा खोऱ्यात मानवी वस्ती आढळत नाही.

आपल्या प्रवाहमार्गात ती मस्कॉक्स, मॅली, हॉक, रॉक, इस्केप, सँडहिल, वुल्फ, व्हर्लपूल इत्यादी ८३ द्रुतवाहांवरून आणि सिनक्लेअर जलप्रपातावरून वाहत जाते. उगमापासून ते मुखापर्यंतच्या तिच्या पात्रात ससिक्स, मस्कॉक्स, बीची, पेली, गॅरी, मॅकडूगल, फ्रँकलिन ही सरोवरे निर्माण झाली आहेत. बॅक नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी आयसी, काँटवॉयटो, सिओरॅक, वॉरन, बुलन व माँट्रीसर या डावीकडून मिळणाऱ्या; तर बेली, जेरव्हॉइज, मकिन्ली, कॉन्सूल, मीडोबँक, हर्मन, मिस्टेक व हेझ या उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत. बेली आणि कॉन्सूल या दोन नद्यांदरम्यानच्या बॅक नदीप्रवाहाने थीलॉन वन्यप्राणी अभयारण्याची उत्तर सीमा सीमित केली आहे.

बॅक नदीच्या खोऱ्यात समृद्ध वन्य प्राणिजीवन आढळते. नदीत वेगवेगळ्या जातीचे मासे सापडतात. नदीखोऱ्यात कॅरिबू, कस्तुरी-वृषभ, लांडगे, वेगवेगळ्या प्रकारची अस्वले, आर्क्टिक ससे इत्यादी प्राणी तसेच विविध पक्षी पाहायला मिळतात.

समीक्षक : नामदेव स. गाडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.