बॅक, सर जॉर्ज (Back, Sir George) : (६ नोव्हेंबर १७९६ – २३ जून १८७८). ब्रिटिश नौसेना अधिकारी, आर्क्टिक प्रदेशाचा समन्वेषक आणि कलाकार. त्यांचा जन्म इंग्लंडच्या चेशायर परगण्यातील स्टॉकपोर्ट येथे झाला. इ. स. १८०८ मध्ये ब्रिटिश नौसेनेमध्ये लढाऊ गलबतात एक स्वयंसेवक म्हणून ते दाखल झाले. १८०९ मध्ये बिस्के उपसागरातील लढाईत फ्रेंचांनी पकडेपर्यंत सामील झाले होते. १८०९ ते १८१४ या काळात ते फ्रेंचांच्या तुरुंगात होते. त्या वेळी त्यांनी आपल्या जलरंग कलाविषयक कौशल्याचा भरपूर सराव केला. त्याचा उपयोग पुढे त्यांना आर्क्टिकमधून प्रवास करताना त्यांच्या नोंदी करण्यासाठी झाला. तुरुंगातून सुटल्यानंतर रॉयल नौसेनेत एक मिडशिपमन म्हणून ते रुजू झाले. १८१८ मध्ये त्यांनी स्वालबारची (स्पिट्सबर्गेन) पहिली सफर केली. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आर्क्टिक प्रदेशाच्या समन्वेषणासाठी घालविले. ब्रिटिश समन्वेषक जॉन फ्रँक्लिन यांच्या वायव्य कॅनडात सर्वेक्षणासाठी गेलेल्या १८१९ ते १८२२ आणि १८२५ ते १८२७ मधील दोन सफरींत बॅक हे सहभागी झाले होते. त्यांपैकी १८१९ ते १८२२ च्या वायव्य कॅनडातील कॉपरमाइन नदीकडील सफरीत सर्व प्रकारचे सर्वेक्षण करण्याची आणि आराखडे तयार करण्याची जबाबदारी बॅक यांच्यावर होती. या सफरीत त्यांनी कॉपरमाइन नदीच्या पूर्वेकडील कॅनडाच्या उत्तर किनाऱ्याचे समन्वेषण केले. मॅकेंझी नदीकडील दुसऱ्या सफरीत कॅनडाच्या वायव्य भागातील ग्रेट बेअर सरोवराजवळ आणि आर्क्टिक किनाऱ्यावर ते पोहोचले होते. या वेळी त्यांना पहिल्यांदा लेफ्टनंट व त्यानंतर कमांडर म्हणून बढती मिळाली (१८२५). १८२७ ते १८३३ या काळात जहाजावर नेमणूक न मिळाल्यामुळे बेकार म्हणून अर्धपगारी यादीत त्यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी आर्क्टिक प्रदेशाच्या स्वत:च्या दोन सफरी केल्या.

ब्रिटिश समन्वेषक जॉन रॉस आपल्या १८२९ मधील आर्क्टिक प्रदेशाकडील सफरीत बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न झाले; परंतु १८३३ पर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. रॉस यांचा शोध घेणे, तसेच ग्रेट स्लेव्ह सरोवर आणि ग्रेट फिश नदीचे समन्वेषण करणे असे दोन प्रस्ताव बॅक यांच्यापुढे ठेवण्यात आले. त्यांनी ते स्वीकारून फर व्यापारी मार्गाने जाऊन पुढे ईशान्येकडे ग्रेट फिश सरोवर आणि ग्रेट फिश (सांप्रत बॅक) नदीच्या दिशेने म्हणजेच रॉस यांच्या संभाव्य मार्गाच्या दिशेने जायचे, असे निश्चित करण्यात आले. त्या दृष्टीने बॅक यांनी १८३३ ते १८३५ या काळात आपली स्वत:ची पहिली सफर केली. फेब्रुवारी १८३३ मध्ये त्यांनी इंग्लंड सोडले. या साहसी सफरीत त्यांनी ग्रेट फिश नदीचे आणि कॅनडाच्या वायव्य प्रदेशात असलेल्या माँट्रिऑल बेटाचे समन्वेषण केले. त्यांच्याच नावावरून ग्रेट फिश नदीला बॅक नदी असे नाव देण्यात आले. त्या काळापर्यंत कोणाही गोऱ्या व्यक्तीने ही नदी किंवा सरोवर पाहिलेले नव्हते; परंतु इंडियन लोकांकडून त्याविषयी माहिती मिळाली होती.

बॅक नदीच्या मुखापासून पूर्वेकडील किनारी प्रदेशाचे समन्वेषण करण्यासाठी बॅक यांनी १८३६-३७  मध्ये दुसरी सफर केली. टेरर या गलबतातून ६० सहकारी आणि पुरेसी आवश्यक साधनसामग्री व खाद्यपदार्थांसह ते सफरीवर निघाले. ऑर्कनी बेटे पार करून ते हडसन सामद्रधुनीपर्यंत पोहोचले; परंतु हिमवृष्टीमुळे त्यांचे टेरर गलबत तेथे १० महिने अडकून पडले. हिमाच्छादन कमी झाल्यानंतर ते परत निघाले. या सफरीत त्यांनी कॅनडाच्या आर्क्टिक किनाऱ्याचे समन्वेषण केले. प्रतिकूल हिम व वातावरणाच्या स्थितीमुळे त्यांची ही सफर विशेष यशस्वी झाली नाही. त्यांच्या सफरींचे वर्णन असलेली नॅरेटिव्ह ऑफ द आर्क्टिक लँड एक्स्पिडिशन टू द माउथ ऑफ द ग्रेट फिश रिव्हर (१८३६) आणि नॅरेटिव्ह ऑफ एक्स्पिडिशन इन एच्. एम्. एस्. टेरर (१८३८) ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली. या पुस्तकांत त्यांनी आराखड्यांसह आपली प्रवासवर्णने, तेथील वनस्पतीजीवन, वातावरण स्थिती व इतर अनुभवांचे वर्णन केले आहे.

आयुष्यभर केलेल्या समन्वेषणविषयक कार्यासाठी त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. त्यांनी रॉयल जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले असून १८३९ मध्ये संस्थेने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. त्यांना १८५७ मध्ये रिअर-ॲडमिरल, १८६३ मध्ये व्हाइस-ॲडमिरल आणि १८७६ मध्ये ॲडमिरल म्हणून बढती देण्यात आली.

बॅक यांना जलरंगाविषयी चांगली जाण होती. त्या काळातील ते प्रसिद्ध आर्क्टिक छायाचित्रकार व प्रदेश नकाशाकार होते. लुसिडा कॅमेऱ्याचा वापर करून उत्तर कॅनडातील नव्याने शोधलेले भूप्रदेश, जंगलातील वणवे, द्रुतवाह, शैलसमूह, सफरीच्या मार्गावरील तळांचा परिसर, स्थानिक सजीव इत्यादींचे हुबेहूब आराखडे, नकाशे व चित्रे त्यांनी रेखाटली होती. फ्रँक्लिन यांची दुसरी सफर आणि बॅक यांची बॅक नदीची जमिनीवरील सफर यांचे दस्तावेज कॅनडाच्या राष्ट्रीय अभिलेखागारात जतन करून ठेवले आहेत.

बॅक यांचे लंडन येथे निधन झाले.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम