मृदुकाय (Mollusca) संघातील शिंपाधारी (Bivalvia) वर्गात तिसऱ्याचा समावेश होतो. सर्व गोड्या व खाऱ्या पाण्यात असणाऱ्या शिंपल्यामधील मृदुकाय सजीवांना तिसरी किंवा तिसऱ्या असे नाव आहे. दोन समान किंवा समान आकाराच्या शिंपल्यामध्ये (पुटांमध्ये) त्यांचे शरीर बंदिस्त असते. त्यामुळे यांना द्विपुटी असेही म्हणतात. समुद्र, खाडी तसेच नदी तळाशी चिखलात व वाळूत रुतून बसणारा तिसऱ्या फार प्राचीन काळापासून अन्न म्हणून वापरला जातो. इंग्रजीत त्यांना बायव्हाल्व्ह (Bivalves), क्लॅम्स (Clams) व कॉकल्स (Cockles) असे म्हटले जाते.

तिसऱ्या : पृष्ठभाग व आंतरभाग रचना

तिसऱ्या बहुतांशी वालुकामय चिखल व गाळ असलेल्या सागरी व गोड्या पाण्याच्या सरोवरामध्ये, नदी प्रवाहात तसेच किनाऱ्यावर आढळतात. पूर्व आफ्रिका, फिलिपाईन्स, पूर्व जपान, चीन, थायलंड, कोरिया, मलेशिया, दक्षिण इंडोनेशिया तसेच आखाती प्रदेशांच्या किनारपट्टीवर हे जीव मोठ्या प्रमाणात दिसून येतात. भारतात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ तसेच बंगाल राज्याच्या किनारपट्टीवरील भागात तिसऱ्या विपुल प्रमाणात सापडतात.

तिसऱ्याच्या जगभरात सुमारे ३,३०० प्रजाती (हुबर, २०१०) असून भारतीय किनारपट्टीवर याच्या सुमारे १२ खाण्यायोग्य प्रजाती आढळतात. मेरेट्रिक्स मेरेट्रिक्स (Meretrix meretrix), मेरेट्रिक्स कास्टा (Meretrix casta), सुनेट्टा स्क्रीप्टा (Sunetta scripta), मार्शिया ओपिमा (Marcia opima), पॅफिया मलबारिका (Paphia malabarica), मेसोडर्मा ग्लॅब्राटम (Mesoderma Glabratum), पॅफिया टेक्स्टाइल (Paphia textiles), कॅटेलेशिया ओपिमा (Katelysia opima), अनादरा ग्रॅनोसा (Anadara granosa), व्हिल्लोरिटा सायप्रिनॉइड्स (Villorita cyprinoides), गेलोइना बेंगालेन्सिस (Geloina bengalensis), डोनॅक्स क्युनेट्स (Donax cuneatus), ट्रिडॅक्ना गिगास (Tridacna gigas) ह्या भारतीय किनारपट्टीवर सापडणाऱ्या तिसऱ्याच्या काही प्रमुख जाती आहेत. यापैकी ट्रिडॅक्ना प्रजाती मोठ्या आकाराची असून तिची लांबी सुमारे १२० सेंमी. व वजन सु. २०० किग्रॅ. आहे. ती अंदमान बेटावर सापडते. तेथील स्थानिक लोक या शिंपल्याचा वापर लहान मुलांसाठी पाळणा म्हणून करतात. १९५६ मध्ये ओकिनावा या जपानी बेटावर जगातील सर्वांत मोठे सुमारे ३०० किग्रॅ. वजनाचे ट्रि. गिगास सापडले आहे. डब्लिन (Dublin) येथील ‘नॅचरल हिस्टरी म्युझियम’मध्ये ते ठेवले आहे.

तिसऱ्या (ट्रिडॅक्ना गिगास)

शरीररचना : तिसऱ्याची दोन्ही पुटे एकमेकांना बिजागरीप्रमाणे जोडलेली असतात. ह्या पुटांची उघडझाप विशिष्ट अभिवर्तनी स्नायूंमुळे (Adductor and abductor muscles) होते. काही देशांत फक्त हे स्नायू खाण्यायोग्य समजून इतर मांसल भाग टाकून दिला जातो. तिसऱ्यांना एकमेव स्नायुमय पाद (पाय) असतो, तो प्रचलनासाठी वापरला जातो. तिसऱ्यांना स्पर्श केल्यास हा मांसल पाय आत घेऊन किंचित उघडलेल्या कवचाची पुटे घट्ट मिटून ते स्वत:ला बंदिस्त करून घेतात.

श्वसन व अन्नग्रहण : तिसऱ्यांमध्ये क्लोम हे मुख्य श्वसनांग असून अन्नग्रहण देखील क्लोमांमार्फत होते. बाहेरील पाणी आत घेण्यासाठी एक अंतर्वाही तसेच उत्सर्जित पाणी व पदार्थ बाहेर टाकण्यासाठी बाहेर उघडणारी बहिर्वाही नलिका असते. अंतर्वाही नलिकेतून आलेले पाणी सूक्ष्म केशिकांच्या समन्वयित आणि एकत्रित स्पंदनाने क्लोमांवर पसरले जाते. त्यातील विरघळलेला प्राणवायू श्वसनासाठी शोषला जातो आणि नंतर ते पाणी बहिर्वाही नलिकेतून बाहेर टाकले जाते. ह्याच क्लोमांवर असलेल्या सूक्ष्म केशिका पाण्यातील प्लवके व सेंद्रीय कण गाळून घेतात. गाळलेल्या प्लवकांत श्लेष्म (चिकट स्त्राव) मिसळला जाऊन ते अन्न सूक्ष्म केशिकांच्या वेगवान स्पंदनामुळे तोंडाजवळ वाहून नेले जाते. तिसऱ्यांमधे विवेचक अन्नप्राशन (Selective feeding)  दिसून येते. नको असलेले अन्न गाळासारखे बाहेर टाकले जाते.

प्रजनन : तिसऱ्यांमध्ये काही अपवाद वगळता लिंगभेद आढळतो. मादी परिपक्व अंडी पाण्यात सोडते. नर त्यावर शुक्राणु सोडतो. अंड्याचे फलन पाण्यातच होते. अंड्यातून बाहेर पडलेली पिले पाण्यावर तरंगू लागतात, अवस्थांतर होऊन तिसऱ्यांसारखे दिसणारे डिंभ वाळू-चिखलमय अध:स्तरावर स्थिर (Substratum) होतात. तिसऱ्याच्या अंडोत्सर्जनाच्या प्रक्रियेवर पाण्याच्या तापमानाचा प्रभाव पडतो. अतिथंड पाण्यात अंडोत्सर्जन होत नाही. अंडी अंडाशयातच पुढील वर्षाचा अनुकूल काळ येईपर्यंत परिपक्व अवस्थेत राहतात. कालव (Oyster) ह्या प्रकारातील तिसऱ्यामध्ये परिपक्व अंड्यांचे उत्सर्जन न झाल्यास त्यांचे जननग्रंथीच्या ऊतीमधे पुन:शोषण होते. तिसऱ्यांचे प्रजनन वर्षभर जरी होत असले तरी पावसाळ्यात त्याचा उच्चांक असतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच काढणी केल्याने लहान अपूर्ण वाढ झालेल्या तिसऱ्या नष्ट होतात. त्यामुळे पुढील हंगामात त्यांच्या संख्येमध्ये घट होते.

तिसऱ्या : आंतरिक रचना

तिसऱ्यांच्या बहुतांश जाती ह्या समुद्र किंवा खाडी किनाऱ्यावर सापडत असल्या तरी लाटांच्या तडाख्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांचे वास्तव्य उथळ पाण्यात असते. ते नेहमी समूहाने राहतात. अधिवासाचे तीन थर असतात. सर्वांत वरील थर वाढ न झालेल्या तिसऱ्यांचा असतो. पूर्ण वाढलेल्या तिसऱ्या खोल भागांत असतात. भरतीच्या वेळेस तिसऱ्या पाण्याखाली असतात, मात्र ओहोटीच्या वेळी त्या आपल्या पादाच्या (Foot) साहाय्याने चिखल किंवा वाळूत स्वत:ला गाडून घेतात. समुद्रातील ओहोटीच्या वेळी किनारपट्टीवर हाताने किंवा लोखंडी अवजाराचा वापर करून वाळू व चिखल खणून काढतात. कोकणात रत्नागिरी येथे लोखंडी किंवा लाकडी चौकटीवर बसवलेल्या लहान अर्धवर्तुळाकार जाळ्याचा तिसऱ्या काढण्यासाठी वापर करतात. त्याला ‘येंड’ असे म्हणतात. काही देशांत यांत्रिक बोटींच्या साहाय्याने लोखंडी पिंजरा (clam hoe)  वापरून तिसऱ्या गोळा करतात. तिसऱ्याच्या काही प्रजाती नदी वा तळ्यातही सापडतात. केरळमधील वेम्बनाड सरोवरातील कमी क्षारता असलेल्या पाण्यात व्हिल्लोरिटा सायप्रिनॉइड्स  या काळ्या तिसऱ्या सुमारे ४ मीटर खोलीपर्यंत सापडतात. तर स्थानिक लोक पाण्यात बुडी मारून मेरेट्रिक्स तिसऱ्या मिळवतात.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सापडणाऱ्या तिसऱ्यांच्या काही प्रमुख जाती खालीलप्रमाणे आहेत —

(१) मेरेट्रिक्स मेरेट्रिक्स (Meretrix metetrix) : वालुकामय किनारपट्टीवर सापडणारी ही तिसऱ्यांची एक प्रमुख जात असून तिला इंग्रजीत व्हिनस क्लॅम्स (Venus Clams) असे म्हणतात. या त्रिकोणी आकाराच्या असून पुढील टोक फुगीर, गोलसर व मागील टोक अरुंद असते. ओहोटीच्या वेळेस त्या वाळूत किंवा चिखलात आत शिरतात, त्यामुळे त्यांना पकडणे अवघड जाते. त्यांचे शिंपले गुळगुळीत राखाडी व पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी पट्टे असतात. तिसऱ्याची ही प्रजाती पुलीकत व चिल्का सरोवरातही सापडते. यांची वाढ ७५ मिमी.पर्यंत होते. पूर्ण वाढ होण्याआधीच या गोळा केल्या जातात.

(२) मेरेट्रिक्स कास्टा (Meretrix casta) : या पिवळसर रंगाच्या तिसऱ्या असून पुटांच्या कडांजवळ करड्या रंगाचा हलकासा पट्टा दिसतो. प्रदूषणविषयक अभ्यासात निर्देशक (Indicator species) म्हणून यांची ओळख आहे. त्यांची वर्षभरात साधारण ४६ मिमी. इतकी वाढ होते. बऱ्याचदा लहान आकाराचे परजीवी खेकडे हे तिसऱ्यांच्या आत राहून त्यांना इजा पोहोचवतात.

(३) पॅफिया टेक्स्टाइल (Paphia textile) : या चमकदार पिवळसर रंगाच्या तिसऱ्या लांबट अंडाकृती असून त्यावर इंग्रजी V अक्षराच्या आकाराने बनलेली सुंदर नक्षी असते. मुंबईतील प्रसिद्ध गिरगांव चौपाटीजवळ तसेच कारवार, उत्तर कर्नाटक येथेही ह्या सापडतात.

(४) कॅटेलेशिया ओपिमा (Katelysia opima) : तुलनेत आकाराने लहान असलेल्या या तिसऱ्यांना इंग्रजीत बेबी क्लॅम (Baby clam) असे म्हणतात. रत्नागिरीच्या भाट्ये व काळबादेवी खाडीत विपुल प्रमाणात सापडतात. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अड्यार खाडीमध्ये सुद्धा त्यांची मासेमारी चालते.

(५) अनादरा ग्रॅनोसा (Anadara granosa) : ह्या जातीच्या तिसऱ्या मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर तुरळक प्रमाणात सापडतात. पांढरट रंगाच्या या शिंपल्यांवर उभ्या खाचा असतात. त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिन असल्यामुळे त्यांचे मांस तांबड्या रंगाचे दिसते, म्हणून त्यास ब्लड कॉकल्स (Blood Cockles) असेही म्हणतात. ह्या तिसऱ्या दक्षिण भारतातील किनारपट्टीवर खाल्ल्या जातात. मात्र, महाराष्ट्रात त्या विशेष खाल्ल्या जात नाहीत. या शिंपल्यांची कॅल्शियम कार्बोनेटयुक्त भुकटी औद्योगिक उत्पादनात वापरली जाते.

तिसऱ्या : विविध जाती

उपयोग : तिसऱ्या हे गरिबांचे खाद्य समजले जाते. त्यातील प्रथिने, ग्लायकोजेन व खनिजामुळे त्यांचे पोषणमूल्य उच्च असते. त्यामुळे आजकाल तिसऱ्यांची स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढत आहे. तिसऱ्यांच्या खाद्यामध्ये अन्नाची उपलब्धता, जननेंद्रियांची परिपक्वता, अंडोत्सर्जन इत्यादी विविध घटकांवर खाद्य मूल्य अवलंबून असते. प्रजनन काळात प्रथिने व कर्बाची साठवणूक होत असल्याने त्या काळात तिसऱ्यांच्या मांसाची गुणवत्ता उत्तम असते. अंडोत्सर्जनापूर्वीच्या तिसऱ्यांचे मांस विशेष चवदार असते. तिसऱ्यांचे मांस गोठवून ते परदेशी पाठवले जाते. तिसऱ्यांच्या मांसापासून लोणचे, सॉस अशी मूल्यवर्धित उत्पादनेही बनविली व निर्यात केली जातात. तिसऱ्यांच्या कठीण कवचापासून अलंकार, शोभिवंत व सजावटी वस्तू बनविल्या जातात. चुना बनविण्यासाठीही शिंपले वापरले जातात. कुक्कुटपालन व कागद उद्योगातही शिंपल्यांचा वापर होतो. प्राचीनकाळी चलन म्हणूनही शिंपले उपयोगात आणले जात असल्याच्या नोंदी सापडतात.

तिसऱ्यांच्या पाणी गाळून अन्न गोळा करण्याच्या गुणधर्माचा उपयोग मत्स्यशेतीमधे केला जातो. मत्स्यसंवर्धनाच्या तलावात ज्यामध्ये मासे, कोळंबीची वाढ होते त्या पाण्यात तिसऱ्यांची वाढ केली जाते. या पाण्यात अवशिष्ट अन्न व माशांची विष्ठा असते. या सेंद्रिय घटकांवर प्लवकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. असे पाणी नैसर्गिक जलस्रोतात सोडण्यापूर्वी त्यात तिसऱ्यांची वाढ करण्यात येते. प्लवकांचा व सेंद्रीय कणांचा तिसऱ्या अन्न म्हणून वापर करतात. अशा पाण्यात त्यांची वाढ जोमाने होते. तसेच ‘प्रक्रिया’ तलावातील पाणी स्वच्छ होऊन बाहेर सोडल्याने नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होत नाही.

अति उष्ण, अतिथंड तापमान तिसऱ्यांसाठी मारक ठरते. तसेच कमी क्षारता असलेले पाणी देखील त्यांच्या वाढीसाठी पोषक नसते. जलविद्युत् प्रकल्पातून सोडले गेलल्या पाण्यामुळे तसेच वाळू खननामुळे कित्येक ठिकाणी तिसऱ्यांचे टापू उद्ध्वस्त झाले आहेत. घरगुती सांडपाणी व औद्योगिक कारखाने ह्यांतून सोडलेल्या प्रदूषित पाण्यामुळे तिसऱ्यांची पिले तसेच पूर्ण विकसित तिसऱ्यांचीही मोठी मरतुक होते. तिसऱ्यांच्या मरतुकीला कारण होणारे हे घटक नियंत्रित करून त्यांची यशस्वी शेती केली जाऊ शकते.

तिसऱ्या ह्या इतर द्विपुटी प्राण्याप्रमाणे जड धातू, किटकनाशके व इतर प्रदूषकांची साठवण आपल्या शरीरात करतात. त्यामुळे प्रदूषित पाण्यातील तिसऱ्या खाण्याने आरोग्याला हानी पोहचू शकते. हे टाळण्यासाठी निर्मलीकरणाची प्रक्रिया केली जाते. तिसऱ्यांच्या शेतीत त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर काढणी करण्याअगोदर एक दिवस त्यांना खाद्यापासून वंचित केले जाते. त्यासाठी तिसऱ्यांना स्वच्छ पाण्यात ठेवले जाते. त्यानंतर २ तास क्लोरीनयुक्त पाण्यात ठेवले जाते. त्यामुळे त्या निर्जंतुक होऊन त्यांचा जीवाणु गणनांक (Bacterial Count) कमी होतो.

पहा : कालव (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

समीक्षक : विनय देशमुख