कायटन हे मृदुकाय संघातील (Mollusca) बहुकवची पॉलिप्लॅकोफोरा (Polyplacophora) वर्गातील प्राणी असून किनाऱ्यालगतच्या भरती-ओहोटीमधील प्रदेशांत समुद्रतळाशी किंवा खडकाला चिकटून त्यांच्या खाचीत असतात. काही प्रजाती ह्या समुद्रात ८,००० मी. इतक्या खोलीवरही आढळून येतात. ह्या वर्गात सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या सुमारे ९४० व जीवाश्म स्वरूपातील ४३० प्रजातींची नोंद केली गेली आहे.
कायटन हे महाराष्ट्रातील रत्नागिरी, अलिबाग व गुहागर येथील खडकाळ किनारपट्टीवरील खडकांना चिकटलेले आढळतात. तसेच गुजरातमधील ओखा येथील किनारपट्टीवर ६-७ सेंमी. लांबीचे विविध रंगांतील कायटन आढळतात. कायटनच्या बहुसंख्य प्रजाती ह्या आकाराने लहान म्हणजेच साधारणपणे २-५ सेंमी. लांबीच्या असतात. मात्र, पॅसिफिक महासागरात आढळणारी क्रिप्टोकायटन स्टेलेरी (Cryptochiton stelleri) ही प्रजाती सुमारे ४३ सेंमी. इतकी लांब वाढते. तिला गम्बूट कायटन (Gumboot Chiton) असेही म्हणतात.
कायटनचे शरीर चपटे व लंब गोलाकार असते. कॅल्शियमयुक्त आठ चकत्यांनी बनलेले बहिर्गोलाकार बाह्यकवच हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ह्या चकत्या टणक, मांसल पट्टीने वेढलेल्या असतात. त्यावर खवले, कंटक, केशिका अथवा सूक्ष्म कणी असते. अग्र आणि पार्श्व भागात ह्या चकत्या एकावर एक अशा रीतीने जोडलेल्या असतात की, प्राणी आपले शरीर गोलाकारात किंवा अर्ध गोलाकारात वळवू शकतो. ह्या वैशिष्ट्यपूर्ण कवचामुळे त्यांच्या मऊ शरीराचे संरक्षण होते. तसेच त्यांना उंचसखल खडकाळ पृष्ठभागावर सहजपणे हालचाल करता येते.
शरीराचा अधर (खालचा) भाग हा स्नायुमय पादाने व्यापलेला असून ह्या पादाचे आकुंचन करीत आणि श्लेष्माचे स्त्रवण करीत परिवलन (Rotation) केले जाते. संस्पर्शक अथवा डोळे नसतात. शरीराच्या पृष्ठभागावर (वरील भागावर) टोकाशी शीर्ष तर अधर बाजूला गुदद्वार असते. मुख अधर पृष्ठावर असून त्यात असणाऱ्या दंतपट्टीकेवर बारीक दातांच्या अनेक पंक्ती असतात. संधीप्रकाशात अन्न शोधण्यासाठी हे प्राणी बाहेर पडतात. शैवाल, डायाटम (Diatom) हे त्यांच्या आहारातील प्रमुख घटक असून तळाशी असलेल्या कुजलेल्या अवशेषांवरही हे गुजराण करतात. दंतपट्टीकेवरील अग्रभागी असणाऱ्या दंतपंक्ती अन्न ग्रहणासाठी वापरल्या गेल्यावर गळून पडतात किंवा त्या गिळल्या जातात, सरकत्या पट्ट्याप्रमाणे (Conveyor belt) मागील नविन दंतपंक्ती अग्रभागी येतात. अशा रीतीने नष्ट झालेल्या दातांच्या जागी नवे दात येतात. कायटन त्यांच्या दंतपट्टीकेवर असणाऱ्या मॅग्नेटाइट या जैव-क्षारआवरणामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देतात. आपल्या मूळ जागी परतण्यासाठी ह्या क्षमतेचा आणि शरीरातून स्रवणाऱ्या रासायनिक द्रव्याचा वापर केला जातो.
यांच्यात नर व मादी अशी लिंग भिन्नता आढळते. शक्यतो बाह्यफलन होते. काही वेळा मादीच्या देहगुहेतही फलन घडून येते. मुक्तपणे पोहू शकणारे त्यांचे ट्रोकोफोर डिंभ (Larva) ह्यांची गणना सागरी प्राणी-प्लवकांत केली जाते. कायटन ट्युबरक्युलॅटस (Chiton tuberculatus) या सामान्य कायटनचे आयुष्य सुमारे तीन वर्षे असते.
सागरी खाद्यान्न म्हणून जरी कायटनचा वापर प्रचलीत नसला तरी पॅसिफिक किनाऱ्यावरील उत्तर अमेरिकेतील काही जमाती क्रिप्टोकायटन स्टेलेरीचा वापर खाण्यासाठी करतात.
पहा : मृदुकाय संघ.
संदर्भ :
- http://agris.fao.org/agris-search/search.do?recordID=US201600082318
- https://www.britannica.com/animal/chiton-mollusk
- https://www.encyclopedia.com/environment/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/polyplacophora-chitons
- https://en.wikipedia.org/wiki/Chiton
समीक्षक : नंदिनी देशमुख