हेमन्स, फेलिसिया डोरोथिया (ब्राउन) : (२५ सप्टेंबर १७९३-१६ मे १८३५). स्वच्छंदतावादी संप्रदायातील लोकप्रिय इंग्रजी कवयित्री. जॉर्ज ब्राउन आणि फेलीसिटी डोरोथिया-वागनर या दांपत्यापोटी लिव्हरपूल, इंग्लंड येथे तिचा जन्म झाला. फेलिसिया भावंडांमध्ये चौथी होती. फेलिसिया आणि तिची भावंडं वेल्समधील समुद्र किनाऱ्याजवळील निसर्गरम्य परिसरातील एका जुन्या प्रशस्त घरात वाढले. इतिहास, इतिवृत्त, प्रणयरम्यता (स्वच्छंदतावाद) या विषयावरील पुस्तके आणि विविध प्रकारच्या कविता यांचे तिने वाचन केले होते. तिचे शिक्षण सलगपणे झाले नाही; मात्र तिच्या शिक्षणाचे स्वरूप तिच्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या विकासास अनुकूल होते. तिने शास्त्रीय आणि काव्यात्मक विषयांवर तसेच अनेक भाषांवरही प्रभुत्व मिळविले. इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि जर्मन भाषा तिने अवगत केल्या होत्या. वयाच्या १९ व्या वर्षी तिने कॅप्टन अल्फ्रेड हेमन्सशी लग्न केले, पाच मुलांचे पालकत्व लाभल्यावरही सात वर्षांनंतर ते विभक्त झाले. असे असतानाही तिने स्वतःतील कल्पकता आणि सृजनात्मक दृष्टिकोण यांची जपणूक केली.
साहित्यिक कारकीर्दीला सुरुवात करताना फेलिसीयाने एडिनबर्ग ऐनुअल रजिस्टरसाठी सदरात्मक लेखन केले (१८१५). या लेखनामुळेच तिची जॉन मरे या प्रकाशकाशी ओळख झाली. जॉन मरे यांनी तिच्या द रीस्टोरेशन ऑफ द वर्क्स ऑफ आर्ट टू इटली (१८१६) आणि मॉर्डन ग्रीस (१८१७) या पुस्तकांचे प्रकाशन केले. वयाच्या चौदाव्या वर्षी पोएम्स हा तिने किशोरवयात लिहिलेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला होता (१८०८). १८१६ ते १८३४ या कालवधीत एकूण २४ खंडांमध्ये तिच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तिच्या चरित्रकारांच्या मते रेकॉर्डस ऑफ वूमेन (१८२८) या काव्यसंग्रहाद्वारे ती सर्वाधिक प्रसिद्ध झाली. तिने प्रणयरम्य विषयावर अगदी सहज आणि आकर्षक पद्धतीच्या अभिव्यक्तीतून काव्यलेखन केले. नयनरम्य निसर्ग, निरागस बालपण, निर्दोषपणा, प्रवास, स्वातंत्र्य, वीरता इ.विषय तिच्या कवितेत आढळतात. भावनांचे विखुरलेपण पकडणाऱ्या अल्पाक्षरी कवितांसाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. ‘द लँडिंग ऑफ द पिलग्रीम फादर्स’, ‘कॅसाबियान्का: द बॉय स्टूड ऑन द बर्निंग डेस्क’, ‘द होम्स ऑफ इंग्लंड : द स्टेटली होम्स ऑफ इंग्लंड’ या त्यातील काही विशेष अल्पाक्षरी कविता होत. स्त्रीच्या आयुष्यात तणाव निर्माण करणाऱ्या बाबी आणि स्त्रीचे पृथगात्म अनुभव यांविषयी तिच्या कविता सखोल चर्चा करतात. तिच्या काव्यनिवेदनात लय आणि आशय यांची एकात्मता साधलेली दिसते. तिची कविता कल्पक आणि उत्साही स्वभावाची निर्मिती आहे, ती अतिशय गुंतागुंतीची नाही. तिच्या कविता साधेपणा, आशय समृद्धता आणि भाषिक सौंदर्यासाठी वाखाणल्या गेल्या. तिने आपली शेवटची कविता २६ एप्रिल १८३५ ला ‘शब्बाथ सॉनेट’ या नावाने प्रसिध्द केली. ही कविता तिने आपल्या भावाला समर्पित केली होती. तिच्या कवितांचा बालकविता म्हणूनही विचार करण्यात आला; तथापि अलिकडच्या वर्षांत तिच्या कार्याची पुन्हा गंभीरपणे तपासणी केली गेली आहे.
लॉर्ड बायरन, विल्यम वर्ड्स्वर्थ आणि सर वॉल्टर स्कॉट यांसारख्या नामांकित लेखकांनी तिच्या कवितांची भरभरून प्रशंसा केली आहे. एकोणिसाव्या शतकातील कवितांमध्ये विशेषतः ब्रिटनमधील ब्राउनिंग्ज, टेनिसन आणि किपलिंग यांच्या गीतांच्या नवीन रूपांत आणि अमेरिकेतील सिगॉर्नी, लॉन्ग फेलो, व्हिटियर आणि हार्पर यांच्या काव्यावरही हेमन्सचा प्रभाव जाणवतो. १९८० च्या दशकात स्त्रीवादी समीक्षकांनी हेमन्सने मांडलेली महिलांची परिस्थिती आणि सर्जनशील मुल्ये यांचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तिचे साहित्य प्रथम महायुद्ध होईपर्यंत ब्रिटन आणि अमेरिकेत वारंवार प्रकाशित होत गेले. तिच्या नावाने लिव्हरपूल विद्यापीठाद्वारा फेलिसिया हेमन्स काव्य पुरस्कार वितरीत केला जातो.
वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी ती डब्लिन येथे मरण पावली.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Felicia-Dorothea-Hemans.
- Sweet, Nanora, Oxford Dictionary of National Biography, 24, (Hemans [née Browne], Felicia Dorothea (1793–1835), poet) Oxford University Press, 2021.
समीक्षक : लीना पांढरे